कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी अर्थव्यवस्थेला वाचवेल

२८ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आरोग्य क्षेत्रातली तज्ञ मंडळी आपल्याला वारंवार सूचना देत असतानाही कोरोना वायरसच्या धोक्याकडे आपण दुर्लक्ष केलं. पहिली लाट ओसरल्याचं दिसताच आता कोरोना गेला अशा अविर्भावात आपण राहिलो. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे पूर्ण व्यवस्थाच वेंटिलेटरवर होती. अशात राजकीय नेते निवडणुका आणि कुंभमेळ्यातल्या भक्तीसागरात दंग होते. अशात कोरोनाची दुसरी लाट आली. हलगर्जीपणामुळे लाखो भारतीयांचे जीव गेले.

कोरोनामुळे जगभर वेगवेगळ्या टप्प्यांमधे लॉकडाऊन करावं लागलं. सगळंच ठप्प झालं. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. भारतही त्यातून सुटलेला नाही. सगळ्याच आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोत. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. वेळीच पावलं उचलून उपाययोजना केल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवता येईल. त्यासाठी तिसऱ्या लाटेच्या आधी काय तयारी हवी याचं ज्येष्ठ पत्रकार ओनिंद्यो चक्रवर्ती यांनी 'न्यूजक्लिक' या पोर्टलवर विश्लेषण केलंय. त्याचं हे शब्दांकन.

कोरोनाची दुसरी लाट संपेल तेव्हाच अर्थव्यवस्था रुळावर येईल. माणसं वाचतील, कारखाने उघडतील, लोकांच्या हातात कामं येतील, लोक वस्तू विकत घेतील त्यावेळीच हे सगळं शक्य होईल. त्यासाठी आधीच प्लॅनिंग हवं. हे जबरदस्त प्लॅनिंग असेल तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही बंद करायची वेळ आपल्यावर येणार नाही.

हेही वाचा: नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!

म्युटेशन ओळखून लसीकरण

कोरोना वायरस हा म्युटेट होतो. त्याच्या रचनेत बदल होतायत. आपल्या आजूबाजूला असे अनेक वायरस, बॅक्टेरिया असतात ज्यांच्यात असे बदल होत राहतात. ही फार नॉर्मल गोष्ट समजली जाते. पण एखादा वायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो. आपल्यातल्या अँटीबॉडी त्याच्याशी लढायला कमी पडतात. आपला जीव जातो. वायरस आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरतात.

वायरस येऊन गेल्यावर किंवा लस दिल्यामुळे आपल्यामधे अँटीबॉडी तयार झाल्या तर आपण या वायरस नावाच्या शत्रूचा हमखास मुकाबला करू शकतो. पण वायरसमधलं म्युटेशन कधीकधी शरीरातल्या अँटीबॉडीला चकवा देतं. या म्युटेशनमुळे संसर्ग होतो. हा संसर्ग संपर्कात आलेल्या इतर नातेवाईक आणि मित्रमंडळींमधे पसरतो. त्यामुळे कोरोना साथीच्या काळात हे म्युटेशन फार धोक्याचं ठरतं.

त्यामुळे सगळ्यांसाठी लसी नसतील, रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तिसरी लाट येऊ शकते. इस्रायलनं देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण हाती घेतलं. त्यामुळे तो देश कोरोनाची साथ आटोक्यात आणत 'मास्क फ्री'च्या दिशेनं वाटचाल करू शकला.

लहान मुलांसाठी उपाययोजना

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची ठरू शकते असं म्हटलं जातंय. आरोग्य क्षेत्रातली अनेक तज्ञ मंडळी तसा इशारा आणि सूचनाही करतायत. त्यामुळे त्यादृष्टीने पुढच्या काही महिन्यांमधे आपल्याला तयार रहावं लागेल. मुलांना संसर्ग झाला तर हॉस्पिटलमधे पुरेश्या प्रमाणात बेड उपलब्ध करावे लागतील. त्यासोबतच बालरोगतज्ज्ञांची टीम उभी करावी लागेल.

मुलांना काय काय दिलं जाऊ शकतं? याचाही विचार करावा लागेल. स्टेराईड सारखी औषध लहान मुलांना देता येणार नाहीत. ज्याला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत अशा पेशंटना खबरदारी घेत घरीच आयसोलेशनमधे ठेवण्याची मुभा देण्यात येते. कोरोना सेंटरही उभी करण्यात आलीत. लहान मुलांच्या बाबतीत हे करता येणं शक्य आहे का? अशावेळी समुपदेशनाची फार गरज पडेल.

उपाययोजना करताना सरकारच्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढेल. त्यासाठी आधीच काटेकोर नियोजन हवं. धोके लक्षात घेऊन वेळीच पावलं उचलायला हवीत. सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला आधीच तयार करायला हवं. त्यामुळे कोरोना वायरसच्या येणाऱ्या लाटेचा लहान मुलांवरचा नेमका परिणाम आणि त्यासाठी काय उपाययोजना करायच्या याचा नेमकेपणाने विचार करायला हवा.

हेही वाचा: कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

नव्या प्रोटोकॉलची तयारी

तिसरी लाट आली नाही तरी आपल्याला तयार रहायला हवं. कदाचित प्रत्येक वर्षी हा कोरोना वायरस आपलं रंग रूप बदलून आपल्यात येऊ शकतो. एखादा दुसरा वायरसही म्युटेट होऊन येऊ शकतो. अँटीबॉडी, लस, औषधं या सगळ्याला चकवा देऊन तो आपल्या शरीरात घुसेल. आपल्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे बेड, ऑक्सिजनची व्यवस्था आधीच तयार ठेवावी लागेल.

येणाऱ्या लाटांशी लढायचं तर आपल्याकडच्या डॉक्टरना ट्रेन करावं लागेल. कोरोनासाठी नवी हॉस्पिटल उभारावी लागतील. एक नवा प्रोटोकॉल तयार करावा लागेल. त्यासाठी याच नाही तर पुढच्या अनेक वर्षांचं प्लॅनिंग करावं लागेल. एखादा वायरस दीर्घकाळ राहतो. उदाहरणार्थ स्वाईन फ्लू. हल्ला केला नाही तरी तो बराच काळ राहतो. तसंच एखादा वायरस येतो आणि वर्षभरात निघूनही जातो. त्यासाठी नशिबावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही.

नशिबावर विश्वास न ठेवता आपल्याला तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. तयारी केलीच नाही तर पुन्हा कारखाने बंद होतील. रोजगार जातील. जीडीपी कोसळेल. अर्थव्यवस्था रुळावरून घसरेल. त्यामुळे अमकं तमकं आपल्याकडे आहे या भ्रमात अजिबात राहता नये. कोरोनाशी लढण्यात आपण सक्षम आहोत हा आपला दावा किती पोकळ होता याची जाणीव आंतरराष्ट्रीय मीडिया आपल्याला सातत्याने करून देतोय.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?