प्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे

२४ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे.

वर्षं साधारण १९९६-९७चं असावं. चेतन दातार यांचं नाटक आलं होतं, `चंद्रपूरच्या जंगलात`. एड्सची माहिती फारशी नसलेल्या काळात नाटकात एड्सचा विषय हाताळला होता. दोन मित्र असतात. एका मित्राने एड्सची टेस्ट केलेली असते. त्याचा रिपोर्ट येतो. तो बघून मित्र त्याला सांगतो, तू एचआयवी पॉझिटिव आहेस. पॉझिटिव म्हटल्यावर तो खूष होतो. त्याला वाटतं पॉझिटिव म्हणजे आपल्याला एड्स नाही. पण तसं नसतं. तो पॉझिटिव असतो, म्हणजे त्याला एड्स असतो.

पॉझिटिव असणं ही गोष्ट निगेटिव असू शकते, हे तेव्हा नाटक बघताना धक्का देणारं होतं. आज कोरोना काळात आपण तो धक्का रोजच अनुभवतो. कोरोनाची पॉझिटिविटी मरणाचं आमंत्रण घेऊन येतेय. या पॉझिटिव असण्याने लाखो जणांचं आयुष्य बेचिराख झालंय. तरीही काही जणांना पॉझिटिविटी या शब्दाचा श्लेष करण्यात आनंद मिळतोय. या परिस्थितीतही शब्दांचे खेळ करताना चुकीचं वाटत नाही.

हेही वाचा: हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

पॉझिटिविटीचा ऑनलाईन इवेंट

`पॉझिटिविटी अनलिमिटेड - हम जितेंगे` नावाचा १५ मिनिटांच्या भाषणांचा ऑनलाईन इवेंट गेल्याच आठवड्यात साजरा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उद्योगांच्या संघटनांसह नावाजलेले डॉक्टर, सत्संगवाले बुवाबाबा यांना गोळा करून `कोविड रिस्पॉन्स टीम` नावाचा गट उभा केलाय. त्याने दूरदर्शन, राज्यसभा टीवी सारख्या यंत्रणा वापरून या भाषणांचं लाइव स्ट्रीमिंग केलं.

इतकी सगळी ताकद आणि लोकप्रिय वक्ते लावूनही त्याला मिळणारे व्यूज, लाईक, अनलाईक यांचे आकडे केविलवाणे आहेत. कोरोनाशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना हा खेळ आवडलेला नाही. मुळात या भुरट्या पॉझिटिविटीची गरजच देशाने नाकारलीय.

अपयश लपवण्यासाठीची भानगड

कोरोनाची साथ हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. राज्य सरकारंही यशस्वी नाहीत. पण सगळं आपल्याच हातात ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या केंद्राला अपयशाचं श्रेय सर्वाधिक आहे. सरकारी यंत्रणाच जवळपास दोन हजार मृतदेह गंगा नदीच्या प्रवाहात सोडत असल्याचं उघड झालंय.

आता मृतदेह नदीत सोडता येत नाहीत, तर टायर पेटवून त्यात ते जाळण्याचं काम सुरू झालंय. यापेक्षा भयानक काही असू शकत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी सगळं बळ एकवटणाऱ्या पंतप्रधानांनी त्याच्या अर्धे तरी प्रयत्न कोरोना नियंत्रणासाठी केले असतील का, असा प्रश्न उभा राहिलाय. त्या सगळ्यामुळे असंतोषाचा भडका उडतोय.

लोकांचं लक्ष हटवण्यासाठी या अनलिमिटेड पॉझिटिविटीची भानगड केलेली दिसतेय. तसं असेल तर त्यात पॉझिटिविटी चिमूटभरही नसणार, हे उघड आहे. कारण पॉझिटिविटी ही आलेल्या संकटाला निधड्या छातीने तोंड देण्यात आहे.

मॅनेजमेंट फक्त हेडलायनींचं

कोरोना वायरसच्या जनुकीय रचनेत होणारे बदल अभ्यासण्यासाठी आम्हाला खरी आकडेवारी द्या, असं शेकडो संशोधक पत्र लिहून पंतप्रधानांना कळवतात. पण ती त्यांना मिळत नाही. त्यासाठी पंतप्रधानांनी उभारलेल्या संशोधकांच्या गटाचे प्रमुख माहितीच मिळत नसल्याने राजीनामा देतात. प्रत्यक्ष मेलेले रुग्ण आणि सरकारी आकडेवारी यात तफावत असल्याचं जवळपास दररोज उघड होतंय. यात कसली डोंबलाची पॉझिटिविटी आहे?

वास्तव स्वीकारणं ही पॉझिटिविटी असते. सत्याला सामोरं जाणं ही पॉझिटिविटी असते. आणि खोट्यासारखी निगेटिविटी तर जगात दुसरी नाही. तरीही सत्याचे रोजच्या रोज खून पाडून खोट्याचे इमले रचले जात आहे.

सत्तेला परिस्थितीचं मॅनेजमेंट करायचंच नाहीच, फक्त टीवी आणि पेपरांमधल्या हेडलाईनींचं मॅनेजमेंट करायचंय. वॉट्सअपवरच्या खोट्यानाट्या मेसेजच्या मोहिमांचं मॅनेजमेंट करायचंय. भाषा पॉझिटिविटी अनलिमिटेडची असली तरी प्रत्यक्षात इथे आहे ती निगेटिविटी अनलिमिटेडच.

हेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

फाटक्या पत्रकारांच्या प्रश्नांची भीती

आमच्या मुलांच्या हक्काचे लशीचे डोस जगभर का वाटले, असा प्रश्न विचारणारं पोस्टर राजधानी दिल्लीत लागलं. म्हणून म्हणे इंद्राचं सिंहासन डळमळलं. कोरोनाचा धोका असतानाही केवळ भुकेपोटी पोस्टर लावणाऱ्या गरिबांना तुरुंगात टाकण्यात आलं. आता प्रश्न विचारले तर उत्तर द्यायचं की दडपशाही करायची?

आमच्या सर्वोच्च सत्ताधाऱ्यांना प्रश्नांची उत्तरं देण्यात कमीपणा वाटतो. मीडियातली मोठमोठी घराणी विकत घेतली तरी फाटक्या पत्रकारांच्या प्रश्नांची भीती वाटते. या घाबरण्यात कसली आलीय पॉझिटिविटी? खरी पॉझिटिविटी तर प्रश्नामधे असते. प्रश्नांना उत्तरं देण्यात असते. कारण त्यात आपण केलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारणं आहे. जबाबदारी स्वीकारण्यात पॉझिटिविटी आहे की नाकारण्यात?

देश संतांनी घडवलाय

मूठभरांनी निर्णय घ्यायचे. एकाने हुकूम सोडायचा. तो खालच्या उतरंडीने मान खाली घालून स्वीकारत जायचं. हीच काम करण्याची सर्वोत्तम पद्धत असल्याचं सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटतं. कारण ते त्याच संस्कारात वाढलेत आणि सत्ता मिळवण्यात यशस्वीही झालेत. पण या भव्यदिव्य यशाचा फोलपणा कोरोनाने उघडा पाडलाय.

हुकूम देऊन सैन्य चालवता येतं, देश नाही. देश चालवायचा तर प्रश्न विचारणारे सोबत असायला हवेत. आंधळे भक्त पॉझिटिविटीच्या कामाचे नाहीत. प्रश्न विचारले की म्हणे फाटे फुटतात. कामं उभारता येत नाहीत. पण फाटे फुटले नाहीत, तर नवी पालवीही फुटत नाही. फाटे नसलेलं, पालवी नसलेलं खोड कितीही लांबलचक असलं तरी त्याला झाड म्हणता येत नाही.

म्हणून तुकोबाराय सांगतात ते सत्ताधाऱ्यांसाठीही महत्त्वाचं आहे, 'निंदकाचे घर असावे शेजारी'. कबीर सांगतात ते महत्त्वाचं आहे, 'निंदक नियरे राखियें, आंगन कुटी छवाय'. कारण हा देश संतांनी घडवलाय, कुठल्या सत्ताधाऱ्यांनी नाही.

सत्तेला प्रश्न विचारले जात नाहीत, तिथलं स्वातंत्र्य नासत जातं. म्हणून सत्तेला प्रश्न विचारणारा कुणीही असो, त्याच्या पाठीशी ठाम उभं राहायला हवं. प्रश्नांचं स्वागत करण्याची हिंमत नसेल, तर छप्पन इंची छातीचं काय लोणचं घालायचंय?

विचार कधी सुरू होतात?

प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत. मग ते कुणी कुणालाही विचारलेले असोत. पुरोगाम्यांनी हिंदुत्ववाद्यांना विचारलेले असोत. हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम कट्टरतावाद्यांना विचारलेले असोत. परदेशी पत्रकारांनी आपल्या देशाच्या सरकारला विचारलेले असोत. काँग्रेसने भाजपला विचारलेले असोत किंवा भाजपने काँग्रेसच्या सत्तर वर्षांच्या कारभाराला विचारलेले असतो.

प्रश्न चुकीचे असोत, बरोबर असोत. योग्य वेळी असोत, चुकीच्या वेळी असोत. छोटे असोत, मोठे असोत. कसेही असोत, प्रश्न यायला हवेत. प्रश्नांना दाबून ठेवलं की फक्त निगेटिविटी जन्म घेते. प्रश्नांना उत्तरं मिळाली की पॉझिटिविटी जन्माला येते.

प्रश्नांइतकी पॉझिटिविटी जगात दुसऱ्या कोणत्याही गोष्टींत नाही. प्रश्नांची रेडीमेड उत्तरं देणारी गाईडं सगळ्या विचारधारांनी दिलेली आहेत. पण त्या रेडीमेड उत्तरांवर जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हा खरं शिक्षण सुरू होतो.

आपल्यावर लहानपणी नकळत्या वयात झालेल्या संस्कारांना आपण स्वतःच प्रश्न विचारायला सुरवात करतो, तेव्हा विचार सुरू होतात. प्रश्नांशिवाय पॉझिटिविटीच्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकता येत नाही. प्रश्नांशिवाय डबक्यातलं साचलेलं पाणी पुढे वाहू शकत नाही. प्रश्नांशिवाय नवं काहीच घडणं निव्वळ अशक्य आहे.

हेही वाचा: नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

प्रश्न विचारणं ही प्रेरणा

सॉक्रेटिसने कधी भाषणं दिली नाहीत. ग्रंथ लिहिले नाहीत. अकॅडमी सुरू केल्या नाहीत. त्याने फक्त प्रश्न विचारले. प्रश्न विचारण्याची शिक्षा म्हणून तो विषाचा प्याला हसत हसत प्याला. पण त्याने त्याच्याआधी आकाशातलं तत्त्वज्ञान जमिनीवर आणलं होतं.

नचिकेताने प्रश्न विचारला, म्हणून लोभी बापाने त्याला हाकलवून लावलं. पण त्याने प्रश्न विचारणं सोडलं नाही. यमाला प्रश्न विचारून जगासमोर पॉझिटिविटीचं तत्त्वज्ञान खुलं केलं. माझी मुंज होते, तर माझ्या ताईची का नाही होत, असा बसवण्णांनी आठव्या वर्षी विचारलेला प्रश्न आजही आपल्यासाठी पॉझिटिविटीची प्रेरणा बनतो.

आपल्या सगळ्यांत एकच देव आहे, मग जातीपातीवरून भेदाभेद कशासाठी, हा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींनी विचारला. त्याचं उत्तर धर्मसभेला देता आलं नाही आणि खऱ्या पॉझिटिविटीची गंगा वाहती झाली.

युरोपातलं विज्ञान की तालिबान्यांची अमानुषता?

खरा धर्मही प्रश्न विचारण्यातच आहे. हिंदू धर्मातल्या जवळपास सगळ्या लोकप्रिय धर्मग्रंथांची सुरवात प्रश्नानेच होते. पार्वती महादेवांना प्रश्न विचारते किंवा कोणता तरी राजा कोणत्या तरी साधूला प्रश्न विचारतो आणि उत्तरादाखल ग्रंथ सुरू होतो.

ग्रीक राजा मिनंडर याने भिक्खू नागसेनांना प्रश्न विचारले आणि मिलिंदप्रश्न सारखा बौद्ध तत्त्वज्ञानाचं सार सांगणारा ग्रंथ निर्माण झाला. धोंडिबांनी महात्मा जोतिबा फुलेंना प्रश्न विचारले, म्हणून गुलामगिरीसारख्या महान ग्रंथाने उलथापालथ केली.

खरा धर्म हा धर्माला प्रश्न विचारायला सांगतो. युरोपात धर्माला प्रश्न विचारायची परंपरा शेकडो वर्षं चालली, म्हणून तर तिथे विज्ञान विकास घडवू शकलं. जिथे धर्माला प्रश्न विचारणं थांबतं, तिथे तालिबान उभं राहतं.

आमच्याच धर्माला, आमच्याच परंपरांना प्रश्न का विचारता, हा प्रश्नच पॉझिटिविटीच्या विरोधातला आहे. युरोपातलं विज्ञान हवं की तालिबान्यांची अमानुषता, हा प्रश्न पॉझिटिविटीच्या बाजूचा आहे.

पॉझिटिविटी प्रश्न विचारण्यातच

मुळात श्रीमद्भगवदगीता म्हणजे तरी दुसरं काय? अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि त्यावरची श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरं. युद्ध सुरू होणार आहे आणि अर्जुनाला प्रश्न पडलेत. अशा वेळेस श्रीकृष्ण रथ दोन सैन्यांच्या मधे उभं करून समाधान होईपर्यंत उत्तरं देतात. समाधान झाल्यानंतरही प्रश्न विचारायला सांगतात. ही पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे.

तरीही गीतेला सर्वोच्च धर्मग्रंथ मानणारे प्रश्न नाकारत असतील, तर ती फक्त निगेटिविटी अनलिमिटेड असू शकते. कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता प्रश्न विचारू नका, असं कुणी म्हणत असेल, तर त्याला गीता दाखवायला हवी.

युद्धभूमीवर उभं राहूनच प्रश्न विचारायचे असतात. मग ती युद्धभूमी महाभारताची असो की कोरोनाची. व्यवस्थेला आणि सत्तेला प्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे.

हेही वाचा: 

शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला?

नेपाळमधल्या सत्तासंघर्षामागचं कारण काय?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफि

कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?

(साभार - दिव्य मराठी)