अब्बासला सांभाळणारी मोदींची आई... हिराबा!

३१ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं ३० डिसेंबरला वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईच्या आठवणी सांगणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी आपल्या आईनं अब्बास नावाच्या मुस्लिम मुलाला स्वतःच्या घरी कसं सांभाळलं त्याचं हृद्य वर्णन केलंय. आज देशात धार्मिक भेदभाव वाढत असताना, मोदींच्या आईंची ही आठवण दिलासा देणारी आणि अनुकरणीय आहे.

माझी आई इतरांच्या आनंदात आनंद मानायची. माझ्या वडलांचा जवळचा मित्र जवळच्या गावात राहत होता. त्या मित्राच्या अकाली निधनानंतर माझ्या वडलांनी त्यांचा मुलगा अब्बास याला आमच्या घरी आणलं. अब्बासने आमच्यासोबत राहून शिक्षण पूर्ण केलं. माझ्या आईला तिच्या मुलांइतकंच अब्बासचं प्रेम आणि काळजी होती. दरवर्षी ईदच्या दिवशी ती अब्बासच्या आवडीचे पदार्थ बनवायची… हे शब्द आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे.

आपल्या आईच्या मृत्यूनंतर गहिवरून गेलेल्या पंतप्रधान मुलानं तिच्या आठवणींना शब्दावाटे वाट करून दिली आहे. त्यांनी आपल्या मातृभाषेतून गुजरातीतून लिहिलेल्या लेखाचं सुरेखा चंद्रशेखर जोशी यांनी आजच्या 'पुढारी'मधे मराठी भाषांतर केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या आईनं आपल्या मुलासोबत एका मुस्लिम मुलाला कसं मोठं केलं, त्याबद्दल नेमक्या शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत.

आज देशभर मुस्लिम माणसांना भाड्यानं घरं मिळत नाहीत, अशा तक्रारी अनेक ठिकाणी ऐकू येतात. अनेक सोसायट्यांमधे तर मुस्लिमांना घर विकू नये किंवा भाड्यानं देऊ नये, असे अलिखित नियम आहेत. हिंदू मुस्लिम दंगली, लव जिहादच्या हिंसक घटना आणि धार्मिक द्वेष असा विखारी वातावरण देशभर वाढत असताना, मोदींची आईंने घालून दिलेला आदर्श हा देशासाठी महत्त्वाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेखात उल्लेख केलेले अब्बास सध्या कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचं उत्तर शोधताना इंटरनेटवर अनेक लेख सापडतात. त्यातल्या 'अमर उजाला'च्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, आज अब्बास ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात आहेत. त्यांच्या छोट्या मुलाकडे ते राहत आहेत. सिडनीला जाण्याआधी ते फूड अँड सप्लाय विभागात काम करत होते.

हेही वाचा: १९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय

चरखा चालवणारी, रेनवॉटर हार्वेस्टिंग करणारी आई

माझ्या वडलांच्या निधनानंतर घरखर्च चालावा यासाठी आईनं काही घरची धुणीभांडीही केली. ती चरख्यावर सुतकताई करायची. आमचं घर मातीचं होतं. पावसात ते तग धरायचं ते आईमुळेच. छतावरून टपकणारं पावसाचं पाणी जमा करण्यासाठी आई छताखाली बादल्या आणि भांडी ठेवायची. या प्रतिकूल परिस्थितीतही आई खंबीर राहिली. तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल, की हे पाणी पुढची काही दिवस वापरण्यात यायचं... रेनवॉटर हार्वेस्टिगचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय असेल, असं पंतप्रधानांनी आपल्या आठवणीत सांगितलंय.

अन्नाचा कणही वाया न घालवणारी आई

स्वयंपाक आणि अन्न याबद्दल आपली आई खूप काटेकोर होती, हे सांगताना पंतप्रधान लिहितात की, माझ्या आईला सहज स्वयंपाक करता यावा म्हणून माझ्या वडलांनी बांबूच्या काड्या आणि लाकडी फळ्यांपासून तात्पुरता किचनकट्टा बनवला होता. तेच आमचं स्वयंपाकघर होतं. आम्ही सगळं कुटुंब बसून एकत्र जेवायचं. माझी आई धान्याचा एक दाणा वाया जाणार नाही, याची काळजी घ्यायची. जेव्हा ती शेजारच्या लग्नांना उपस्थित राहायची, तेव्हा आम्हाला आठवण करून द्यायची की अनावश्यक काहीही घेऊ नका. घरात एक नियम होता, जेवढं खाऊ शकाल तेवढंच घ्या.

हेही वाचा: सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?

आईवडलांना आवडत नरसी मेहतांची भजनं

मोदी म्हणतात की, माझी आई ही वडलांसोबत पहाटे चार वाजता उठायची. सकाळी लवकर उठून अनेक कामं पूर्ण करायची. वेळेच्या बाबतीत ती कमालीची शिस्तप्रिय होती. धान्य दळण्यापासून ते तांदूळ आणि डाळी निवडण्यापर्यंत. तिची आवडती भजनं आणि कीर्तन गुणगुणत वडील कामावर जायचे. गुजरातचे आदिकवी नरसी मेहता यांचं एक भजन त्यांना आवडायची - 'जलकमल चंडी जाने बाला, स्वामी अमरो जगशे.'

शाळेत न गेलेल्या गावच्या डॉक्टर

आमची आई ही रुढ अर्थानं शिकलेली नव्हती. पण तिला बऱ्यापैकी आयु्र्वेदाचं ज्ञान होतं. घरगुती उपचारात ती पारंगत होती. जणू अवघ्या गावासाठी ती डॉक्टरच होती. कुणी आजारी पडलं की तिचा सल्ला हमखास घेतला जाई. कंबर मजबूत राहावी म्हणून ती दोन वेळा विहिरीवरून पाणी भरून आणायची. चालणं, पायऱ्या चढणं व्हायचं म्हणून ती तलावावर कपडे धुवायला जायची. या बळावरच ती शंभर वर्ष जगली, अशी आठवण पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हादभाई मोदी यांनी सांगितली आहे.

पूज्य हिराबा मार्ग

गांधीनगरमधल्या एका रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी गांधीनगर पालिकेनं हा निर्णय घेऊन मोदींच्या आईच्या आदर्शाची आठवण लोकांना कायमची राहावी म्हणून हा निर्णय घेतला.  याबद्दल गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना म्हणाले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन १०० वर्षांच्या होत आहेत आणि राज्याच्या राजधानीतल्या लोकांची मागणी आणि भावना लक्षात घेऊन, रायसन पेट्रोल पंपापासून ८० मीटर रस्त्याला ‘पूज्य हिराबा मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

हेही वाचा: 

‘सुपर स्प्रेडर’कडे कुठून येते कोरोना पसरवायची सुपरपॉवर?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?