एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल

०६ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली.

मुंबईतलं १९९३ हे वर्ष असं ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या मुंबईचं चित्र उभं राहतं. पण यानंतर एका रायफलचं नाव खूप चर्चेत आलं होतं ते म्हणजे एके ४७. आजच्याच दिवशी म्हणजे ६ जुलैला एके ४७ च्या निर्मितीला सुरवात झाली. पण आधी सैन्याने या रायफलची चाचणी घेतली. आणि मग अधिकृतरीत्या एके ४७ रायफल बनू लागली.

असं झालं एके ४७ चं नामकरण

आपण काऊंटर स्ट्राईक गेम खेळतानासुद्धा बऱ्याचदा एके ४७ ची निवड करायचो. पण रायफलचं नाव एके ४७ असं का दिलं? मिखाईल क्लाशनिकोव या रशियाच्या मिलिटरी इंजिनियरने १९४१ पासून बंदुक आणि रायफल डिझाइन करण्यास सुरवात केली. सोविएत युनियनला दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या एसटीजी ४४ पेक्षा अद्ययावत रायफल हवी होती.

मग काय क्लाशनिकोव कामाला लागले. आणि १९४६ मधे त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर एक रायफल बनवली. पण त्यात अनेक त्रुटी असल्यामुळे त्यावर पुन्हा काम करून १९४७ ला एक नव्या रुपातली रायफल सैन्यदलासमोर ठेवली. सैन्याने या ही रायफल वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. आणि ६ जुलै १९४७ पासून या रायफलची अधिकृत निर्मिती होऊ लागली.

पण या रायफलला एके ४७ का म्हणतात, तर एके मधल्या ए म्हणजे ऑटोमॅट याचा अर्थ ऑटोमॅटीक असाच होतो. के म्हणजे क्लाशनिकोव हे रायफल बनवणाऱ्याचं नाव. आणि ही १९४७ ला बनवली म्हणून ४७ अशी माहिती हिस्ट्री अँड हेडलाईन या वेबसाईटवर वाचायला मिळते.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान युद्ध लढताहेत की टाळताहेत?

या रायफलची खासियत काय?

आपल्याला माहिती आहे का, संपूर्ण जगात एके ४७ या रायफल मानवी इतिहासातली सर्वोत्तम आणि यशस्वी रायफल म्हणून नावाजलं जातं. पण या रायफलचं मूळ स्वरुप म्हणजे त्याकाळी उपलब्ध असलेल्या सगळ्या चांगल्या रायफल. म्हणजे काय तर त्याकाळातल्या एका रायफलीत हे चांगलं होतं आणि दुसऱ्या रायफलीत ते. मग क्लाशनिकोव यांनी साधारण १५० रायफलींमधले चांगले पार्ट नव्याने बनवून ते असेम्बल केले. आणि बनली एके ४७.

या रायफलमधलं ट्रिगर तंत्र, सेफ्टी कॅच, रोटेटींग बेल्ट आणि गॅसवर आधारीत रिलोडींग इत्यादी सर्व गोष्टी एके ४७ ची खासियत आहे. एक रायफल साधारण १५ हजार वेळा वापरता येते. आणि यातून एका मिनिटात  ४० ते १०० गोळ्या बाहेर पडतात. ज्या ३५० मीटरपर्यंत जातात. आणि याचं वजन फक्त ३.४७ किलो आहे, असं द इकॉनॉमिस्टने आपल्या एका रिपोर्टमधे म्हटलंय. आता एवढी सगळी वैशिष्ट्यं असणारी रायफल खूप महाग असेल असं आपल्याला वाटेल पण असं काही नाही. उलट ही रायफल स्वस्त आहे. म्हणूनच हिचा वापर जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमधे केला जातो.

हेही वाचा: नक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही

एके ४७ चा काळा बाजार

ही रायफल काही फक्त सैन्यामुळे प्रसिद्ध झाली नाही. तर दहशतवादी हल्ल्यांमधेही हिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच ही रायफल वारंवार चर्चेत येते. फोर्ब्स मॅगझिनने मार्च २०१७ मधे एका लेखात दिलेल्या माहितीनुसार, एके ४७ रायफलचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे रायफलच्या अनधिकृत किंमतीत ५६ टक्क्यांनी वाढ झालीय. प्रत्येक देशात वेगवेगळ्या किंमतींना विकली जाते. सध्या ६०० ते २ हजार ८०० युएस डॉलरने रायफल विकली जातेय.

वर्षाला एके ४७ ची जगातल्या वेगवेगळ्या देशांमधे साधारण २० कोटींची अधिकृत विक्री होते. डुप्लिकेट रायफल बनवण्याचा बाजारही मोठा आहे. पण त्या रायफलमधे ओरीजनलसारखे फिचर मिळणार नाहीत. भारतात अधिकृतरीत्या बनवली जाणारी इंसास, कलांतक आणि इंसास लाइट मशीन गन रायफलही एके ४७ ची प्रतिकृती असल्याचं म्हटलं जातं.

हेही वाचा: २६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी

एके ४७ वरचं पुस्तक

या रायफलबद्दल आणखी इंटेस्टींग गोष्ट म्हणजे ही रायफल आपल्या वीडियो गेम, खेळणी, टिशर्ट, दारूच्या बाटल्या, गिफ्ट आर्टीकल इत्यादी सगळीकडे आहे. म्हणजे या रायफलची लोकांमधेसुद्धा क्रेझ आहे. त्याचबरोबर बगदादच्या वस्तुसंग्रहालयात सद्दाम हुसेनची स्पेशल एके ४७ ठेवली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही रायफल सैनिकांपासून, दहशतवाद्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात दिसते आणि सगळ्यांनाच आवडते.

या रायफलवर २००७ मधे मायकल होजेस या ब्रिटिश लेखकाने 'एके ४७: द स्टोरी ऑफ पीपल्स गन’ नावाने एक पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक एमेझॉन, गुगुल बुक, गुडरीडवर उपलब्ध आहे. पुस्तकात एके ४७ ही रायफल आणि रायफल बनवणारा कसा सोविएत युनियनचा हिरो आहे. पण संपूर्ण जगाचा खात्मा होण्यात ही रायफल केंद्रस्थानी आहे. ही रायफल दहशतवादाच्या हातातले अस्त्र असल्याचाही उल्लेख पुस्तकात आहे. तसंच या रायफलला सर्वव्यापी असंही म्हटलंय. आणि जगात तिसरी क्रांती होणार आहे म्हणतात. पण क्रांती करणाऱ्यांच्या हातात एके ४७ आहे, असं लिहून लेखकाने आपली चिंता व्यक्त केलीय.

हेही वाचा: 

मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?