आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
कोणाच्या आयुष्याला कधी आणि कशी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. हे वाक्य आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांकडून ऐकलंय. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा एखादा तरी प्रसंग येतोच. पण काहींचं आयुष्य तर अगदी सिनेमातल्या सारखं बदलून जातं. असंच काहीस कंदीलच्या बाबतीत घडलं.
कंदील, कंदील बलुच हे तिचं सगळ्यात लोकप्रिय नाव असलं तरी फौजिया अझीम हे तिचं ऑफिशिअल नाव होतं. बलुचचा जन्म पाकव्याप्त पंजाबमधे १ मार्च १९९० ला झाला. ती एका कन्झर्वेटीव कुटुंबात आणि वातावरणात जन्मली. पण तिने तिच्याच टर्मसवर जगणं मान्य केलं. आणि तिच्या याच विचारांमुळे तिचा जीव गेला.
असं काय केलं होतं कंदीलने? तिचे विचार काय होते? २००८ मधे वयाच्या सतराव्या वर्षी कंदीलचं आशिक हुसेनशी लग्न लावून देण्यात आलं. मात्र एकाच वर्षात तिने आपल्या नवऱ्याचं घर सोडलं. यामागचं कारण तो गैरवर्तणुक करतो असं तिने सांगितलं. तसंच तिने फेमस झाल्यानंतर मीडियासमोर त्यांच्यातल्या अगदी पर्सनल गोष्टी उघडपणे सांगितल्या. त्यामुळे त्याच्या वर्तणुकीबद्दल सगळ्यांना कळलं. हा सारा प्रसंग पाकिस्तान आणि पाकिस्तानी महिलांसाठी खूप वेगळा होता.
कंदीलच्या मृत्यूनंतर मीडियामधून पाकिस्तानातल्या अनेक महिलांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. अनेकजणी अक्षरश: रडत होत्या. त्यांच्या मते तिचा मृत्यू म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य नाकारणं. तिचं जाणं म्हणजे पाकिस्तानातल्या वुमेन फ्रिडम मुवमेंटला अल्पविराम लागल्यासारखं आहे. म्हणूनच बीबीसी, इंडिया टुडे, कारवान इत्यादींनी पाकिस्तानात जाऊन तिथली जनता, सरकार, आरोपी आणि संबंधित व्यक्तींशी बोलून तिचं आयुष्य आणि तिचा मृत्यू यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
कंदीलने घटस्फोटानंतर काही वर्ष काय केलं ते माहिती नाही. पण २०१३ मधे ती सगळ्यांच्या नजरेत आली आणि लोकप्रिय झाली. २०१० नंतर इंटरनेट घराघरात आणि बऱ्याच अंशी मोबाईलमधे पोचलं. पाकिस्तानी आयडॉलमधे ती भाग घेण्यासाठी ऑडिशन दिली. तिचं सिलेक्शन झालं नाही. पण लोकांनी सोशल मीडियाद्वारे तिला पसंती मात्र दिली.
तिचे ऑडिशनचे वीडियो एवढे वायरल झाले की कंदील सगळ्यापर्यंत पोचली. नंतर ती तिचे सेन्शुअस वीडियो शेअर करत होती. यातले हाऊ आय एम लुकिंग आणि मेरे सर में दर्द है इत्यादी पोस्ट सर्वाधिक वायरल झाल्या. पाकिस्तानी युथने तिला डोक्यावर घेतलं. पुढे ती जगभरात फेमस झाली तिचे जगभरातले फॉलोवर्स होते.
मग काय तिची तुलना चक्क हॉलिवूड अभिनेत्री आणि उद्योगिनी किम कार्दाशिअनशी करू लागले. पण पाकिस्तानी मात्र किमपेक्षा कंदील बेटर आहे असंच म्हणत होते. तिच्या वीडियोचं डमस्मॅश खूप मोठ्या प्रमाणावर होतहोतं. पुढे ती सोशल मीडियावर वुमन फ्रिडमवर उघडपणे बोलत होती. आणि इथूनच ती मेन स्ट्रीम मीडियामधे टॉक शोमधे भाग घेताना दिसली. त्यामुळे तिला जेवढं प्रेम, फेम मिळालं त्यापेक्षा जास्त हेट मिळत होतं.
हेही वाचाः जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?
तिची आणखी सगळ्यात जास्त वायरल झालेली पोस्ट म्हणजे तिने माजी क्रिकेटर आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर व्यक्त केलेलं प्रेम. आणि दुसरी पोस्ट म्हणजे टी २० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारतला हरवलं तर मी पाकिस्तानी जनतेसाठी स्ट्रिप डान्स करणार. पण भारताने मॅच जिंकली. आणि भारतीय मीडियाने तिची तुलना पूनम पांडेशी केली. पाकिस्तानात गाणं गाण्यासाठी, महिलांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी ती जागोजागी जात होती.
असंच तिला न्यूज चॅनलवर पाकिस्तानी नैतिकतेवर बोलण्यासाठी बोलावलं. तिथे मुल्ला मुफ्ती कवीदेखील होते. त्यानंतर काही महिन्यांनी दोघे एका हॉटेलमधे भेटले. तिथे तिने त्यांच्यासोबत बरे फोटो काढले. जे तिने नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर टाकलं. त्यामुळे मुल्लांची खुप निंदानालस्ती झाली. त्यांना त्यांच्या सर्व सार्वजनिक आणि मानाच्या पदांवरुन काढून टाकण्यात आलं.
हेही वाचाः एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच
पुढे १५ जुलै २०१६ ला तिच्या आई वडिलांच्या घरात तिचा मृत्यू झाला. सुरवातीला समजलंच नाही की तिचा मृत्यू कसा झाला. पण तिचा भाऊ एम. वसीमने तिचा जीव घेतला. पण यात मुल्ला आणि तिचा नवरा सामील असल्याचं म्हटलं जातं. पण वसीम सध्या एकटाच याची शिक्षा भोगतोय.
आणि त्याने मीडियासमोर कोणतीही भिती किंवा अपराधी न वाटता असं सांगितलं, की ती करत असलेल्या कामांमुळे आमची खूप बदनामी झाली. हे न पटणारं होतं. एका बाईला असं करता येतं नाही. तिच्या सर्व गोष्टींना वैतागून तिला मारलं.
शेवटी पुन्हा तेच. कोणतीही महिला कोणतीही भीडभाड न बाळगता आपले विचार मांडत असेल, आपल्या शरिराचं किती आणि केवढं प्रदर्शन करावं हे ती ठरवू शकत असेल, तिला जन्मत: मिळालेलं नैसर्गिक स्वातंत्र्य ती उपभोगत असेल तर तिला मृत्यूचाच सामना करावा लागतो.
महत्त्वाचं म्हणजे कंदील शेवटपर्यंत स्वातंत्र्यात जगली. तिने सर्वकाही आपल्या टर्म्स अँड कडिशन्सवर जगली. ती आजही पाकिस्तानातल्या असंख्य महिलांची प्रेरणा म्हणून जगतेय.
हेही वाचाः
गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?
इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?