मोदी मास्तरांचे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ७ गुरूमंत्र

२० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र.

दोन वर्षापूर्वी १६ फेब्रुवारी २०१८ ला हा उपक्रम सुरू झाला होता. दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांना आपले प्रश्न थेट पंतप्रधानांना पाठवण्याची सोय या उपक्रमात आहे. यापैकी निवडक प्रश्नांची उत्तर पंतप्रधान आपल्या या कार्यक्रमात देतात. याआधी २९ जानेवारी २०१९ ला परीक्षा पे चर्चा उपक्रम पार पडला. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचं हे तिसरं वर्ष आहे.

दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षण यांनी सहभाग घेतला. देशभरातून जवळपास दोन हजार विद्यार्थी आले होते. पंतप्रधान मोदी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव कसा डील करावा, याविषयी काही टिप्स दिल्या. तसंच मुलांच्या प्रश्नांनाही उत्तरंही दिली.

यंदाच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य होतं. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच आकाशवाणीवरच्या आपल्या मन की बातमधून अपंग विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावं असं आवाहन केलं होतं. त्यानुसार अपंग विद्यार्थ्यांचे प्रश्न हे यंदाच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सात गुरूमंत्र पुढीलप्रमाणे,

हेही वाचाः आत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं?

१) पंतप्रधान मोदींनी सुरवातीलाच 'पुन्हा एकदा आपला दोस्त आपल्यात आलाय. सुरवातीलाच मी आपल्या सगळ्यांना नववर्ष २०२० च्या सदिच्छा देतो,' असं म्हणत विद्यार्थ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले, ‘हे नवं वर्ष आणि नवं दशक आपल्या सगळ्यांसोबतच देशासाठीही खूप महत्त्वाचं आहे. या नव्या दशकात जे काही घडेल ते थेट दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी संबंधित असणार आहे.’

दहावी, बारावीच्या परीक्षेचं आपले आईवडील खूप टेन्शन घेतात. त्यामुळे आईवडलांशी बोलून त्यांच्या मनावरचं ओझं कमी करावं, असं मला वाटलं. मीही आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्यामुळे मीही सामुदायिकपणे ही जबाबदारी निभावली पाहिजे.

२) मूड ऑफ का होते हे आपल्याला माहीत आहे का? याला आपणच जबाबदार असतो की बाहेरच्या गोष्टी कारणीभूत असतात. अधिकाधिक वेळा तर मूड ऑफ होण्यामागे बाहेरच्या गोष्टीच असतात, असं मोदी म्हणाले.

मूड ऑफ होण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मोदींनी चांद्रयान मिशनचं उदाहरण दिलं. अनेकजण रात्रभर जागं राहून चांद्रयानाचं लाँचिंग बघत होते. यापैकी बऱ्याच जणांचा या मिशनशी कोणताही थेट संबंध नव्हता. पण हे मिशन अयशस्वी झालं, तेव्हा प्रत्येकाला हे आपलं वैयक्तिक अपयश असल्याचं वाटलं. मिशन फेल गेल्यामुळे मलाही अनेकांनी तिथे न जाण्याचा सल्ला दिला. पण मी गेलो.

३) मुलांच्या आयुष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आयुष्यात कधीही तंत्रज्ञानाची भीती बाळगू नका. तसंच आपल्या दोस्त मंडळींसमोर तंत्रज्ञानाचं शो ऑफ करू नका. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी कशी महत्त्वाची आहे हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे. मोबाईलमधे असलेल्या डिक्शनरीतून दररोज १० शब्दांची ओळख करून घ्या. ते वापरा.’

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, ‘सध्या असं दिसतंय की टेक्नॉलॉजी अनेकांचा वेळ चोरतेय. अगोदर लोक बड्डे विश करण्यासाठी जातीनं हजर राहायचे, आता वॉट्सअपवर विश करतात. हे बरोबर नाही.'

हेही वाचाः जेएनयू आंदोलनाला विरोध म्हणजे आपल्याच मुलांच्या करियरवर घाला

४) अपयशातूनही यशाचा मार्ग काढता येतो, हे सांगण्यासाठी मोदींनी क्रिकेटशी संबंधित दोन उदाहरणं दिली. संकल्प केला असेल तर अपयशातून मार्ग निघतो, असं ते म्हणाले.

२००१ मधे कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच होती. भारताला फॉलोऑन मिळाला होता. भारताची अवस्था खूप खराब झाली होती. पुन्हा बॅटिंग करायला येऊनही झटपट विकेट जात होत्या. वातावरणात खूप सारी नकारात्मकता निर्माण झाली होती. प्रेक्षकही प्रचंड नाराज होते. आपलीच टीम खेळतेय, त्यांचा उत्साह वाढवावा हा विचार सोडून प्रेक्षक टीमवर आपला रोष व्यक्त करू लागले होते.

अशातच राहुल द्रविड आणि वीवीएस लक्ष्मण हे दोघं मैदानावर उतरले. आपल्या संथ खेळीनं दोघांनी मॅच दिवस संपेपर्यंत लांबवली. पराभवाचं सावट दूर केलं. एवढंच नाही तर हातातून गेलेली ही मॅच जिंकून दिली. वातावरण खूप नकारात्मक होतं. पण एक संकल्प केलेला होता, आपण हरू कसं शकतो? एकेका बॉलशी दोन हात केले आणि आपला संकल्प पूर्ण केला.

२००२ मधे भारताची टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर होती. त्यावेळी आपल्या टीममधला आघाडीचा फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या जबड्याला एक बाऊन्सर येऊन आदळला. त्यात ते गंभीर जखमी झाले. महत्त्वाचा बॉलरच जखमी झाल्याने भारताची टीम कमकुवत झाली. अनिल कुंबळे बॉलिंगला उतरेल की नाही अशी चर्चा सुरू झाली. अशातच आपल्या दुखापतीची चिंता न करता अनिल कुंबळे मैदानावर उतरले.

अनिल कुंबळे खेळले नसते तरी लोक त्यांच्यावर कुठलाच ठपका ठेवले नसते. तरीही स्वतःची जबाबदारी ओळखून ते मैदानावर आले. आणि वेस्ट इंडियाचा आघाडीचा बॅट्समन ब्रायन लाराची विकेट घेऊन मॅचचं चित्रच पालटून टाकलं. एका व्यक्तीचा संकल्प आजूबाजूच्यांच्या प्रेरणेचं किती मोठं कारण बनू शकतो, हे या दोन गोष्टींवरून दिसतं, असं मोदी म्हणाले.

५) पंतप्रधान मोदींनी आपलं एक्झाम वॉरिअर हे पुस्तक एकदा नाही तर दोनदा वाचायला सांगितलं. एका मुलाने परीक्षा आपलं भविष्य ठरवते आणि त्याचा खूप ताण येतो, असा प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आला होता.

त्यावर ते म्हणाले, 'एक्झाम वॉरिअर हे पुस्तक आपल्या काही बनण्याचं नाही तर काही करून दाखवण्याचं स्वप्न दाखवतं. आयुष्याला काही बनवण्याऐवजी काही करून दाखवण्याच्या स्वप्नाशी जोडायला हवं. असं केल्याने आपल्यावर कुठलाही ताण येत नाही.'

परीक्षेतले आकडे म्हणजे आयुष्य नाही. एखादी परीक्षा म्हणजे अख्खं आयुष्य असत नाही. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण हा टप्पा म्हणजेच सारं काही आहे, असं मानायची गरज नाही. परीक्षा म्हणजेच सारं काही असतं, अशा गोष्टी पालकांनीही आपल्या पाल्याशी करू नयेत, असं आवाहनही मोदींनी केलं.

हेही वाचाः फुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का?

६) कुठल्याही ताणतणावाशिवाय आपण परीक्षा हॉलमधे जायला हवं. नाही तर सारे प्रयत्न फसतात. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जावं. परीक्षेला कधीही आपल्या आयुष्यावरचा भार बनू देऊ नका. सकाळी उठून अभ्यास केल्याने मन आणि मेंदू दोन्ही तंदुरुस्त राहतात. पण प्रत्येकाची आपापली सवय, वैशिष्ट्य असतं. त्यामुळे सकाळ, दुपार किंवा मग संध्याकाळ कुठली का वेळ असत नाही जेव्हा चांगलं स्वतःला चांगलं वाटतं तीच वेळ अभ्यासासाठी निवडायला हवी.

७) परीक्षेसाठी गुरूमंत्र देतानाच मोदींनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचा दाखला देत कर्तव्य आणि अधिकारांचं महत्त्वही सांगितलं. गांधींनी कर्तव्यांना मूलभूत अधिकार म्हटलं होतं, असं मोदी म्हणाले.

हेही वाचाः 

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे बिनपैशाच्या ओझ्याचं गाढव होणं

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

फोकस्ड म्युच्युअल फंडमधली हाय रिस्क गुंतवणूक कुणाच्या फायद्याची?