राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशात जाणारी तमसा नावाची गंगेची उपनदी आजही आहे. आजही तिचं निर्मळ पाणी आणि तीरावरचं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहून टाकतं. वाल्मिकींसारख्या संवेदनशील मन कमावलेल्या ऋषीला हजारो वर्षांपूर्वी ते आवडलं नसतं तरच नवल. गंगास्नानासाठी निघालेल्या वाल्मिकींनी तमसा नदीच्या किनारी आंघोळ करायचा निर्णय घेतला.
तेवढ्यात त्यांनी एक प्रणयात दंग असणारी क्रौंच पक्षाची जोडी बघितली. ती पाखरं एकमेकांत इतकी मिसळून गेली होती की त्यांना जगाचं भानच उरलं नव्हतं. संसाराचं महत्त्व आणि व्यर्थता या दोघांचं समग्र भान मिळवून त्याच्या पलीकडे गेलेले वाल्मिकी प्रेमाचा तो उत्कट आविष्कार पाहून प्रसन्न झाले होते.
कुठून तरी एक बाण आला आणि त्याने क्रौंच जोडीतल्या नराचा वेध घेतला. वर्मी लागलेल्या बाणाने तो मुका जीव तडफडून मेला. त्याच्या सखीला ते सहनच झालं नाही. दुःखाच्या आवेगाने तिने हंबरडा फोडला आणि प्राणही सोडला. हे पाहणाऱ्या वाल्मिकींच्या काळजाचं पाणी पाणी झालं. हे कोणी केलंय, यासाठी ते आजूबाजूला बघत होते.
तेवढ्यात तीरकामठा घेतलेला पारधी त्यांना दिसला. त्याला बघून ते रागाने थरथर कापू लागले. त्यांच्या सात्विक चेहऱ्यावर संतापाच्या खुणा दिसू लागल्या. आपसूकच त्यांचे ओठ उघडले. एकाच वेळी वेदनेने रडत स्फुंदत आणि क्रोधाने व्याकूळ होत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ।।
थोडा शोध घेतल्यावर त्याचा अर्थ असा सापडतो, `हे निषाधा, तू कामात दंगून प्रणय करणाऱ्या क्रौच पक्षांच्या जोडीपैकी एकाचा वध केलास. त्यामुळे तुला आता अनंत काळापर्यंत कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही.`
या दोन ओळींना संस्कृत साहित्यात फार महत्त्व आहे. हे संस्कृतमधलं पहिलं काव्य मानलं जातं. आज इतिहासवाले सांगतात, वेद वगैरे होते त्याआधीही. तरीही हे पहिलं का मानलं गेलं असेल? या प्रश्नाची हजारो वर्षं पुन्हा पुन्हा सांगितली गेलेली तयार उत्तरं आहेतही. पण माणसाच्या वेदनेतून उभ्या राहिलेल्या, माणसाशी जोडलेल्या, माणुसकीचं प्रतिबिंब उमटलेल्या या संस्कृतमधल्या बहुतेक पहिल्याच दोन ओळी होत्या. संस्कृतला आकाशातून जमिनीवर आणलेल्या या दोन ओळींतून नवा छंद रचला गेला. महान संस्कृत काव्याचा पाया रचला गेला.
प्रेमाचा स्पर्श झाल्यावर माणसाचा कवी होतो, असं प्लेटो म्हणाला होता. तसंच काहीतरी झालं असावं. वाल्मिकींसमोर निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कार घडत होता. त्यातून उमटलेल्या शब्दांत प्रेमाची ताकद तर होतीच, पण त्यापेक्षाही प्रेमाकडे नितळपणे पाहणाऱ्या नजरेची ताकद होती. आज काही हजार वर्षांनंतरही ती ताकद कायम टिकून आहे. आजही वाल्मिकींचा तो शाप प्रेमाच्या वैऱ्यांना भोवत असणारच. वॅलेंटाइन डे आला की पुन्हा पुन्हा जागा होत असणारच.
हेही वाचा: रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?
वाल्मिकींनीच लिहिलेल्या रामायणातल्या बजरंगाच्या नावाने दल काढणारे, श्रीरामांच्या नावाने सेना काढणारे, रामाचं नाव सांगत रोमियो स्कॉड काढणारे वॅलेंटाइन डे निमित्त प्रणयात दंग जोडप्यांना मारत असतात, हाकलत असतात, त्यांना बदनाम करत असतात, त्यांना वाल्मिकींचा हा शाप भोवत असणारच.
वाल्मिकी तर पाखरांची जोडी तुटली म्हणून व्याकुळ झाले होते. इथे तर एकमेकांवर जीव लावणारी जितीजागती माणसं आहेत. तरीही वाल्मिकींच्या रामायणाचा वारसा सांगत कुणाला असं कसं करता येतं? असं करणाऱ्यांना वाल्मिकीच्या शापामुळे निरंतर प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता नाहीच. त्यांना तळमळत तडफडत रहावं लागणार आहेच.
मुळात रामच प्रेममूर्ती आहे आणि रामायण ही लवस्टोरीच आहे, सीतारामांच्या महान प्रेमाची. सीता या स्वतंत्र महान व्यक्तिमत्त्वाची. या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला समाजाच्या रूढी परंपरांना नाकारत सन्मान देणाऱ्या रामाची. एकाच पत्नीशी एकरूप होऊन दुसरीचा विचारही न करणाऱ्या निष्ठेचा नवा आदर्श उभा करणारी. दोन निष्पाप प्रेमी जीवांच्या विरहाची. रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर रामाने केलेला विलाप त्याची साक्ष आहे.
