पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

०१ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले? त्यांची नावं काय? त्यांनी किती काळ राज्य केलं? पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली? हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा 

छत्रपती शिवरायांनी १६४७मधे वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि मराठेशाहीची खर्‍या अर्थाने सुरवात झाली. १६७४ मध्ये झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाने त्यावर शिक्कामोर्तब झालं. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांनी ९ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्याचा विस्तार केला. त्यानंतर शिवपुत्र राजाराम महाराज आणि नंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाईंनी औरंगजेब महाराष्ट्रात असतानाही स्वराज्य राखलं.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांचा मुलगा छत्रपती शाहू १७०७मधे महाराष्ट्रात आले. तोपर्यंत ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्वराज्याच्या संघर्षापासून दूर उत्तरेत औरंगजेबाच्या कैदेत होते. महाराष्ट्रात परतल्यावर त्यांचा ताराराणींशी संघर्ष झाला. त्यातून शाहूंची सातारा गादी आणि ताराराणींची कोल्हापूर गादी अशा मराठेशाहीच्या दोन वाटण्या झाल्या.

पहिल्या शाहूंच्या काळात वाढले पेशवे

छत्रपती शाहू महाराज स्वतः लढवय्ये नव्हते. पण त्यांनी पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, धारचे पवार, नागपूरचे भोसले अशा सरदारांना स्वायत्तता देऊन स्वराज्याचा भौगोलिक विस्तार केला. पण त्यात छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा मात्र लोप पावत गेली. यातले नागपूरचे भोसले सोडले तर इतर सगळेच सरदार पुण्याच्या पेशव्यांच्या अधिकृत वर्चस्वाखाली होते. 

नागपूरचे भोसल्यांनाही पुढे ते वर्चस्व स्वीकारावं लागलं. कारण पुण्याच्या पेशवे बाळाजी विश्‍वनाथ आणि थोरले बाजीराव यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्याकडे छत्रपतींपेक्षा जास्त अधिकार आले. शाहूंनी ऐतखाऊ सरंजामदाराप्रमाणे आयुष्य घालवण्यात धन्यता मानली. बाजीरावांच्या काळातच शाहू नाममात्र राजे बनले आणि खरा कारभार पेशव्यांच्या हातात आला. तरीही शाहू जिवंत असेपर्यंत त्यांच्या वडीलकीचा वचक होता.

हेही वाचाः पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

शाहूंच्या नंतर छत्रपती बनले नामधारी

शाहूंच्या नंतर रामराजा (कार्यकाळ - १७४९ ते १७७७), दुसरे शाहू (कार्यकाळ - १७७७ ते १८०८), प्रतापसिंह (कार्यकाळ - १८०८ ते १८३९) यांचं पेशवाईवर कोणतंही नियंत्रण नव्हतं. पेशवाईमुळे उन्मत्त झालेल्या ब्राह्मणशाहीने छत्रपती प्रतापसिंहांचा बळी घेतल्याचा सविस्तर इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलाय.

दुसरीकडे, कोल्हापूर गादीने ताराराणींच्या प्रेरणेमुळे पेशव्यांच्या विरोधात शक्य होईल तसा संघर्ष केला. पण तो फारच तोकडा पडला. शिवाजी-दुसरे (कार्यकाळ - १७०० ते १७१२), संभाजी-दुसरे (कार्यकाळ - १७१२ ते १७६०),  शिवाजी-तिसरे (कार्यकाळ - १७६० ते १८१२) हे केवळ नामधारी छत्रपती होते.

सातार्‍यात छत्रपती प्रतापसिंह आणि कोल्हापूरच्या गादीचे शिवाजी-तिसरे यांनी इंग्रजांचं वर्चस्व मान्य केलं. त्यानंतर केवळ कोल्हापूर गादीवरच्या छत्रपती शाहू महाराजांनी (कार्यकाळ - १८९४ ते १९२२) आपल्या बंडखोर सामाजिक कार्यातून इतिहासावर ठसा उमटवला. बाकी सारे छत्रपती इतिहासाच्या पानांमधल्या याद्यांमधेच हरवून गेले. 

पेशव्यांच्या आधीचे पेशवे

अष्टप्रधान मंडळातले मोरोपंत पिंगळे हे स्वराज्याचे पहिले पेशवे. त्यानंतर शाहू महाराजांपर्यंतच्या धामधुमीत चार पाच पेशवे झाल्याची नोंद आहे. त्यात रामचंद्रपंत अमात्य हे महत्त्वाचं नाव. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश आज्ञापत्रातून एकत्र करून इतिहासात कायमचं नाव कोरून ठेवलंय. 

महाराणी ताराबाई यांनीही काहीकाळ पेशवेपदाचा कारभार पाहिल्याची नोंद आहे. भट घराण्याआधीचा शेवटचा पेशवा बहिरोबा पिंगळे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कैदेत टाकलं. त्यानंतर बाळाजी विश्वनाथांकडे पेशवाईचा कारभार आला. बाळाजी विश्वनाथांपासून ते दुसऱ्या बाजीरावापर्यंत आठ पेशव्यांची पेशवाई चालली. त्याची ही माहिती.

१. बाळाजी विश्‍वनाथ भट्ट

(कार्यकाळ - १७ नोव्हेंबर १७१३ ते १२ एप्रिल १७२०)

बाळाजी विश्‍वनाथ हे पुण्याच्या पेशवे घराण्याचे संस्थापक. कोकणातून परागंदा झालेल्या कुटुंबात जन्मलेल्या बाळाजींनी त्यांच्या करिअरची सुरवात रामचंद्रपंत अमात्य आणि नंतर सेनापती धनाजी जाधव यांच्याकडे कारकून म्हणून केली. औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शाहू महाराष्ट्रात परतल्यानंतर झालेल्या भाऊबंदकीत धनाजी जाधवांना शाहूंच्या पक्षात नेण्याचं श्रेय बाळाजींना मिळालं.

त्यांनी युद्ध जिंकत, मसलती करत शाहूंचा पक्ष प्रबळ करण्यात हातभार लावला. शाहू छत्रपती बनल्यानंतर त्यांनी हळूहळू मुतालिकपदापासून पेशवेपदापर्यंत झेप घेतली. रफीउर्दौरजात याला दिल्लीच्या गादीवर बसवण्याच्या राजकारणात सामील होऊन मराठ्यांच्या उत्तरेतील घोडदौडीची सुरवात करून दिली.

हेही वाचाः भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

२. थोरले बाजीराव

(कार्यकाळ - २७ एप्रिल १७२० ते २८ एप्रिल १७४०)

बाळाजी विश्‍वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा बाजीराव बल्लाळ याला वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळालं. ते इतिहासात थोरले बाजीराव किंवा पहिला बाजीराव म्हणून ओळखले जातात. सैन्याच्या अग्रभागी राहून ३६ लढाया जिंकल्या. त्यांनी एकही लढाई हरली नाही, असं मानलं जातं. त्यांनीच पुण्याला राजधानीचं वैभव मिळवून दिलं आणि शनिवारवाडाही बांधला.

त्यांच्या काळात मराठ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अंमल उत्तर भारत ते कर्नाटकपर्यंत पसरला. मात्र शत्रू ज्याच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हता, अशा या योद्ध्याला घरभेद्यांच्या जातीय मानसिकतेने संपवलं. मस्तानी या मुस्लिम लावण्यवतीशी त्यांच्या विवाहाला मान्यता देण्यात पुण्याच्या धर्ममार्तंडांनी नकार दिला. त्यामुळे बाजीराव मस्तानी ही प्रेमकथा पेशवाईतली महान शोकांतिका बनली.

३. नानासाहेब पेशवे

(कार्यकाळ - ४ जुलै १७४० ते २३ जून १७६१)

थोरल्या बाजीरावांचा सर्वात मोठा मुलगा बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी पेशवा बनले. ते सर्वाधिक काळ पेशवेपदी राहिले आणि त्यांच्याच काळात पेशवाईचे झेंडे अटकेपार लागले. पण ते स्वतः सेनापती नव्हते. त्यांनी दरबारी राजकारण करत राज्य विस्तारलं.

होळकर, शिंदे, पवार, गायकवाड अशा सरदारांच्या मदतीने त्यांनी जवळपास सगळ्या देशावर प्रभुत्व सिद्ध केलं. मात्र शाहूंच्या नंतर छत्रपतींना नामधारी बनवून त्यांनी मराठेशाहीची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. त्यांच्या काळात पेशवाईतील ब्राह्मणी संकुचितपणाला सुरवात झाल्याचं दिसतं. त्यामुळे दुखावलेल्या सरदारांमधील दुफळीमुळे पेशवे पानिपताचं युद्ध हरले. त्याच्या धक्क्याने नानासाहेबांचाही शेवट झाला.

हेही वाचाः पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?

४. थोरले माधवराव

(कार्यकाळ - २३ जून १७६१ ते १८ नोव्हेंबर १७७२)

पानिपतच्या पराभवाने झालं नाही, इतकं पेशवाईचं नुकसान माधवरावांच्या मृत्यूने झालं, असं मराठ्यांचा इतिहासकार ग्रँड डफ याने नोंदवलेलं मत प्रसिद्ध आहे. पानिपतच्या पराभवानंतर पराभूत मानसिकतेत आणि कर्जाच्या खाईत बुडालेल्या पेशवाईला पुन्हा उभारी देण्याचं काम थोरल्या माधवरावांनी केलं.

नानासाहेबांचा मोठा मुलगा विश्‍वासराव पानिपतात मारला गेल्यामुळे, दुसर्‍या मुलाला म्हणजे माधवराव बल्लाळ यांना वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवा बनवण्यात आलं. काका राघोबादादाच्या त्रासाला तोंड देत त्यांनी निजाम, हैदर अली आणि इंग्रज या तिन्ही शत्रूंना मर्यादेत ठेवलं. उत्तरेतल्या मराठा सरदारांना बळ दिलं. पण वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्यांचा टीबीने म्हणजे तेव्हाच्या भाषेत राजक्ष्यमाने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्यासोबत सती गेल्या.

५. नारायणराव पेशवे

(कार्यकाळ - १३ डिसेंबर १७७२ ते ३० ऑगस्ट १७७३)

माधवरावांच्या अकाली निःसंतान मृत्यूनंतर त्यांचे काका राघोबादादांना पुन्हा पेशवा होण्याची इच्छा झाली. पण माधवरावांचे छोटे भाऊ नारायणराव यांना सतराव्या वर्षी पेशवाईची वस्त्रं मिळाली. त्यामुळे धुसफुसणार्‍या राघोबांनी सुमेरसिंग गारदी याला नारायणरावांना मारण्याची सुपारी दिली. राघोबांच्या पत्नी आनंदीबाई यांनी नारायणरावास धरावे या पत्रातील आदेशात ‘ध’चा ‘मा’ केला.

काका, मला वाचवा, असं ओरडत नारायणराव धावले. पण शनिवारवाड्यातलं कुणीही त्यांच्या मदतीला धावलं नाही. काकासमोरच पुतण्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. नारायणरावांच्या खुनाच्या वेळेस त्यांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. त्या बाळंत झाल्यानंतर नारायणरावांचा मुलगा सवाई माधवराव याला तो अवघा चाळीस दिवसांचा बालक असताना पेशवा बनवण्यात आलं.

हेही वाचाः शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

६. रघुनाथराव पेशवे

(कार्यकाळ - १० ऑक्टोबर १७७३ ते १७७४ ची सुरवात)

राघोबादादा आणि राघोभरारी या नावांनी इतिहासाला माहीत असणारे रघुनाथराव हे थोरल्या बाजीरावांचे सर्वात लहान मुलगा होते. त्यांनी ऐन तारुण्यात आजच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंतचा मुलूख पेशव्यांच्या वर्चस्वाखाली आणला. दिल्लीच्या दोन मुगल सत्ताधीशांना अटक करण्याचा पराक्रम त्यांनी गाजवला.

नारायणरावाचा खून करून ते पेशवा बनले. पण न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी त्यांना नारायणरावांच्या खुनामध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ती कधीच प्रत्यक्षात आली नसली, तरी त्यानिमित्ताने नाना फडणीसांसह बारा कारभार्‍यांनी बारभाई कारस्थान  करून रघुनाथरावाला पदावरून हटवलं. बारभाईने पुकारलेल्या युद्धासाठी रघुनाथरावाने आधी निजाम आणि नंतर इंग्रजांची मदत घेतली. पण त्यात ते सतत पराभूत झाले. वडगाव येथे तह होऊन त्यांनी पेशवेपदावरचा हक्क सोडला.

७. सवाई माधवराव

( कार्यकाळ - २८ मे १७७४ ते २७ ऑक्टोबर १७९५ )

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या दिवशी पेशवेपद ते एकविसाव्या वर्षी शनिवारवाड्याच्या बाल्कनीतून उडी मारून केलेली आत्महत्या, अशी शोकांतिका असलेल्या सवाई माधवराव अर्थात माधवराव-दुसरे यांनी सत्तेचा उपभोग खर्‍या अर्थाने घेतलाच नाही. कारण त्यांच्या काळात कारभारी नाना फडणीस हेच पेशवाई चालवत होते.

सवाई माधवरावांच्या काळात उत्तरेत महादजी शिंदे यांनी पराक्रमाच्या बळावर जवळपास सर्व उत्तर भारत कब्जात आणला. त्यांनी दिल्लीवरही भगवा फडकवला. दुसरीकडे, नाना फडणीसांनी निजाम, टिपू सुलतान आणि इंग्रज या शत्रूंवर वचक बसवला. मात्र नानाच्या फडणीशी चाळ्यांमुळे पेशवाई बदनामही झाली. त्यात सवाई माधवरावाच्या आत्महत्येची आणि पर्यायाने पेशवाईच्या नाशाची मुळं होती.

८. दुसरा बाजीराव

(कार्यकाळ - ६ डिसेंबर १७९६ ते ३ जून १८१८)

नाना फडणीसांनी इंग्रज आणि निजाम या मराठेशाहीच्या सर्वात मोठ्या शत्रूंची मदत घेऊन दुसर्‍या बाजीरावाला पेशवा बनवलं. तेव्हाच त्याच्या कारकीर्दीचा शेवट पारतंत्र्यात होणार, हे स्पष्ट होतं. दुसरा कुणीच वारस नसल्यामुळे राघोबादादांच्या या मुलाला पेशवा बनवणं भाग होतं. त्याने बापाप्रमाणेच गुण उधळत स्वातंत्र्य गमावलं.

इतिहासात त्याचं वर्णन स्वाभिमानशून्य, नीतिभ्रष्ट, उधळा, स्वार्थासाठी ब्रिटिशांची गुलामगिरी पत्करून ऐष करणारा नादान राज्यकर्ता, अशी केली जाते. त्याने जून १८१८ मधे त्याने ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ती पेशवाईची अखेर होती. वार्षिक आठ लाख रुपये तनखा आणि अकरा बायकांचं कुटुंब घेऊन कानपूरजवळ बिठूर इथे वयाच्या ७६ वर्षांपर्यंत जगला.

हेही वाचाः 

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही