प्रमोद महाजनांनी मोदींना भाजप हायजॅक करू दिला असता?

३० ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज देशात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची क्षमता भाजपकडे आली, त्यात प्रमोद महाजनांचं योगदान मोठं आहे. आज त्यांचा जन्मदिन. क्वचित कुठेतरी त्यांची आठवण काढली जातेय. आज महाजन असते तर मोदीयुगात त्यांचं स्थान कुठे असतं?

देश स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाल्यानंतरही महाराष्ट्राला कुठल्या गोष्टीची खंत वाटत असेल, तर ती मराठी माणूस अजून पंतप्रधान न झाल्याची. त्यामुळे अजूनही मराठी माणूस शरद पवारांकडे भावी पंतप्रधान म्हणून बघतोय. पंतप्रधान होण्याची क्षमता असलेल्या अशाच एका तंत्रकुशल नेत्याचा आज जन्मदिन.

प्रमोद महाजन आज असते तर त्यांचा ६९ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला असता का? कधीकाळी अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यालयाचा कारभार चालवणारे महाजन मोदीयुगात कुठं असते? महाजनांची अवस्थाही लालकृष्ण अडवाणी कॅम्पातल्या नेत्यांसारखी झाली असती का? त्यांनी मोदींबरोबर जमवून घेतलं असतं की महाजनांनी मोदींना भाजप हायजॅकच करू दिला नसता?

कधी हार मानली नाही

आज मोदींच्या करिश्म्याच्या सुनामीत भाजपचे सगळेच नेते प्रभावहीन झालेत. पण प्रमोद महाजन त्याला अपवाद ठरू शकले असते. कारण हार मानणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले पत्रकारितेचे प्राध्यापक जयदेव डोळे यांनी महाजनांच्या सुरवातीच्या काळाविषयी सांगितलं, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा गाजवत प्रमोद महाजन प्रसिद्ध झाले. तो काळ काँग्रेसबरोबरच समाजवादी, साम्यवादी, शेतकरी कामगार पक्ष यांच्या प्रभावाचा होता. जनसंघ दुबळा होता. तरीही आपल्या उत्साही आणि धडाकेबाज स्वभावावर महाजन यांनी लोकप्रियता मिळवली.’

‘मराठवाडा विकास आंदोलन सुरू झाल्याबरोबर महाजनांनी त्यात उडी घेतली आणि सर्वपक्षीय राजकारणामुळे त्यांचं नाव झालं. नंतर ते आणीबाणीत तुरुंगात गेले. पुढं जनता पक्षात प्रवेश करून सत्तेच्या राजकारणात पाय ठेवला. तिथं मात्र संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत भागवत यांनी त्यांना खूप संधी दिली. तिथून खऱ्या अर्थानं प्रमोद महाजन यांचं नेतृत्व फुलायला सुरवात झाली.’

भागवत यांनीच ‘माधव’ फॅक्टरच्या मदतीनं ओबीसी समाजात भाजपची पाळंमुळं रुजवली. माळी, धनगर आणि वंजारी समाजातल्या तरुणांना पक्षात आणलं. त्यात गोपीनाथ मुंडेही होते. देशातही अशाच ओबीसी फॉर्म्युल्यावर काम सुरू होतं. त्यात नरेंद्र मोदींना संधी मिळाली.

हेही वाचाः ओबीसी राजकारणाचा गुरुमंत्र देणारा भगवानगड

एकाला जातीचा फायदा, दुसऱ्याला नुकसान

महाजनांनी दिल्ली जिंकली. तो काळ समजावून सांगताना दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, `माणसं जोडायची, तडजोडी करायची आणि पक्षासाठी पैसा आणायची अफाट क्षमता असलेल्या महाजनांनी दिल्लीत आपलं बस्तान बसवलं. तालुक्याच्या ठिकाणाहून राजकारणात आलेल्या महाजनांना त्यासाठी कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं त्यांनी संघर्ष करून सगळं मिळवलं. महाजन आणि मोदी या दोघांचं दिल्लीतलं करियर एकत्रच सुरू झालं. पण बुद्धीमत्तेच्या जोरावर दिल्लीत महाजनांनी आपलं स्थान आधी निर्माण केलं.`

महाजन यांचा राजकीय प्रवास जवळून बघितलेल्या केसरी यांनी सांगितलं, `महाजन कधीच मुख्यमंत्री नव्हते. याउलट मोदी १२-१३ वर्ष मुख्यमंत्री राहून नव्याने दिल्लीच्या राजकारणात उतरले. त्यामुळं त्यांची व्यवस्थेमधे अगोदरच मुळं रूजलेली होती. मोदींनी सलग तीन वेळा भाजपला गुजरातमधे एकहाती सत्ता मिळवून दिली. दुसरीकडे व्यवस्थापनात काटेकोर, निवडणुकीच्या नियोजनात पारंगत असलेल्या महाजन यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचं टाळलं. ते अपवाद वगळता राज्यसभेवरच राहिले.`

हेही वाचाः राम कदमांची हंडी का फुटली?

युती इतकी बिघडली नसती

महाजन यांनी लोकसभेच्या तीन निवडणुका लढवल्या. त्यापैकी ते एकदा ईशान्य मुंबईतून जिंकून आले. `आपण थेट निवडणूक जिंकू शकणार नाही, कारण आपण ब्राह्मण आहोत, अशी खंत महाजनांना होती. त्यामुळं ते कायम राज्यसभेतच राहिले. त्यासाठी त्यांनी युतीचं राजकारण सुरू केलं,‘ असं डोळे म्हणाले. महाजन शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणून महाजन ओळखले जात. याच युतीने १९९५ मधे महाराष्ट्रात सत्ता मिळवली. पण महाजन मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पंतप्रधानपदाचं स्वप्नही त्यांच्यापासून दूरच राहिलं. पण ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींना अनेक वाटा खुल्या झाल्या.

आज राज्य आणि केंद्रातल्या सरकारमधे शिवसेनेचा सहभाग आहे. मात्र, दोन्ही पक्षांमधे सत्तेत आल्यापासूनच धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे नेते, मंत्री राजीनामे खिशात असल्याचं सांगतात. भाजपच्या सुरवातीच्या काळापासून असलेली शिवसेनेसोबतची मैत्री नरेंद्र मोदींच्या काळात कायमची तुटण्याच्या मार्गावर येऊन ठेपलीय. अनेक वर्षांपासूनचा आंध्र प्रदेशातला मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीनंही भाजपसोबतची सत्तासोबत सोडून दिलीय.

आता भाजपकडे पूर्ण बहुमताएवढे आमदार आहेत. पण येत्या निवडणुकीनंतर भाजपला महाजनांची आठवण येऊ शकते. १९९९ मधे वाजपेयी तिसऱ्यांदा सत्तेत आले. तेव्हा १७ पक्षांना सोबत ठेवण्यामधे प्रमोद महाजन यांचं योगदान महत्त्वाचं होतं.  २००३च्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचं श्रेय त्यांनी घेतलं तसंच शायनिंग इंडियाच्या नादात २००४ची लोकसभा हरल्याचं अपश्रेयही घेतलं. या पराभवाचा बाप मीच, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मोदींना असा पराभव पचवता येऊ शकेल का?

हेही वाचाः एमजे अकबर : कोण होतास तू, काय झालास तू?

अंबानींना मोदी जवळचे की महाजन?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारतमधे एके काळी उपसंपादक राहिलेल्या प्रमोद महाजन यांना अनेकजण मीडिया मॅनेजर म्हणतात. पण ही महाजनांची खरी ओळख नसल्याचं केसरी म्हणतात. ‘महाराष्ट्राच्या अँगलमधून बघितलं, तर महाजन आपल्याला मीडिया मॅनेजर वगैरे वाटू शकतात. पण ते त्याहून खूप मोठे होते. ते भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट, धोरण व्यवस्थापक होते. निवडणूक कॅम्पेनर होते. पक्षासाठी निधी आणत होते. अनेक राजकीय पक्षांना त्यांनी जोडून ठेवलं होतं.’

`युतीच्या राजकारणातूनच महाजनांची लोकप्रतिमा तयार झाली होती. आंदोलनं, चळवळी यापेक्षाही सत्तेची गणितं, तडजोडी, भेटीगाठी आणि साधनसंपत्ती उभी करण्याची क्षमता सोबत उत्तम वक्तृत्व या बळावर महाजन हे भाजपमधे प्रबळ झाले. महत्वाची खाती सांभाळून ते केंद्रीय मंत्री झाले. संसदीय कामकाज खातं सांभाळत असतानाच त्यांनी सर्व पक्षांशी सौहार्दाचे संबंध करून ठेवले होते. वाजपेयी यांच्यासारखाच त्यांचा विचारप्रवाह मवाळ आणि उदारमतवादी होता`, असं मत डोळे यांनी व्यक्त केलं.

सलग तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींनी अंबानी, अदानीसारख्या उद्योगपतींचाही पाठिंबा मिळवला. त्यातून त्यांची राजकीय स्थिती आर्थिकदृष्ट्या बळकट झाली. मुख्यमंत्रीपदाच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मोदींनी आपण एक चांगले इवेंट मॅनेजरही असल्याचं दाखवून दिलं. पण याच साऱ्या महाजनांच्याही जमेच्या बाजू होत्या. त्यांचेही अंबानींशी असणारे संबंध अधिक जुने होते. त्यामुळे पंतप्रधानपदावर फार पूर्वीपासून डोळा असणाऱ्या मोदींना महाजन हे आपल्या वाटेतला अडथळा वाटत असणार नक्की.

२००२ च्या दंगलीमुळं मोदींची प्रतिमा जागतिक पातळीवर खराब झालेली होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी मोदींना राजधर्म पाळायचा सल्ला दिला होता. त्यावेळी काही अभ्यासकांच्या मते महाजन यांनी मोदींची बाजू लावून धरली होती. तर काहीजण म्हणतात की महाजन मोदींनी राजीनामा द्यावा, यासाठी कारस्थानं करत होते.

हेही वाचाः हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

मोदींनी दुसरी फळी संपवली

संघाचे नेते कार्यकर्ते प्रमोद महाजनांवर टीकाच करत. सत्तेत येण्यासाठी महाजनांना संघ लागतो. त्यानंतर ते विचारत नाहीत, अशी ती टीका असायची. पण आता मोदींच्या बाबतीतही तशी टीका होताना दिसते. व्यंकटेश केसरी सांगतात, `मोदींनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी संघाचा वापर केला. संघाच्या नावावर त्यांनी भाजपचे आमदार, खासदार निवडून आणले. सोबतच त्यांनी भाजपमधे स्वतःची पाळंमुळं रुजवायला सुरवात केली. जसजसं पक्षावर नियंत्रण मिळू लागलं तसं त्यांनी संघाला संपवायला सुरवात केली.`

लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी देशभरात तरुण नेतृत्वाची फळी उभी केली. ती वेगवेगळ्या जातीजमातींतली होती. वाजपेयी- अडवाणी यांच्यानंतर तीच भाजपची दुसरी फळी मानली गेली. आता ही फळीच नाहीशी झालीय.

याविषयी व्यंकटेश केसरी म्हणाले, ‘गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधे मोदींनी वाजपेयी आणि अडवाणींना बाजूला सारून भाजपमधे आपला जम बसवला. सत्तेत आल्यावर मोदींनी सगळ्यात आधी काय काम केलं असेल तर अडवाणी कॅम्पमधल्या लोकांचं अस्तित्व संपवायचं. त्यासाठी अमित शहा यांना आणून पार्टी ताब्यात घेतली.’

केसरी पुढं म्हणाले, अडवाणींनी प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, अनंत कुमार, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह यांना दिल्लीच्या राजकारणात आणलं. गोपीनाथ मुंडेंना हरल्यानंतरही भाजपचा प्रदेशाध्यक्ष केलं. हे सगळे भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते होते. मोदींनी सत्तेत येताच पहिल्यांदा या फळीचा प्रभाव संपवला.’

केसरी म्हणतात, `मोदी दुसऱ्या टर्ममधे निवडून आले, तर त्यांच्या सरकारमधून सगळ्यात आधी जेटलींचा पत्ता कट होईल. वेंकय्या नायडू यांना आधीच उपराष्ट्रपती बनवून बाजूला सारलंय. अनंत कुमारही सध्या आजारी आहेत. मुंडे नाहीत. महाजन, कल्याणसिंग यांच्यासारखी माणसं असती, तर मोदींना भाजपमधे सध्या जे मोकळं रान मिळालंय, ते कधीच मिळू शकलं नसतं. मोदींना पक्ष हायजॅक करणं सहज शक्य झालं नसतं.`

हेही वाचाः 

तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम

पण मुख्यमंत्री बनलेलं बघायला आई नव्हती

गडाफी जिवंत असता तर जग आणखी चांगलं झालं असतं?