कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम

२२ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.

वारकरी संत आपल्या समाजाचे लोकशिक्षक होते. त्यांनी समाजाला अध्यात्माबरोबरच नीतीची शिकवणही दिली. ‘आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत’ या अभंगातून तुकोबारायांनी जगाला नीतीची शिकवण देण्यात आम्हाला कौतुक वाटतं, असं म्हटलंय. लोकांना सामाजिक नीतीची शिकवण देण्यासाठी संतांनी पुराणकथांचा चांगला उपयोग करून घेतला आहे.

नामदेवराय पहिले रामकथाकार

आपल्या भारतीय समाजमनावर रामकथेचा विलक्षण प्रभाव असल्याने या रामायणातल्या अनेक कथा संतांनी आपल्या अभंगातून लोकांसमोर ठेवल्या आहेत. रामायणातल्या अनेक प्रसंगांचा वापर करून संतांनी आपला नीतीविचार त्यातून व्यक्त केला आहे.

संतांनी त्यांच्या अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. मराठीतून पहिली रामकथा लिहिली ती संत नामदेवरायांनी. नामदेवराय हे महाराष्ट्रातले आद्य रामकथाकार. त्यानंतर संत एकनाथबाबांनी विस्ताराने मराठीतून रामायण लिहिलं.

नाथबाबांनंतर रामायणातल्या काही प्रसंगांचा आधार घेऊन तुकोबारायांनी अभंगरचना केली. नामदेवराय, एकनाथबाबा आणि तुकोबाराय या संतांबरोबरच इतरही संतांनी रामकथेतले काही प्रसंग आपल्या अभंगातून मांडलेले आहेत.

हेही वाचा: मुंह मे राम, बगल में वोट

कबीरांनी रामाला वैश्विक केलं

महत्त्वाचं म्हणजे वारकरी परंपरेतल्या संतपंचकांपैकी एक असणार्‍या कबीरांची रामभक्तीही प्रसिद्ध आहे. तुकोबांनी एका अभंगात नामदेवराय विठ्ठलभक्त, ज्ञानोबाराय कृष्णभक्त आणि कबीर रामभक्त असल्याचं सांगितलंय. ‘रामकृष्णहरी’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. या मंत्रातला हरी म्हणजेच विठ्ठलभक्तीसाठी नामदेवराय, कृष्णभक्तीसाठी ज्ञानोबाराय तर रामभक्तीसाठी कबीर प्रसिद्ध आहेत.

एका अर्थाने कबीरांच्या रामभक्तीने वारकरी परंपरेच्या मंत्राला पूर्णत्व मिळालं. कबीरांनी रामाची निर्गुणोपासना आपल्याला शिकवली. कबीरांचा राम निर्गुण आहे. त्यामुळेच त्यांना राम आणि रहीम यांच्यात फरक दिसत नाही. कबीरांनी रामाला एका धर्माच्या कोषातून बाहेर काढून वैश्विक केलं. त्यांनी आपल्या भारतीय समाजाला रामनामाची ताकद समजावून सांगितली.

कबीरांच्या या ‘निराकार’ रामाबरोबर मराठी संतांच्या ‘साकार’ रामाचे ‘सद्गुण’ खूप महत्त्वाचे आहेत. रामाची सगुणोपसाना करणार्‍या मराठी संतांनी रामाच्या जीवनातील प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून दिलीय.

बिभीषणाला लंकाराज्य देणारा राम

रामाच्या जीवनात त्यांची त्यागाची भूमिका दाखवणारे दोन प्रसंग आहेत. पहिला प्रसंग म्हणजे वडील दशरथांच्या वचनासाठी राजगादी सोडून चौदा वर्षे त्यांनी वनवास भोगला आणि दुसरा प्रसंग म्हणजे लंका जिंकल्यावर ती आपल्या ताब्यात न ठेवता बिभीषणाकडे सोपवली.

या दोन्हीही प्रसंगातून रामाला सत्ता गाजवण्यात फारसा रस नव्हता, असं दिसतं. विशेषतः लंका बिभीषणाकडे सोपवताना रामाच्या उदार त्यागाचं आपल्याला दर्शन घडतं. संतांनी रामाच्या जीवनातले हे दोन्ही प्रसंग आपल्या अभंगात नमूद केलेत. डोक्यावरच्या गुंडाळलेल्या जटा हाच जणू फेटा आणि अंगाला गुंडाळलेल्या झाडाच्या सालीची वल्कलं हीच वस्त्रभूषण मानून राम जगला.

वैकुंठाचा राजा असतानाही राम एखाद्या योग्याप्रमाणे त्यागी भूमिकेत कसा जगला, याविषयी नामदेवरायांनी एक अभंग लिहिलाय.या अभंगात नामदेवरायांनी वडलांच्या वचनरक्षणासाठीचा रामाचा त्याग मांडलाय. ‘पितृवचनालागी मानोनी साचारी। जाला पादचारी वनी हिंडे।’ असं त्यांनी रामाचं वर्णन केलंय. याबरोबरच बिभीषणाला लंकाराज्य देण्याचा प्रसंगही काही अभंगात आलाय.

सत्तेला चिटकून न राहता लंकाराज्य बिभीषणाकडे सोपवणार्‍या रामाची उदारता तुकोबांनी एका अभंगात अधोरेखीत केली आहे. ‘लंकाराज्य बिभीषणा। केली चिरकाळ स्थापना॥ औदार्याची सीमा। काय वर्णू रघुरामा॥’ असं म्हणत तुकोबांनी बिभीषणाकडे लंकाराज्य सुपूर्द करणार्‍या रामाचं औदार्य मांडलं आहे.

हेही वाचा: जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

रामाच्या पराक्रमाच्या प्रेरणा

रामाच्या उदारतेबरोबरच संतांनी त्यांच्या पराक्रमाची महती गायलीय. खरं तर नामदेवरायांच्या काळात मराठी माणसांच्या पराक्रमाला उतरती कळा लागली होती. त्यानंतर तर मराठी माणसं हतबल झाली. निराशेचा काळोख दाटला. नेमक्या याच काळात संतांनी मराठी समाजाला रामाच्या पराक्रमाची आठवण करून दिली.

वानरांसोबत स्वतः दुष्टांवर चाल करून विजयश्री खेचून आणणार्‍या कोदंडधारी रामाच्या पराक्रमाच्या कथा एकनाथबाबांनी आपल्या रसाळ वाणीनं तळागाळात पोचवल्या. नंतरच्या काळात शहाजीराजे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी माणसांच्या पराक्रमाची कमान चढतीच राहिली.

मराठी माणसांच्या या पराक्रमाला अनेक कारणं आहेत; पण संतांनी सांगितलेल्या रामाच्या पराक्रमाच्या कथा हे त्यापैकी एक कारण आहे हे नक्की.

सीता रामाचं प्रेममय नातं

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. खरं तर रामाचं त्याच्या घरातल्या सर्व माणसांवर प्रेम होतं. स्वतःला कितीही कष्ट सोसावं लागलं तरी चालेल; पण घरातली माणसं सुखात असावीत, असं रामाला वाटायचं.

पित्याच्या वचनासाठी ते वनवास भोगायला तयार झाले, यावरून त्यांचं वडलांवरचं प्रेम दिसतं. वडलांबरोबरच रामाचं सीतेवरचं प्रेम दाखवणारा एक प्रसंग आहे. ज्यावेळी रावणानं सीतेला पळवून नेलं. त्यावेळी राम वेड्यासारखा रानावनात शोक करत फिरत होता, अशी वर्णनं तुकोबारायांनी त्यांच्या अभंगात केली आहेत.‘वनांतरी रडे। ऐसे पुराणी पवाडे।’ असं त्या प्रसंगाविषयी तुकोबाराय लिहितात.

सीतेच्या विरहानं व्याकूळ होऊन रानावनात रडत हिंडणार्‍या रामाच्या त्या प्रसंगातून पती-पत्नीचं नातं प्रेममय असावं, हेच संतांना सूचित करायचं आहे. रामाचं त्याच्या धाकट्या भावांवरही जबरदस्त प्रेम होतं. लक्ष्मणशक्तीचा असाच एक प्रसंग नाथबाबांनी रामायणात नमूद केलाय. लक्ष्मण युद्धात मूर्च्छा येऊन पडला होता. त्यावेळी रामानं केलेला शोक काळजाला घरं पाडणारा आहे. राम आणि त्यांचे सर्व भाऊ यांचं परस्परांवरचं प्रेम विलोभनीय आहे.

हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

शबरीसोबतचं आंतरजातीय सहभोजन

घरातल्या माणसांवर प्रेम करणारा हा कुटुंबवत्सल राम भक्तवत्सलही आहे. ‘श्रीराम प्रेमवत्सलू। श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू। श्रीराम भक्तकाजकृपाळू। दीनदयाळू श्रीराम॥ या ओवीतून नाथरायांनी रामाची भक्तवत्सलता व्यक्त केली आहे. रामाच्या भक्तांवरच्या प्रेमाची अशीच एक कथा संतांनी वारंवार सांगितली आहे. ही कथा आहे भिल्लीण शबरीची.

रामाला गोड बोरं खाऊ घालण्यासाठी शबरी दररोज बोरं आधी चाखून बघायची. जी बोरं गोड असतील तीच रामासाठी ठेवायची. जेव्हा रामाची आणि शबरीची भेट झाली तेव्हा शबरीने चाखलेली तीच उष्टी बोरं रामानं खाल्ल्याची कथा प्रसिद्ध आहे. आपल्या भारतीय समाजात अन्नोदक व्यवहारावर कठोर जातीय निर्बंध आहेत.

आपल्यापेक्षा खालच्या मानल्या गेलेल्या जातीच्या व्यक्तीचे अन्न अथवा पाणी चुकूनही खाऊ-पिऊ नये, असा धर्मशास्त्राचा नियम आहे. संतांना भोजन व्यवहारातला हा जातिभेद अर्थातच मान्य नव्हता. त्यामुळे संत पारंपरिक सनातन्यांना न जुमानता धर्मशास्त्राचा नियम झुगारून बेधडकपणे आंतरजातीय सहभोजन करत.

संतांनी आपण करत असलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या कृतीला आधार म्हणून रामचरित्रातील हा भिल्लीण शबरीची उष्टी बोरं खाण्याचा प्रसंग अनेकदा सांगितला आहे.

धार्मिक नियमांपेक्षा प्रेम महत्त्वाचं

चोखोबारायांच्या घरी देवासोबत अनेक जातीचे संत जेवणासाठी आले होते, अशी एक कथा आहे. यावेळी कोणीतरी सनातनी हे पाहतील, अशी भीतीही चोखोबारायांनी बोलून दाखवली होती. चोखोबारायांच्या काळानंतर नाथबाबांनीही राणू नावाच्या एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या भक्ताच्या घरी जेवण केलं होतं.

नाथबाबांच्या या कृतीमुळे अनेकजण त्यांच्यावर चिडले होतेच; पण त्यांचा पोटचा मुलगाही या प्रसंगामुळे नाथबाबांवर चिडून काशीला निघून गेला होता. अर्थातच नाथबाबांना त्याची पर्वा नव्हती. संतांनी सुरू केलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या मोहिमांना रामकथेतल्या या प्रसंगाचा खूप मोठा आधार होता.

‘भिल्लीणीची बोरे कैसी। चाखोनी वाहतसे देवासी॥’

असं यामुळेच जनाबाईंनी म्हटलंय. देवाला म्हणजेच रामाला जातीविषयाच्या धार्मिक नियमांपेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे, हेच या रामकथेतून संतांनी समाजाला सुचवून दिलंय.

हेही वाचा:  ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त

कर्मकांडापलीकडचा प्रेमभक्तीचा मार्ग

वारकरी संत प्रेमभक्तीचे पुरस्कर्ते होते. भक्तीसमोर ब्रह्मज्ञानाची आणि कर्मकांडाची मातब्बरी त्यांना मान्य नव्हती. ब्रह्मज्ञान आणि कर्मकांड हे दोन्ही मार्ग अतिशय अवघड होते आणि त्यावर केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. त्यामुळेच संतांनी ज्ञानकांड आणि कर्मकांड यापेक्षा भक्तिकांडाचा महिमा वाढवला.

प्रेमभक्तीचं कर्मकांडाच्या तुलनेतले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तुकोबांनी रामाने शबरीची बोरं खाण्याचा हा प्रसंग आपल्या अभंगात मांडलाय. यज्ञात देवांना संतुष्ट करण्यासाठी तूप, तीळ, तांदूळ यांसारख्या पदार्थांची समंत्रक आहुती दिली जाते. यावेळी अतिशय काटेकोरपणे शुचिता पाळली जाते; पण यज्ञयागाचा कर्मकांडी मार्ग देवाला फारसा आवडत नाही त्यामुळे तो यज्ञात खोड्या काढतो.

