रामचंद्र कह गये सियासे, ऐसा कलजुग आयेगा

०५ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.

१९७० मधे दिलीपकुमार, सायराबानू, ओमप्रकाश, निरुपा रॉय, प्राण यांच्या भूमिका असलेला ‘गोपी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेलं, कवी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, कल्याणजी- आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं एक खूपच अर्थपूर्ण गाणं आहे. त्या गाण्याचा प्रत्यय आज आपल्याला येताना दिसतो.

घोर कलियुगाची प्रचिती

पन्नासेक वर्षात युग बदलत नाही, पण पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसत आहे, त्या गाण्यात असं म्हटलंय-

रामचंद्र कह गये सियासे,
ऐसा कलजुग आयेगा,
हंस चुगेगा दाना दुनका,
कौआ मोती खायेगा

प्रभु श्रीराम सीतेला म्हणाले, असं घोर कलियुग येईल, की, हंस निकृष्ट दाणे टिपेल आणि कावळा मात्र मोती खाईल. हंस मोती खातो अशी आपल्या पुराणांत कल्पना आहे.

सिया पूछे,
क्या कलजुग में
धर्म और कर्म को कोई नहीं मानेगा?

त्यावर प्रभु श्रीराम उत्तर देतात, ‘धर्म भी होगा, कर्म भी होगा, परंतु शर्म नहीं होगी’ धर्म असेल, कर्मही असेल, पण शर्म- लाजलज्जा मात्र मुळीच नसेल, असं श्रीराम म्हणतात. याच गोष्टीचा प्रत्यय आज यायला लागलेला आहे.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 

पतीच्या 'उद्योगांची' कल्पना नाही?

राज कुंद्रा नावाचा तथाकथित उद्योगपती. हा माणूस एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा आहे. या कुंद्राचे म्हणे बरेच उद्योग आहेत. अगदी दरिद्री अवस्थेतून हा पुढं खूप संपन्न झाला अशी चर्चा आहे. पण अलीकडेच अश्लील वीडियो निर्मितीतून म्हणजे पॉर्न फिल्मचे अ‍ॅप काढून त्यानं कोट्यवधी रुपयांची कमाई केली.

वेश्यांची दलाली करण्यापेक्षाही नीच असलेला हा धंदा करताना त्याला लाज वाटली नाही. भर पोलिस ठाण्यात आपल्या पतीवर ओरडणार्‍या शिल्पाला कोट्यवधी रुपये मिळवून देणार्‍या आपल्या ‘उद्योग’ ‘पती’ चा उद्योग माहीतच नव्हता, यावर आपण विश्वास ठेवायचा तरी कसा?

निर्लज्जपणाचा कळस

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला लग्नात ३ कोटींची हिर्‍यांची अंगठी घातली. ५० लाखांचा लग्नाचा शालू नेसवला. लग्नाच्या वाढदिवसाला दुबईच्या बुर्ज खलिफामधे १९ व्या मजल्यावर ५० कोटींचा फ्लॅट दिला. लंडनमधे १०० कोटींचा राजमहल नावाचा बंगला भेट दिला. मुंबईत जुहू बिचवर किनारा नावाचा १०० कोटींचा आलिशान बंगला भेट दिला.

नोएडामधे ७ कोटींची सुपरनोवा नावाची ८० मजल्यांची अख्खी अपार्टमेंट भेट दिली. २ कोटींची रेंजरोवर, ८० लाखांची बीएमडब्ल्यू झेड फोर, ५ कोटींची लॅम्बोर्गिनी असं सगळं भेट दिलंय. आता ही ४६ वर्षांची शिल्पाबाई राज कुंद्राला म्हणते तुझ्यामुळे बॉलिवूडमधलं माझं करिअर संपलं, माझं आर्थिक नुकसान झालं.

वाल्या कोळ्याची बायको- मुलं त्याच्या पापात वाटेकरी होत नाहीत, तसं ही शिल्पाही आता नवर्‍याच्या पापात वाटेकरी व्हायला तयार नाही. पण त्या पौराणिक काळात वाल्याचा वाल्मिकी झाला, तसा तर राज कुंद्रा होण्याची सुतराम शक्यता नाही. या उलट पोलिस त्याला न्यायालयातून घेऊन येताना तो लोकांकडे पाहून विजयचिन्ह दाखवतो, त्यांना हात करतो, हे काय आहे? हा निर्लज्जपणाचा कळस नाही तर काय?

