रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख.
बायोकेमिस्ट्री म्हणजे शरीरात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास. रक्तात असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची पातळी मोजण्यासाठी त्या पदार्थाचं एका रंगीत पदार्थात रूपांतर करून मग तो रंग कलरीमीटर नावाच्या मशिनने मोजला जातो. रंगाचं प्रमाण हे त्या पदार्थाच्या पातळीवर अवलंबून असतं. जुन्या काळात या साध्या मशिनचा वापर होत होता. तेव्हा टेस्ट करायला खूप वेळ लागायचा. कारण यात थेट रिझल्ट न येता ऑप्टिकल डेन्सिटी मिळते. त्यावरून आकडेमोड करून मग संख्या काढावी लागते.
नंतर काही वर्षांनी सेमी ऑटोमॅटिक मशिन आली. यात रिझल्ट थेट मिळतो. पण सॅम्पल मोजून त्यात रिएजंटसुद्धा मोजून मिक्स करावा लागतो. यात चुका होऊ शकतात. आणि वेळही जास्त लागतो. आता सध्या पूर्णपणे ऑटोमॅटिक मशिन वापरली जातात. यामधे सॅम्पल आणि रिएजंट मशिनमधे ठेवायचे आणि कम्प्युटरला फक्त प्रत्येकाच्या कोणकोणत्या टेस्ट आहेत, हे सांगायचं की रिझल्ट मिळतात.
हेही वाचाः पॅथॉलॉजीविषयी १: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?
पूर्वी बायोकेमिस्ट्रीत एमडी नव्हते. तेव्हा एमएससी, पीएचडी इन बायोकेमिस्ट्री असे प्रोफेसर असायचे. बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट वेगळंच असायचं. अजूनही वेगळंच असतं. एमडी पॅथॉलॉजी करताना त्याबद्दल विशेष ज्ञान मिळायचं नाही. पण एमडी होऊन बाहेर पडलो आणि स्वतःची लॅब काढली किंवा जॉब केला तरी मुख्य काम बायोकेमिस्ट्रीचंच असतं. त्यानंतरच या विषयाचं खरं शिक्षण सुरू होतं.
आधी मशिनवर काम करणं, मग क्वालिटी कंट्रोल हे सर्व शिकायला लागतं. पण यात स्किल हे टेक्निशियनकडेच असते. कारण रोज तेच काम केल्यानं स्पीड आणि अचूकता येते. साध्या टेस्ट म्हणजे ब्लड शुगर, लिवर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल या सगळ्याच लॅबमधे होतात. हॉर्मोन टेस्ट म्हणजे थायरॉईडची हार्मोन्स, विटॅमिन डी वगैरे काही छोट्या लॅबही करतात. पण बऱ्याच ठिकाणी या टेस्ट बाहेरून करून घेतल्या जातात.
एनएबीएल नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज ही संस्था लॅबला प्रमाणित करते. हॉर्मोनच्या किंवा इतरही स्पेशल टेस्ट अशा लॅबकडून केल्या तर विश्वासार्ह असतात. त्या लॅबचे लोक आपल्याकडून सॅम्पल घेऊन जातात आणि रिपोर्ट ई-मेल वर देतात. त्यांची लेटरहेड सुद्धा देतात. रिपोर्ट प्रिंट करून आपण द्यायचा.
यात सॅम्पल ट्रान्सपोर्टला खूप महत्व असतं. त्या लॅबच्या पुस्तिकेत सॅम्पल कसं स्टोअर करायचं ते दिलेले असते. त्याप्रमाणे ते फ्रीज किंवा फ्रीझरमधे ठेवावं लागतं. कारण टेस्ट लगेच होत नाही आणि वेळ जाईल तशी पदार्थाची पातळी कमी होऊ शकते. अशी सॅम्पल नेण्यासाठी त्यांच्याकडे आईस पॅक किंवा सीओ२ स्नो असतो. एनएबीएलचे अधिकारी या सर्व गोष्टी बारकाईने तपासतात.
हेही वाचाः कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
आज विज्ञान एवढं पुढं गेलंय की रक्तातल्या प्रत्येक पदार्थाची लेवल मोजता येते. पण त्यासाठी लागणाऱ्या मशिन सगळ्यांना परवडत नाहीत. शिवाय अशा टेस्ट नेहमी विचारल्या जात नाहीत. अशा टेस्ट मोठ्या लॅबसुद्धा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वगैरे करतात.
अशा टेस्ट असल्यास त्या लॅबने दिलेली माहिती नीट वाचावी लागते. समजा ती लॅब ही टेस्ट दर मंगळवारी करत असेल आणि आपण सॅम्पल बुधवारी घेतलं तर रिपोर्ट पुढच्या मंगळवार नंतर मिळेल. हे नीट समजावून सांगितलं नाही तर पेशंटकडून खूप ऐकून घ्यावं लागतं. या टेस्ट खूप महाग असतात.
आधीच डॉक्टर उगाच टेस्ट करायला सांगतात, असा पेशंटचा समज असतो. त्यात रिपोर्ट लगेच मिळाला नाही की त्यांची चीडचीड होते. पण अशा टेस्ट काही उगाच लिहिल्या जात नाहीत. पेशंटने लिहिणाऱ्या डॉक्टरकडून किंवा पॅथोलॉजिस्टकडून प्रत्येक टेस्ट का विचारली आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तसंच सॅम्पल घेण्यासाठी सांगितलेल्या अटींचंही पालन केलं पाहिजे. त्यामुळे रिझल्ट अचूक येतील.
जवळजवळ सर्वच टेस्ट फास्टिंगमधे चांगल्या होतात. पण फास्टिंग शुगरसाठी ८ तास आणि लिपिड प्रोफाइलसाठी १२ ते १८ तास फास्टिंग गरजेचं आहे. जेवणानंतरच्या शुगरसाठी जेवणानंतर २ तासांनी रक्त घ्यावं लागतं. काही हॉर्मोन्ससाठी ठराविक वेळेला सॅम्पल घ्यावं लागतं. हे पाळलं नाही तर रिझल्ट चुकीचे येतात. बाकी टेस्ट कुठल्याही वेळी होऊ शकतात पण इमर्जन्सी नसेल तर शक्यतो सकाळी फास्टिंगमधेच कराव्या.
हेही वाचाः मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी
कधीकधी दुसऱ्या काही कारणांनी रिझल्ट चुकीचे येऊ शकतात. काही वेळा रक्त हिमोलाईज होतं. म्हणजे लाल पेशी तुटून सिरमला लालसर रंग येतो. हे सॅम्पल चालत नाही. कधीकधी जेवणानंतर रक्त घेतल्यास त्यात चरबीचे कण येतात. असं सॅम्पलसुद्धा चालत नाही.
वॉर्डमधून सॅम्पल घेऊन पाठवताना सिस्टर ज्या हाताला सलाईन लावलंय त्यातूनच ब्लड घेऊन पाठवतात. जर त्याच शिरेतून ग्लुकोज दिलं जात असेल तर पेशंटची ब्लड शुगर खूप जास्त येते. पण खरी ती नॉर्मल असू शकते. नेहमी सॅम्पल घेताना ट्यूबमधे घेतलं जातं. ती ट्यूब समोर ठेवून त्यावर पेशंटचं नाव, वय, डॉक्टरचं नाव, नंबर सगळं काही लिहावं. नंबर सर्वात महत्वाचा. कारण बरेचदा चूक सॅम्पल बदलल्याने होते. याची खात्री पेशंटने स्वतःही करून घ्यावी.
आणखी एक चूक म्हणजे टायपिंग मिस्टेक. कधी युरियाची पातळी क्रिएटिनिनच्या जागी आणि क्रिएटिनिन युरियाच्या जागी टाइप होते. कधी पांढऱ्या पेशींची संख्या १० हजारऐवजी एक लाख टाइप होते. सॉफ्टवेअरमुळे अबनॉर्मल रिझल्ट बोल्ड लेटरमधे येतो आणि सही करताना समजतं. पण एखाद्यावेळी सही होते आणि मग खूप ऐकून घ्यावं लागतं. हे टाळण्यासाठी काही ठिकाणी इंटरनेफेसिंग असतं. म्हणजे डायरेक्ट मशिनमधून रिपोर्टमधे रिझल्ट जातात.
काही लॅब पेशंटच्या घरून रक्त कलेक्ट करून आणण्याची सुविधा देतात. बरेलीमधे असताना असा अनुभव आला की ब्लड कलेक्शनला मुलगा एकदा गेला की तो स्वतःचा नंबर द्यायचा आणि मग दुसऱ्या लॅबमधून तपासणी करून घेऊन रिपोर्ट द्यायचा कारण त्याला कमिशन मिळायचं. असे प्रकार आणि काही बिझनेस माइंडेड लोकांमुळे वाईट अनुभव येतात, पण सामान्यतः सगळेजण आपलं काम निष्ठापूर्वक करत असतात. मेडिकलच्या अभ्यासक्रमात नैतिकता किंवा मेडिकल एथिक्स नावाचा विषय शिकवला जात नाही. पण तोच विषय दैनंदिन कामात असा सर्वात महत्त्वाचा ठरतो.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
क्लिनिकल पॅथॉलोजी यात लघवी, विष्ठा, थुंकीची तपासणी वगैरे येतं. युरिन रुटीनमधे लघवीचा रंग क्लिअर आहे की नाही, स्पेसिफिक ग्रॅविटी तसंच त्यात प्रोटीन, शुगर, बिलिरुबिन, कीटोन आहे का आणि पेशी आहेत का हे बघितलं जातं. पूर्वी प्रत्येक पदार्थासाठी वेगळी टेस्ट करावी लागायची. आता स्ट्रीपने सगळ्या टेस्ट एकत्र येतात. पेशी मायक्रोस्कोपमधे बघाव्या लागतात. या साध्या टेस्टमधूनही खूप माहिती मिळते. नॉर्मल युरिनमधे ग्लुकोज प्रोटीन अजिबात नसतं. ब्लड शुगर १८०च्या वर गेली की ग्लुकोज युरिनमधे येतं. किडनीच्या आजारात युरिनमधे प्रोटीनही असतं.
कावीळ झाली की बिलीरुबिन येतं. डायबेटिस खूप वाढला की कीटोन येतं. अर्थात आणखीही काही कारणांनी या टेस्ट पॉझिटिव येऊ शकतात. पण त्याची खात्री करूनच रिपोर्ट दिलेला बरा असतो. पस सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी. इन्फेकशन असेल तर या पेशींची संख्या वाढते. इन्फेकशन किंवा किडनीच्या आजारात लाल पेशी लघवीमधे येतात.
लघवीतून प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे गरोदर आहे की नाही हेसुद्धा तपासतात. यासाठी सकाळचं पहिलं सॅम्पल देणं योग्य असतं. कधी कधी गर्भ बीजवाहक नळीमधे असतो. अशावेळी टेस्ट कमी प्रमाणात पॉझिटिव येते. तेव्हा गायनॅकॉलॉजिस्टशी बोलून ही शक्यता विचारात घ्यायला सांगावं लागतं.
इन्फेक्शनची शक्यता असेल तर कल्चर टेस्ट करावी लागते. यासाठी मिड स्ट्रीम सॅम्पल घ्यावं लागतं. म्हणजे सुरवातीची आणि शेवटची लघवी सोडून मधला काही भागाचं सॅम्पल घेणं. कारण सुरवातीच्या आणि शेवटच्या भागात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे इन्फेक्शन नसतानाही कल्चर पॉझिटिव येऊ शकते. कल्चर पॉझिटिव आल्यास अँटीबायोटीक सेनसिटीवीटी केली जाते. म्हणजे हे जंतू कुठल्या औषधाने जातील त्याची तपासणी केली जाते. आजकाल बरेच जंतू औषधांना दाद देत नाहीत. म्हणून ही टेस्ट करूनच औषध द्यावं लागतं.
स्टूलची म्हणजेच विष्ठेची टेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे जंत, त्यांची अंडी किंवा अमिबाच्या सिस्ट आहेत का, हे बघायला करतात. तसंच डिसेंट्री, डायरियामधेही केली जाते. काही वेळा स्टूलमधून रक्त जातंय का, अशी शंका असेल तर ऑकल्ट ब्लड टेस्ट विचारतात. म्हणजे डोळ्यांना दिसत नाही पण केमिकल टेस्ट पॉझिटिव येते.
रक्तामुळे स्टूल डांबरासारखं काळं होतं. पण लोहाच्या गोळ्यांमुळेही काळं होतं. पेशंटला विचारून याची खात्री करावी लागते. लहान आतडं, मोठं आतडं यांच्या आजारांत म्हणजे कॅन्सरमधे किंवा इतरही आजारांत स्टूलमधून रक्त जातं.
थुंकीची तपासणी टीबीचे जंतू आहेत का हे बघण्यासाठी केली जाते. यासाठी फुप्फुसातून ती यावी लागते. बरेचदा लाळच असते. अशावेळी जंतू सापडत नाहीत. यासाठी ३ दिवस सलग ही टेस्ट घेतली जाते. थुंकीत जंतू असतील तर अशा पेशंटकडून इतरांनाही टीबीची लागण होण्याची शक्यता असते. अशा पेशंटची माहिती सरकारला देणं गरजेचं असतं. तसंच मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड या पेशंटचीही माहिती द्यावी लागते.
हेही वाचाः आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघींना बिग थँक्यू
टायफॉईड साठी विडाल टेस्ट करतात. सीमेन म्हणजे वीर्याची तपासणीही केली जाते. यात स्पर्म काउण्ट म्हणजे शुक्राणूंची संख्या, त्यातले किती टक्के सक्रीय आहेत, किती नाहीत, नॉर्मल किती टक्के, पस सेल आहेत का, वगैरे रिपोर्ट द्यावा लागतो. स्पर्म काउण्ट खूप कमी किंवा अजिबात नसतील तर ट्रीटमेंट घ्यावी लागते.
सर्जरीच्या आधी एचआयवी, एचसीवी, एचवीएसएजी या तीन वायरसच्या टेस्ट करतात. सुरवातीला कार्ड टेस्ट केली जाते. हे रोग रक्तातून किंवा लैंगिक संबंधातून पसरत असल्याने या टेस्ट पॉझिटिव आल्या तरी रिपोर्ट देताना ईलीसा पद्धतीने कन्फर्म करा अशी तळटीप द्यावी लागते. कारण यात फॉल्स पॉझिटिव म्हणजे वायरस नसूनही टेस्ट पॉझिटिव येऊ शकते.
एचआयवी टेस्टच्या आधी प्रीटेस्ट आणि पोस्टटेस्ट काऊन्सिलिंग म्हणजे समुपदेशन करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे एचआयवी पॉझिटिव आला तरी सगळी काळजी घेऊन सर्जरी करणं आवश्यक आहे. पण तसं केलं जात नाही. त्याला डिस्चार्ज दिला जातो.
कधीकधी पेशंटचं रक्त घेताना घेणाऱ्यालाच सुई लागू शकते. अशामुळे हेपाटायटीस बी हा रोग होऊन डॉक्टर दगावल्याची उदाहरणं आहेत. म्हणून सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हेपाटायटीस बी ची लस घेणं गरजेचं आहे. आपण काम करतो तिथल्या मालकाचीच ती जबाबदारी असते. कधी चुकून रक्त किंवा शरीरातला द्रव जमिनीवर सांडतो. तेव्हा तो इनफेक्टेड आहे असं मानून यावर हायपोक्लोराइट पसरून ग्लोवज घालूनच तो पुसावा लागतो.
हेही वाचाः पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो
एनएबीएलप्रमाणेच एनएबीएच म्हणजे नॅशनल अक्रीडीएटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल ही संस्थासुद्धा लॅबला प्रमाणित करते. यात इन्फेक्शन कंट्रोलला खूप महत्व असतं. एका पेशंटकडून दुसऱ्याला, पेशंटकडून आपल्याला किंवा आपल्याकडून पेशंटला इन्फेक्शन होता कामा नये यासाठी खूप जागरूक रहावं लागतं. तसेच वेस्ट डिस्पोजलसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या रंगाच्या पिशवीत जमा करावा लागतो. हा कचरा घेऊन जाण्याची सोय करावी लागते.
कचऱ्यात पडलेल्या सुयांमुळे कचरा वेचकांना एचआयवी झाल्याची उदाहरणं आहेत. अशा या साध्या पण अत्यंत महत्वाच्या टेस्ट. या करायला सोप्या असल्या तरी निदानाकडे बोट दाखवतात. पुढे कोणत्या टेस्ट कराव्या लागतील याचा अंदाज देतात. आणि अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात.
हेही वाचाः
तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?
१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
(डॉ. मंजिरी मणेरीकर या गेली २५ वर्ष पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरिअल कॉलेजमधून एमडी पॅथॉलॉजी केलंय.)