अर्थात रामायणातल्या उत्तरकांडाने हे प्रेम काळवंडून टाकलंय. कारण स्त्रीत्वाचा सन्मान नाकारणारा सीतात्याग आणि शिक्षणाचा अधिकार नाकारणारी शंबूकहत्या त्यात आहे. पण रामायणातलं हे प्रकरणच प्रेमाच्या पुरुषी विचारांच्या वैऱ्यांनी नंतर घुसवलंय. वाल्मिकींनी ते लिहिलेलं नाहीच. अशी रामायणाच्या अभ्यासकांची खात्री आहे.
हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक
ती धूळ झटकली की फक्त प्रेमच दिसतं. नितांत प्रेम. प्रेमाचं प्रतिबिंब रामात दिसतं आणि रामाचं प्रेमात. राम आणि प्रेम वेगळे नाहीच. म्हणूनच जगाविषयी प्रचंड प्रेमानं ओथंबलेलं हृदय असणाऱ्या रामाची गोष्ट भारताची ओळख बनलीय. जगाला भुरळ पाडतेय. इथे दोन माणसं एकमेकांना भेटली की रामराम म्हणतात. इथे माणूस मरतो तेव्हा तो राम म्हणतो. कशातही दम नसेल, तर राम नसतो.
भूत पळवायलाही राम म्हणायला लागतं. कुणाला माहीत नसते ती गोष्ट राम जाने असते. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत असा विश्वास असलेले शेकडो तलाव, देवळं, नद्या, डोंगर आहेत. त्यांच्यात रामाचं प्रेम शोधलं जातं. रामाचं नाव आजही लाखो जणांच्या मनात प्रेम फुलवतं.
पण आज याच प्रेममय रामाचा वापर करून द्वेषाचं हुकमी आणि नगदी पीक काढलं जातंय. रामाने वैऱ्याचाही सन्मान केला. आपलं वाईट केलं त्यालाही रिटर्न प्रेमच दिलं. राम असेल तिथे द्वेष असूच शकत नाही. म्हणून द्वेष असेल तिथे राम कसा असणार? एखाद्या समाजाचा द्वेष तर नाहीच नाही. इथे आजही रामनामात दंग झालेले हजारो मुसलमान आहेत. मग ते वारकरी असतील, कबीरपंथी असतील, रामानंदी असतील किंवा अगदी सुफीही.
रामलीलेसारख्या रामगाथांत रमणारे मुसलमान फक्त भारतातच नाही, तर आग्नेय आशियातल्या अनेक देशांतही आहेत. आणि आपल्याला रामाच्या प्रेमाची ओळख करून देणारे संत कबीर धर्माने कोण होते? आणि जगातला सर्वात मोठा रामजन्मोत्सव एका मशिदीत ज्यांच्या प्रेरणेने होते, ते साईबाबा तरी कोण होते?
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. पूजापाठ करायची गरज नाही.
हेही वाचा: जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड
राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं. जीवाच्या आकांताने थेंब थेंब प्रेम गोळा करावं लागतं. प्रेमासाठी जगावं लागतं. प्रेमासाठी मरावं लागतं. सगळीकडे फक्त प्रेमच असावं लागतं. इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई, असं घडावं लागतं. कुन फाया कुन.
प्रेम करत नाहीत, त्यांना राम कळू शकत नाही. द्वेष करत असतील, त्यांना राम भेटू शकत नाही. भूमिकन्या सीतेने दिलेल्या नांगराचा सन्मान करू शकत नाहीत, त्यांना राम कळू शकत नाही. रामायणाचे आदर्श पायदळी तुडवत बायकोला आपल्या आयुष्याचा भागही बनवू शकत नाहीत, त्यांनी तर राम आठवण्याचाही विचारदेखील करू नये. प्रचार करणाऱ्यांना देणग्या मिळू शकतील, राम नाही मिळू शकणार.
प्रेम नाही, तर राम नाही. प्रेम कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे. ते सृष्टीच्या आधीपासून होतं, नंतरही राहणार आहे. मुळात ते आहे, म्हणूनच सृष्टी आहे. ते आपल्यात असतं, म्हणून आपण असतो. तेरी तिरछी नजर ने दिल को कर दिया पेंचर असं 'देल्ली बेल्ली'तलं गाणं गात कुणी प्रेमभंगाचं दुःख सांगेल.
`दिल टुकडे टुकडे हो गया, उस दिन मैं जल्दी सो गया.` आजचे हे दिल के टुकडे शंभर वर्षांपूर्वीच्या देवदासासारखे नाहीत, म्हणून प्रेम संपलेलं नाही. तेव्हाही खालच्या जातीच्या मुलीसाठी दारूत बुडणारा देवदास तेव्हाच्या जुन्या लोकांना पटला नव्हताच. करणारे बदलतात. पण प्रेम असतंच. प्रेम असणारच.
म्हणून आज प्रेमाच्या दिवशी आपल्याजवळचं प्रेम जपायची वेळ आहे. प्रेमाचा राम जपायची वेळ आहे. बाकी खोट्या प्रेमाचा आणि खोट्या रामाचा बाजार जोरात आहे. त्यात राम नाही, हे वेगळं सांगायची गरज आहे का?
हेही वाचा:
हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का
नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा
(दिव्य मराठीवरून साभार)