नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं

३१ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज बुधवार ३१ जुलै. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी. एक व्यापारी दानशूर आणि संवेदनशील असू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्यामुळे मुंबई आज मुंबई आहे. या शहराच्या प्रगतीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

अजस्र आणि तेवढीच अवघडलेली मुंबई आपण आज पाहतो. या मुंबईला एक टापटीप, स्वच्छ, नीटनेटकं शहर करणारे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ. नानांनी या मुंबईचा चेहरामोहरा बदलला. तिला घडवलं. तिचे जे मोजके शिल्पकार आहेत त्यामधे नानांचा समावेश होतो.

मुलींना शाळा, कॉलेजात प्रवेश दिला

एक खरा श्रीमंत माणूस. सचोटीने व्यापार करणारा, उद्योग करणारा. त्यांच्या व्यापार उदिमाचे आकर्षण अरबी आणि अफगाणी व्यापाऱ्यांनाही होतं. व्यवहारात चोख असा हा माणूस. आणि तेवढाच मनानेही श्रीमंत. पैसा केवळ आपल्यासाठी न ठेवता आपल्या अवतीभोवती असलेल्यांच्याही कल्याणासाठी वापरायचा अशी भली बुद्धी असलेला हा भला माणूस.

नानांनी मुंबईसाठी बरंच काही केलं. त्यांच्या आवडीचं क्षेत्र होतं शिक्षण. त्यासाठी त्यांनी शाखा काढल्या, कॉलेज काढलं. एल्फिन्स्टन कॉलेज ही त्यांची देणगी. त्यांच्या काळातले विद्यार्थी होते दादाभाई नवरोजी, बाळशास्त्री जांभेकर, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण भांडारकर पुढे गोपालकृष्ण गोखले, लोकमान्य टिळकसुद्धा या कॉलेजात अभ्यासाला होते. नानांनीसुद्धा विरोध सहन करून मुलींना शाळा-कॉलेज प्रवेश दिला होता.

हेही वाचा: आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

सोयी सुविधांयुक्त मुंबई हा एकच ध्यास

मूळचे मुरबाडचे असलेले नाना हे देशस्थ ब्राह्मण. त्यांचे वाडवडील पौरोहित्य करणारे. पण त्यात नानांना स्वारस्य नव्हतं. मुंबईला ते उद्योगधंदा करण्यासाठी आले. मुंबईला ब्रिटिशांनी मुंबई शहर व्यापारासाठी योग्य ठरवलं होतं. त्यांना तेव्हा इथे माणसं हवी होती. कामगार, मजुरांचे तांडे इथे येत होते. पण त्यांच्या रहाण्याची व्यवस्था मुंबईतल्या काही भल्या माणसांनी केली.

ब्रिटिशांना चांगल्या कामात नानांनी भरभरून साथ दिली. ब्रिटीश सतीची चाल बंद करू पहात होते. त्यालाही नानानी पाठींबा दिला. नानांनीं हे शहर सोयी सुविधायुक्त असावं असा ध्यासच घेतला होता. शाळा-कॉलेजांबरोबरच त्यांनी थिएटरसाठीही जमीन दिली. आणि देवळासाठी कुणी देणगी मागायला गेला तर ते त्याला वापस पाठवायचे नाहीत. एवढंच नाही तर स्मशानभूमीसाठीही त्यांनी जागा देऊ केली होती. मरीन लाईन्स इथली सोनपूर स्मशानभूमी त्यांच्यामुळे अस्तित्वात आलेली आहे.

हेही वाचा: 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

रेल्वे सुरु होण्यात नानांचं योगदान

नानांचं सगळ्यात महत्वाचं योगदान कुठलं असेल तर ते रेल्वेचं. १८४५ मधे नाना आणि जमशेटजी जीजीभाय यांनी इंडियन रेल्वे असोसियेशनची स्थापना केली. ब्रिटीश सरकारशी त्यांच्या तेव्हा बैठका व्हायच्या. यातून भारतात रेल्वे सुरु करायच्या कामाला चालना मिळत गेली.

ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे सुरु झाली तेव्हा संचालक मंडळात दहापैकी अवघे दोघेजण भारतीय होते. ते होते जमशेटजी जीजीभाय आणि नाना. पहिली रेल्वे गाडी मुंबई-ठाणे अशी धावली. त्यामधून नानांनी प्रवास केला होता. सर जॉर्ज बर्डवूड, डॉ. भाऊदाजी लाड आणि नाना या त्रिमूर्तीने मुंबईमधे अनेक सुधारणा घडवल्या होत्या

१८५७ ला ब्रीटीशांविरुद्धचा उठाव झाला. यातली विशेष गोष्ट म्हणजे तेव्हा ब्रिटीशांनी नानांवर संशय घेतला. नाना छुपेपणाने उठावाला आर्थिक सहाय्य करत असावेत असा ब्रिटीशांचा समज होता. पण त्या दृष्टीने ठोस पुरावे काही मिळाले नाहीत. पण एरवी ब्रिटिशांनी नानांचा सन्मानच केला.

हेही वाचा: युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?

नानांचे खापरपणतू काय म्हणाले?

३१ जुलै १८६५ रोजी नानांचं निधन झालं. त्यांचा वर्षभरातच जहांगीर सोसायटीजवळ संगमरवरी पुतळा बांधला गेला आणि ग्रांट रोड मधल्या मुख्य चौकाला नाना चौक असं नाव दिलं गेलं.

नानांचे खापरपणतू सुरेंद्र शंकरशेठ यांचा काही वर्षांपूर्वी गोरेगावात राजहंस संस्थेतर्फे सत्कार झाला होता. तेव्हा त्यांनी खुसखुशीत भाषण केलं होतं. ते म्हणाले, ‘आईवडलांच्या पुण्याईवर जगायचे दिवस आता गेले. मी स्वतः फार्मासिस्ट आहे. नानांनी काढलेल्या शाळा चालवायचा प्रयत्न करत आहे. आता मुले मिळत नाहीत,  देवळे आणि स्मशानभूमींना होईल तेवढा दानधर्म करतो. दोन स्मशानभूमी बांधून झाल्यात. त्या बघण्यासारख्या आहेत. पण त्या बघायला या असं मी सांगू शकत नाही.’  नाना चौक जवळील राम मंदिर आणि भवानीशंकर मंदिर यांची मालकी त्यांच्याचकडे आहे.

नानांसारखा द्रष्टा आणि दानशूर माणूस या मुंबईला लाभले. त्यांच्यामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं यात शंका नाही.

हेही वाचा: 

खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?

ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण' 

नामदेवांची पुण्यतिथी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वेगवेगळ्या दिवशी का? 

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव