महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

११ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


प्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख.

सत्य चिरडले वेचुनि ठेचूनि उफाळेल ते नेमानें।
जो सत्याचा शोधक मोक्ष त्यास ये बलिदाने।।

'ब्राम्हण भट जोशी उपाध्ये इत्यादि लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरितां आणि आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारें आज हजारों वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत यास्तव सदुपदेश आणि विद्याद्वारें त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरितां म्हणजे धर्म आणि व्यवहारसंबंधी ब्राम्हणांचे बनावट आणि कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता'

ता. २४ माहे सप्तंबर सन १८७३ रोजी स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे जनक जोतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी चालू आठवड्यात महाराष्ट्रभर साजरी होणार आहे. जोतिबाच्या हयातींत आणि सन १८९० साली ते दिवंगत झाल्यानंतर सुमारे अर्धशतक रंजल्या गांजल्या अनाथ अपंग मानवतेच्या उद्धारासाठी सबंध आयुष्य कुरबान करणाऱ्या या थोर विचारक्रांतिकारकाच्या हेतूंचा कडू जहर विपर्यास चालूच होता. या विपर्यासाच्या बदकर्मात पुणे शहर नि पुणेरी बामण यांनी कमालीचा बदलौकीक कमावलेला आहे. 

हेही वाचाः महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

ता. ४ सप्तंबर १९२५ रोजी पुणे मुनसिपालटींत फुले पुतळ्याचा प्रश्न आला तेव्हा तर या बदलौकीकाच्या शर्यतीत पुण्याच्या भटांनी आणि मयत बाबूराव फुले नि हयात गणपतराव नलावडे यांसारख्या त्यांच्या भटाळलेल्या बामणेतरी मांजरांच्या डावल्यांनी लोकशिक्षण चढाओढ केली. `जोतिबा फुले हा क्रिस्ती मिशनऱ्यांचा एक पोटभरू दास होता,` या पालुपदाने सुरुवात करून, त्या सत्यशोधक महात्म्यावर नऊ लाख बीभत्स शिवीगाळीचा उकीरडा उधळण्याचा मुनसिपालटीत शिमगा साजरा झाला आणि त्याचे एक छापील चोपडेहि फैलावण्यात आले. 

आज काळ बदलला. आता काळाची करणी पहा. ज्या मंडईच्या कळशी माडीवर मयत लखुनाना आपटे यांच्या अध्यक्षतेखालीं जोतिबाचा अर्वाच्य शिमगा साजरा झाला, फुले पुतळा बंडाच्या प्रसंगी ज्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला एक आठवडाभर हत्यारबंद पोलिसांच्या पहाऱ्याचे कडे पडले होते, तो पुतळा फुले मंडईचा द्वारपाळ बनला. 

निबंधमालेत ज्या ‘मराठीच्या शिवाजी’ नें जोतिबाला ‘महामूर्ख शूद्रशिरोमणि’ ठरविण्यासाठी पेशवायी तंगडझाड केली. ते विष्णूशास्त्री चिपळोणकर एका बटाटेवाल्याच्या दुकानाच्या फडताळातच बसलेले आढळले असते, पण तेथून ते मागेच फरारी होऊन कोणच्याशा कॉलेजच्या कोपऱ्यांत छपून बसलेले आहेत म्हणतात. 

ज्या बाबूराव फुल्याने जोतिबाला स्वरचित छापील चोपड्यातून निरर्गल शिव्यांचा भडीमार केला, त्याला त्याच वेळी ‘तोंडात किडे पडून मरशील’ असा हजारो बाया बापड्यांनी शाप दिला. आणि काय आश्चर्य सांगावे! खरोखरच तो प्राणी अखेर तस्सेच होऊन परलोकवासी झाला!

जोतिबा बंडखोर निर्माणच कां झाला? ‘तुका म्हणे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नोहे.’ जोतिबा जातिवंत होता. ज्या श्रमजीवी शूद्र समाजात त्याचा जन्म झाला, त्याच्या सामाजिक नि धार्मिक अडीअडचणी, वरिष्ठ जातवाल्यांचा हरघडी टोचणारा बोचणारा उपहास निंदा छळ तिटकारा यामुळे त्यांच्या विचारवंत मस्तकात दर क्षणाला प्रतिकाराच्या तुफानी लहरी खळखळत होत्या. 

चोहो बाजूंनी हिंदूंची समाजरचना, सामाजिक जुनेपुराणे विकल्प आणि मनुस्मृतिप्रणित वेदिक धर्माचे दण्डक खबरदार गडबड करशील तर म्हणून त्याला रोजच्या रोज धमकावत होते. बामणांची हिटलरी पेशवाई नुकतीच नष्ट झाली होती तरी त्या जळालेल्या सुंभाचे पीळ कायम होते. पेशवाईच्या पुनर्घटनेचे पुणेरी भटांचे प्रयत्न जारी होते. श्रमजीवी शेतकरी कामकरी समाज कुंथत होता, पण त्या घाणेरड्या जिण्याची चीडच त्याला येत नव्हती. देवाने दिलेल्या जन्माच्या आधीव्याधी मुकाटतोंडी आपण भोगल्याच पाहिजेत या भ्रमाने ते सारे पछाडलेले होते. अस्पृश्यांची अवस्था शूद्रांहून भयंकरच होती.

हेही वाचाः प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

या सर्व अधोगतीचे कारण काय याचा जोतिबा कसोशीनें विचार करू लागला आणि त्याने बिनचूक सत्य शोधून काढले की प्रचलित हिंदू धर्म, त्याचे पाषाण हृदयी प्रचारक आणि प्रवर्तक बामण भट आणि वरिष्ठपणाच्या सत्तामदाने बेफाम असलेले बामण गृहस्थ हे सारे या मानव संहाराच्या विशाळ कटातले मुख्य आरोपी आहेत. त्यांचे वर्चस्व सफाचाट झुगारून दिल्याशिवाय सुटकेचा दुसरा मार्गच नाही या कटवाल्यांच्या धुमाकुळाने शुद्रादि अस्पृश्यांची माणुसकी ठार झालीच आहे. पण खुद्द त्या पांढरपेशा समाजांतल्या मुली स्त्रिया नि अनाथ विधवा यांचेहि जिणे नासलेले सडलेले आहे, हेही जोतिबाने बिनचूक हेरले. 

लोकांच्या धार्मिक समजुती आचार विचार आणि नीती अनीतीच्या कल्पना आरपार बदलल्याशिवाय, मागासलेल्या श्रमजीवी समाजांचीच काय, पण तमाम हिंदू समाजाचीहि धडगत नाही आणि हे सत्य सिद्धीला नेण्यासाठी साक्षरतेशिवाय शूद्रांचा तरणोपाय नाही, ही एकच मक्खी जोतिबाने हुडकून त्या दिशेने सत्यशोधक समाजाची स्थापना करून मदोन्मत्त होऊन बसलेल्या भटा बामणांच्या सामाजिक नि धार्मिक वर्चस्वावर हिरिरीने हल्ला चढवला. 

`ब्राम्हणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकळून जोती म्हणे,` अशी भीमगर्जना केली. भटां बामणांच्या पुढारपणावर, त्यांनी काढलेल्या पंथ, पक्ष, पत्रांच्या मिजासीवर हल्ला चढवणाराला आजही ते कसे नि किती पाण्यात पहातात, हरतऱ्हेने बदनाम करतात, हयातींतून उखडण्याचा अट्टाहास करतात, हे विचारांत घेतले म्हणजे पाऊणशे वर्षांपूर्वी जोतिबाला कसकसल्या भट विरोधाच्या वणव्यातून होरपळत जीवन कंठावे लागले असेल याचा तेव्हाच अंदाज लागतो. 

पण तो मर्द बिचकला नाही. बावरला नाही. त्याने धीर सोडला नाही. अखंड चिंतनांतून काढलेल्या सत्यावर त्याचा अढळ विश्वास होता त्याच्या सिद्धीसाठी देवाच्या कृपाप्रसादाची करुणा त्याने भाकली नाही. देवाला धूपच घातला नाही. भिक्षुकशाही हिंदू धर्माला त्याने साफ खेटारले आणि मानवी समानतेचा पुरस्कार करणारा नवा सत्यशोधक धर्म त्याने जाहीर केला.

हेही वाचाः प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

प्रचारासाठी अनेक पुस्तके लिहिली. व्याख्यानांची परवड रचली. जबरदस्त भटी वृत्तपत्रे त्याला पदोपदीं आडवीत होती, हिणवीत होती, खिजवीत होती. मुर्दाड भाषाशैलीनें टर टिंगल करीत होती. हव्या त्या कुटाळ गटारयंत्री गप्पांनी त्याला बदनाम करीत होती. तरीही निर्धाराने पण हसतमुखाने, कटाक्षाने पण निंदकांची कीव करीत, जोतिबा आपल्या शुद्ध सत्याच्या जोतिप्रकाशाने वाट काढीत ठाम पावलाने पुढेपुढे जातच होते. 

अलिकडे १५-२० वर्षांत जोतिबाचे गुणगायन करण्याची बामण पंडितांत शर्यत लागलेली दिसते. ठीक आहे. आनंद आहे. हयातभर छळ करून मारलेल्या बापाचे तेरावे बुंदीच्या लाडवांच्या मेजवानीने साजरे करण्यासारखा हा प्रकार असला, तरी नेले ते जळ आणि उरली ती गंगा या न्यायाने त्या तेराव्याचे कौतुक करायला हरकत नाही. 

ओबडधोबड बोबड्या बोलांनी मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या उद्धारासाठी, त्या काळी उपलब्ध असलेल्या अवजड बोजड साधनानी नि भाषेनी, सत्यशोधक धर्माचा खटाटोप करणाऱ्या जोतिबाचा ज्योतिप्रकाश वाजवी होता. सत्य, न्याय नि समता यांवर आधारलेला होता, त्याने केवळ शूद्रांदि अस्पृश्य समाजाचेच हित होत होते असे नव्हे, तर पृथ्वीरवच्या सर्व मानवजातीच्या उद्धाराच्या संघटनेचा संकेत होता. चालू घडीच्या समाजवादी तत्वांची बीजेच त्यांत आढळतात. हे आब्राम्हण शूद्रादि विचारवंताना पटू लागले आहे. ही समाधानाची गोष्ट होय.

हेही वाचाः असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा

या नव्या सत्यशोधकी धर्मप्रसाराच्या कामांत सहकार करायला जोतिबाला फारच थोडे सहकारी लाभले. तो विचारच इतका जबरदस्त बंडखोरीचा होता का तो एकाकी पचनी पडण्याएवढा मगदूर मोठमोठ्या पांढरपेशांना नव्हता, तर जोतिबाच्या मागासलेल्या जातभाई समाजाची कथा ती काय! सुरुवातीला माळी गवळी रामोशी समाजांतले मूठभर अनुयायी मिळाले, तरी क्षत्रिय मराठा समाजातला एकहि आदमी त्या वेळी पुढे सरसावलेला आढळत नाही. कारण स्पष्ट आहे. पेशवाईच्या पुनरागमनाची स्वप्ने पाहाणाऱ्या भटां बामणांइतकेच मराठा समाजातले सरंजामी पुढारी आपापल्या शिलकी शिलेदारी वैभवात तर्र होते.

हेही वाचाः ग्लोबल लोकल मेळ घालायचा असेल तर महात्मा फुले हवेत

आत्मोद्धाराचा नि समाजोद्धाराचा जोतिबाला बसलेला चिमटा त्यांच्या गांवींही नव्हता. साक्षरतेचे महत्वहि त्यांना पटत नव्हते. सत्यशोधक समाजाचे ध्वजधारक म्हणून मराठा समाजांतील जी कांही थोडी मंडळी पुढे आलेली दिसतात, ती सारी काल परवाची लागण आहे. अलिकडच्या काळांत या चळवळीला जे महत्त्व आले ते केवळ छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रभावी पुढारपणामुळेंच होय. 

जोतिबाच्या सत्यशोधकी एकांडे शिलेदारीचे वास्तविक मूल्यमापन महाराष्ट्रात प्रथम शाहू छत्रपतीनीच केले. पण ते सुद्धा ती तत्वें पचनी पाडता पाडता बेजार झाले. त्यातच त्यांनी बामणेतरी चळवळीचे बांडघुळ लपेटल्यामुळे तर धड ना सत्यशोधक, धड ना बामणेतरी चळवळ, असा विचका होऊन, दोन्हीहि चळवळी लयाला गेल्या. जोतिबा फुल्यांच्या सत्यशोधक संप्रदायाचा एकही सच्चा अनुयायी आज महाराष्ट्रात आढळत नाही. फुल्यांच्या नांवावर स्वताला विकू पहाणारे मात्र रगड आहेत.

पेशवाई जाऊन आंग्लाई झाली. हा शूद्रादि अस्पृश्य जमातींना आत्मोद्धाराचा मोठा राजरस्ता गवसला, अशी जोतिबांची ठाम समजूत होती. पण त्या राजवटीत, मागासलेल्या श्रमजीवी समाजांचे दारिद्र्यविमोचन होईल, ते साक्षर होतील, माणुसकीची पुरी उंची त्यांना हस्तगत करता येईल, हा त्यांचा भरवसा मात्र अनाठायी असल्याचेच प्रत्ययाला आले. 

मानवाच्या उदात्त नि उदार तत्वांवर आंग्लाई राजवटीचे कायदे नि कारभार जरी उभारलेला होता, तरी परकीय देशात निष्कंटक राज्य चालवण्यासाठी, त्यानाहि येथल्या जुन्या सामाजिक धार्मिक नि आर्थिक परंपरेला नि विकल्पांना विरोध करण्याचे धारीष्ट नि धोरण अंमलात आणता आले नाही. शिवाय राज्यकारभार तर शहाण्या नि धूर्त पांढरपेशांच्या सहकारावरच चालवायचा. म्हणूनच पेशवाई अंमलाच्या फार पूर्वीपासून श्रमजीवी जमातीचे असलेले दारिद्र्य, त्यांची भिक्षुक सावकार नि सरंजामदार यांचेकडून नित्य होणारी पिळवणूक आणि गुलामगिरी जशीच्या तशी कायमच राहिली. चालू घटकेलाहि ती वज्रलेप कायमच आहे. 

हेही वाचाः वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

ख्रिस्ती धर्माच्या बाप्तिम्स्याने का होईना, पण रंजल्या गांजल्या अनाथ अपंगांना प्रेमाने जवळ कसे करावे, साक्षरतेने त्यांना माणुसकीत कसे आणावे, हे भूतदयेचे दाखले जोतिबा नित्य अभ्यासीतच होता. त्या दिशेने त्याने केलेले स्वावलंबी प्रयत्न इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहेतच. पण अनुयायांचा नेहमीच तुटवडा पडल्यामुळे, त्याच्या हयातीनंतर तसले प्रयत्न कोणी केलेच नाहीत. 
सत्यशोधकी तिरमिरीने वरघाटी बामणेतर उफाळले. त्यानी समाजसेवेच्या आद्यतत्वांना सफाचाट डावलून राजकीय हक्कांसाठी भांडणे केली. एकमेकांत खूप सुंदोपसुंदी माजवली. अखेर त्यानाहि काँग्रेसने आंजारून गोंजारून आपल्या गटात खेचले आणि सफाचाट पचनी पाडून, त्यांचा चोळामोळा लगदा दिला भिरकावून बाहेर. सारांश काय? 

जोतिबांनंतर त्यांच्या तत्वांचा मळवट फासलेले पुष्कळ पंथ पक्ष निघाले, झगडले बागडले, जखमी होऊन घरी परले. मागासलेल्या श्रमजीवी जमातीचे कर्मकांड पूर्वी होते तसे आजहि जशाचे तसे कायम! जोतिबाचा सत्यशोधनी जोतिप्रकाश संधिसाधू लेखाळ बोलमांडांच्या हातांत दिवटीसारखा दिसत असला, तरी ते सारे पोटासाठी केले ढोंग, तेथे कैचा पाण्डुरंग! अशा मामल्याचा बाजारच होय. 

शिवरायांनी मऱ्हाट्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तीनचार पिढ्या गाजले वाजले, इतिहासजमा झाले. पेशवाईने बामणांचा उद्धार केला, वामनी अवसानाने बामणेतराना बळीसारखे पाताळात चिणले, तेहि गेले निजधामाला! एवढी मोठी आंग्लाई आली, अडीचशे वर्षे नाचली नांदली. अखेर येथून खरचटून परागंदा झाली! या तीन राजवटींचे जसे आता नुसते नावच उरले, तीच गत जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची झाली आहे. 

त्या थोर विचारवंत पुरुषोत्तमाचे चरित्र आठवावे, त्याच्या त्या मानवोद्धारी चळवळीतील विश्वस्पर्शी तत्वे मोठ्या कौतुकाने वाचावी गावी. वहावा! काय थोर महात्मा होऊन गेला हो, असे अभिमानाचे उद्गार काढावे. यापेक्षा काय उरले आहे? जोतिबांची सत्यतत्वे अमर होती. त्यांचे सिद्धांतच आज निरनिराळ्या श्रमजीवी जनतेच्या उद्धाराच्या चळवळीत प्रकर्षाने प्रकाशत आहेत. 

म्हणूनच आज महात्मा जोतिरावकी जय अशा गर्जना जागोजाग ऐकू येताहेत. पूर्वीच्या कट्टर निंदकांचे वंशज त्याची भजने गात आहेत. मोठमोठे तत्ववेते त्याच्या चरित्राचे नि चारित्र्याचे संशोधन करून प्रबोध निबंध लिहिताहेत. त्यांच्या वार्षिक पुण्यतिथी उत्सवांत त्यांच्या नामसंकीर्तनाने आपली वाणी पुनित करून घेताहेत. महात्मा फुले अमर आहेत.

(हर्षद खंदारे यांनी काढलेला महात्मा फुले यांचा हा फोटो मराठीमाती डॉट कॉमवरून घेतलाय.)

हेही वाचाः थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

(प्रबोधनकार ठाकरे यांच्या या लेखातलं व्याकरण आणि वाक्यरचना शक्यतो तीच ठेवलीय. अगदीच अर्थबोध होत नव्हता तिथे बदल केलेत. प्रबोधनकारांचं समग्र साहित्य वाचण्यासाठी बघा prabodhankar.org)