लॉकडाऊननंतरच्या स्थलांतरांची वेदना मांडणारे 'ते पन्नास दिवस'!

२१ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ८ मिनिटं


कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.

जगाच्या इतिहासात स्थलांतरणाचा प्रश्न तसा खूपच प्राचीन आहे. ही स्थलांतरं कधी युध्द, दुष्काळ, महामारी, दंगली तर कधी रोजीरोटीसाठी झालीत. ही स्थलांतरं माणसाला त्याच्या मूळ निसर्ग आणि प्रदेशातून तोडतात. आपल्या मूळ भाषा, संस्कृतीपासून तुटलेली ही माणसं नव्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणात एकाकी पडतात. स्थलांतरीत देशप्रदेशात परकेपण घेऊन जगतात.

जगण्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी व्यवस्थेनं लादलेली ही स्थलांतरं खूपच निर्दयी असतात. ती माणसाचं माणूसपणच नाकारतात. अलीकडे कोरोनाच्या काळात भारतीय समाजातल्या स्थलांतरितांचा प्रश्न उग्र स्वरुपात आपल्यासमोर आला. अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावाकडे लाखोंच्या संख्येनं परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे तांडे आपण पाहिले. अनेकांनी गावी पोचण्यापूर्वीच प्राण सोडले. तर काहीजण कसेतरी तग धरून मैलोनमैलांचा प्रवास करून आपल्या गावी पोचले.

स्थलांतरीत मजुरांच्या विदीर्ण करणाऱ्या या महाभयानक प्रवासाचं, असंवेदनशील शासन व्यवस्थेच्या क्रूर दमनकारी यंत्रणेचं, पोलिसी दहशतीचं आणि या अशा कठीण काळातही धर्म,लिंग,जातीच्या भेदांना नकार देत परस्परांना सांभाळणाऱ्या माणुसकीचं प्रत्ययकारी चित्रण पवन भगत यांच्या ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीत येतं.

सर्वहारा वर्गाचं जगणं

मैत्री प्रकाशननं प्रकाशित केलेली ही कादंबरी त्याच वेळी ब्राम्हो-भांडवली शोषण व्यवस्थेचे अनेक पदर उलगडून दाखवते. ही कादंबरी केवळ स्थलांतरित मजुरांच्या ससेहोलपटीचं चित्रण करून थांबत नाही त्याचवेळी ती या देशातल्या वर्तमानकालीन राजकीय व्यवस्था आणि तिच्या दमनकारी यंत्रणेचा क्रूर चेहराही पुढे आणते.

खरंतर कोणतीही महामारी किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जगण्याची हमी देणं हे राजकीय व्यवस्थेचं कर्तव्य असतं. जनतेसोबत संवेदनशील व्यवहार करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देणं गरजेचं असतं. पण इथं मात्र वेगळेच घडलं.

कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे इथल्या राजकीय व्यवस्थेनं लॉकडाऊन जाहीर केलं. बेफिकीर एकाधिकारशाहीनं घेतलेल्या निर्णयाचा पहिला फटका स्थलांतरित मजुरांना बसला. पडेल ते आणि मिळेल ते काम करून जी शहरं त्यांनी स्वतःच्या श्रमावर उभी केली त्या शहरात एकाच झटक्यात ते परके झाले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते या देशातल्या बहुसंख्यांक हिंदूंचं धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या बनारस या शहरापर्यंतचा हा प्रवास चित्रित करताना लेखक केवळ स्थलांतरितांची करुणामय बाजू मांडत नाही. तो या देशातल्या ब्राम्हो-भांडवली-पितृसत्ताक राजकारणात नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे अधोरेखित करतो.

हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

शिक्षणासाठी कष्ट करणारा रामस्वरूप

रामस्वरूप, पंडित ब्रिजमोहन मिश्रा, शेख आरिफ आणि प्रवासाच्या मधल्या टप्प्यात त्यांना भेटलेली उच्च शिक्षित दिपाली ही तरुणी या पुस्तकातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहेत. यातला रामस्वरूप मौर्य इतिहासात एमए करणारा विद्यार्थी आहे. तो कबीराचा निस्सीम भक्त आहे. बाप नसल्यानं आईनंच त्याला मेहनत करून वाढवलाय. आईला मदत व्हावी म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडून पैसे कमावण्यासाठी तो मुंबईत आलेला.

श्रम विकून पैसे कमवायचे आणि उरलेलं शिक्षण पूर्ण करायचं हे त्याचं स्वप्न. रोज सकाळी उठायचं आणि मजुरांचा अड्डा असलेल्या परळच्या मडकेबुवा चौकात जायचं. आधीच दलाल ठेकेदारांनी तिथं ठिय्या मांडलेला असायचा. तिथं मजुरांची बोली लागायची. हाही स्वतःला बोलीवर लावायचा. मिळेल ते काम स्वीकारायचा. रात्री तो फक्त एकवेळ जेवायचा. जास्तीतजास्त पैसे उरवून तो आईला पाठवायचा. मुंबईत जगणाऱ्या लाखो कामगारांसारखीच त्याची जिंदगानी होती.

आपल्या पंतप्रधानांनी आकस्मिक टाळेबंदी जाहीर केली आणि मजुरांच्या झुंडीच्या झुंडी रेल्वे स्टेशनवर जमू लागल्या. इथं राहून जगणं अवघड असल्यानं लाखो मजुरांना गावी परतण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. रामस्वरूपनेही जमेल तितकं सामान घेतलं आणि रेल्वे स्टेशन गाठलं. प्लॅटफॉर्मवर माणसांची तुडुंब गर्दी उसळलेली.

लहान पोरं, बायामानसं, तरणीताठी, म्हातारीकोतारी, अपंग, आजारी, कोण फिरायला आलेलं तर कोण सरकारी कार्यालयात काम घेऊन आलेलं. असं सगळंच अडकलेलं. बुड टेकवायला कुठंच जागा नव्हती. जिथ मिळेल तिथं मानसं घुसून जागा पकडत होती. वैतागलेला रामस्वरूप पानपोईजवळ जागा पकडून बसतो. तिथल्या गर्दीत त्याला टिळाधारी शेंडीवाला पंडित ब्रिजमोहन मिश्रा आणि शेख आरिफ हा तरुण भेटतो.

पंडित ब्रिजमोहन आणि आरिफ

पन्नाशीच्या वयाचे पंडित ब्रिजमोहन बनारसहून मुंबईत आलेले. श्राद्ध, पूजापाठ, सत्यनारायण, वास्तुशांती, गृहशांती, जन्मशांती, अभिषेक, विवाह यासारखे धार्मिक विधी करायचं काम पंडित ब्रिजमोहन मुंबईत करायचे. अनेक पंडितांच्या टोळ्या मुंबई महानगरीत सक्रिय होत्या. नवख्या पंडितांकडून दलाली घेऊन काम करून घेणारे दलालही या शहरात होते. अशाच एका एजंटाच्या मदतीनं ब्रिजमोहन बनारसहून मुंबईत आलेले.

तेही रामस्वरूपसारखे रोजंदारीवर काम करणारे धार्मिक मजूर होते. धर्माच्या कामात त्यांना वेठबिगार म्हणून राबवून घेतलं जात होतं. पंडित ब्रिजमोहन मिश्राही एक प्रकारे नाका कामगारच. त्यांच्याही श्रमाचा कोणीतरी दुसराच सौदा करायचा. पंडित ब्रिजमोहनसारखाच आरिफही बनारसहून मुंबईत जगण्यासाठी आलेला. कष्ट करून जगणारा हरहुन्नरी मुसलमान. त्याला कोणतंच काम जमत नव्हतं असं नाही.

नळ फिटिंग, गॅसशेगडी, सायकल पंक्चरपासून पडेल ते काम नेटानं करायचा. भारतातल्या कष्टकरी मुसलमानांकडे असते तशी जगण्यासाठी आवश्यक असलेली हुन्नर त्याच्याकडे होती. आरिफ शेवटी कामाठीपुरातल्या रेड लाईट एरियात बिर्याणी सेंटरवर कुक म्हणून काम करायचा. एकवीस दिवसाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा लॉकडाऊन सुरु झालं. हॉटेल सुरु होण्याची काहीच चिन्हे दिसेनात तसं आरिफही गावाकडे जायला निघालेला.

हेही वाचा: क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

स्थलांतरितांच्या जगण्याची कैफियत

इथं राहून जगण्याच्या सगळ्याच शक्यता संपल्यानं गावी परतण्याशिवाय कोणताच पर्याय त्यांच्याकडे उरत नाही. गावाकडे परतायचंय पण परतणार कसं. बेफिकीर शासन व्यवस्थेनं बस, रेल्वे अशा सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था आधीच बंद केल्या होत्या. कसंही करून आपलं गाव गाठण्याची प्रत्येकाची धडपड चाललेली. मजुरांच्या तांड्यानी रस्ते अक्षरशः वाहू लागलेले.

या अशा कठीण प्रसंगातही जात धर्माच्या टोकदार जाणीवा घेऊन ते गावी परतणाऱ्या गर्दीचा भाग बनले. नाईलाजानं का असेना हे तिघे सहप्रवासी बनून पायी चालणाऱ्या मजुरांच्या तांड्यासोबत निघतात. जसं ते सोबतीनं चालू लागतात तशा त्यांच्या जातधर्माच्या अस्मिता हळूहळू गळून पडतात.

इतके दिवस आपण स्वतःविषयीचे बाळगलेले अहं किती तकलादू आहेत याची त्यांना पहिल्यांदा जाणीव होते. माणूस म्हणून ते आता एकमेकांना पाहू लागतात. पुढच्या प्रवासात त्यांना दिपाली नावाची उच्च शिक्षित तरुणी भेटते. टाळेबंदीनं केवळ मजूरच नाही तर मध्यमवर्गीय उच्चशिक्षित गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांचीही गोची केली होती. मध्यमवर्गीय दिपालीला ही टाळेबंदी जीवनाचं खरखुरं दाहक वास्तव दर्शन घडवते.

त्याची भेदकता ती पहिल्यांदा अनुभवते. चांगुलपणावरचा तिचा विश्वासच उडून जातो. पुरत्या खचलेल्या या तरुणाला या तिघांची भेट नवा आत्मविश्वास देते. जगण्याची नवी उमेद जागवते. मुंबई ते बनारस हा या चौघांचा प्रवास स्थलांतरितांच्या जगण्याची कैफियत मांडतो.

वास्तवाला भिडणारी कादंबरी

या प्रवासातल्या अनेक प्रसंगात लेखक ब्राम्हो-भांडवली-पितृसत्ताक शोषण व्यवस्थेचे पदर बारकाव्यांसह टिपतो. कादंबरीत प्रसंगानुरूप अनेक तपशील भरताना लेखकाची वैचारिक बांधिलकी, त्याचा इतिहास आणि संस्कृतीविषयीचा अभ्यास, त्याची सामाजिक राजकीय समज सहजपणे वाचकाला जाणवते. आपण काय लिहितोय आणि कोणासाठी लिहितोय याची स्पष्टता आणि पक्कं भान लेखकाला आहे. त्यामुळेच कादंबरी चौकट तोडून बाहेर येते.

कादंबरीचा पारंपारिक आकृतीबंद ती झुगारून देते. कोरोना, बेफिकीर राजकीय शासन सत्ता, तिची दमनकारी यंत्रणा, व्यवस्था, तिनं घोषित केलेली टाळेबंदी, त्याचे श्रमिक कष्टकरी स्त्री-पुरुषांच्या जगण्यावर झालेले खोल परिणाम, गावी परतणाऱ्या मजुरांच्या तांडे या साऱ्यांचं दस्तऐवजीकरण ही कादंबरी करते असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तसं नाही.

उलट लेखकाच्या या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे कादंबरी वास्तवाला अधिक भिडते. त्यामुळे कादंबरीत कुठेही कोरडेपणा येत नाही. वाचकावरची पकड तर जराही निसटत नाही. कबीर म्हणतो त्याप्रमाणे ‘तू कहता कागद कि लेखी, मै कहता आखीन कि देखी.’ असं म्हणून लेखक ‘आखन कि देखी’ लिहितोय अशी स्पष्ट भूमिका घेतो. टाळेबंदीच्या जीवघेण्या प्रवासात तो मजुरांच्या जथ्यासोबत राहिलाय.

हेही वाचा: ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

अस्सल अनुभव, अस्सल कादंबरी

अनुभवाच्या अस्सलपणामुळे यातले अनेक प्रसंग अक्षरशः अंगावर येतात. ते वाचकाला हादरवून टाकतात. अस्वस्थ करतात. कादंबरीच्या सुरवातीला जेव्हा या तिघांचा मजुरांच्या तांड्यासोबत प्रवास सुरु होतो तेव्हा मिश्राजी या दोघांसोबत अंतर राखूनच राहतो. आरिफबद्दल तर त्याच्या मनात भयंकर तिरस्कार असतो.

धार्मिक शिक्षण घेत असतानाच मुसलमानांचा द्वेष करायचे संस्कार त्याला वेदपाठशाळेतच मिळालेले असतात. ‘साला! नौबत क्या आयी की कटवेसे दोस्ती करनी पड री’ अशी आतून आलेली मुस्लिम द्वेषाची ब्राम्हणी जळजळ सहजपणे बाहेर येते. इतका टोकाचा विखार घेऊन सहप्रवाशी म्हणून निघालेला पंडित बदलतो.

त्यावेळी तबलिगी जमातीनं दिल्लीत भरवलेल्या मरकजमुळे कोरोना पसरल्याच्या ब्रेकिंग न्यूज टीवीवर झळकल्या. आधीच मुस्लीम द्वेषानं पछाडलेल्या काही जातजमातवादी शक्तींना आयतीच संधी मिळाली. मुसलमानांवर जागोजागी हल्ले सुरु झाले. आपला सहप्रवासी मुस्लीम आहे हे त्याच्या दाढीवरून लक्षात येत असल्यानं त्याच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो म्हणून पंडित त्याची स्वतः दाढी करतो.

चर्चा जात आणि शोषण व्यवस्थेची

दुसऱ्या एका प्रसंगात विहिरीवर पाणी प्यायला गेलेल्या पंडिताला वरून वाढलं जातं. त्यावेळी तो म्हणतो ‘मी ब्राम्हण आहे.’ पाणी वाढणारी बाई त्याला म्हणते, ब्राम्हणाला कोरोना होत नाही का? आयुष्यात पहिल्यांदा अस्पृश्यतेचा असा अनुभव आलेला पंडितजी आतून हादरतो.

त्यावेळी रामस्वरूप म्हणतो, धर्मग्रंथ लिहिणाऱ्या ब्राम्हणांना पुढे कोरोना नावाची महामारी येणार आहे हे माहित असतं तर त्यांनी ब्राम्हणांना कोरोना होत नाही असंही लिहून ठेवलं असतं. ब्राम्हण म्हणून मिळालेल्या जातीवर्चस्वाचे फायदे आपण इतके उपटत आलो. अनेकांना तुच्छ, हीन ठरवून त्यांना अस्पर्शित ठेवलं. हे पाप जातीधर्माच्या नावाखाली आपण हजारो वर्षे केलं.

स्वतःच्या ब्राम्हण असण्याची त्याला लाज वाटू लागली. शतकानुशतकांच्या ब्राम्हणी संस्कारांनी मजबूतपणे उभी केलेली भेदाची भिंत तो बाजूला सारतो आणि रामस्वरुपला घट्ट मिठी मारतो. लेखक या प्रसंगातून भारतीय समाजातली जातीव्यवस्था, ब्राम्हणी धर्मग्रंथाचा तिला मिळालेला आधार, तिची उतरंडीची शोषण व्यवस्था या साऱ्याची चर्चा कादंबरीत घडवून आणतो.

