देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख.
साल १९९१. जय श्रीरामचा नारा अख्ख्या भारतात जोशाने आणि जल्लोषाने घुमत होता. जय श्रीराममुळे हिंदुत्ववाद देशभर फोफावणार आणि पुढच्याच लोकसभेत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करेल, अशी आशा संघ परिवारातून व्यक्त होत होती. वातावरणही तसंच होतंय अयोध्येमुळे देश जिंकणार हे भाजपवाले आत्मविश्वासाने सांगत होते, मांडत होते. आणि दोन खासदार असलेल्या भाजपने लोकसभेत शंभरीचा आकडा पार केला.
लोकसभेच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत्या. अयोध्येतल्या श्रीराममुळे आपण दोनवरून १२० वर गेलो. तोच राम आपल्याला उत्तर प्रदेश नक्की जिंकून देईल हा आत्मविश्वास होता. या निवडणुकीआधी कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायम सिंग यांचा समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली. भाजपला मात्र त्याची फिकीर नव्हती ते निर्धास्त होते.
निवडणुकीचे निकाल आले आणि श्रीरामाला उत्तर प्रदेशच्या भूमीत कांशीराम यांनी अडवले. भाजपचा रामरथ अडवून उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाचं सरकार आलं. आणि देशात पूर्ण बहुमताने स्वबळावर सत्तेवर यायला भाजपला २०१४ पर्यंत तब्बल २४ वर्षांचा वनवास भोगावा लागला.
कांशीराम यांच्यात अशी काय जादू होती की त्यांनी जय श्रीरामचा पराभव केला? आजच्या विरोधी पक्षांनी भाजपला हरवायचं स्वप्न बघायचं असेल तर कांशीराम यांची ही जादू समजून घ्यावी लागले.
हेही वाचाः डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!
शत्रूला हरवायचं असेल तर आपल्याला शत्रूची ताकद आणि कमजोरी नीट समजून घेतली पाहिजे, हा युद्धशास्त्राचा पहिला नियम आहे.
त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, हा युद्धशास्त्राचा दुसरा नियम. कांशीराम यांनी हे दोन्ही नियम पाळले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपला शत्रू आहे हे कांशीराम पूर्ण ओळखून होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः बामसेफची स्थापना करण्यापूर्वी संघाच्या संघटनात्मक बांधणीचा पूर्ण अभ्यास केला. आणि बामसेफची त्याला तोडीस तोड अशी बांधणी केली. कांशीराम तिथेच थांबले नाहीत तर संघाने जनसंघ आणि भाजप अशी राजकीय बाळं जन्माला घातली, हे समजून कांशीरामांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आणि त्यापूर्वी डीएसफोरसुद्धा बांधली.
स्वतः कांशीराम यांनी आयुष्यभर पाच प्रतिज्ञांचं पालन केलं. ते वैयक्तिक आयुष्यात सर्वोच्च त्याग करून संघाच्या प्रचारकांच्या तोडीस तोड संघटक झाले. म्हणूनच भारतातला तिसरा राष्ट्रीय पक्ष म्हणून बसपा उभा राहिला. अनेक दिग्गजांचे पक्ष फक्त राज्यापुरते राहत असताना बसपा देशव्यापी झाली. कांशीराम यांनी ही किमया त्याग आणि कठोर संघटन बांधणी यांच्या जोरावर साधली.
महात्मा फुलेंचं तत्वज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि प्रतिमा, स्वतःची अद्भूत राजकीय गणिती समज आणि निर्णयक्षमता या जोरावर कांशीराम यांनी बहुजन मिशनचं स्वप्न बघितलं.
कांशीराम यांनी महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानाला घोटवून घेतलं. तोच त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पाया होता. कांशीरामांनी बाबासाहेबांच्या लढ्यापासून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या प्रतिमेचा वापर दलितामधे राजकीय स्फुल्लिंग पेटवण्यासाठी केला. फुलेंचा सामाजिक पाया आणि बाबासाहेबांचा सामाजिक आणि राजकीय संघर्ष या पलीकडे कांशीरामांनी एक पाऊल पुढं टाकलं.
कांशीरामांनी बहुजन समाजाला राजकीय सत्ताप्राप्तीसाठी निवडणुकीच्या राजकीय गणिताची मांडणी करून दिली. दलित या परिभाषेच्या पुढे जात बहुजन ही परिभाषा वापरत राजकीय सत्तेच्या खेळातलं गणिताचं महत्व ओळखलं. म्हणूनच ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’ या घोषणेने प्रस्थापित काँग्रेस पक्षाचे धाबे दणाणले.
या पलीकडे जात विस्तीर्ण राजकीय पट बघायची दृष्टी त्यांच्याकडे होती. या दृष्टीनेच विचारसरणीचं जोखड बाजूला ठेवत राजकीय क्षितिजावर सापशिडीच्या खेळात कांशीराम यांनी काँग्रेसला सापनाथ तर भाजपला नागनाथ अशा उपमा दिल्या. या दोघांच्याही फण्यावर पाय ठेवत कांशीरामांनी सत्ता मिळविली. मात्र आपल मिशन मात्र इतर दलित नेत्यांसारखं सत्तेसाठी गुंडाळून ठेवलं नाही. मिशन आणि सत्ता त्यांनी कायम वेगळी मानली.
अनेक राजकीय पक्ष सध्या सत्तेच्या नशेत स्वतःचं मिशन विसरतात आणि कालांतराने संपून जातात. स्वतःचं मिशन विसरणं एखाद्या सुसाईड बॉम्बरसारखंच आहे. अशा सर्वांनी कांशीरामांचा हा धडा कायम ध्यानात ठेवला पाहिजे. कांशीराम यांचं बहुजन मिशन हे सर्वपक्षीय ब्राम्ह्ण्यवादी विचारसरणीच्या विरोधात बहुजनांना राजकीय सत्तेचा वाटा मिळवून देण्याचा होता. आणि त्या आघाडीवर कांशीराम सतत कार्यरत राहिले.
हेही वाचाः पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार
कांशीराम आपली वैचारिक बांधिलकी आणि त्यातली स्पष्टता याबद्दल गोंधळलेले नव्हते. त्याबद्दल त्यांची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट होती. भाजप देशभर पसरवत असलेल्या हिंदुत्ववादाला कांशीराम यांनी नागडं करत तो हिंदूंचा हिंदुत्ववाद नसून संघाचा ब्राम्ह्ण्यवादी हिंदुत्ववाद आहे हे त्यांनी उघड उघड मांडलं. त्यांनी कधीही घाबरून त्याला शरण जाण्याचा मार्ग स्वीकारला नाही.
कांशीराम यांनी भाजपशी कधी दोन हात केले, तर कधी त्याला मिठीत घेतलं. मात्र हा साप आहे आणि याला मला आपल्या राजकीय संघर्षात स्वतःच्या ताब्यात ठेवून नाचवायचंय ही गोष्ट त्यांच्या कायम ध्यानात होती. भाजपपेक्षा कमी आमदार असतानासुद्धा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरची दावेदारी कधीच सोडली नाही. ही दावेदारी सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी भाजपलाच सोडलं. ही राजकीय समज आणि धमक कांशीराम यांच्यात होती. आणि आज भाजपला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकाही नेत्यामधे ही समज आणि धमक दिसत नाही.
कांशीराम यांच्याकडे जबरदस्त राजकीय समज आणि जाण होती. कधी कोणाला उचलायचं आणि कधी कोणाला आपटायचं याची उत्तम जाण त्यांना होती ती समजून घ्यावी लागेल. दोन उदाहरणांवरून आपल्याला हे दिसतं.
१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांनी कांशीराम यांना सांगितलं की तुम्ही माझ्याशी युती केली तर मला पूर्ण बहुमत मिळेल. त्यावर कांशीराम म्हणाले, तुमच्याशी युती मी करेन. कारण त्यात माझा फायदा आहे. मात्र तुम्हाला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची काळजी मी घेईन. कारण तसं झालं तर तुम्हाला माझं महत्व राहणार नाही. त्यामुळे मला सशक्त नाही अशक्त पंतप्रधान हवाय.
१९९१ नंतर कांशीराम यांची वाजपेयी आणि अडवाणी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी दोघांनी एक प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, आपण निवडणूकपूर्व युती करू. मायावतींना मुख्यमंत्री करू. तुम्ही राज्य सांभाळ. आम्ही देश सांभाळतो. त्यावर कांशीराम म्हणाले, माझं एक मिशन आहे. या देशाची व्यवस्था मला आडव्या समांतर रेषेत आणायचीय. त्यासाठी मी संघ विचाराविरोधात माझे कार्यकर्ते तयार केलेत. आणि संघाला या देशाची व्यवस्था उभ्या ब्राम्हणी वर्चस्वात ठेवायचीय.
‘उभी रेष तोडायला तयार केलेले कार्यकर्ते मी उभ्या रेषेचा प्रचार करायला वापरणार नाही. कार्यकर्ते दुषित होतील. मी तुमच्याशी फक्त निवडणुकीनंतर राजकीय युती करेन. अगोदरची सामाजिक युती करणार नाही. कारण आपण दोघ एकमेकांच्या विरोधात आहोत आणि राहणार हे तुम्ही दोघांनी लक्षात घ्या,’ असं कांशीराम म्हणाले.
हेही वाचाः शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय
निवडणूक हा वैचारिक बांधिलकीचा नाही तर पूर्णपणे राजकीय गणिताचा खेळ आहे, हे कांशीराम यांना नीट समजलं होतं. निवडणुकीच्या या खेळाला ते सापशिडीचा खेळ म्हणायचे.
आंबेडकर निवडणूक जिंकले नव्हते. कांशीराम यांनी याचा नीट अभ्यास केला होता. त्यामुळेच निवडणूक आणि मिशनचं काम या दोन गोष्टी वेगळ्या आहेत याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. ते निवडणुकीला सापशिडीचा खेळ म्हणायचे आणि माझ्या शक्तिहीन समाजाला निवडणुकीच्या खेळात जिंकायचं असंल तर मी कुणाचीही शिडी वापरेन. पण वरती मात्र माझा बसपाचा माणूस जाईल याची खात्री मी करेन, असं ते म्हणायचे. आणि त्यांनी तसं केलंसुद्धा.
भाजप आणि काँग्रेस, सपा सर्वांसोबत युत्या केल्या. मात्र दरवेळी मायावती मुख्यमंत्री होतील याची काळजी घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर मायावतींना सरकारच्या स्थिरतेची काळजी न करता मिशनचं काम रेटायला सांगितलं. ही राजकीय समज आजच्या एकाही दलित नेत्याकडे आणि पक्षाकडे नाही.
दलितांच्या मतांची गरज सर्वांना आहे, हे ओळखून असलेल्या कांशीराम यांनी या गरजेलाच आपलं बलस्थान बनवलं. मग नंतरच्या काळात कांशीराम यांचा दृष्टीकोन बदलून इतर दलित नेते इतर पक्षांच्या दावणीला राहून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करू लागले. तेव्हा कांशीराम यांनी गर्जना केली ‘मैं लेनेवाला नहीं, देनेवाला हूँ.’ ही घोषणा दलित, बहुजन मतदारमधे आत्मभान जागवणारी होती.
कांशीराम इतरांना स्वतःच्या पायाकडे यायला भाग पडायचे. आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडता इतरांमधल्या सत्ता स्पर्धेचा फायदा आपल्या पक्षासाठी करून घ्यायचे. कांशीराम निवडणुकीला दहीहंडी समजायचे. बसपाला ते इतर सर्वांच्या खांद्यावर चढवायचे आणि हंडीतलं दही बहुजन समाजाला मिळेल, याची खात्री करून घ्यायचे.
हेही वाचाः रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
दलित या शब्दाला अनेक अर्थ आहेत. भारतीय मतदाराच्या जातीय मनोवैज्ञानिक विचारात त्याला जातीय पूर्वग्रहातून खालचं स्थान मिळतं, हे ओळखून कांशीराम यांनी फुलेंच्या बहुजनवादाला जवळ केलं. बहुजन या शब्दाला राजकीय वर्चस्वाचं वजन मिळवून दिलं.
बहुजनवादाला वजन मिळवून देण्यासाठी कांशीराम यांनी छोट्या छोट्या जातींना सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आत्मभान मिळवून दिलं. आवाज दिला. राजकीय ताकद मिळवून दिली. छोट्या जातींना बेरीज वजाबाकीच्या राजकारणात मोठं केलं. छोट्या जातीतून मोठे नेते उभे केले. वाराणसीजवळच्या अपना दलाच्या सोनुलाल पटेल, महाराष्ट्रातले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत.
राजकारण हे बेरजेचं आहे. त्यात अधिकाधिक लोक आपल्यासोबत असायला हवे, याचं भान त्यांना होत. आणि सवर्ण जातींना ते १५ टक्के म्हणायचे. संख्येने कमी असतानाही ते आपल्यावर राज्य करतात हा फिअर फॅक्टर कांशीराम जोरकसपणे मांडायचे.
कांशीराम यांना मीडियाचं महत्त्व माहीत होतं. पण देशातला मीडिया हा ब्राम्हणांच्या हातात आहे. तो आपल्याला जागा देणार नाही, हेही कांशीराम ओळखून होते. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडिया नव्हता त्या काळात स्वतःचा मीडिया उभा केला होता. म्हणूनच
‘जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी’
‘ब्राम्हण ठाकूर बनिया चोर बाकी सब है डीएसफोर’
‘नोट के बदले वोट’
‘जो जमीन खाली है वो हमारी है’
यासारख्या घोषणा भित्तीपत्रकं आणि भिंतीचित्राच्या माध्यमातून घराघरात गेल्या. कांशीरामांनी स्वतःची मीडिया यंत्रणा उभी केली. आपल्या पक्षाचं तत्वज्ञान निवडणूक असो आणि नसो, ते कायम लोकांच्या मनात आणि माथी मारत राहिले. काँग्रेसने हे शिकायला हवं. फक्त निवडणुकीपुरता प्रचार न करता तो कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे. कांशीराम यांच्याकडून नरेंद्र मोदी, अमित शहा हेच शिकले.
संघटन न करता फक्त प्रतीकात्मक संघर्ष केला तर तो यशस्वी होत नाही. प्रशासन, मीडिया, राजकीय पदं, न्यायव्यवस्था या सर्व ठिकाणी उच्चवर्णीय आहेत. आणि ते आपल्या गरीब कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या केसेसमधे अडकवून संपवून टाकतील, ही गोष्ट ओळखून कांशीराम यांनी सुरवातीची ७ वर्ष फक्त संघटन बांधणीवर जोर दिला. १५ मार्च १९३४ ला पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात जन्मलेल्या कांशीराम यांचं ९ ऑक्टोबर २००६ ला निधन झालं.
संघर्ष करायचा नाही. आधी गल्लीपासून संघटन करायचं आणि संघटनेची ताकद आली की एकदाच जबरदस्त बार उडवून द्यायचा हे त्यांचं शास्त्र होतं. बसपाची स्थापना १९८४ ला झाली. आणि ५ वर्ष संघटन बांधणी करून १९८९ मधे त्यांनी दिल्लीच्या बोट क्लबवर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी १० लाखांचा मोर्चा काढून दिल्ली हादरवली. या मोर्चामुळे आपण दिल्ली हादरवू शकतो याचा आत्मविश्वास त्यांनी अनुयायांना दिला.
कांशीराम हे स्वतंत्र भारतातले आतापर्यंतचे सर्वोत्तम निवडणूक रणनीतीकार आहेत. अमित शहा १३० खासदारांपासून पुढे गेले. कांशीराम यांनी ० ते उत्तर प्रदेशचा दलित मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय पक्ष हा चमत्कार अवघ्या ७ वर्षात घडवून दाखवला. आज भाजपचा विजयी अश्वमेध रोखायचा असेल तर कांशीराम यांच्याकडे जावं लागेल.
हेही वाचाः
देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!
इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी
(लेखक हे निवडणूक रणनीतीकार असून महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातील महत्त्वाचे नेते आणि राजकीय पक्ष यांच्यासोबत निवडणूक सल्लागार म्हणून ते काम करतात.)