भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण

१७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश.

मार्च २०१६. राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने जावेद अख्तर यांचं सभागृहात निरोपाचं भाषण होणार होतं. त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. पुढे अनेक दिवस त्यांचं भाषण चर्चेत राहीलं. भर सभागृहात भारत माता की जयची तीनदा घोषणा देत त्यांनी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर जोरदार निशाणा साधला. आपल्या या भाषणातून त्यांनी ओवेसींवर थेट टीका केली. त्याला कारणही तसंच होतं.

त्याकाळात जेएनयूत भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याच्या बातम्या देशभर चर्चेत  होत्या. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारतातल्या नव्या पिढीला 'भारत माता की जय' या घोषणेचं महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असं विधान केलं आणि वादाला फोडणी मिळाली.

'भारत माता की जय' बोललंच पाहिजे असं राज्यघटनेत कुठंही लिहिलेलं नाही. 'भारत माता की जय' न बोलण्याचं स्वातंत्र्य मला घटनेनंच दिलं. माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी 'भारत माता की जय' बोलणार नाही, असं वादग्रस्त विधान करत ओवेसींनी मोहन भागवत यांना खुलं आव्हान दिलं होतं. असदुद्दीन ओवेसींच्या याच विधानाचा संदर्भ घेत जावेद अख्तर यांनी राज्यसभेत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. त्यांच्या १४ मिनिटांच्या त्या भाषणाचं अक्षय शारदा शरद यांनी शब्दांकन केलं असून त्याचा हा संपादित अंश.

 

सरकार जसं हुकूमशाही असलेल्या देशात असतं तसंच राजा, महाराजा असलेल्या ठिकाणीही असतं. लोकशाही आणि इतर राज्यांमधे फरक हा असतो की तिथं फक्त सरकार असतं पण लोकशाहीत सरकार आणि विरोधी पक्ष दोन्हीही असतात.

चमन में इख़्तिलात-ए-रंग-ओ-बू से बात बनती है 
हम ही हम हैं तो क्या हम हैं तुम ही तुम हो तो क्या तुम हो

बागेत रंग आणि सुगंध या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

सेक्युलॅरिझमशिवाय लोकशाहीला अर्थ नाही

आपण नशीबवान आहोत. तक्रारी तर आपण सगळेच करत असतो. राज्यकर्त्यांबद्दल देश, समाजाबद्दल. पण आपल्याकडं जे आहे त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. एखाद्या गोष्टीचे आपल्याला जितके उपकार मानायला हवेत ते आपण मानत नाही. संविधानाचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपण चालू लागलो की पावला पावलावर आपल्याला लोकशाही दिसते. आपल्यातली ही शक्ती नेमकी आहे काय जी आपल्याला इथं मिळते?

संविधान आपल्याला लोकशाही देतं. पण सेक्युलॅरिझमशिवाय लोकशाहीला अर्थ नाही. लोकशाहीचा अर्थ काय? तर ज्या लोकांच्या बाजूला मॅजॉरिटी आहे त्यांचं म्हणण मानलं जाईल. ज्या बाजूनं मायनॉरिटी असेल ती गोष्ट मान्य केली जाणार नाही. मेजॉरिटी आणि मायनॉरिटी या गोष्टी काही कायमच्या नाहीत. दोन्ही बदलणाऱ्या गोष्टी आहेत. मेजॉरिटी आणि मायनॉरिटी आहे तशीच राहील अशी कुणी म्हणत असेल तर आपली लोकशाही संपून जाईल.

आपण सेक्युलॅरिझमची भाषा करतोय. सेक्युलॅरिझमला वाचवण्याची भाषा करणं म्हणजे कोणत्याही एका वर्गानं दुसऱ्यावर उपकार करणं नाही. आपल्याला सेक्युलॅरिझम यासाठी वाचवायला हवा कारण त्याशिवाय आपली लोकशाही वाचू शकत नाही.

प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूनं

आज आपण बऱ्याचशा गोष्टी मिळवल्यात. आपण स्वतंत्र झालो तेव्हा सुई बनवण्याच्या लायक नव्हतो. आज आपल्याकडे एक खास गोष्ट आहे. आपल्या जमिनीत लोकशाहीची मूल्यं इतकी खोलवर रुजवलीत की त्याला कोणी उखडून फेकू शकत नाही. आणि ते शक्यही नाही. पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही एक मोठी भेट आहे.

एका बाजूला लोकशाही आणि दूसऱ्या बाजूला संविधान आहे. तिसरीकडे असा देश जिथं ५० टक्के लोकसंख्या ही २७ वर्ष वयोगटाच्या आतली आहे. आपल्या देशातली ३५ कोटी जनता तरुण आहे. १० ते २५ वर्ष या वयोगटातली. भारत युवकांचा, तरुणांचा देश आहे. या सगळ्यांकडे उर्जा आहे. चांगला कायदा आहे. टॅलेंट आहे. योग्यता आहे.

सर्वसाधारण कुठल्याही भारतीयाचं आय क्यू हे चांगलंच असतं. भलेही ती व्यक्ती शिकलेली नसेल. गावात राहत असेल. मोडकं तोडकं बोलत असेल. पण त्याच्याकडे अक्कल असते. तो मूर्ख नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूनं आहे.

विकास म्हणजे जीडीपी ग्रोथ नाही

जगात सगळ्यात जास्त बेरोजगारी भारतात आहे. जगातले सगळ्यात जास्त टीबी पेशंट आपल्या देशात आहेत. जगभरात मृत पावणारं प्रत्येक पाचवं मूल जे ५ वर्षांमधलं ते आपल्या देशाचं असतं. असं कोणतं कारण आहे की दरवर्षी ५०,००० च्या आसपास महिला प्रेग्नन्सीच्या वेळेस मृत्युमुखी पडतात. आपल्याला यावर विचार करायला हवा.

आपल्याकडे शक्ती आहे. कायदा आहे. व्यवस्था आहे. हे सगळं काही आपल्याकडे आहे. मग आपण नक्की कोणता आणि कुणाचा विकास करतोय? हा सारा विकास कुणासाठी चाललाय? विकास म्हणजे फक्त जीडीपी नाहीय.

विकास म्हणजे ‘ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स’. अर्थात मानव विकास निर्देशांक. प्रश्न हाच आहे. ब्राझील या देशात जगातल्या उद्योगपती, धनदांडग्यांकडे मोठमोठी खासगी विमानं आहेत. खासगी विमानं असलेला जगातला तिसरा देश अशी ब्राझीलची ख्याती आहे. पण त्यांच्या देशातली एक तृतीयांश जनता ही दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगतेय. आपल्याला असा विकास आपल्या देशात नकोय.

हेही वाचा: पटकथा लिहिणाऱ्या जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेसारखाच फिल्मी आहे

भारत माता की जय हा माझा अधिकार

पक्ष कोणताही असो प्रत्येकाला देशाचं भलं व्हावं असंच वाटत असतं. बेरोजगारी, हॉस्पिटल, औषध, शाळा, कॉलेज, इंफ्रास्ट्रक्चर या समस्या असतानाही आपण आपली ताकद नेमकी कुठं खर्ची घालतोय. या सगळ्यात दर दिवशी कुठलीतरी नवीच गोष्ट कानावर येत असते. आणि मग ती ऐकली नसती तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. 

एका व्यक्तीला असं वाटतंय की आपण नॅशनल लीडर आहोत. पण खरी गोष्ट ही आहे की ती व्यक्ती भारतातलं एक राज्य असलेलं आंध्राप्रदेश, त्यातलं एक शहर असलेलं हैद्राबाद, त्या शहराच्या मोहल्ल्याचे ते लीडर आहेत. संविधान परवानगी देत नाही त्यामुळे ते भारत माता की जय बोलणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. संविधान त्यांना शेरवाणी आणि टोपी घालायलासुद्धा सांगत नाही.

मला हे ऐकण्यात काहीएक इंटरेस्ट नाही, की भारत माता की जय म्हणणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. ही गोष्ट मला समजूनही घ्यायची नाही. कारण भारत माता की जय म्हणणं कर्तव्यच नाही तर हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी भारत माता की जय बोलणार. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. पण यासोबतच 'मुसलमान के दो स्तान कब्रस्तान या पाकिस्तान' अशा घोषणांचाही मी निषेध करतो.

आपल्याला नेमकं काय हवंय?

वेळ कुणासाठी थांबत नाही. आपण एकतर पुढे जाऊ किंवा मागे. आपल्याला निर्णय घ्यायचाय. कोणत्याही देशात, समाजांमधे हुशार तेच असतात जे अनुभवातून काहीतरी शिकत असतात. पण त्यापलीकडचा हुशार तो असतो जो दुसऱ्याच्या अनुभवातून शिकत असतो. ज्या देशांमधे धर्माचा बोलबाला असतो. जिथं भूतकाळ हा अधिक चांगला होता असं म्हटलं जातं. ज्या देशांमधे आपलंच खरं आहे असं म्हटलं जातं. त्या देशांमधे सध्या काय चाललंय?

सब तिरे सिवा काफ़िर आख़िर इस का मतलब क्या 
सर फिरा दे इंसाँ का ऐसा ख़ब्त-ए-मज़हब क्या

असं म्हणणारे देश आज कुठं आहेत? जिथं बोलल्यावर जीभ कापली जाते. एखादा शब्द धर्माच्या विरोधात बोलला तरी फाशी दिली जाते. ते देश आपल्यासाठी उदाहरण बनायला हवेत? की जिथं हरेएक प्रकारचं स्वातंत्र्य आहे असा देश. कोणता देश चांगलाय? कुठं माणूस सुखासमाधानात जगतोय? यापैकी आपल्याला नेमकं काय हवंय?

निवडणुकांची काळजी करणं बंद करुयात

सरकारमधे काही चांगल्या व्यक्तीही आहेत. चांगलं काम करताहेत आणि करु शकतात. त्यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही बोलघेवडी मंडळी फक्त सर्वसामान्य लीडर नाहीत. तर आमदार, खासदार, राज्यांचे मंत्रीही आहेत. यांच्यावर कंट्रोल ठेवायला हवा. विरोधी पक्ष असू देत नाही तर सरकार. विरोधी पक्षाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 

देशातले तरूण काही सर्वकाळासाठी तरुण राहणार नाहीत. शंभर दीडशे वर्षानंतर पुन्हा परिस्थिती बदलेल. जपान, चीन यांनी संधी गमावलीय. आपल्याकडे पुढची २० वर्ष तरुणांची ही उर्जा राहील. विरोधी पक्ष आणि सरकार या दोघांनीही विचार करायला हवा. समाजाचं पोलरायजेशन आपल्याला पुढे घेऊन जाणारं नाही.

आपण असा देश बनवायला हवा जिथं प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असेल. प्रत्येकाकडे कपडा असेल. पोटासाठी अन्न असेल. औषधोपचार मिळतील. शाळा असतील. रस्ते असतील. वीज असेल. हे सगळं होऊ शकेल. फक्त निवडणुकांची काळजी करणं आपण बंद करुयात. सगळं काही ठीक होईल.

हेही वाचाः 

जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

रधोंचा विचार समाजाच्या राजकीय आणि सामजिक स्वास्थ्याबद्दलचा

माहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा आज विसावा बड्डे!

संसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?