हेही वाचा: कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

स्थलांतर आणि स्त्रियांची फरफट

रामस्वरूप, पंडित ब्रिजमोहन मिश्रा, शेख आरिफ आणि दिपाली या कादंबरीतल्या महत्वाच्या व्यक्तिरेखा. त्या वेगवगळ्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात. हे चौघेही स्थलांतरित आहेत. स्थलांतराच्या अवकाश पटलावर ही कादंबरी या चार व्यक्तिरेखांच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेचं दर्शन घडवते. त्यातल्या वर्गीय, जातीय, लैंगिक शोषण आणि जमातवादी दहशतीवर नेमकं बोट ठेवते.

महामारीनं आणि राजकीय व्यवस्थेनं अचानक लादलेल्या स्थलांतरासारख्या संकटात सर्वाधिक फरफट होते ती बाईचीच. या कादंबरीतला गरोदर स्त्रीच्या बाळंतपणाचा प्रसंग स्थलांतरणाची भयावहता आणि असंवेदनशील आरोग्यव्यवस्थेचं पोस्टमार्टम करतो. टाळेबंदीनं सगळीकडेच नाकेबंदी केलेल्या या काळात दीपालीच्या मासिक पाळीच्या निमित्तानं लेखक ब्राम्हणी धर्मानं अपवित्र ठरवलेल्या विटाळाचीही चर्चा घडवून आणतो.

टाळेबंदीमुळे मासिक पाळीत दिपालीला सॅनिटरी पॅड मिळत नाहीत तेव्हा तिला पंडित ब्रिजमोहन मिश्र आपला गमछा घडी करून देतो. ब्राम्हणी धर्मानं जे वस्त्र पवित्र ठरवलं ते आपण या मासिक पाळीत कसं वापरायचं असा प्रश्न तिला पडतो. त्यावेळी पंडित तिला म्हणतो, ‘इससे बडा कोई धर्म नही होता है.'

लेखकाची स्पष्ट भूमिका

हे सारं ज्या जिवंतपणे या कादंबरीत आलंय याचं कारण लेखक नुसता कलावंत नाही तो संवेदनशील कार्यकर्ताही आहे. त्यामुळेच तो आपली राजकीय मतं अधिक धीट आणि स्पष्टपणे नोंदवतो. संवेदनशील आणि ठाम भूमिका असलेला कलावंत हा मानवी जीवनावर खोल परिणाम करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, घटनांची नोंद नेहमीच आपल्या कलाकृतीत घेत असतो.

या कादंबरीचा लेखकही पहिल्या पानापासून स्वच्छ आणि सुस्पष्ट भूमिका घेताना दिसतो. कादंबरीच्या सुरवातीला मनोगतातच लेखक म्हणतो, ‘जेव्हा शोषक सत्ता एखादं षडयंत्र आखते तेव्हा आधारभूत नवसमाजाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या कलावंतानी, कवींनी, पत्रकारांनी तिच्या विरोधात पुढं येणं गरजेचं असतं.’ इतकी स्पष्ट भूमिका या लेखनामागे आहे.

सन्मानजनक रोजगार हक्कासाठी संघर्षरत असलेल्या जगभरातल्या जनतेला ही कादंबरी अर्पण करून लेखक आपलं सांस्कृतिक राजकारण कादंबरीच्या पटलावर ठोसपणे उमटवत जातो. आजच्या वर्तमानकालीन विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर सहिष्णुता आणि सलोख्याच्या राजकारणाची अपरिहार्यता ही कादंबरी अधोरेखित करते.

कादंबरी: ते पन्नास दिवस
लेखक: पवन भगत
प्रकाशन: मैत्री प्रकाशन
किंमत: ३००

हेही वाचा: 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

(लेख ‘परिवर्तनाचा वाटसरू’या मासिकातून साभार)