मराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी

२१ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.

येत्या २९ मार्चला ‘जंगली’ हा हिंदी सिनेमा रिलीज होतोय. ‘जंगली पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या सिनेमामधे विद्युत जामवाल, पूजा सावंत, अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे आणि आशा भट हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, झकास, सतरंगी रे, पोश्टर बॉईज सारख्या गाजलेल्या सिनेमामधून आपल्या ऍक्टिंगचं नाणं खणखणीतपणे वाजवणारी पूजा सावंत पहिल्यांदाच हिंदी सिनेमात आपलं मराठी पाऊल ठेवतेय.

विशेष म्हणजे, चक रसेल या हॉलीवूडमधल्या नामांकित डायरेक्टरचाही हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. ड्रिम कम ट्रू या शब्दात पूजा जंगली सिनेमाचा आपला प्रवास व्यक्त करते. जंगली सिनेमा हा पूजाचा पहिला हिंदी सिनेमा असला तरी गेली अनेक वर्ष ती हिंदी सिनेमात येण्यासाठी प्रयत्नशील होती.

झालं ते बरंच झालं

पूजा सांगते, ‘मी याआधीही अनेक मोठमोठ्या हिंदी सिनेमांसाठी ऑडिशन्स दिल्यात. पण माझं काम कधीच झालं नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रॉडक्शन हाऊसेसकडून नकार मिळायचा आणि मग मी पुन्हा दुसऱ्या ऑडिशनची तयारी करायची. आज या सगळ्याचा विचार करते तेव्हा वाटतं झालं ते बरंच झालं. कारण माझा बॉलीवूडमधे प्रवेश हा शंकरासारख्या एक अत्यंत ताकदीच्या भूमिकेतन होणार होता. आज याचा मला खूप अभिमान वाटतो.’

‘जंगली सिनेमासाठी मी २०१६ ला ऑडिशन दिलं होतं. ऑडिशननंतर लगेच दुसऱ्या दिवशी मला प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला की तुमची शंकराच्या भूमिकेसाठी निवड झालीयं. डायरेक्टरला तुम्हाला भेटायचंय. तेव्हा तुम्ही लगेच आजच मिटींगसाठी येऊ शकता का? मीही लगेच तयार झाले. तिथे गेल्यानंतर मला कळलं की या सिनेमाचे दिग्दर्शन चक रसेल हे हॉलीवूडचे प्रसिद्ध डायरेक्टर करणारेत. `द मास्क` फेम रसेल सरांच्या दिग्दर्शनामधे काम करायला मिळणार तेही पहिल्याच हिंदी सिनेमासाठी यामुळे माझ्या आनंदाला पारावारच राहिला नव्हता. मला आठवतंय, त्या दिवशी मिटिंगमधे वीडियो कॉलवर मी रसेल सरांना भेटले आणि त्यांनी हसत हसत मला सांगितलं होतं की मला तुझ्यात माझी शंकरा दिसते.’

पूजाची शंकरा या भुमिकेसाठी निवड झाली पण तिचा पुढचा प्रवास सहजसोपा नव्हता. तब्बल दोन महिने पूजाला या भुमिकेसाठी जंगलामधे जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागलं. यानंतर २०१७ मधे सिनेमाचं शूट पूर्ण झालं. २०१८ ला सिनेमा रिलिज होणार होता. पण काही कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. प्रोड्युसरसोबतच्या करारानुसार यादरम्यान सिनेमाबद्दल कुठेही काहीही बोलायचं नाही ही अट असल्यानं मधलं एक वर्ष पूजाने अक्षरशः वाट बघण्यात घालवलं.

शंकराने इमोशनली मजबूत केलं

पूजा सांगते, ‘२०१७ आणि २०१८ ही दोन वर्ष माझ्यासाठी अक्षरशः शंकरामय होती. या काळात माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामधे खूप गोष्टी घडल्या. बरे वाईट अनुभव येऊन गेले. पण या सगळ्यामधे माझ्यासोबत सदैव सोबत राहिलं ते माझं कुटुंब आणि शंकरा.’

पूजा पुढे सांगते ‘प्रत्यक्ष जगण्यात एक व्यक्ती म्हणून मी खूप भावूक आहे. डोक्यापेक्षा मी ह्रदयाने अधिक निर्णय घेते. पण शंकरामुळे मी इमोशनली मजबूत झाले. मेंदू आणि ह्रदय याचा योग्य मेळ घालून निर्णय घेणं मला शंकराकडून शिकायला मिळालं. याआधी मी स्वतःला एक ऍक्ट्रेस म्हणवून घेताना कचरायचे. कुणी मला विचारलं की तुला याच क्षेत्रामधे यायचं होतं का तर मी खूप विचार करुन याचं उत्तर द्यायचे. आज मात्र मी ठामपणे सांगते की हो मला ऍक्ट्रेसच बनायचं होतं. आणि ती बनण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय, असं मी मानत नाही. प्रत्येक सिनेमागणिक माझ्यातली कलावंत अधिक सक्षम आणि सजग बनतेय. त्यामुळे ही प्रक्रिया अविरत अशीच सुरु राहील.’

प्राण्यांविषयीचं प्रेम हा शंकराशी जोडणारा दुवा

पूजा आणि शंकरामधलं महत्वाचं साम्य म्हणजे या दोघींचं प्राण्यांवर असलेलं अतूट प्रेम. पूजाला ओळखणाऱ्या अनेकांना तिचं प्राण्यांबद्दलचं प्रेम चांगलंच माहीत आहे. जंगली सिनेमामधेही शंकरा वन्यप्राण्यांसाठी लढताना दिसते. प्राणी आणि निसर्ग याचा संवर्धन करण्याचा ध्यास या दोघींमधे दिसतो.

याबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘सिनेमामधे शंकरा जंगलातल्या हत्तींना वाचवण्यासाठी लढताना दिसते. तर गेली कित्येक वर्ष मी या काँक्रिटच्या जंगलामधल्या प्राण्यांची निगा राखायचा प्रयत्न करतेय. मी आणि माझ्या मित्र मंडळींनी यासाठी एक टीमही बनवलीय, जी अशा मोकाट सोडलेल्या प्राण्यांना अन्न आणि निवारा द्यायचं काम करतेय. इतकंच नाही तर आज माझ्या गाडीमधे तुम्ही  पाहीलं तर तुम्हाला या प्राण्यांसाठी आवश्यक औषधांच्या बाटल्या किंवा पॅकेट दिसतील. मला तर वाटतं किंबहुना माझा हा ठाम विश्वास आहे की, वन्यजीवांबद्दलचं प्रेम हे मला शंकरासोबत समरस करणारा महत्वाचा दुवा आहे.’

हिंदीचा दमदार ‘प्लॅन ऑफ ऍक्शन’

क्षणभर विश्रांती या सिनेमापासून कारकीर्द सुरु करणाऱ्या महाराष्ट्राच्या या श्रावणक्वीनचा हा प्रवास तिच्याच शब्दात ऐकताना अधिक रोचक वाटतो. पूजा सांगते, ‘प्रत्येक कलाकारासारखंच माझ्याही या प्रवासामधे अनेक चढउतार आले. पण कुटुंब आणि माझ्या चाहत्यांच्या मदतीने मी हे सर्व टप्पे पार करत आलेय. आज जंगली सिनेमातून मी माझी हिंदी सिनेमाची नवी इनिंग सुरु केलीये. तेव्हा या सर्व अनुभवांची शिदोरी माझ्यासोबत मी ठेवलीय. कारण हिंदी असो नाहीतर मराठी सिनेमा असो शेवटी कलाकार म्हणून माझी माझ्या अभिनयाशी असलेली बांधिलकी महत्वाची आहे असं मी मानते.’

हिंदी आणि मराठी सिनेमामधला फरक विचारला तर हिंदीला असलेलं तगडं आर्थिक पाठबळ हा एकमेव आणि महत्वाचा घटक असल्याचं मत पूजा मांडते. पूजा सांगते ‘मराठी असो वा हिंदी या दोन्ही क्षेत्रामधलं टॅलेंट सेम आहे. मेहनत सेम आहे. फिल्ममेकिंगच्या तंत्रप्रणाली बाबतीतही दोन्ही क्षेत्रं आता समान पातळीवर आलीयत. पण फरक पडतो तो आर्थिक पाठबळाचा. हिंदी सिनेमामधे पैसा आहे. मराठीमधे काम करताना अभिनेत्री म्हणून माझ्यासोबत डिझायनरची दोन जणांची टीम असते. तर हिंदीमधे एका कलाकारासाठी हीच टीम तब्बल दहा जणांची बनते. शिवाय सिनेमाचं प्रमोशन, त्याचं वितरण याबाबतीत हिंदीमधे सुरवातीपासूनच एक ठोस प्लॅन ऑफ ऍक्शन असतो जो मराठीमधे आताशा हळूहळू दिसू लागलाय.’

जंगली सिनेमा हा टर्निंग पॉईंट

जंगली सिनेमामधे पूजा एक्टर विद्युत जामवालसोबत झळकतेय. विद्युतसोबतच्या अनुभवाबद्दल पूजा सांगते ‘जॅकी चॅनच्या या शिष्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तो स्वतःचे स्टंट स्वतः करतो. त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेतो. शुटिंग सेटवरचा त्याचा मोकळा वावर, भूमिकेबद्दलची त्याच्यामधे दिसणारी उत्सुकता आणि कलाकार म्हणून त्याच्यामधे दिसणारी शिस्त या सगळ्याचा मला सहकलाकार म्हणून फायदाच झाला.’

‘जंगली सिनेमा रिलिजसाठी सज्ज झालाय. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमधे आम्ही व्यग्र आहोत. यानंतर सिनेमा रीलिज होईल आणि जी शंकरा आतापर्यंत फक्त माझ्यासोबत होती ती मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोचेल. टेंशन आहे पण त्याहून अधिक उत्सुकता आहे. कलाकाराच्या आयुष्यामधे क्वचित एखादी अशी भूमिका येते, जी त्याला त्या सिनेमानंतरही आयुष्यभरासाठी सोबत करते. माझ्यासाठी शंकराही अशीच आहे.’
 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)