झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत.
टीवीवरच्या प्रसिद्ध सिरीयल आणि त्यातल्या व्यक्तिरेखा यांची लोकप्रियता काय आणि किती, हे समजून घ्यायचं असेल तर झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको`तल्या राधिका सुभेदारला भेटावं लागेल. नवऱ्याने विश्वासघात केल्यानंतर रडत न बसता एक साधी गृहिणी यशस्वी उद्योजिका बनते, ती राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय.
राधिका म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यातली अभिनेत्री अनिता दाते. सिरियलमधे स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारी राधिका आणि प्रत्यक्षात मनाला पटेल तेच बोलणारी आणि वागणारी अनिता या दोघींमधे साम्य आहे. काही बाबतीत तफावतही. नाशिकमधे एकत्र कुटुंबामधे जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनितासाठी महिला दिन हा कुठल्याही सेलिब्रेशनचा दिवस नसून आत्मचिंतनाचा असतो.
महिला दिन आणि या दिनाचं वाढतं प्रस्थ चूक किंवा बरोबर या वादात अनिताला अजिबात शिरायचं नाही. महिला दिन असावा का? तर नक्कीच असावा. या दिवशी काहीतरी वेगळं अनोखं सेलिब्रेशन करण्यापेक्षा या दिवशी प्रत्येक बाईने बाकीच्या ३६४ दिवसांची उजळणी करावी, असं अनिताला वाटतं. एक महिला म्हणून बाकीचे दिवस मी कशी वागते, स्त्री म्हणून माझी तत्वं, आणि या तत्वांचं काटेकोर पालन मी करते का, मी माझ्या स्त्रीपणाशी किती प्रामाणिक आहे, दैनंदिन जगण्यात स्त्री पुरुष समानता याबदद्ल आग्रही असताना कधीतरी सोयीनूसार स्त्री असण्याचा स्वतःसाठी फायदा मी कुठे करुन घेतला नाही ना, याचा आढावा घ्यायला हवा, असं अनिताला वाटतं.
हेही वाचाः मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?
महिला दिन आला की तिच्याशी संबंधित अनेक विषय येतात. यापैकीच एक म्हणजे बाईची मासिक पाळी. अनिताला हा विषय चिंतनाचा आणि तेवढाच चिंतेचा वाटतो. मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. पण बदलत्या पिढीनुसार या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. याबद्दल बोलताना अनिता तिच्याच घरातल्या स्त्रियांचा अनुभव सांगते.
अनिता सांगते, आमचं एकत्र कुटुंब आणि त्यात मी मोठी मुलगी. त्यामुळे लहानपणी माझी आई, काकू, माझ्या इतर नातेवाईकांकडून मला या पाळीविषयी वेळोवेळी माहिती दिली जायची. मी आठवीमधे होते, तेव्हा मला मासिक पाळी आली. माझ्याआधी माझ्या छोट्या बहिणीला आल्याने माझी आई आधीच चिंतेत होती शिवाय शाळेतही माझ्या अनेक मैत्रिणींना पाळी येत होती. घरातनं मिळालेल्या भरभरून ज्ञानामुळे मीही त्याबद्दल अतिशय उत्सुक होते. त्यामुळे पाळी सुरू झाली, याचा मला आनंदच झाला. माझ्या आईचीही जणू मोठी चिंताच दूर झाली.
अनिता पुढं सांगते, आईने माझं औक्षण केलं आणि त्यानंतरचे चार दिवस माझे भरभरून लाड सुरु होते. या गोष्टींमुळे खरंतर मला तेव्हा पाळी नेहमीच रहावी असंच वाटलं. अर्थात या आनंदाबरोबरच त्रासही जाणवू लागला. ही गोष्ट काय फार आनंदाची नाही, हे मला चांगलंच समजलेलं.
पूर्वी घराघरांमधे मासिक पाळी आली की बाईला बाजूला बसावं लागायचं. आताही अनेक घरांमधे ही प्रथा पाळली जाते. अनिता सांगते, माझ्याही घरी ही प्रथा होती. लहानपणी घरात पाळी येण्याला कावळा शिवला असं म्हणायचे. मला आठवतंय लहानपणी आई आम्हाला म्हणायची, मला हात नका लावूत, कावळा शिवलाय. मग आम्ही मुद्दामून तिला हात लावायला जायचो. मग तिची पळापळ सुरू व्हायची. तेव्हा तो आमच्यासाठी एक खेळ बनलेला. पण जसे मोठे होऊ लागलो तशी यातलं वास्तव कळू लागलं.
माझ्या घरी शिवाशिव आणि बाजूला बसण्याची प्रथा असली तरी माझ्या आईने मला कधीच या गोष्टींसाठी जबरदस्ती केली नाही. त्यावेळी ती आमची बाजू सांभाळून घ्यायची. कामानिमित्त आम्ही नाशिकच्या घरातनं बाहेर पडलो. त्या घरातले विचार तिथेच राहिले ते कायमचे. आज मी या कुठल्याच गोष्टी मानत नाही. आईलाही समजावत असते पण नंतरच्या पिढीचे सगळेच विचार आधीच्या पिढीला पटतात, असं नाही.
हेही वाचाः मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?
मासिक पाळी ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे त्यामुळे तिला सहन करण्याची ताकदही प्रत्येक स्त्रीमधे नैसर्गिकरित्या असतेच, असं अनिता मानते. त्यामुळेच अनेकदा मासिक पाळीचं कारण सांगून एखादी स्त्री आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देते किंवा काम टाळण्यासाठी बहाणा करते तेव्हा तिला राग येतो. इतकंच नाही तर याविषयी बायकांमधे दिसणारी अस्वच्छताही तिला पटत नाही.
याबद्दल बोलताना अनिता सांगते की या दिवसांमधे प्रत्येकीने अधिकाधिक स्वच्छता ठेवायला हवी. आज बाजारामधे अनेक पर्याय आहेत. मग ते सॅनिटरी नॅपकीन असो टॅम्पॉन असो, या सगळ्याचा वापर आपण सर्रास करतो. पण ते वापरून झाल्यावर त्याचा निचराही योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असते.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे आज राधिका सुभेदारही व्यक्तिरेखा घराघरामधे पोहोचली आणि राधिकाच्या निमित्ताने अनिताचा एक मोठा प्रेक्षकवर्ग बनलाय. चाहत्यांचं हे प्रेम आणि यातनं येणाऱ्या जबाबदारीची जाणीव तिला आहे. अनिता सांगते की लोकांसमोर अनिता दाते म्हणून मी बोलते, तेव्हा लोक ते ऐकतात. पण त्यांना ते किती पटतं मला माहीत नाही.
अनिता सांगते, मी लोकांसमोर राधिका म्हणून उभी रहाते आणि तिच्यासारखी बोलायला लागते, तेव्हा लोक माझे विचार ऐकतात, त्याला दुजोरा देतात म्हणूनच महिला मेळावा किंवा विविध कार्यक्रमांसाठी मी गावागावांमधे फिरते, तेव्हा स्त्रियांच्या या गोष्टी आणि त्यासाठीच्या आवश्यक खबरदारी याविषयी आवर्जून बोलते आणि यापुढेही बोलत राहीन.
म्हणून अनिता दाते राधिका सुभेदार बनून सांगतेय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. हा तिचा विचार आजच्या महिला दिनापासून आपण सर्वांनी आचरणात आणायला हवा. हेच या दिनाचं खरं सेलिब्रेशन मानायला हरकत नाही.
हेही वाचाः
थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच
बरं झालं, आमच्या देवाला मासिक पाळीचं वावडं नव्हतं
महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)