अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारी कविता

०७ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्‍या आणि सामाजिक भान जपणार्‍या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्‍या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्‍या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.

कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आहे. तसंच तो जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या कवितेच्या तृष्णेचा प्रवास आहे. ज्यात प्रेम, विरह, कारुण्य, नातं, समाजभान, विसंगत अनुभव, वास्तव,तळमळ, तगमग आणि तडफडही आहे. पानापानांत मुक्त श्वास देणारे विषय आहेत. तृष्णा शमवणारे शब्द आहेत.

श्रीराम पचिंद्रे हे सुप्रतिष्ठित न्यूजपेपरचे कार्यकारी संपादक. प्रतिथयश कवी आणि गझलकार. यापूर्वी त्यांचे फुलोरा, सूर्यपंख, आभाळाचे पंख निळे, लक्ष्यवेध हे कवितासंग्रह प्रकाशित झालेत. निसर्ग, सामाजिक, प्रेम कविता आणि गझल लिहिण्यात त्यांचा हातखंडा. तितकंच गद्य लेखनही त्यांनी केलंय. त्यांच्या शाहू कादंबरीतलं एक  प्रकरण बालभारतीच्या अभ्यासक्रमात आहे. आता नवा कवितासंग्रहही दिलाच पाहिजे असं मनापासून वाटलं, तेव्हा त्यांचा संग्रह आला, त्याचं नाव ‘मृगजळ मागे पाणी'.

यात यमकबद्ध रचना, मुक्त काव्य ,अभंग, मुक्तकं, लावणी, गझल, हझल असे वेगवेगळे कवितेचे प्रकार आलेत. सुजाता पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची कविता धीरगंभीर आणि खोल समज घेऊन येते. प्रस्थापितांविरुद्ध अंगार होते. तितकाच हळवा आणि परखड असा त्यांच्या शब्दांचा बाज आहे. तत्त्व चिंतनाच्या आणि वास्तवाच्या मुशीतून हा कवी अनुभवांना सामोरे जातो.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक भूमिका असते. समूह भावना आणि वास्तव जरी त्या भूमिकेपेक्षा वेगळं असलं तरी खरा कवी आपल्या भूमिकेपासून विचलित होत नाही. म्हणून एका कवितेत श्रीराम पचिंद्रे म्हणतात, ‘मी ऐकलीय तुझ्या आत्म्याची साद, काळ्या मातीची त्वचा सोलून, हिरवी रक्तिमा पानापानातून, तशी तुझी भाषा, काळजातून उगवलेली.’

अशी स्वतःची शब्दकळा सापडलेला हा कवी भुसभुसीत वाळूचा निद्रिस्त किनारा व्हायला नाकारतो आणि म्हणतो, नाजूक फुलांचे हृदयी मी रसरसणारा अग्नी, वरतून  राख जमलेला पण थंड निखारा नाही. कवीला शब्दांच्या पोटातील मौनाचा गाभारा खुला करायचा आहे, म्हणून ते अभिमानाने दाखवून देतात, ‘फुटतात अक्षरे आशय घेत उराशी, क्षितिजावर पडल्या या तुकड्यांचा राशी’ या राशी म्हणजे चमकत्या तारका आहेत ज्यांनी आपलं जगणं अधिक प्रकाशमान होतं.

हेही वाचा: राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

यातल्या सुरवातीच्या काही कविता प्रेमविषयक, भावभावनांच्या, आठवणींच्या, विरहाच्या आणि नात्यांच्या नाजुक धाग्यात विणणाऱ्या आहेत. ‘तुझे माझे नाते, उत्कट इतुके, भुकेचे पोटाशी, असते तितुके.’ असं एकजीव झालेलं हे नातं आहे. जे कवीचंच नाही तर तुमचं आमचंही असतं. ‘किती मोहविती तुझ्या भावमुद्रा, कसे आवरावे मनीच्या समुद्रा?’ असे भाव ते व्यक्त करतात.

आपकी याद आये तो. असे भाव अनेक कवितेत फुलले आहेत. डोळ्यांच्या काळ्याशार डोहांत दोघे बुडालेले, पण कोणी जातो साथ सोडून. मग ‘माझ्या आतबाहेर सतत वावरणारी तू, अविरत कोसळणारी आनंदाची वृष्टी तू , आयुष्यातली उणीव तू, व्यवहाराचे नेणीव तू’ अशी जाणीव कवीला होते.

विरहाच्या जंगलातही आठवणींचे पक्षी फिरू लागतात. त्यामुळे कवी म्हणतो, ‘वार्‍यावरून आता आली तुझी खुशाली’ मग तो राधेच्या डोळ्यांमधला घननीळ तिच्या डोळ्यातल्या आभाळात बघू इच्छितो, त्यासाठी शब्दांचे ताटवे लावताना कवी म्हणतो की, ‘वाटेवर ठेवतो मी पावलांचे काही ठसे, तुझ्या मनात लावतो, माझ्या डोळ्यांचे आरसे’ अशी कधी विफल , कधी सफल प्रेमाची कविता पानापानावर भेटते.

जगण्याच्या लढाईत पराभूत झालेल्या माणसांच्या व्यथा कथाही कवीने शब्दबद्ध केलेल्या आहेत. ‘जन्माच्या तृष्णेसाठी हे मृगजळ मागे पाणी, मौनाच्या सांजकिनारी उच्छ्वास ऐकतो गाणी’ या मुक्तकातून हे भाव ते व्यक्त करतात.

तर बाजार कवितेतून सारा जन्म भंगार झाला असताना आणि डोळसांनी अंध मैत्रीचा खुला व्यापार मांडला असताना वेदनेची कारणं काय सांगावीत असं वाटून ते लिहितात, ‘शस्त्र त्यांनी पेलले हाती जरी, झेलला मी आसवांचा वार हा’

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

दिलासे फितूर झाल्यावर कुठून खुलासे आणावेत? सगळे फासे उलटे पडल्यावर पराभवा तूच आता ये असं त्यांना वाटतं. प्रवास कवितेत आयुष्याची भटकंती सुरू झाल्यावर ही वनवन आपण का करतो, जगण्याचा हा प्रवास मारण्यासाठी आहे का? जगणं मरणाच्या तोंडाशीच नेतं आणि आत्मा चिरंतनाचा पाठी असं जीवन सत्य कवीने व्यक्त केलंय.

तर ‘आयुष्य रद्दीच्या कागदासारखं असतं, टेरिकॉटच्या शर्टाआत गन्जिफ्रॉकला भोक असतं’ अशा प्रतिमेतून जगण्याचं बकाल वास्तव व्यक्त केलं आहे.

तरी अशा बकालपणात आणि आयुष्याच्या उजाड वनात कवीला जगण्याच्या काही वाटा आणि सुगंधाच्या पेठा सापडतातच. मग काय ते लिहितात ‘तुझ्यासारखे फूल सृष्टीत नाही, तुझ्याविण कोणीच दृष्टीत नाही, तुझे नेत्र खुलताच फुलतात बागा, तुझ्या स्वागतालाच झुलतात राने, विधाता जरी पैज घेईल आता, असं रूप केव्हाच घडणार नाही‘ अशी काही जगण्याची हिरवळ भेटत राहते आणि मग आयुष्य सुखाच्या प्रवासास फिरू लागते.

सुखदुःखांच्या फेर्‍यात आयुष्य सरतं. प्रकाश अंधाराच्या पाठशिवणीच्या खेळात रमतं. दुःखाशी खेळतं. जिंकतं. हरतं. सफल होतं. विफल होतं. त्यांच्या कडू-गोड आठवणी कोणत्याही साहित्यात शब्दात रूपांनी प्रकट होत असतात. अनुभवांचं आणि समकालीन पर्यावरणाचं साहित्यिक भान किती खोल आहे यावर कोणत्याही कवीची  कविता आपली भावमुद्रा काळावर उमटवत असते.

त्या अर्थाने कवी श्रीराम पचिंद्रे यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्‍या सामाजिक भान जपणार्‍या, नात्यांना कवेत घेणार्‍या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्‍या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

माणसाच्या विपरीत परिस्थितीतच माणुसकीची खरी ओळख होत असते. सौख्याच्या, आनंदाच्या क्षणात सोबत असणारे दारिद्र्याच्या आणि दुःख वेदनेच्या काळात कुठे दूर पळून जातात, असे काही अनुभव सामाजिक कवितांमधून आणि गझलांमधून कवी श्रीराम पचिंद्रे यांनी रेखाटलेत.

धमन्यांमधे रक्त जळू लागल्यावर उसासणार्‍या शब्दांमधून अर्थ छळू लागतात असं त्यांना वाटतं. ते लिहितात, ‘कधी अनावर वळणावरती भेटत होते थवे, कसे अचानक रस्त्यांमधुनी तेच वळू लागले’ नेकीने राहणार्‍या आणि राबणार्‍या माणसाला जगात थारा नाही हे स्पष्ट करताना कवी लिहितो, ‘पाय ओढतो त्याला मिळतो मानमरातब मोठा, पाय धराया वाके त्याच्या पाठीमधे रट्टा'

असे व्यक्तिगत अनुभव जेव्हा समकालात अनुभवाला येतात, तेव्हा व्यवस्थेचे फास बळकट होतात. हे फास वेळीच काढण्यासाठी कवी मग शब्दातून अस्वस्थता व्यक्त करत विद्रोहाची पेरणी करतो. भूक कवितेत कवी कुठलाच पक्ष माझ्या पोटाला घालत नाही, कुठलाच वाद भुकेशी संवाद साधत नाही हे सांगत व्यवस्थेला खडसावत म्हणतो,

‘सगळे धर्मजातपंथकला जीवनवादी वाद पेटवा
त्याच आगीवर समस्तांचे विचार
शिजवा किंवा भाजा
आणि वाढा गरिबाला
काहीतरी द्या पोटाला’

पोटापाण्याचे असे प्रश्न छळत असताना बळी जाणारे बळी जातात, बळी घेणारे बळी घेतात. हे कुठवर चालायचं असे सनातन प्रश्न कवीला पडलेत. मरण तुमचे टळत नाही अशी जाणीव कवी समकालाला करून देत आहे. हे या कवितेचं फार मोठं यश आहे.

हेही वाचा: जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

भुकेच्या प्रश्नाबरोबरच अभिव्यक्तीवर गदा आणणारे आणि भय आणि धाक दाखवणारे अदृश्य हात वाढू लागल्याची खंत कवी यात व्यक्त करतात. बुद्धी विकत घेणारे किंवा बुद्धीची भीक मागणारे अदृश्य धाक दाखवत असतात, अशावेळी जगावं की मरावं हा प्रश्न आम्हाला कधीच सतावत नाही कारण आमचं जगणं हीच असते आमची आत्महत्या अशी परखड कविता देऊन रसिकांच्या मनातला असंतोष कवी उजागर करत आहे.

अशा अस्वस्थतेतून कवी म्हणतो, ‘पाखरांनो उठा, बांडगुळांचं बीजच चोचीनं टिपून काढा, का की यांचा जन्मच होता कामा नये,  झाडं जगायची, तर हेच आवश्यक आहे!’

श्रीराम पचिंद्रे यांच्या या संग्रहात काही महापुरुष आणि महान नेते यांना उद्देशून लिहिलेल्या कविता आहेत. थोरांचे नाव घेऊन राजकारणी मंडळी असोत की, जातीधर्मात संघर्ष निर्माण करणारी स्वार्थी जमात असो, यांचा निर्देश करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, नेताजी सुभाष, राजर्षी शाहू महाराज यांच्याशी कवी संवाद साधतो; त्यावेळी समाजात माजलेली दुफळी,माजलेली बजबजपुरी नव्याने डोकी वर काढणारी जातीयता यांनी कवी अस्वस्थ झालेला दिसतो.

त्यांनी लिहिलेल्या पत्रकारितेविषयीच्या कविताही वाचकाला अस्वस्थ करून सोडणार्‍या आहेत. समाजाला जागे करणार्‍या, समाजाच्या समस्या नष्ट करणार्‍या, समाजातल्या अभद्रावर आघात करणार्‍या आणि चांगल्याला उजाळा देणार्‍या पत्रकारितेची एक बाजू कशी आणि किती अस्वस्थ करणारी आहे, हे त्यांच्या कविता वाचताना जाणवतं. अशी आश्वासक आणि समर्थ कविता देणारे श्रीराम पचिंद्रे यांची या कवितासंग्रहातली कविता रसिक मनावर अधिराज्य करेल आणि पुरस्कार प्राप्त ठरेल.

कवितासंग्रह - मृगजळ मागे पाणी
कवी - श्रीराम  ग. पचिंद्रे
प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
पान - ११२ किंमत - १२५
पहिली आवृत्ती - १५ मार्च २०२०

हेही वाचा:

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह