संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात.
पंडित प्रभाकर कारेकर हे दोन्ही कानांच्या पाळ्यांना बोटं लावून घ्यायचं नाव. गेल्या १३ जुलैला त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी साजरी करण्यात आली. आतून बाहेरून साधा असलेला माणूस, सगळ्याच बाबतीत श्रीमंत. बडेजाव न करता संगीतसेवा करणारे कारेकर म्हणजे शास्त्रीय आणि नाट्य संगीतातलं जणूकाही रत्नच. प्रतिभेची राशी असलेला हा संगीतातला खऱ्या अर्थाने प्रभाकर आहे.
अखंडपणे संगीतसाधना करून पंडित पदवीला पोचलेले हे एक हुशार आणि नम्र विद्यार्थी. अगदी गुरु दत्ताप्रमाणेच ज्याच्याकडून जे मिळेल ते शिकत जायचं. आणि त्याला गुरु मानायचं असा वसा घेतलेले हे संगीतातलं व्रतस्थ नाव आहे. आजही संध्याकाळी शिवाजी पार्कच्या मैदानाला फेऱ्या मारत आपली तब्येत ठणठणीत ठेवलीय. कारेकरांनी पंच्याहत्तरी गाठल्याचं पटतच नाही. व्यसनं आणि शौक यापासून अलिप्त राहिल्यामुळेच ही किमया त्यांना जमलीय.
रसिकाग्रणी विलास गोडबोले यांच्यामुळे माझा आणि त्यांचा परिचय झाला. अगदी लहान असताना म्हणजे गाण्यातलं काही समजत नसताना वडलांनी पार्ल्यातल्या टिळक स्मारक मंदिरात आम्हा भावंडांना एका मैफिलीला नेलं. त्या मैफिलीत लालजी देसाई, शरद जांभेकर आणि प्रभाकर कारेकर हे तिघे गायले होते. कारेकरांचा हसतमुख चेहरा तेव्हापासून लक्षात राहिला तो कायमचा. पण त्यांची गाणी ऐकल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर जास्तच दुणावला.
हेही वाचा: `मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`
ते मूळचे गोव्यातले. त्यांचे वडील आणि वडीलबंधू दोघंही चांगलं गायचे. पण घरची परिस्थिती खास नव्हती. प्रभाकरला गाण्याचं अंग असल्याने त्याला मुंबईला धाडावं असं वडलांना वाटायचं. कारेकर बंधूंचं गाणं काही हितचिंतकांमुळे पं. सुरेश हळदणकर यांनी ऐकलं. आणि त्यांनी प्रभाकरला आपल्या घरी ठेवायची तयारी दाखवली. प्रभाकर तेव्हा वयाने लहान असले तरी कष्टाळू होते.
दादरच्या त्या घरी केवळ संगीत शिकायचं आणि जेवायचं, खायचं, झोपायचं अशी काही त्याची दिनचर्या नव्हती. आपल्या गुरूंना कुठलीही तकलीफ होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी लागे. घरची बहुतेक सर्व कामं प्रभाकर लवकर उठून आटपून घेत. संगीत साधनेवेळीही कामांकडे दुर्लक्ष होणार नाही याची ते काळजी घेई. हळदणकर हे तेव्हा लोकप्रिय गायक आणि नाट्यअभिनेता होते. त्यांच्या बऱ्याच मैफली व्हायच्या. तसंच त्यांच्याकडेही बरेच बुजुर्ग गायक यायचे आणि गाऊन जायचे. त्यामुळे प्रभाकरांच्या गाण्याची आपोआप उत्तम तयारी झाली.
हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
काही कारणाने प्रभाकरचा त्या महान व्यक्तीबरोबरचा सहवास संपला आणि कुठे रहायचं इथपासून सगळ्याचीच भ्रांत पडली. रघु भट या भल्या गृहस्थाने त्यांना आश्रय दिला. आता जमेल त्या मैफिलीत गायचं एवढंच कमाईसाठीचं साधन होतं. पण दैवाची लीला अगाध असते. एकदा प्रभाकरचा रियाझ सुरु असताना शेजारच्या खोलीतल्या सीएकडे आलेल्या नटसम्राटांच्या कानावर त्यांचं गाणं पडलं.
मग आवाज आणि एकूण तयारीचं गाणं ऐकताऐकता हे नटसम्राट मंत्रमुग्ध झाले. त्यांनी ताबडतोब चौकशी करून प्रभाकरला मद्रासला येण्याचं आमंत्रण दिलं. मद्रासला या नटसम्राटाचं शुटींग होतं. त्याने दिलेल्या विमानाच्या तिकिटामुळे प्रभाकरचे पाय पहिल्यांदा विमानाला लागले. पुढे पंधरा दिवस शुटींगच्या ठिकाणी गेले. शुटींग संपल्यावर नटसम्राटाने प्रभाकरच्या गाण्याचा लुफ्त उठवला. एवढंच नाही तर मानधन नाकारणाऱ्या प्रभाकरांना त्यांनी तंबोऱ्याची जोडीही नंतर पाठवली. हे नटसम्राट म्हणजे दुसरे तिसरं कुणी नसून दिलीपकुमार होते.
हेही वाचा: प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा
पुढे त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकींकडे स्वरसाधना सुरु केली. तिथेही त्यांना दर्जेदार गायकीच्या संस्काराबरोबर वात्सल्य, प्रेमही लाभलं. प्रभाकर यांचा स्वभावही मनमिळाऊ, सोशिक असल्याने स्वरसाधनेत त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. मग पं. सी. आर. व्यास हेसुद्धा गुरु म्हणून त्यांना लाभले. त्यामुळे त्याची गायकी अधिक कसदार झाली. विशेष म्हणजे जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर अशा वेगवेगळ्या घराण्यांची गायकी त्यांच्या गळ्यात उतरत गेली.
प्रभाकर कारेकर हे नाव खऱ्या अर्थाने गाजायला लागलं ते पु.लं.च्या वरदहस्तानं. पुलं तेव्हा शाकुंतल ते सौभद्र या सांगीतिक प्रवासाच्या प्रयोगात गुंतले होते. त्यांनी कारेकरांना ‘प्रिये पहा’ हे गाणं अतिशय उस्फुल्लपणे शिकवलं आणि कारेकरांनीसुद्धा ते अतिशय गोडपणे सादर करायला सुरवात केली. पुढे तर जिथे तिथे हेच गाणे त्यांना गायचा आग्रह होऊ लागला. या गाण्याने प्रभाकर कारेकर हे नाव घरोघरी पोचलं असं म्हटलं तरी चालेल.
हेही वाचा: गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी
यथावकाश प्रभाकर कारेकरांनी आपलं गाणं अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. ‘सुकांत चंद्रानना पातली, नभ सागरी उभी बालिका, चंदनाचे परिमल आम्हा काय त्याचे’ ही काही गाणी खास त्यांनी आपल्या स्वराने आणि माधुर्याने वेगळी ठरतील अशापद्धतीने पेश केली. ती नेहमीच तजेलदार वाटतात. त्यांना अर्थातच मैफलीची अनेक आमंत्रणंही येत राहिली. त्याचबरोबर नाटकातून काम करण्याच्याही ऑफर यायच्या. पण यापासून ते दूरच राहिले.
अभिनय वगैरे करायच्या भानगडीत ते पडले नाहीत. मात्र रोजचा रियाझ अतिशय तन्मयतेने करत त्यांनी गळा गाता ठेवला. वय वाढल्यावरही त्यांच्या गळ्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. काही वर्षापूर्वी दादरला सलामी देणारा ‘आम्ही दादरकर’ हा कार्यक्रम झाला होता. त्यात त्यांना आमंत्रण होतंच. पण त्यांनी अतिशय उत्साहाने ‘शत जन्म शोधताना’ हे गाणंही गायलं आणि आपलं नाणं खणखणीत असल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा: टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनीही त्यांचं गाणं ऐकून त्यांची वाहवा केली होती. आपल्या जन्मभूमीतल्या महान व्यक्तीकडून मिळालेली ही कौतुकाची शाबासकी कारेकरांसाठी मोठा सन्मानच होता. त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. सत्कार सोहळे त्यांच्या वाट्याला आले. पण ती शाबासकी त्यांच्यासाठी मोठी होती, जिव्हाळ्याची होती.
खूप चांगले दिवस आल्यावरसुद्धा ते निगर्वी राहिले. त्यांनी यश आपल्या डोक्यात जाऊ दिलं नाही. त्याचबरोबर कधीही वाद वगैरे ओढवून घेतले नाहीत. साधं सरळ आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल राहिला. लेंगा झब्बा हा त्यांचा पोशाख. संगीतसाधक म्हणूनच रहाणं त्यांनी पसंत केलंय. त्यांना पंच्याहत्तरी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा:
ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य