ओपिनियन पोलचं वारं कोणत्या बाजूने वाहतंय?

१२ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान तीसेक दिवसांवर आलंय. तरी रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या शिडात हवा भरण्यासाठी शड्डू ठोकून उभे आहेत. कोण कुणावर मात करतंय ते येणारा काळच ठरवेल. ओपिनियन पोलवालेही अंदाज अपना अपना स्टाईलमधे आपले आकडे घेऊन समोर आलेत. वारं कोणत्या दिशेनं असेलं हे सांगायला हे पोल राजकीय पक्षांच्या दिमतीला आहेतच.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. आठवडाभरातच प्रचाराच्या तोफा धडधडायला लागतील. सभा, भाषणांचा धुरळा उडेल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. जुने सर्वे आता आउटवुटडेटेड झालेत. त्यामुळे नवे सर्वे बाहेर येत राहतील. बालाकोटच्या हल्ल्यानंतर लोकांच्या मनात राष्ट्रवादाचं वारं तयार करण्यात सरकार यशस्वी झाल्यासारखी स्थिती आहे. या सगळ्याचा परिणाम निवडणूकपूर्व सर्वेक्षणांवरही होईल.

काहीच दिवसात अनेक ओपिनियन पोल आपापले अंदाज घेऊन समोर येतील. इंडिया टीवी-सीएनएक्स, एबीपी न्यूज-सीवोटर यांनी जानेवारी, मार्चमधे वेगवेगफळे सर्वे केलेत. या सर्वेंचं विश्लेषण करणारा लेख एनडीटीवी इंडियाच्या अनिंद्यो चक्रवर्ती यांनी लिहिलाय. एनडीटीवीच्या वेबसाईटवरच्या या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

इंडिया टीवी-सीएनएक्स आणि एबीपी न्यूज-सीवोटरचा सर्वे काय सांगतो?

मार्चच्या पहिल्या आठवड्यात इंडिया टीवी-सीएनएक्सचा सर्वे झाला. २६ मार्चला बालाकोट एअर स्ट्राईकची घटना झाली. या सर्वेत एनडीएला २८५ सीट मिळतील म्हणजेच बहुमतापेक्षा १३ सीट जास्त. यात फक्त २३८ सीट्स या बीजेपीला मिळतील असा अंदाज आहे. गेल्या डिसेंबरमधे असाच एक सर्वे इंडिया टीवी-सीएनएक्सने केला होता. देशभरात तेव्हा पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांचा माहोल होता. त्यावेळी बीजेपी उत्तरेकडच्या तीन राज्यांमधे मागे होती. या सर्वेत बीजेपीला २४७ आणि एनडीएला २८१ जागा मिळतील असा अंदाज मांडला होता.

दुसरीकडे, आताच झालेल्या इंडिया टीवी-सीएनएक्सच्या पोलमधे बालाकोट घटनेनंतर बीजेपीच्या ९ सीट्स कमी झाल्याच दिसतं. महत्त्वाचं म्हणजे याच काळात सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

एबीपी न्यूज-सीवोटरच्या ओपिनियन पोलने बीजेपी खुश असेल. हा सर्वे एनडीएला २६४ सीट्स मिळतील असं दाखवतोय. बहुमतापासून ८ सीट्स लांब आहे. बीजेपीला २२० जागा मिळतील. गेल्यावेळच्या चाचण्यांपेक्षा हा सर्वे बीजेपीसाठी अधिक फलदायी आहे, असंच म्हणावं लागेल.

मतांची टक्केवारी

एनडीएचा वोट शेअर जानेवारीमधे ३७.६ टक्के होता. तो वाढून मार्चच्या सर्वेत ४१ टक्के झाल्याचं दिसतय. म्हणजेच ४ टक्क्यांची वाढ झालीय. मग हे बालाकोटमुळे शक्य झालंय का? राज्याचा विचार केला तर एक-दोन सीटांमधे वाढ झालीय. बालाकोटमुळे हे शक्य झालं असं म्हणायला वाव आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या राज्यांमधे एक-दोन जागांमधे वाढ होताना दिसतेय. ओडीसामधे मात्र काही फरक पडताना दिसत नाही. तर उत्तर प्रदेशात ४ जागा वाढाहेत. मात्र २०१४ चा विचार करता ४४ जागा कमी झाल्यात.

महाराष्ट्रात युतीचा परिणाम की एअर स्ट्राईकची कमाल?

एबीपी न्यूज-सीवोटरच्या जानेवारीच्या सर्वेत एनडीएला २० सीट्स मिळण्याचा अंदाज होता. २८ सीटस युपीएला मिळतील असा अंदाज होता. मार्चच्या सर्वेत मात्र हे चित्र पूर्णपणे पालटलं. शिवसेना-भाजप युतीला ४८ पैकी ३५ जागा मिळतील असं सर्वे सांगतो. अर्थात एनडीएला जानेवारी ते मार्च या काळात ३१ जागांचा अधिकचा लाभ आहे. यात महाराष्ट्रातूनच १५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

एअर स्ट्राईकनंतर देशभरातला सगळा माहोल बदलून गेला. सगळ्या चर्चा फिक्या पडल्या आणि राष्ट्रवादावर जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियाचाही यात मोलाचा वाटा होता. याचा परिणाम सर्वेतही दिसतोय. पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो या समोर बाकी सगळे मुद्दे फिके पडलेत का?

एनडीएचं दक्षिणायन

एबीपी न्यूज-सीवोटर पोलमधे एनडीएला दक्षिणेत अर्थात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु या राज्यांमधे १६ जागा मिळण्याचा अंदाज दाखवलाय. नव्या ओपिनियन पोलमधे यात आणखी ५ जागांची भर पडण्याचा अंदाज आहे. आणि हा अंदाज पुढे खरा ठरला तर बीजेपीने तामिळनाडूत केलेली युती ही फलदायी ठरल्याचं म्हणता येईल.

हा सर्वे बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर लगेच करण्यात आलाय. राष्ट्रवादाचा ज्वर ऐनभरात होता तेव्हाच हे सर्वेक्षण झालंय. बेकारी, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई हे सगळे मुद्दे आपसूक बाजूला जात राष्ट्रवाद, देशभक्तीचा मुद्दे समोर आणले जात असतील. काहीही करुन बीजेपीला नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवायचंय. त्यामुळे साम, दाम, दंड अशा सगळ्या शक्यतांचा वापर करून हे इलेक्शन जिंकण्याची व्युहरचना शहा-मोदी जोडगोळीने आखलीय.

ही निवडणूक २०१४ इतकी सोपी नाही. तरीही बाकी सगळ्या मुद्द्यांना टाटा बाय बाय करत राष्ट्रवादाच्या मुद्यांवर ही निवडणूक रेटून न्यायची हा चंग बीजेपीने बांधलेला दिसतोय. बालाकोट-पुलवामा या घटना पुढे करुन महिनाभरात मतं मागितली जातील.