प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?
प्रेमाची भावना कुणाला हवीहवीशी वाटत नाही? एकाच वयाच्या किंवा एकाच पिढीच्या दोन व्यक्ती प्रेमात पडतात. कधी कधी दोन वेगवेगळ्या पिढीतल्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम जडतं. प्रेमात पडणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती स्त्री असते आणि एक पुरूष असते. कधी कधी दोन्ही व्यक्ती समानलिंगीही असू शकतात. म्हणजे बाईबाई, पुरुषपुरुष. कधीकधी तर जेंडरच्या पलिकडे गेलेल्या दोन व्यक्ती प्रेमात असतात.
कधी प्रेमात पडलेल्या त्या दोघांनी त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव दिलेलं असतं. कधी नात्याला कुठलंच नाव न देता ती प्रेमवेडी माणसं एकमेकांमधे पार बुडून गेलेली असतात. कधी कधी प्रेमात पडलेल्या व्यक्तींमधे शारीरिक आकर्षण असतं. अनेकदा शारीरिक आकर्षण नसूनही माणसं प्रेमात असतात.
प्रेमाची अशी वेगवेगळी रूपं आपल्याला जगभर दिसतात. त्यामुळे प्रेमाच्या नात्यात काय काय असावं असं आपल्याला कुणी विचारलं तर त्याचं उत्तर देण्यासाठी ज्ञानकोश वाचावे लागत नाहीत की डोकं खाजवून फार विचार करावा लागत नाही. आमच्या शिबीरातली तरुण मुलं मुलीही या प्रश्नाचं नेमकं उत्तर देतात.
हेही वाचा : ‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’
'आरोग्य भान' किंवा 'आभा' हा आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप आहे. या ग्रुपर्फे शाळा, कॉलेजात जाणाऱ्या मुला मुलींसाठी संवादशाळा घेतल्या जातात. या सगळ्या संवादशाळेचं, त्यातल्या सगळ्या सत्रांचं डिझाईन डॉ. मोहन देस यांनी केलंय. दोन किंवा तीन दिवसांची ही संवादशाळा असते. संवादाचा विषय असतो ‘आधुनिक काळातले प्रेमाचे नातेसंबंध’.
शाळा कॉलेजातल्या मुलांसाठी ही संवादशाळा असली तरी त्यातलं शेवटचं सत्र कुठल्याही वयाच्या, लिंगाच्या, कुठल्याही भागातल्या, कुठल्याही व्यक्तीनं पहावं, ऐकावं असं आहे. संपूर्ण संवादशाळेसाठी ४० ते ५० मुलामुलींचा एक ग्रुप समोर बसलेला असतो. या शेवटच्या सत्रात समोरच्या फळ्यावर किंवा बोर्डवर एक मोठा पांढरा कोरा कागद लावला जातो. संवादक मुलांना प्रश्न विचारतो, ‘एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय असायला असावं? नातं खूप मस्त वाटेल, ते अगदी समृद्ध, श्रीमंत वाटेल, असं काय काय प्रेमाच्या नात्यात असावं?’ या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दांत द्यायचं अशी अट असते.
मुलं काहीशी गोंधळात पडतात. इकडे तिकडे बघतात. हळू हळू उत्तरं येऊ लागतात. हा प्रश्न विचारल्यावर हमखास पहिल्यांदा येणारं उत्तर असतं, विश्वास! प्रेमाच्या नात्यात विश्वास हवाच. मग संवादक फळ्यावरच्या कोऱ्या कागदावर ‘विश्वास’ हा शब्द लिहितो. आणि मग उत्तरं येत राहतात. कुणाचं म्हणणं असतं आपुलकी हवी. कुणी सांगतं जबाबदारी हवी. कुणाला प्रेमाच्या नात्यात आनंद असणं महत्त्वाचं वाटतं. कुणाला काळजी असावी असं वाटत असतं. हे सगळे मुद्दे त्या पांढऱ्या कागदावर लिहिले जातात.
