जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही

२४ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल.

आज २३ मे हा जागतिक कासव दिन. जगभर तो साजरा होतो. आपल्या देशातही प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी मंडळी त्याचे कार्यक्रम करतात. पण आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. कोट्यवधी भारतीय मतदारांनी दिलेला कौल ठरवण्याचा दिवस. त्यामुळे कासव दिनाकडे दुर्लक्ष होणं खूपच स्वाभाविक होतं. पण त्यानिमित्त ससा आणि कासवाची गोष्ट आठवणंही तितकंच स्वाभाविक आहे.

इसापच्या या गोष्टीतला ससा आणि कासवाची स्पर्धा लागते. ससा वेगवान त्यामुळे जिंकणारच असतो. त्यामुळे तो बेफिकीर बनतो आणि डुलकी घेतो. चिवट कासव मात्र हळूहळू चालत राहिलं आणि जिंकलं. पण लोकसभेच्या स्पर्धेत नेमकं उलट झालंय. धडाक्याने प्रचार करणारे नरेंद्र मोदी विजेच्या वेगाने पुढे जात राहिले. शांत राहुल गांधींनी आत्मविश्वासाने लढत दिली. पण ते मोदींच्या जवळपासही पोचू शकले नाहीत. कारण या कासवाजवळ सशाइतका धडाका नव्हताच.

हेही वाचाः सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

कासवाने सशाशी स्पर्धा केली, हेही यशच

कासव सशाशी स्पर्धा करतो ईसापची कल्पनाच जगावेगळी आहे. म्हणून त्याची कथा आपण आजही वाचतो. मुलांना सांगतो. त्याचा भाषणांमधे दाखला देतो. तशीच काहीशी राहुल गांधींच्या लढाईचीही कहाणी आहे. २०१४च्या निवडणुकांत मोदींच्या महायशासमोर राहुल क्षुल्लक ठरले होते. भाजपच्या २८२ जागांसमोर काँग्रेसच्या ४४ जागा किस झाड की पत्ती होत्या.

त्याच्याही पलीकडे जाऊन मोदीभक्तांनी सोशल मीडियातून राहुल यांना पप्पू ठरवलं होतं. मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कारकीर्दीत राहुल यांचं वागणंही त्यांची तशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी सोयीचंच होतं. त्याच वेळेस मोदी मात्र सर्वसामान्यांचे मसिहा बनून आले होते. अशावेळेस एकामागून येणारं अपयश पचवून मोदींच्या विरोधात आव्हान उभं करणं, अवघड होतं. ते करण्याचं धाडस राहुल यांनी दाखवलं.

नवी ओळख बनवली पण

गुजरात विधानसभा निवडणुकांपासून राहुल गांधी मोठ्या आत्मविश्वासाने मोदींना आव्हान देत ठाम राहिले. त्याआधी त्यांनी पंजाबात मिळवलेलं यश कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर लिहिलं गेलं. कर्नाटकातलं अपयश कुमारस्वामींशी हातमिळवणी करून झाकून टाकलं. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्य जिंकत त्यांनी मोदी-शाह करिश्म्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी आपली नवी प्रतिमा उभी केली. त्यांची स्वतःची प्रतिमा बदलून प्रस्थापितांचा नाही तर विस्थापितांचा प्रतिनिधी अशी बनवली. मोदींवर उद्योजकांच्या हिताचे आरोप केले. राफेल खरेदीत भ्रष्टाराचाचे आरोप करत चौकीदार चोर हैंची घोषणा लोकप्रिय बनवली. मोकळेपणाने लोकांशी बोलत राहिले. अपयश हसत हसत स्वीकारत राहिले. चांगली भाषणंही करत राहिले. लोकांचा प्रतिसादही मिळत राहिला. पण मोदी आधीच इतके मोठे बनले होते, की त्यांच्यासमोर राहुल उभेच राहू शकले नाहीत.

हेही वाचाः नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

प्रेमाचा मार्ग यशस्वी होणार का?

विधासभेच्या चाचणी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळालं तरी राहुल लोकसभेच्या परीक्षेत मात्र पार फेल झाले. ते मोदींच्या जवळपासही भरकटू शकले नाहीत. मतदारांनी राहुलना आणि काँग्रेसला झिडकारलं. स्मृती इराणींनी त्यांना अमेठीतूनही हरवलं. पण तरीही राहुल पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले.

राहुल गांधी म्हणाले की जनादेश मान्य आहे. त्यांनी मोदी आणि स्मृती इराणी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांना सांगितलं की घाबरू नका. हा दोन विचारधारांमधला संघर्ष आहे. आपण लढत राहू. त्यांनी सांगितलं माझा कितीही द्वेष केला तरीही मी प्रेमाचा मार्ग सोडला नाही, सोडणार नाही.

आम्ही प्रेमाचा मार्ग सोडणार नाही, हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या युद्धात तो चालणार आहे का, यावर राहुल यांना विचार करावाच लागेल. निवडणुकीचं युद्ध अनेक पातळ्यांवर लढलं जातं. त्या प्रत्येक पातळीवर ते लढावं लागतं. त्यासाठी मोठी तयारी करावी लागते. त्यासाठी राहुल तयार आहेत का? काँग्रेस तयार आहे का?

साधेपणातून करिश्मा कसा उभा करणार?

राहुल यांनी देशभर प्रचाराचा धुरळा उडवला. मोदींच्या तोडीस तोड सभा घेतल्या. माध्यमांनाही आपली दखल घ्यायला लावली. पण ती पुरेशी नव्हती, हे उघड झालंय. मोदींच्या विरोधात राहुल यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवण्यात राहुल यांना यश आलेलं नाही. त्यांनी स्वतःला प्रामाणिक असल्याचं प्रोजेक्ट केलं. ते प्रामाणिक असतीलही. पण प्रामाणिक असणं म्हणजे डावचेपात मागे पडणं नसतं. त्यात ते फारच मागे पडलेले दिसतात. 

निवडणुकांसाठी वेग देतात ते कार्यकर्ते. घट्ट संघटना. त्यांना दिलेले कार्यक्रम आणि त्यासाठी उभा केलेला पैसा. काही राज्यांचे अपवाद वगळता काँग्रेसचे कार्यकर्ते हवेत धावत राहिले. त्यांना एकत्र बांधणारं कोणतंही एक सूत्र दिसलं नाही. राहुल गांधी तसं सूत्र बनताना दिसले नाहीत. साधेपणाचाही करिश्मा असतो. तो करिश्मा उभा करावा लागतो. त्यातून ते कार्यकर्त्यांना जोडू शकतील. पुढेही टिकायचं असेल तर त्यांना सगळ्यांना बांधणारा धागा बनावं लागेल.

हेही वाचाः 

काय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट?

विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता