राहुल गांधींच्या संवादामुळे मराठी तरुण काँग्रेसकडे वळणार?

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काल पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधाला. गेल्या काही महिन्यांपासून फर्स्ट टाईम वोटर्सना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे पुण्यात कार्यक्रम घेण्याची तयारी सुरू होती. कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी होती. यातले राहुलचे किंवा काँग्रेसचे खरे समर्थक किती हा प्रश्न पडला. पण राहुलचं स्वागत करताना जो टाळ्यांचा आवाज झाला, त्यावरुन मात्र यातले बहुतांश विद्यार्थी खरोखरच राहुलचे समर्थक असले पाहीजेत, हे लक्षात आलं. यात सर्वच मुलं मात्र काँग्रेस समर्थक होती, असं नाही.

कार्यक्रमाचं स्वरुप तरुणाभिमुख

काँग्रेस नेत्यांच्या पुण्यात अनेक शिक्षणसंस्था आहेत, हे यावेळी लक्षात ठेवायला हवं. यातल्या अनेक मुलांची पाटी कोरी असून मुलांच्या मनात राहुल किंवा काँग्रेसबद्दल पूर्वग्रह नाही, हेही जाणवलं. अशी वेगवेगळ्या प्रकारची मुलं या कार्यक्रमात आली. हे एका दृष्टीने बरंच झालं. कारण जाताना काही मुलांना तरी राहुल गांधींचं म्हणणं ऐकता आलं असेलच.

एरवी ते राहुलची भाषणं ऐकत नसतील, पण पाच वर्षांपूर्वीची प्रतिमा आणि आजची प्रतिमा यात बदल झाला, हे त्यांना या संवादातून नक्कीच जाणवलं असेल. काँग्रेस हा पारंपरिक पद्धतीने राजकारण करणारा पक्ष. बदलत्या काळानुसार कार्यपद्धतीत, निवडणूक प्रचाराच्या पद्धतीत फारसा बदल केला नाही. याचा अर्थ अजिबातच बदल झाला नाही असंही नाही. पण हा कार्यक्रम मात्र तरुणाभिमुख होता, हे मान्य केलं पाहीजे.

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

ही तीच काँग्रेस ना?

सुरवातीला काही गाणी, नंतर डान्स, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांवर बनवलेलं पेंटिंग, मुंबईची आरजे मलिष्का आणि सुबोध भावेसारखा कलाकार हे चित्र पाहून ही तीच काँग्रेस आहे ना, असा प्रश्न पडला. आणि या कार्यक्रमाच्या मागे बऱ्यापैकी डोकं लावलंय, याची जाणीव झाली. पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरात हा कार्यक्रम झाला. त्यामुळे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरुनही आलेले विद्यार्थी वेगळा विचार घेऊन मतदान करण्यासाठी जातील.

तरुण मतदार हा काही स्वाभाविकपणे काँग्रेसला मतदान करणार नाही, उलट तो 'चेहरा' पाहूनच मतदान करण्याची शक्यता अधिक! या वर्गाकडून काँग्रेसला सर्वात कमी अपेक्षा असताना, या वर्गाकडे हवं तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात आणि देशभरात आणखी काही असेच कार्यक्रम घेण्याची आवश्यकता होती. याआधीही असे कार्यक्रम झालेत. पण वातावरण निर्मितीसाठी या संवादांची सुरवात ६ महिन्यांआधी व्हायला हवी होती.  निवडणुकीला महिनाही उरला नसताना असा कार्यक्रम घेणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार वाटतो.

हेही वाचाः राहुल गांधींनी केरळमधल्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज का भरला?

बाकी कार्यक्रमामधे फार काही वेगळं होतं असं नाही. कारण गेल्या दोनेक वर्षांपासून राहुल गांधी अशा कार्यक्रमांना आणि अशा प्रश्नोत्तरांना देशविदेशात सामोरं जाताहेत. पण एका प्रश्नाचं उत्तर देताना आपल्यात आणि नरेंद्र मोदींमधे नेमका काय फरक आहे, हे अधोरेखित केलं. ‘माझ्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही आणि तरीही मला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न तुम्ही विचारले पाहीजेत,’ हेसुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामधे ठसवलं.

निगेटीव मुद्द्यांना फाटा

आपण विद्यार्थ्यांसमोर बोलतोय, याची जाणीव मात्र राहुलना होती. त्यामुळे हल्लीच्या त्यांच्या भाषणातला आक्रमकपणा दिसला नाही, पण स्पष्टपणा मात्र होता. 'चौकीदार चोर है' चा नाराही त्यांनी लगावला नाही. तेव्हा मुलांना पॉझिटिव मुद्द्यांनी आपल्याकडे आकर्षित करावं, निगेटिव मुद्द्यांनी नाही, असलं काहीतरी राहुलच्या मनात असावं. याचा अर्थ ते सरकारविरोधात काहीच बोलले नाहीत, असं नाही. पण त्यांनी मर्यादा मात्र सांभाळली. तेव्हा नरेंद्र मोदींनी अशाच एका कार्यक्रमात मुद्दा सोडून राहुलची खिल्ली उडवल्याची आठवण झाली.

काँग्रेसचा जाहीरनामा यंदाच्या निवडणुकीला वेगळं वळण देईल, असं बोललं जातंय. ग्रामीण भागात सरकारविरोधी नाराजी आहेच. पण या जाहीरनाम्यामुळे शहरी मध्यमवर्गावरही परिणाम होईल, असाही एक सर्वे येऊन गेला. विद्यार्थ्यांचा या जाहीरनाम्यावर किती विश्वास आहे, हे माहीत नाही. पण विद्यार्थ्यांनी बहुतेक प्रश्न या जाहीरनाम्याशी संबंधित विचारले, याचं मला आश्चर्य वाटलं.

हेही वाचाः महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

७२ हजार आणणार कुठून?

याचा अर्थ विद्यार्थ्यांमधे या जाहीरनाम्याची काही प्रमाणात चर्चा झालीय. या प्रश्नांची उत्तरं मला तरी समाधानकारक वाटली. जाहीरनाम्यातले अनेक बारकावे स्पष्ट केल्यामुळे तिथे असलेल्या बाकी विद्यार्थ्यांनाही या जाहीरनाम्यात हवेतल्या गोष्टी नाहीत, असं वाटून गेलंच असेल. एका मुलाने प्रश्न विचारला, ७२ हजार रुपये तुम्ही गरीबांना देत आहात. तो पैसा नेमका कुठुन येईल?

त्यावर राहुल गांधींनी आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलंय. आपल्याकडे पैशांची कमतरता नाही. पण हा पैसा काही उद्योगपतींसाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो पैसा आम्ही या कामात वळवू. काही फारशा यशस्वी नसलेल्या योजना बंद करून त्यासाठी पैसे उभारले जातील. एकदा हा पैसा बाजारात आला तर, सध्याच्या मंदीच्या वातावरणातून बाहेर येऊ, असं राहुल म्हणाले. आणि मध्यमवर्गावर नवा कर न लादता हे करण्याचं आश्वासनही दिलं.

हेही वाचाः नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

तरुणांना नवा व्यवसाय सुरू केल्यानंतर ३ वर्ष कुठल्याही सरकारी परवानगीची गरज नसेल, त्यांना करातून सवलत दिली जाईल, असं ते म्हणाले. महिला आरक्षण, २२ लाख नोकऱ्या, शिक्षणावर जीडीपी च्या ६% खर्च यासारख्या आश्वासनांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. रोजगार मिळण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करु असं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशातल्या टेलिकॉम क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी आमच्याकडे याची ब्लु प्रिंट असल्याचंही सांगितलं.

मोदींबद्दल काय वाटतं?

पुलवामा हल्ल्याबाबतचं मत आणि बालकोट एयर स्ट्राइकचं श्रेय नेमकं कोणाचं, असा प्रश्न विचारला असता, पुलवामा हल्ला हा दुदैवी होता आणि भारतात अशा कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहीजे. आणि एयर स्ट्राइकचं श्रेय हे सैन्याचं असल्याचं राहुल यांनी ठासून सांगितलं. मी कधी त्या मुद्द्याचं राजकारण केलं नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

नीती आयोग आणि योजना आयोगावर प्रश्न विचारला असता, नीती आयोग हे तात्पुरते डावपेच ठरवतं. योजना आयोग दीर्घकाळाची धोरणं ठरवायचं, असं उत्तर राहुल यांनी दिलं. डावपेच हे राज्य पातळीवर सोडवता येऊ शकतील, असं उत्तर दिलं. या योजना आयोगाचे सदस्य कोण असतील, यावर आमची त्या बाबतीत ताठर भूमिका नाही, आम्ही इतरांचे सल्ले घेऊन त्याबाबतीत बदल करू शकतो, असं ते म्हणाले.

मोदींबद्दल आपलं मत काय, असा प्रश्न विचारला तेव्हा, माझ्या मनात मोदींबद्दल द्वेषभावना नाही. उलट माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमच आहे, असं उत्तर दिलं. काही मुलांनी यावर मोदी-मोदी केलं तेव्हा, ‘मला यात काही गैर वाटत नाही,’ असं मुलांना उद्देशून ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्यावर सभागृहात लगेच शांतता पसरली.

हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

जमिनीवर यावंच लागतं!

शेवटी काही हलके फुलके प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्यांनी आपल्याला सिक्स पॅक अॅब्ज होते, असं सांगितलं. त्यांनी आपल्या आजी आणि बहिणीसोबतचे किस्से सांगितले. सोशल मीडियाच्या वर्च्यूअल रियलिटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्हाला कधी ना कधी या वर्च्यूअल जगातून रियालिटीकडे यावंच लागेल. कारण वास्तव आ वासून तुमच्यासमोर उभं असेल,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

येत्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय येईल, कोणता घटक, कोणते राज्य कोणाला साथ देईल, हे २३ मार्चला कळेलच. पण प्रत्येक घटकाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून केला जातोय. तरुण मतदार आपले फासे कुणाच्या बाजूने टाकणार यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. आणि आजच्या कार्यक्रम राहुल गांधी यांनी तरुणांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचा एक चांगला प्रयत्न केला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हेही वाचाः गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत