एकटी, दुकटी बाई आता निवडणुकीच्या रिंगणात

२१ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी.

तब्बल २७ वर्ष ती स्वतःच्या अधिकारासाठी लढतेय. नवरा वारला आणि त्याच्या घरच्यांनी तिचा प्रॉपर्टीवरचा हक्क नाकारला. त्यामुळे तिच्यापुढे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरच यायची वेळ आली. पण बाई म्हणून थिजत न बसता मुलांना हक्काचं छप्पर आणि त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, हे तिच्या डोक्यात पक्क झालं होतं. यासाठीच जळकोट तालुक्यातल्या विमल देवकाते यांचा संघर्ष सुरू आहे.

एकट्या बाईचा लढा

वयाच्या ३२व्या वर्षी हातात एक सहा-सात वर्षांच मुलं आणि ओटीत महिन्या दोन महिन्याचं तान्ह बाळ घेऊन विमलबाईंनी नातेवाईकांच्या अन्यायाविरोधात न्यायालयीन लढा पुकारला. आजचं विमलबाईंच वय ५५ वर्षे. ३२ व्या वर्षापासून त्या न्यायालयीन लढा देत आहेत. आता तर मुलांनीही त्यांना हा विषय सोडून द्यायचा धोशा त्यांच्यामागे लावलाय. पण आपला हक्क मिळवायचंच हा विमलबाईंचा इरादा पक्का आहे.

जळकोट हा लातूर जिल्ह्यातला दुष्काळी, डोंगरी तालुका. द्रौपदा गवळीला नवरा रोज मारायचा. माराला कंटाळून द्रौपदा पळून आली. तिने दुसरं लग्न केलं. तिला मुलगा झाला. पण या सगळ्यामुळे तिच्या आयुष्यात काही बदल झाला नाही. द्रौपदाचा दररोजचा मार चुकला नाही. शेवटी द्रौपदाने मुलगा घेऊन लग्न आणि नवऱ्याशिवाय राहण्याचा निर्णय घेतला. श्रमजीवी संघटनेची कार्यकर्ता म्हणून द्रौपदा कामाला लागली.

याच काळात तिला कमिटी ऑफ रिसोर्स ऑर्गनायजेशन अर्थात कोरोची फेलोशिप मिळाली. त्यातून ती महिला मंडळ फेडरेशन आणि त्यानंतर एकल महिला संघटनेशी जोडली गेली. द्रौपदाचं काम पाहून जळकोटच्या तहसीलदारांनी कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण रोखण्याच्या विशाखा कमिटीवर द्रौपदाची गेल्यावर्षी नेमणूक केली.

मराठवाड्यात निवडणुकीच रणधुमाळी

कौटुंबिक प्रश्नांनी पोळलेल्या या महिला आता लोकशाही प्रक्रियेने होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. लोकसभा निवडणुकीचे वारे तापण्याआधी मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या १० तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीसाठी अर्ज भरणं, अर्ज बाद होणं, प्रचार असं निवडणुकीचं वातावरण आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणुकीत सर्व उमेदवार महिला आहेत. ७ आणि ८ जानेवारीला निवडणुकीची ही प्रक्रिया पार पडली. यात १२८ जणी निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी ६६ महिला निवडून आल्या. अशी अवेळी वाटणारी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची आणि समाजाला प्रश्न विचारणारी आहे.

विधवा, परित्यक्ता आणि ज्यांना नवऱ्यांनी टाकलंय अशा महिलांचे प्रश्न समाज कधी आपले प्रश्न म्हणून स्विकारणार? यंत्रणा त्यांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचा विचार करुन कधी त्यावर तोडगा काढणार? ‘ज्याचे प्रश्न त्याचे नेतृत्त्व’ या विचारातून ही निवडणूकीची संकल्पना पुढे आलीय, असं या प्रक्रियेत सहभागी असलेले राम शेळके सांगतात.

आणि उभी झाली संघटना

महिला मंडळ फेडरेशनच्या सदस्य असलेल्या विविध संघटनांच्या महिला एकत्र यायच्या. तेव्हा असं लक्षात आलं की यामध्ये मोठ्या संख्येने एकल महिला आहेत. ज्यांना समाज विधवा, परित्यक्ता अशा नावाने संबोधतो. त्यांचे प्रश्न इतर महिलांसारखेच वाटत असतात. मात्र त्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. इतर महिलांमध्ये त्यांचे प्रश्न लपवून टाकले जातात. 