मंत्रातल्या बारीक चुका काढून यज्ञ विफल करून टाकतो. यज्ञातल्या आहुतीवर सहजासहजी संतुष्ट न होता त्यात काहीतरी खोड काढणारा हाच राम शबरीनं चाखून उष्टी केलेली बोरं मात्र आवडीनं खातो. यावरून कर्मकांडापेक्षा प्रेमभक्तीचा मार्ग रामाला जवळचा वाटतो, अशी तुकोबारायांनी मांडणी केली आहे. ‘यज्ञमुखी खोडी काढी। कोण गोडी बोरांची॥’ असं याविषयी तुकोबारायांनी म्हटलंय.

न्यायी आणि आदर्श राजा

राम घरातल्या माणसांवर आणि भक्तांवर जसा प्रेम करत होता. तसाच तो आपल्या राज्यातल्या प्रजेवरही प्रेम करत होता. संतांनी रामाची एक ‘प्रजावत्सल राजा’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. ‘आले रामराज्य आम्हा सुखा काय उणे’ अशा शब्दात तुकोबारायांनी रामराज्याचं कौतुक केलंय.

वनवासाच्या काळात रामाने अनेक देश वसवले, असं तुकोबारायांनी म्हटलंय. तुकोबारायांच्या काळात राजमाता जिजाऊंनी ओस पडलेलं पुणं नव्यानं वसवलं होतं. कदाचित यामुळेच आदर्श राजा नवीन राज्य वसवतो, असं तुकोबारायांना सुचवायचं असावं.

वनवासाच्या काळात नवीन देश वसवणारा, वनवास संपल्यावर सगळ्या जनतेला समाधान देणारे राज्य चालवणारा आणि पीकपाणी-दूधदुभत्याची भरभराट करून उत्पन्न वाढवणारा एक न्यायी आणि आदर्श राजा अशी रामाची प्रतिमा संतांनी उभी केलेली आहे.

हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

एकनाथांनी रामकथेकडे कसं पाहिलं?

अशा प्रकारे संतांनी प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श मूल्यांची पेरणी करण्यासाठी रामकथा सांगितली आहे. संतांची आणि विशेषतः नाथरायांची विस्ताराने रामकथा लिहिण्यामागची भावना काय असावी याविषयी गं. बा. सरदार यांनी केलेलं विवेचन फारच महत्त्वाचं आहे.

 सरदार लिहितात - ‘भागवत धर्माचं निरूपण करण्यासाठी एकनाथांनी एकादश स्कंध निवडला; पण कथारचनेच्या वेळी मात्र रामायणाची कास धरली, हे त्यांच्या समयज्ञतेचं आणि समाजप्रवणतेचं द्योतक आहे. रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांनी आज शेकडो वर्ष हिंदवासीयांना सामाजिक नीतिमत्तेचं बाळकडू पाजलंय. त्यातल्या महानुभावांच्या चरित्रापासून स्फूर्ती घेऊनच निरनिराळ्या काळातल्या धर्मसंस्थापकांनी आमच्या सांस्कृतिक मूल्यांची जोपासना केली आहे.'

'रामायण हे तर राजधर्म, पुत्रधर्म, क्षात्रधर्म, पत्नीधर्म, सेवाधर्म आदीकांचे स्फूर्तिदायक आणि अमर प्रात्यक्षिक आहे. स्वतः रामाच्या चरित्रात त्याग आणि तपस्या, प्रभुत्व आणि पराक्रम, स्वाभिमान आणि सहिष्णुता, लोकसंग्रह आणि संघटना चातुर्य हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला या गुणांची किती आवश्यकता याची एकनाथांना पुरती ओळख होती. म्हणून त्यांनी इतक्या विस्ताराने रामचरित्राचं वर्णन केलं.’

सरदारांच्या या विवेचनावरून संतांची रामकथेकडे पाहण्याची दृष्टी कशी होती, हे स्पष्ट होतं. त्यामुळेच संतांनी त्यांच्या साहित्यातून जो राम उभा केलाय तो समजून घेण्याची आजच्या काळात खूपच गरज आहे. त्यांच्या अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा
लागेल.

हेही वाचा: 

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

दिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा

बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर

(लेखक तरुण वारकरी कीर्तनकार आहेत)