हेही वाचा: भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

कर्जबुडव्या मद्यसम्राटाची नैतिकता

काही वर्षांपूवीची गोष्ट. विजय मल्ल्या तर आपल्याला आठवतच असेल. तोच तो मद्यसम्राट आणि उघड्यानागड्या बायांना घेऊन जो दिनदर्शिका प्रकाशित करायचा, तोच तो. जगाला सत्य -अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधी यांनी आयुष्यभर दारूला विरोध केला. त्याच महात्म्याच्या वस्तू लिलावात विकत कोणी घेतल्या? तर ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्यानं.

‘कष्टाशिवाय मिळालेली संपत्ती म्हणजे पाप आहे’ असं महात्मा गांधी यांनी सांगितलं. पण बँकांची कर्ज घेऊन आणि बुडवून हा मल्ल्या देश सोडून पसार झाला. फरार झाला. आपण महात्मा गांधींच्या वस्तू लिलावात घेतल्या, याची त्याला मुळीच खंत किंवा लाज वाटलेली नव्हती.

गणेशोत्सवात उद्घाटनाला सनी लिओनी

सनी लिओनी नावाची पॉर्न स्टार आहे. ती एका नृत्याला एक कोटी रुपये घेते. तेवढी रक्कम मोजून तिचं नृत्य बघणारे शौकिनही आपल्या देशात आहेत. याच सनी लिओनीला पुण्यात एका मंडळानं गणेशोत्सवात काही लाख रुपये मानधन द्यायचं मान्य करून उद्घाटन करायला बोलावलं होतं.

बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाच्या उद्घाटनाला चक्क सनी लिओनी! त्या निमंत्रणावरून काहीसा गदारोळ माजला. ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होती, अशा काहींनी लाज बाळगून हे निमंत्रण रद्द केलं, ही गोष्ट खरी.

गणेशोत्सवाला सनी लिओनीला बोलावण्याची कल्पना ज्या डोक्यातून निघाली असेल, त्या डोक्यांना सुपीक म्हणावं की नापीक? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहात नाही.

हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

लोभी, भोगी असणारे योगी?

काला धन और काले मन होंगे,
चोर उचक्के नगरशेठ और
प्रभुभक्त निर्धन होंगे
जोभी होगा लोभी भोगी
वो जोगी कहलाएगा

याचाही प्रत्ययही आपल्याला आज येत आहे. आपण आजूबाजूला हे पाहतोच आहोत की, बरेचसे राजकारणी गुन्हेगारीशी संबंधित असतात किंवा स्वतः गुन्हेगारच असतात, हेही आपण पाहतो. मटकाकिंग फलकावरं झळकतात आणि त्यांच्या नावापुढे कंसात साहेब, युवा नेते, आमचे मार्गदर्शक अशी विशेषणं लागलेली आपण वाचत असतो.

‘बापू’, ‘बाबा’, ‘रामरहिम’ अशी नावे धारण करणारे लोभी आणि भोगी स्वतःला योगी समजतात. आणि समाजाला लाज वाटेल अशा असंख्य कारवाया उघडकीला आल्यानंतर कारावासाची हवा खात बसतात.

लाजलज्जा संपलेल्या गोष्टी

मंदिर सूना सूना होगा
भरी रहेगी मधुशाला
पिता के संग भरी सभा में
नाचेगी घर की बाला

हेही घडताना आपण पाहतो. फरक इतकाच की, मंदिरंही भरलेली असतात आणि मधुशालाही! ढोंगी भक्तीचं पाप धुण्यासाठी मधुशाला आणि मधुशालेतलं पाप धुऊन काढण्यासाठी मंदिर. असं दोन्हीही समाजात चाललेलं असतं.

बाप आणि मुलगी नाचतानाही आपण पाहतो. तसेच, याउलट घडलेली आणखी गोष्ट अशी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक वीडियो वायरल झाला. आपल्या कळत्या वयाच्या मुलासह त्याची आईच अश्लील हावभाव करीत नाचत असल्याचं ते होतं. असं करताना त्या मुलाला तर सोडाच, पण आईलाही काही लाज वाटत असल्याचं दिसत नव्हतं.

दिलीपकुमार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर चित्रित झालेली अनेक सिनेमाची गाणी सोशल मीडियावर, टीवीवर प्रसारित करण्यात आली, त्यामधे ‘परंतु शर्म नहीं होगी’ हे गाणंही होतं. त्यावरून लाजलज्जा संपलेल्या दाखवणार्‍या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवल्या.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?