महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे

२५ मार्च २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.

महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांतच लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होतंय. त्यात उन्हाचा चटका बसणाऱ्या विदर्भातल्या सात मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज इथल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं. भंडारा-गोंदियाच्या जागेवर तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधे पहले आप, पहले आपचा खेळ रंगला. दोन्ही पक्षांनी उमेदवारी भरायला एक दिवस शिल्लक असताना काल उशिरा आपापले उमेदवार जाहीर केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय तसंच दीक्षाभूमी असलेल्या नागपूरसोबतच रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. यामधे भंडारा वगळता सर्व पाचही जागा सध्या भाजप, शिवसेनेच्या ताब्यात आहेत. भंडाऱ्याची जागाही २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडेच होती. या सहाही मतदारसंघातल्या पत्रकारांशी बोलून तयार केलेला हा रिपोर्ट.

नागपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची

नागपुरात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे नितीन गडकरी हे निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार नाना पटोले यांना मैदानात उतरवलंय. कुणबी, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सागर डबरासे यांचं नाव शेवटच्या क्षणी जाहीर केलं. इथे बसपाचीही संघटनात्मक बांधणी चांगली आहे. गेल्यावेळी त्यांच्या उमेदवाराला लाखभर मतं मिळाली होती.

सध्यातरी इथे गडकरी विरुद्ध पटोले यांच्यात थेट लढत होताना दिसतेय. देशभरात मोदी सरकारमधला विकासाचा चेहरा म्हणून गडकरींचं नाव घेतलं जातं. निवडणुकीच्या तोंडावरच नागपुरात मेट्रोचं उद्घाटन झालंय. तसंच राष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या संस्थात त्यांनी शहरात आणल्यात. जातीने ब्राम्हण असलेल्या गडकरींनी सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता अशी इमेज उभी केलीय. या जोरावरच त्यांनी गेल्यावेळी काँग्रेसच्या ताब्यातून ही जागा खेचून आणली होती. तसंच सत्ता आल्यावर पीएमपदासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव बाजू पडल्यास गडकरींकडे पंतप्रधान पदाचा माणूस म्हणून बघितलं जातंय. ही गडकरींसाठी जमेची बाजू आहे.

याउलट मतदारसंघातला मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस संघटनात्मक पातळीवर गेल्या पाच वर्षांत खिळखिळी झालीय. गटबाजीही वाढलीय. अंतर्गत हेव्यादाव्यांच्या तक्रारी दिल्लीपर्यंत पोचल्यात. त्यामुळे काँग्रेसने यंदा इथे विलास मुत्तेमवारांसारखा निष्ठावान माणूस पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यापेक्षा पटोलेंसारखा क्लीन इमेजवाला कुणबी समाजातला फ्रेश चेहरा दिलाय. गडकरींसाठी सहजसोपा वाटणारा विजय पटोलेंच्या उमेदवारीने आता तेवढा सोपा राहिला नाही.

हेही वाचाः भाजपच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय?

मोदी सरकारच्या कारभारावर मुस्लीम आणि दलित समाजाची नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकार अनेकदा अडचणीत आलंय. या मतदारसंघात मुस्लीम, दलितांसोबतच शेतीशी संबंधित कुणबी समाजाची मतं विजयासाठी निर्णायक आहेत. या सगळ्या सरकारविरोधी मतांची गोळाबेरीज करण्यात पटोलेंना यश आल्यास ते गडकरींसाठी जायंट किलर ठरू शकतात. पटोलेंने उमेदवारी देत काँग्रेसने कुणबी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. इथल्या उमेदवारीचा काँग्रेसला विदर्भात फायदा मिळू शकतो.

रामटेकमधलं बंड शमणार?

नागपूर जिल्ह्याचा भाग असलेला रामटेक मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. इथे शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनाच पुन्हा तिकीट दिलंय. पण काँग्रेसने मुकुल वासनिक की आणखी दुसरा कुणी हे ठरवण्यात शेवटी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली. बहुजन वंचित आघाडीने किरण पाटणकर यांना उमेदवारी दिलीय. २०१४ मधे त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत तब्बल ९५ हजार मतं मिळवली होती. त्यात शिवसेनेचे तुमाने पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले.

काँग्रेसच्या गजभिये यांनी गेल्यावेळी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. २०१४ मधे त्यांनी उत्तर नागपुरातून बसपाच्या तिकीटावर विधानसभा लढवली. त्यावेळीही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. काँग्रेसचे नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर घसरले.

हेही वाचाः काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?

गजभियेंना उमेदवारी मिळवून देण्यात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी असलेल्या वासनिकांचाच हात असल्याचं बोललं जातंय. काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी ऐनवेळी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने ते उमेदवारी भरू शकले नाहीत. राऊत यांना आमदार सुनील केदार यांचा पाठिंबा आहे. बंडखोरीचं हे वादळ शमतं की कायम राहतं त्यावर काँग्रेसच्या इथल्या विजयाची गणितं अवलंबून आहेत.

भंडारा-गोंदियात कुणबी फॅक्टर महत्त्वाचा

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असतानाही त्यांना भंडाऱ्याचा उमेदवार ठरवताना नाकीनऊ आलं. राष्ट्रवादी काँग्रेस आपले राष्ट्रीय नेते प्रफूल्ल पटेल यांना उमेदवारी देत की दुसरी काही खेळी खेळली जाते हे बघण्यात शेवटी काल भाजपलाच आपला उमेदवार जाहीर करावा लागला. भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना रिंगणात उतरवत भाजपने कुणबी कार्ड बाहेर काढलं. मग राष्ट्रवादीनेही काही तासांतच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्या रुपाने कुणबी समाजालाच प्रतिनिधीत्व दिलं.

गेल्यावेळी इथे भाजपच्या नाना पटोले यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. मात्र नंतरच्या काळात पटोले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून भाजप नेतृत्वावर कडवट टीका करत पक्षाला रामराम ठोकला होता. इथल्या जागेवर गेल्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपचा तब्बल ५० हजार मतांनी पराभव केला होता.

यंदा दोन्ही पक्षांनी नवखे उमेदवार दिलेत. अशावेळी जिल्हाभरात उठबस असलेल्या पंचबुद्धे यांचं जड आहे. 

वर्ध्यात फिफ्टी-फिक्टी शक्यता

महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्ध्यात सध्या रामदास तडस यांच्या रुपाने भाजपचा खासदार आहे. त्यांना यंदा तिकीट दिलं जाणार नाही, असं बोललं जातं होतं. पण मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या तेली समाजाची नाराजी ओढवून न घेता भाजपने पुन्हा एकदा तडस यांनाच पसंती दिलीय. माजी खासदार दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे हे तिथे भाजपकडून इच्छूक होते. तडस हे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात.

हेही वाचाः निवडणूक जिंकण्याचं किलर इन्स्टिंक्ट कुणामधे?

काँग्रेसने चारुलता टोकस यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे मावस भाऊ रणजित कांबळे सध्या आमदार आहेत. राव यांच्या माध्यमातून १९९६ मधे वर्धेकरांनी एकदाच महिलेला खासदार निवडून दिलाय. बसपानेही इथे काँग्रेसमधून आलेल्या शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिलीय. गेल्यावेळी बसपाच्या उमेदवाराने ९० हजार मतं घेतली होती.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार सुबोध मोहिते हेही इच्छूक होते. स्वाभिमानीने ही जागा आपल्यासाठी सोडण्याचीही आग्रही मागणी केली होती. दुसरीकडे आधीपासूनच तयारी करत असलेल्या धनराज वंजारी यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलंय.

दिल्लीजवळच्या गुडगावमधे सासर असलेल्या टोकस सध्या तिथेच राहतात. याउलट तडस यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पण त्यांच्या नावावर विकासकामांचं चांगलं रेकॉर्ड नाही. तसंच यंदा सरकारविरोधी तसेच त्यांच्या कारभाराविरोधातल्या नाराजीचाही त्यांना फटका बसू शकतो. असं असलं तरी जिल्ह्यातली जातीची गणितं तसंच मेघे गट कुणासाठी काम करतो, हे विजयी होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

चंद्रपूरकरांची अँटी इकम्बन्सी अहिरांना भोवणार?

पहिल्या टप्प्यात गडकरी आणि हंसराज अहिर या दोन केंद्रीय मंत्र्यांचं नशीब मतपेटीत बंद होणार आहे. भाजपने केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. काँग्रेसचं चंद्रपूरचं उमेदवारी प्रकरण देशभर गाजलं. माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी दिल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपणच राजीनामा देण्याच्या मूडमधे असल्याचं सांगून एकच खळबळ उडवून दिली. शेवटी शिवसेनेतून आलेले विद्यमान आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाली.

तीनवेळा निवडून आलेल्या अहिर यांना यंदा अँटी इकम्बन्सीचा फटका बसू शकतो. मंत्री असूनही त्यांना मतदारसंघात अपेक्षित विकासकामं करता आली नाहीत. प्रदूषणामधे चंद्रपूर देशात टॉप टेनमधे आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही. उद्योगबंदीही उठवली. पण त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मंत्री असूनही मतदारसंघातच ते जास्त दिसायचे.

काँग्रेसने यंदा धानोरकरांच्या रुपात नवा, तरुण, मराठी चेहरा दिलाय. वरोरा, भद्रावती या भागात तरुणांमधे त्यांची क्रेझ आहे. चंद्रपूर मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातले वणी आणि आर्वीचाही भाग येतो. या कुणबीबहुल भागात काँग्रेसचं नेटवर्क आहे. नवख्या धानोरकरांसाठी ही जमेची बाजू आहे. गेल्यावेळी इथे आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांनी लाखाहून जास्त मतं खाल्ली होती. त्याचा काँग्रेसला खूप मोठा फटका बसला होता.

चंद्रपूर मतदारसंघात जातीपातीची फॅक्टर तितका चालत नाही. पण गेल्या काही काळात या समीकरणांना महत्त्व येतंय. या समीकरणांमुळे यंदा इथे खूप वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून असलेल्या गवळी समाजातले अहीर विरुद्ध स्थानिक कुणबी समाजातले तरुण धानोरकर अशी लढत होईल, असं दिसतंय. 

गडचिरोलीत गटागटांना महत्त्व

भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच इथे कंटिन्यू केलंय. अंतर्गत गटबाजीमुळे नेते यांचं तिकीट कापलं जाईल, असं बोललं जातं होतं. काँग्रेसनेही माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा रिंगणात उतरवलंय.

गेल्या पाच वर्षांत भाजपने मतदारसंघात आपली पाळंमुळं पक्की केलीत. त्यासोबतच पक्षात अंतर्गत गटबाजी वाढलीय. या गटबाजीमुळेच नेते यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. भाजपसोबतच काँग्रेसमधेही सत्ता गेल्यापासून अंतर्गत वादावादी सुरू आहे. जिल्ह्यात विजय वड्डेटीवार यांच्या रुपाने पक्षाकडे एकमेव आमदार आहे. दोन्ही पक्ष अंतर्गत गटबाजी कशी हाताळतात यावर सगळी गणितं अवलंबून आहेत.

यवतमाळ-वाशिममधे सारी मदार बंजारा, कुणबी समाजावर

यवतमाळ-वाशिम मतदारसंघामधे यंदा शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. पण वंचित बहुजन आघाडीने इथे बंजारा समाजातल्या प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी दिल्याने तिरंगी लढतीची चिन्हं आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडेही निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवलीय.

हेही वाचाः श्रमिक जनतेचा जाहीरनामा

साडेबारा लाख मतदार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाची मतं निर्णायक आहेत. साडेसहा लाख मतदार असलेला वाशिम जिल्हा कुणबीबहुल आहे. मतदारसंघात मुस्लीम समाजाची मतंही खूप आहेत. कुणबीबहुल मतदारसंघात गेल्यावेळी एक लाख मतांनी निवडून आलेल्या गवळी यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो.

वाशिमच्या गवळी आणि यवतमाळचे ठाकरे हे कुणबी समाजातून येतात. शिवसेनेचे राज्यमंत्री, बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना यंदा इथून उमेदवारी हवी होती. ते बंडाच्याही तयारीत होते. पण आता त्यांना पक्षनेतृत्वाने शांत केलंय. तरीही ते प्रत्यक्ष निवडणुकीत कसं काम करतात यावरच इथल्या विजयाची गणितं अवलंबून आहेत. पक्षांतर्गत गटबाजी थांबवण्यात यश आल्याचं चित्र उभं करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेच गवळी यांची उमेदवारी भरायला आले होते. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्नही या मतदारसंघात खूप गंभीर आहे.

गेल्यावेळी विदर्भामधे भाजपच्या एकहाती विजयात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याने खूप महत्त्वाची भूमिका निभावली होती. नितीन गडकरींनी तर सत्ता आल्यावर वेगळा विदर्भ करण्याचं लिखित आश्वासनच दिलं होतं. पण आता हा मुद्दा थंडबस्त्यात पडला. विदर्भवाद्यांची सरकारविरोधात नाराजी आहे. याचा भाजपला सगळीकडेच कमी-अधिक फटका बसेल.