युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

१५ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.

‘युगानुयुगे तूच' या दीर्घकवितेच्या माध्यमातून अजय कांडर हे मराठी कवितेच्या प्रांतात पुन्हा एकदा दाखल होत आहेत. कवीला इतिहासाचे आणि समकाळाचे सुयोग्य असे भान आहे. ही कविता ते अशा काळात घेऊन येत आहेत जो कमालीच्या अरिष्टाचा काळ आहे. भारतीय समाज अभूतपूर्व अशा राजकीय-आर्थिक अरिष्टातून जात आहे.
या अरिष्टाचे चार कोन आहेत. 

एक, हे अरिष्ट जुन्या जात-सामंती व्यवस्थेच्या कुजलेपणातून भारतात साचून थिजले आहे. दोन, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेद्वारे साम्राज्यवादी शक्तींनी भारतीय जनतेला आर्थिक विपन्नावस्थेच्या खाईत ढकलले आहे. तीन, भारतातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या पितृसत्तेने जुन्या जातिव्यवस्थेची संगत न सोडता नव्या साम्राज्यवादाशी हातमिळवणी करीत स्वत:च्या पुनरुत्पादनाच्या शक्यतांचा निरास होण्यापासून स्वत:ला वाचवून स्वत:प्रति पुनर्शक्ती प्राप्त करून घेतली आहे. चार, आधुनिक उदारमतवादी अवकाशाचा संकोच करीत फॅसिझमचा एतद्देशीय झंझावात सर्व लोकशाही मूल्ये, संस्था, रचना आणि प्रक्रियांची पुनर्रचना करीत निघाला आहे.

सत्य सत्तेला सांगायचं!

काही निवडक व्यक्ती आणि समूह वगळता बहुतांश समाज हा या अरिष्टातून पोळून निघत आहे. अशा विलक्षण पडझडीच्या काळात लेखकाची काय भूमिका असायला हवी? याविषयीची मांडणी नोम चॉम्स्की यांनी १९६७ मधल्या ‘द रिस्पॉन्सिबिलीटी ऑफ इंटलेक्च्युअल' या आणि १९९६ मधल्या ‘रायटर्स अ‍न्ड इंटलेक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी' या लेखांत केली होती.

चॉम्स्की म्हणतात की, लेखकाची जबाबदारी ही श्रोत्यांविषयी आहे. सत्य कुणाला सांगायचे असते? मिशेल फुको या फ्रेंच विचारवंताच्या मतानुसार, सत्य हे सत्तेला सांगायचे आहे. तथापि, चॉम्स्की फुकोप्रमाणे भूमिका घेत नाहीत. तर, ते असे म्हणतात की, सत्य हे कुणाला सांगायचे, हा प्रश्न महत्त्वाचा असून ज्या समूहाला सत्यकथन करायचे आहे असा समूह प्रबोधन आणि मानवी हितासाठी आवश्यक असलेल्या कृतीसाठी तत्पर असणे अपेक्षित आहे.

चळवळीतील आणि तुरुंगातील स्वत:च्या अनुभवांच्या आधारे चॉम्स्की असे मांडतात की, सत्तेला सत्यकथन करण्याऐवजी प्रबोधन आणि मानवी हितासाठी आवश्यक असलेल्या कृतीसाठी तत्पर असलेल्या समूहाला सत्य सांगितले पाहिजे. ते असेही प्रतिपादित करतात की, सत्य कोणत्याही समूहाला सांगण्यापेक्षा त्या समूहासोबत राहून सत्य सांगितले पाहिजे. चॉम्स्की यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती तिचा भारतीय लेखकांसाठी विशेष असा संदर्भ आहे. चॉम्स्की यांची अट भारतीय लेखकांनी पूर्ण करण्यामधे एक अडचण ही संरचनात्मक आहे.

जैसे थे वाद जोपासण्याचा प्रयत्न

भारत हा असा देश आहे ज्यामधे अज्ञान, अविवेक, अनीती आणि अन्याय यांचे स्थायीकरण आणि संस्थीकरण झालेले आहे. एका मोठ्या समूहाला मोठ्या कालखंडात ज्ञानवंचित ठेवून त्यांना हीनतम पातळीवर जगण्यास बाध्य करण्यात या देशातील प्रभुत्वशाली वर्ण-जातींना यश आलेले आहे. हे साध्य करण्यासाठी विविध सांस्कृतिक रचना, बौद्धिक उत्पादनसाधने, धार्मिक संस्था, प्रशासन, सैन्यदले, शिक्षण आणि भाषेविषयक व्यवहार यांवर कडेकोट बंदिस्त असे वर्चस्व ठेवण्यात या वर्गाला आलेले यश हे जगाच्या पातळीवर अद्वितीय अशा स्वरूपाचे आहे. या संदर्भात भारतासारख्या देशात लेखकांचे उत्तरदायित्व अधिकच लक्षणीय बनते. 

आधुनिक काळात समाजात ‘जैसे थे वाद' जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न या वर्गाने केला आहे. अशा समाजात दुजाभाव, अपधारणा, पूर्वग्रह, द्वेष यांच्याप्रति असलेल्या खोलवरच्या अधिमान्यतेमुळे विविध समूहांमधे एकोपा, संवाद, साहचर्य हे जवळपास अशक्यच होते.

अशा समाजात पोलादी भौतिक पर्यावरणातून निपजलेल्या लेखकांच्या जाणीव-नेणिवेचा ठाव घेणाऱ्या अटळ अशा परिस्थितींवर लेखक मात करू शकतीलच असे नाही. लेखकांच्या वर्ण-जातींनी बद्ध असलेल्या नेणिवेने त्यांच्या कलाकृतींमधे कसा निर्णायक हस्तक्षेप केलेला आहे, याची अनेक उदाहरणे साहित्याच्या प्रांतात आहेत. चॉम्स्की यांची तिसरी अट पूर्ण करण्यामधे ही संरचनात्मक अडचण मूलभूत स्वरूपाची आहे.

हेही वाचा : शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

लेखकांसमोर स्वायतत्ता जपण्याचं आव्हान

चॉम्स्की यांची अट पूर्ण करण्यामधे दुसरी अडचण भारतातील वैशिष्ट्यपूर्ण अशा राज्यसंस्थेकडून निर्माण करण्यात आलेली आहे. समाजाचे संचलन हे जुन्या रीतीभातींनी करता येणार नाही, हे लक्षात घेऊन सत्ताधारी वर्गाने आपले धोरण बदललेले आहे. लेखक ज्या बुद्धिजीवी वर्गाचा अविभाज्य भाग असतो अशा बुद्धिजीवी वर्गाचे तुष्टीकरण कसे करावे, हा राज्यसंस्थेपुढील कळीचा प्रश्न असतो.

भांडवली समाजातील बुद्धिजीवी वर्गाचे नि:शस्त्रीकरण साधण्यासाठी सत्ताधारी वर्ग हा राज्यसंस्थेद्वारा नवनव्या योजना आखत असतो. लेखकांच्या ठायी सुप्तरूपात असलेल्या परिवर्तनकारी शक्तीचा शक्तिपात करण्याची संधी नवा सत्ताधारी वर्ग अर्थातच सोडत नाही. आश्रितीकरणाच्या विविध रचना, अनुदान आणि दातृत्व बहाल करणाऱ्या फलदानक्षम विविध संस्था, पुरस्कारांच्या राज्यपुरस्कृत यंत्रणा अशा विविध मार्गांनी या प्रक्रिया कार्यान्वित केल्या जातात.

अशा वेळी, लेखकांनी आपली स्वायत्तता जपणे, हे आव्हानात्मक बनते. स्वत:च्या स्वायत्ततेला बाधा आणणाऱ्या राज्यसंस्थेच्या लाभदानयंत्रणेपासून लेखक जेवढे स्वत:ला दूर ठेवतील तेवढे ते चॉम्स्की यांनी मांडलेला निकष पूर्ण करण्याची पात्रता सिद्ध करतील. आजच्या काळात अनेक तरुण लेखक मराठी साहित्याच्या प्रांतात नवनवे प्रयोग करीत असले आणि त्यांच्या परीने वास्तवाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असले तरी, समाजातील मूलभूत अंतर्विरोधाचे सम्यक आकलन करण्यापासून बरेच जण चुकताहेत, हेही खरे! अशा वेळी, ज्या विषयवस्तूविषयी ते लिहिताहेत तिचे बाह्यदर्शनच केवळ कवितेतून घडण्याचा धोका असतो!

कांडर वैचारिक भूमिकांना प्राधान्य देतात

नव्या लेखकांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही; परंतु व्यापक अशा संवेदनशीलतेसाठी उपकारक नसलेल्या आजच्या काळात ते आपली घडवणूक करण्यात आणि त्यासाठी चुकवावी लागणारी किंमत मोजण्यापासून चुकले तर त्यांची संवेदना बाह्यात्कारी राहण्याचीच अधिक शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजय कांडर ही चिंतनशील दीर्घकविता घेऊन येत आहेत.

‘आपण कवी म्हणून कोणाच्या बाजूने उभे आहोत?' याविषयीची स्पष्ट जाणीव घोषित करण्यात आणि ती निभावण्यात संकोच न बाळगणारा हा कवी आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅक्झिम गॉर्कीसोबत राहण्याची आकांक्षा बाळगतो. लेखकाकडे वैचारिक भूमिका नसणे, लेखकाने पद, प्रतिष्ठा, पुरस्कार, प्रसिद्धी, मान्यता यांच्यामागे धावणे, हे कांडर यांना व्यथित करते. कवितेचा आणि एकूणच साहित्याचा प्रांत कंपूशाहीने ग्रस्त झालेला असल्याच्या काळात कांडर हे वैचारिक भूमिका आणि लेखकीय निष्ठांना प्राधान्य देतात.

त्यांना समकालीन असलेले अनेक नव्वदोत्तर कवी हे विशिष्ट अशा भूमिकेच्या आणि परिपक्वतेच्या अभावात ‘मीपणा' समारंभपूर्वक मिरवताहेत आणि पुरस्काळलेपणा जपताहेत. अशा अलंकृत कवींसाठी अजय कांडर यांचे गद्य आणि पद्यलेखन हे आदर्शभूत ठरू शकते. नव्वदोत्तरीचे अनेक कवी हे राज्यसंस्थेच्या औपचारिक आणि अनौपचारिक संस्थांकडून लाभान्वित होण्याच्या मनीषेमुळे वास्तवाचे केवळ पृष्ठस्तरीय वर्णन करण्याची क्षमता बाळगून आहेत आणि यामुळे भारतासारख्या वैशिष्ट्यपूर्ण देशात एक जबाबदार लेखक आणि बुद्धिजीवी म्हणून उत्तरदायित्व निभावण्याच्या ऐतिहासिक ठरू शकणाऱ्या भूमिकेपासून स्वत:ला परावृत्त करीत आहेत. 

जागतिकीकरणाने सर्वच प्रकारचे सांस्कृतिक व्यवहार भुसभुशीत पायावर उभे केले आहेत. यामुळे, आज कवितेने जरी उत्सवी स्वरूप धारण केलेले असले तरी ती आंतरिक गुणवैभव आणि जनप्रियता गमावत आहे, हे वास्तव क्लेशदायक आहे.

हेही वाचा : तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

नायकाला सखा वाटणारी ‘भिमाई’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हे मराठीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषांमधील अनेक कवींना स्फूर्तिदायक वाटलेले आहे. तथापि, त्यांच्या विशाल कार्याला न्याय देणे, हे एखाद्या छोट्या कवितेच्या आवाक्यात नाही; म्हणून कांडर यांनी या महामानवाचे जीवन हा दीर्घकवितेचा विषय केला.

अनेक चरित्रपर कवितांमधील अंध भक्तिभाव, अवास्तव गौरवीकरण, कृत्रिम प्रतिमांचा भडिमार, संकुचित अस्मितांचा सोस, स्वान्तसुखायतेकडे झुकणारी आत्मश्लाघा आणि आत्मसंतुष्टता, उपलब्धीबाबतचे पोकळ दावे, अपयशाबाबतची आत्मघातकी आणि सवंग विश्लेषणं, आत्मगौरव आणि आत्मप्रतारणा हे सर्व टाळून लेखक अधिक सघन असा आशय कवितेत ओतण्यात यशस्वी होतो.

वारकरी कवींनी विठ्ठलाला सखा मानून त्याला ‘विठाई' आणि ‘तू' या एकेरी सर्वनामाने संबोधले आणि ज्याप्रमाणे वामन दादा कर्डकांनी अलवार प्रेमाने भीमरायाला ‘विठाई'प्रमाणे ‘भीमाई' संबोधले; त्याचप्रमाणे कवी नायकाला सखा मानतो आणि त्याला ‘तू' असे प्रेमाने आणि हक्काने संबोधतो. 

तू तुझे भक्त होण्याचे
सगळे विचार नाकारलेस
तरी मी
गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे

असा कवितेच्या सुरुवातीलाच आत्मटीकेचा भेदक स्वर उंचावत ही कविता वाचकाचे लक्ष वेधून घेते. यानंतर, ही कविता संथपणे, पण धीरगंभीरपणे अवखळपणा टाळून शांतपणे वाहणाऱ्या नदीप्रमाणे पुढे जात राहते.

स्त्रीवाद आणि आंबेडकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

कवितेचे वेगळेपण हे की, या कवितेतील एक मोठा भाग स्त्रीविषयक संवेदन व्यक्त करतो. ‘आजी' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हा भाग सुरू होतो. स्त्रियांच्या जाणिवेमधे पारंपरिक शहाणपण आणि नव्या मुक्तिदायी मूल्यांना स्वीकारण्याची स्वागतशील भूमिका यांचा मंगल मिलाफ कसा असतो, हे आकलन कलात्मकतेने व्यक्त झालेले आहे: 

आजी म्हणायची
ज्या घरात बाईचा मान राखला जाईल 
ते घर आपलं समजावं आणि
जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल
तोच समजावा साऱ्या समाजाचा

अलीकडच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रीवादी रूपात मांडण्याचा प्रश्न अभ्यासकांकडून होत आहे. जात आणि पितृसत्ताक व्यवस्था या परस्परअंतर्भावी आणि परस्परांना घडविणाऱ्या कशा आहेत, हे अलीकडे बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारे मांडले जात आहे. साहित्याच्या प्रांतात अशी नोंद अद्याप पुरेशा व्यासंगाने घेण्यात आलेली नाही. प्रस्तुत कविता त्या दिशेने पहिला महत्त्वपूर्ण आणि धाडसी असा मौलिक प्रयत्न असेल. किमान या एका योगदानासाठी मराठी कवितेत अजय कांडर हे सदैव जाणले जातील.

नैराश्याचा सूर न काढणारी कविता

कवितेच्या सुरुवातीला ऐकू येणारा आत्मक्लेशी टीकेचा सूर पुढे अधिकच आर्त रूप धारण करतो. एकंदरीत मूल्यांचा सुरू असलेला सार्वत्रिक ऱ्हास आणि बुद्धिजीवी वर्गाने स्वत:च्या इतिहासदत्त भूमिकेपासून केलेले पलायन, अशा अनेक क्लेशदायक विषयांवर भाष्य करणे कवीला आवश्यक वाटते. त्यामुळे, ही कविता केवळ पारंपरिक चरित्रकविता बनून राहत नाही; तर समग्रतेला कवेत घेण्याची क्षमता बाळगत ती मूल्यकविता बनते. 

केवळ गौरवी उच्चरवाने गोडवे गाण्याऐवजी समकाळातील प्रधान अंतर्विरोधाला समग्रतेचे भान राखून भिडणे, हे कवीला आत्यंतिक गरजेचे वाटते. सर्वत्र भय आणि भ्रमाचे मळभ दाटून आलेल्या काळात लेखकवर्ग जर गलितगात्र होऊन संकोचला; तर समाज सैरभैर होऊन विध्वंसक अराजकतेकडे ढकलला जाणे, हे क्रमप्राप्तच असते, याची जाणीव कवीला आहे. कवितेच्या सुरुवातीला असलेला कवीचा एकवचनी आत्मस्वर कवितेच्या शेवटी मात्र ‘समूहाने बोलू पाहतो' आणि दु:खाचे मळभ दूर होतील आणि नवी पालवी फुटणारच आहे, याची नि:संदिग्ध शब्दांत ग्वाही देतो.

कवीची वैचारिक बांधिलकी आणि विश्वास अढळ असल्यामुळे ‘जीवन निरर्थक आहे', ‘अनाकलनीय आहे', ‘शून्यवत आहे', ‘अराजकताच सार्वत्रिक आणि अंतिम सत्य आहे', असा हतबलतेचा भ्रमनिराशी सूर ही कविता काढत नाही. कवी ज्याप्रमाणे नैराश्याच्या डोंगराखाली स्वत:ला गाडून घेण्याचे नाकारतो, त्याचप्रमाणे आत्मप्रौढीचा राग आळवण्याचेही नाकारतो. त्याऐवजी, कविता कवितानायकाच्या विचारव्यवहारावर आणि त्या प्रभावातून निर्माण झालेल्या सामान्य जनतेच्या अपरंपार कर्तृत्वावर अढळ निष्ठा ठेवणारी होते. 

‘शेवटी मदांध तख्त' फोडण्याचा उग्र स्वर कवी काढत नसला; तरी तोच आशय अलवारपणे पण थेटपणे मांडण्यात कवीला यश आलेले आहे. कवितेच्या शेवटी कवितेचा नायक आणि सामान्य श्रमजीवी जनता हे एकरूप होतात आणि नायकाचे एकवचनी असणेदेखील हे बहुवचनी सामुदायिकतेमधे रूपांतरित होते. हे ज्या कलात्मकतेने साधले गेले आहे ते मराठी कवितेच्या प्रांतात अद्वितीय ठरावे!

हेही वाचा : 

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

(लेखक भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)