स्वतःच्या हक्काचं मिळवण्यासाठी जेव्हा त्या कायदेशीर प्रक्रियेत उतरतात. मात्र तिथे त्यांना वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही. त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. तिथेही कागदपत्रांच्या अडचणींचा डोंगर त्यांची वाट रोखून धरतो. त्या महिला आहेत. महिलांसाठी आपल्याकडे अनेक योजना आहेत. पण या महिलांकडे तर पुरुषाच्या कथित सुरक्षिततेचं कवचंच नाही. त्यामुळे या महिलांती समाजाच्या आणि कुटूंबियांच्या लेखी त्यांची किंमत शुन्य आहे.

अशा महिलांनी स्वतःच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि एकल महिला संघटना स्थापन झाली. मग हे प्रश्न सोडविण्यासाठी जबाबदारी घेणारी माणसं लोकशाही पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या गाव, तालूका आणि विभागपातळीवर या निवडणुकांची धामधूम टप्प्याटप्प्यात सुरू आहे.

सगळ्यांना प्रतिनिधीत्व

वेगवेगळ्या संघटनांशी जोडलेल्या या महिला एकल महिला संघटनेच्या बॅनरखाली एकत्र आल्या. चार वर्षात सुमारे १२,८०० महिला या संघटनेच्या सदस्य आहेत. त्यांनी या निवडणुकीत मतदान केलं. मराठा, मुस्लिम आणि दलित अशा सर्व समाजगटातल्या महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. सगळ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आलं. मुस्लिम समाजातल्या दोन महिलाही या निवडणुकीत विजयी झाल्या.

निवडणूक लढवणाऱ्या महिलाही विशेषच म्हणायला पाहिजेत. या सगळ्याजणी रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱ्या आहेत. त्यातल्या कोणाचा संपत्तीसाठी वर्षानुवर्षे नातेवाईकांशी संघर्ष सुरू आहे. कुणाला नवरा वारल्यानंतर मुल नाही म्हणून घराबाहेर काढून अधिकार नाकारण्यात आलंय. कुणी नवऱ्याच्या माराला कंटाळून एकटीने जगायचा निर्णय घेतलाय.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंगीत तालीम

मुलं छातीपोटाशी बांधून शेतमजूरी करत गुजराण करणाऱ्या या महिला स्वतःच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी, इतर महिलांचे प्रतिनिधित्व करायला आणि इतर महिलांना न्याय मिळवून देणारं नेतृत्त्व निवडायला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव मिळावा म्हणून हा निवडणूक कार्यक्रम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची ही रंगीत तालीमच आहे, असं कोरोचे महेंद्र रोकडे सांगतात.

राम शेळके सांगतात, मराठवाड्यात महिला नेतृत्त्व नाही. परिणामी एकल महिलांचा प्रश्न हा मराठवाड्यासारख्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे असलेल्या भागात अत्यंत मोठा आहे. पण यावर काम करायला सरकारी यंत्रणांनाही फारसा रस नाही. अशा परिस्थितीत एकल महिलांची ही लोकशाही पद्धतीने संघटन बांधण्याची कला अत्यंत महत्त्वाची आहे.

अगदी सुरवातीला महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महिला आणि संघटना एकत्र आल्या. त्यावेळी एकल महिलांच्या प्रश्नांसाठी एक वेगळी संघटना असावी या मागणीला महिलांनीही विरोध केला होता. त्यानंतर जेव्हा विषयांची आणि प्रश्नांची मांडणी केली त्यावेळी एकल महिलांसाठीची संघटना हा अत्यंत निकडीचा विषय असल्याचे लक्षात आलं आणि एकल महिला संघटनेची स्थापना झाली.

आत्मविश्वासाची प्रक्रिया

या निवडणुक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या अनिता कांबळे यांच्या मते, महिलांसाठी ही निवडणूक आत्मविश्वास देणारी गोष्ट आहे. यातून मिळणाऱ्या नेतृत्त्वाकडून त्यांना भरपूर अपेक्षा आहेत. सगळ्या महिलांना प्रश्न मांडण्यांची संधी मिळणार नाही म्हणून मग ही नेतृत्त्व निवडीची लोकशाहीचा आधार असलेली प्रक्रियाच आपण नाकारणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आताच्या या निवडणुकीकडे बघितलं जातंय.

शहरात आपण वेगवेगळे सेल्फ हेल्प सपोर्ट ग्रुप पाहतो. आपल्यासारख्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना धीर देणं आणि त्यांच्या हक्कासाठी, मागण्यांसाठी एकत्र येऊन दबाव गट तयार करणं हे सपोर्टग्रुपचं वैशिष्ट्य. एकल महिला संघटनेतून असा दबाव गट निर्माण होईल, एकटी एकटीही ही ताकद एकीचं बळ होईल, अशी आशा आहे.
 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)