घरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का?

२७ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय.

मध्य प्रदेशातल्या चित्रकूटमधे नुकताच ‘हिंदू एकता महाकुंभ मेळा’ पार पडला. त्याचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत होते. आपल्या भाषणात त्यांनी ‘ज्यांनी धर्मांतर केलं आहे, त्यांची हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी मोहीम राबवा’ असं आवाहन केलं. त्याचबरोबर ‘इथून पुढं कुणीही हिंदू धर्म सोडून दुसर्‍या धर्मात जाणार नाही, यासाठी ‘धर्मरक्षक’ म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत' असंही ते म्हणाले.

हेही वाचा: हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

संविधानाची सोयीस्कर मांडणी

देशातल्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तिथं भाजप-संघ परिवार आपला हिंदुत्ववादी अजेंडा पूर्ण ताकदीनं रेटत असतो. भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्माचं आणि धर्मांतराचं स्वातंत्र्य दिलंय. पण भाजपशासित राज्यात धर्मांतराला आडकाठी केले जाणारे कायदे बनवायची मालिका सुरू आहे.

त्याची सुरवात उत्तर प्रदेशातल्या लव जिहादविरोधी कायद्याने झाली. पण त्याला विरोध झाल्यामुळे वेगळ्या पद्धतीचे कायदे काही राज्यांनी केले. आताही कर्नाटकातल्या भाजप सरकारनं धर्मांतर विरोधी कायद्याचा मसुदा तयार केलाय. तो कर्नाटक विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याची शक्यता आहे.

या कायद्यात अनुसूचित जाती-जमाती, अल्पवयीन आणि महिलांना सक्तीनं किंवा आमिषानं धर्मांतर करायला भाग पाडलं तर शिक्षेची तरतूद आहे. अशाप्रकारे एखाद्याला किंवा कुटुंब-समूहाला धर्मांतर करायला भाग पाडणं, हे बेकायदेशीर आहे. त्यासाठी विशेष कायद्याची गरज नाही. गरज आहे, अशा धर्मांतराच्या सापळ्यात कुणी का फसतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची.

धर्मांतराचं कारण जातीयता

धर्मांतरं प्रामुख्यानं हिंदूंची होतात. ती जातीयतेला कंटाळून होत असतात. ही धर्मांतरं टाळण्यासाठी बगलमारू कायद्याचा इलाज उपयोगाचा नाही. त्यावर वर्णाधिष्ठित जातव्यवस्था नष्ट करणारा जालीम इलाजच हवा. त्यासाठी सनातन वैदिक धर्माची सोवळेधारी काठी फिरवत मिरवणार्‍या शंकराचार्यांना कामाला लावणारं आंदोलन केलं पाहिजे. घरवापसी करण्याआधी हिंदू धर्म गिळणारी जातीयता साफ व्हायला हवी.

घरवापसी झालेला हिंदू कोणत्या जातीचा हा प्रश्नच निर्माण होऊ नये याची खबरदारी डॉ. भागवत का घेत नाहीत? भारताच्या लोकसंख्येत ८० टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. या ८० टक्यांमधेही अल्पसंख्याकांचा फापटपसारा आहे. जाती-जमाती, पोटजाती-उपजाती अणि उच्च-नीचतेच्या हत्यारानं हिंदू धर्मीयांचं विभाजन केलंय. त्यामुळेच हिंदूंमधे ब्राह्मण अल्पसंख्याक आहेत. यात देवरुखे ‘अल्पसंख्याक’ तर किरवंत ‘दलित’ आहेत.

हाच प्रकार इतर जाती-जमातीतही आहे. प्रत्येकाचं देव, दैवतं, श्रद्धास्थानं, रीती-रिवाज वेगळे. फक्त दुसर्‍या जाती-पोटजातीला तुच्छ लेखण्याची वृत्ती तेवढी सारखी. जर कधी या जातींच्या चिंध्या ‘हिंदू’ म्हणून एकत्र आल्या, तरी त्यात संघटन नसतं. कारण प्रत्येकजण आपल्या जाती-पोटजातीचा वेगळेपणा शाबूत ठेवूनच एकत्र आलेला असतो.

हेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

समरसता मंच थोतांड

या उलट स्थिती ख्रिश्चन आणि मुस्लिमांची आहे. अर्थात, हिंदूंसारखी इतर धर्मांमधेही जातभावना आहे. शिखात जाट-रजपूत असा भेद आहे. जैनात दिगंबर-श्वेतांबर असा पंथभेद आहे. धर्मांतर होऊन ६५ वर्षं उलटली तरी बौद्धात घाटी-कोकणी असा भेद आहे. मुस्लिमांमधे व्यवसाय आणि प्रदेशवार जातींचं वर्गीकरण आहे. ख्रिस्तीही अजून आपल्या मूळ जाती विसरलेले नाहीत.

या जाती वधू-वर संशोधनाच्या वेळी उचल खातात. पण अहिंदूंपुढे अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे ते धर्माच्या नावानं संघटीत असतात. आपल्यात धर्माचा कडवेपणा फुलवतात. असा कडवेपणा, संघटन हिंदूंमधे जातिभेदांमुळे दिसत नाही. कधी दिसलाच तर तो जुजबी, फसवा असतो.

यामुळेच ‘हिंदू संघटन’ हे संघाचं मूळ उद्दिष्ट असलं तरी ते पूर्ण होणं दूरची गोष्ट आहे. पण ‘हिंदू संघटनासाठी जाती-वर्ण्यव्यवस्थेला मूठमाती कशी देणार’ या प्रश्नाचं उत्तर आजवरच्या एकाही सरसंघचालकांना देता आलेलं नाही. त्याऐवजी ‘समरसता मंच’सारखं थोतांड उभं करण्यात आलं. कारण संघ जातीयतेच्या विरोधात असला, तरी जाती-वर्ण्य व्यवस्थेचा समर्थक आहे.

संघटीत हिंदुत्वाचं ढोंग

जातीयतेच्या अमानवी व्यवस्थेचं उच्चाटन करण्याची जबाबदारी डॉ. मोहन भागवत टाळत आहेत. यासाठीच ‘भारत हिंदुस्थान असून, हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत’, ‘जर हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल, तर भारतानं अखंड व्हायची गरज आहे.’ किंवा ‘हिंदू आणि मुस्लिमांचा ‘डीएनए’ एकच आहे!’ अशी विधानं करत ते जाती-धर्माचे डाव टाकत असतात. ‘घरवापसी’, ‘गोरक्षा’, ‘लव जिहाद’ अशा मोहिमा चालवून ते भाजपसाठी सत्तेचं राजकारण खेळतात.

हे ढोंग अल्पसंख्याकांना चिथावणारं आणि हिंदूंना अल्पसंख्याक करणारं आहे. असंही डोकं उठवणाऱ्या बांगेला प्रत्युत्तर म्हणून काकड आरतीच्या घंटानादाला लाऊडस्पीकर लावून, हिंदू धर्मीय मुस्लिमांसारखे वागू लागलेत. तर केक कापून ख्रिश्चनांसारखे वाढदिवसही साजरे करू लागलेच आहेत की!

हेही वाचा:  

महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

शेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी?

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री