एकएक उत्तरं मुलांकडून येत राहतात. यातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होते. कुणी प्रेमाच्या नात्यात जबाबदारी असावी, असं म्हटलं की त्यावर उलटसुलट प्रश्नउत्तरं होतात. समोर बसलेल्या मुलामुलींना संवादक विचारतो, जबाबदारी फक्त बाईनेच घ्यायची की पुरुषाने पण घ्यायची? घर सांभाळण्याची जबाबदारी फक्त बाईवर आणि बाहेरून पैसे कमवून आणण्याची जबाबदारी फक्त पुरूषावर असं करायचं का? मुलं मुली दोघंही अशा परिस्थितीला नकार देतात. त्यांनी वाटून जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात असा त्यांचा सूर असतो.
असंच अनेक गोष्टींबाबत घडतं. प्रेमाच्या नात्यात स्वातंत्र्य हवंय. मग फक्त पुरूषांना द्यायचं की बायकांनाही द्यायचं? ‘दोघांना द्यायचं.’ मुलं सांगतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असं असतं का? हाही प्रश्न येतो. प्रेमात समजूतदारपणा असावा. तो दोघांनीही दाखवावा. प्रेमात आधार असावा, जो दोघांना एकमेकांचा असायला हवा. प्रेमात मोकळीक असायला हवी. प्रेमाच्या नात्यात पारदर्शकता हवी. सहजता हवी. उत्कटता हवी. या तरूण मुला मुलींना भरपूर काही वाटत असतं.
आणि आकर्षण हवं की नको? आकर्षण असणं चांगलं की वाईटच? तेही असायला हवं की नको? यावर भारी चर्चा होते. शेवटी ते असायला हवं असं ठरतं.
हा संवादाचा दौर असाच सुरू राहतो. कुणी मधेच म्हणतं. प्रेमाच्या नात्यात द्वेष नको. तसं फळ्यावरच्या कागदावर लिहा असा एखाद्या मुलाचा आग्रह असतो. पण आपल्याला या कागदावर प्रेमात काय नको हे लिहायचं नाहीय. काय हवं हे लिहायचंय. काय नको ते नंतर बघू या असं संवादक सांगतो.
हेही वाचा : खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!
दोन तीन मुद्द्यांवर जोरदार चर्चा होते. ही चर्चा मुलंच करतात. कुणीतरी सांगतं, ‘प्रेमाच्या नात्यात आदर हवा.’ सगळ्यांना पटतं. यावर संवादक एकच प्रश्न विचारतो आणि सगळ्यांची विचारप्रक्रिया पुन्हा सुरू होते. आदर हवा की सन्मान हवा? मुलं गोंधळतात. आदर हा वयाने किंवा कर्तृत्वाने मोठ्या असणाऱ्या माणसाबद्दल वाटणारी भावना आहे. सन्मान हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. व्यक्ती वयाने मोठी असो किंवा लहान असो सन्मान हवाच. मग मुलांच्या ट्युबा पेटतात. आपल्या जोडीदारानं आपल्याबद्दल सन्मान ठेवावा आणि आपल्याही मनात त्याच्या विषयी सन्मान असावा असं त्यांना वाटू लागतं. मग सगळ्यांना संवादकाचं म्हणणं पटलंय हे पाहून फळ्यावरच्या पांढऱ्या कागदावर ‘सन्मान’ असं लिहिलं जातं.
परत मुलं आणखी काही मुद्दे सांगतात. प्रेमाच्या नात्यात मैत्री हवी, आधार हवा, एकमेकांबरोबर संवाद हवा असं काही काही. पुन्हा कुणीतरी सांगतं, प्रेमाच्या नात्यात समानता हवी. सगळ्यांनाच हे म्हणणं पटतं. समानता हवीच! यावर संवादक विचारतो, समानता हवी की समता हवी? मुलं पुन्हा गोंधळात पडलेली दिसतात. ‘समानता म्हणजे सगळ्यांना एक सारख्या गोष्टी देणं. पण समता म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार गोष्टी किंवा संधी मिळणं’ संवादक समजावतात. पण असली अवघड भाषा मुलांच्या कुठून लक्षात येणार?
मग एक उदाहरण घेतलं जातं. शक्यतो पोळीचं. घरात दोन माणसं आणि चार पोळ्या आहेत. प्रत्येकाला दोन दोन पोळ्या देणं ही झाली समानता. पण त्यातल्या एका माणसाला तीन पोळ्यांची भूक असेल आणि एखाद्याला एकाच पोळीची भूक असेल आणि तशी वाटणी झाली तर ती झाली समता. मुलांना मुद्दा लक्षात येतो. मग मुलांना समानतेपेक्षा समता हवीहवीशी वाटते.
प्रेमाच्या नात्यात इतकं काहीबाही असतं हे मुलंमुली सांगत राहतात. हे सगळे मुद्दे मागच्या पांढऱ्या कागदावर अर्धगोलात लिहिलेले असतात. पण हे असं अर्धगोलाकार का लिहिलं गेलं? एका खाली एक का लिहिलं गेलं नाही? असं मुलांना विचारलं जातं. मग संवादक रंगीत खडू घेतो आणि शब्द लिहिलेल्या दोन ओळींच्या मधे रेघा मारतो. मग मुलांना लगेच लक्षात येतं. ‘हे तर नात्यांचं इंद्रधनुष्य’ मुलं सांगतात.
प्रेमाचं नातं म्हणजे एक इंद्रधनुष्य असतं. नेहमीच्या इंद्रधनुष्यात सात रंग असतात. प्रेमाच्या नात्यात विश्वास, समता, स्वातंत्र्य, काळजी, आधार, समजूतदारपणा, आकर्षण, सन्मान, मोकळीक इत्यादी सात नाही तर असंख्य रंग असू शकतात. आपल्या नात्यात कोणते रंग असावेत आणि कोणते रंग नसावेत याचा निर्णय प्रेम करणाऱ्या दोन माणसांनी घ्यायचा असतो.
हे सगळे रंग आपल्या जोडीदाराच्या नात्यात असावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. काही वेळा असं होतं की यातले काही रंग फिके पडतात. तेव्हा निराश नाही व्हायचं. कधी काही रंग मस्त गडद होतात. कधीकधी नात्यात काही रंगांची भर नंतर घालता येते. रंगांचं कमी जास्त होणं हे साहजिक आहे. फक्त तीन रंगांना आपल्या नात्याच्या इंद्रधनुष्यात कधीही स्थान द्यायचं नाही असं मुलांना सांगितलं जातं. आणि हे तीन रंग म्हणजे बेजबाबदारपणा, फसवणूक आणि हिंसा!
हेही वाचा : ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
हे इंद्रधनुष्य नात्याच्या आभाळात असावेत असं कुणाला वाटणार नाही? पण इंद्रधनुष्य असंच येत नाही. पाऊस असतो आणि आकाशात उन्हही आलं की दवबिंदूवर परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे इंद्रधनुष्य दिसतं हे विज्ञान सगळ्यांनाच माहितीय. मग नात्याचं इंद्रधनुष्य काढलेल्या कागदावरही सूर्य हवा, पाऊस हवा, ढग हवेत, झाडं हवीत. ही सगळी कलाकारी साकार करण्यासाठी मुलांना समोर बोलावलं जातं. दोनचार मुलं पुढं येतात. हळूहळू फळ्यापाशी गर्दी होते. एक मुलगा पक्षी काढतो. एखादी मुलगी झाडं, डोंगर, नदी, गवत काढते. कुणी कुणीतर मोरही काढतं. तेव्हा नात्याचं इंद्रधनुष्य पूर्ण होतं!
आपलं आपल्याशी स्वतः शी एक नातं असतं. आपल्या शरीराशी असतं. आपल्या आसपासच्या निसर्गाशी नातं असतं. आपण वाढलो त्या समाजाशी, संस्कृतीशीही आपलं नातं असतं. नात्यांचे हे सगळे पैलू दोन दिवसांच्या संवादशाळेत कवर होतात आणि मगच हे नात्यांचं इंद्रधनुष्य मुलांच्या समोर ठेवलं जातं. मुलं हरखून जातात. हे इंद्रधनुष्य त्यांना आशादायी वाटत राहतं.
हेही वाचा :