यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

०३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोकूटनूरमधे यल्लमा देवीची यात्रा भरते. बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातले लोक या यात्रेला येतात. पण त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचीही गरज सरकारला वाटत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, यापैकी काहीच नसतं. अशा परिस्थितीत उघड्या माळरानावर लोक तीन दिवस काढतात.

आस्था, श्रद्धा, परंपरा, रीत या सगळ्याचा चष्मा बाजूला सारून थोडं अंतर ठेवून यल्लमाच्या यात्रेकडे पहायचं असं ठरवलं होतं. सीएए आणि एनआरसी विरोधात रस्त्यावर उतरणारं कर्नाटक टीवीवर पाहिलं होतं. आता कोकूटनूरमधल्या यल्लमा यात्रेतला कर्नाटक पहायचं होतं.

कर्नाटकमधे शिरलो की हायवेवर जिथे तिथे पाण्याची सोय आणि वॉशरूम होते. त्यामुळे यात्रेत इतर कुठली सोय असो नसो वॉशरूमची सोय नक्की असेल अशी माझी खात्रीच झाली होती. मी त्या दृष्टीने निश्चिंत होते. पण यात्रेत आल्यावर माझ्या या विश्वासाला जोरदार तडा गेला.

बिगरसरकारी संस्था मागतात यात्रा कर

अगदी पहिला धक्का होता तो यात्रेत प्रवेश करताना. कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसमधून यल्लमावाडीत पोचले. त्याच्या थोडं अलिकडेच एक 'कृत्रिम' टोल प्लाझा उभारला होता. त्या प्लाझावर गाडीतल्या प्रत्येकाच्या नावाने यात्रेचा कर जबरदस्ती वसूल करण्यात येत होता. प्रत्येकी पाच रुपये दिल्यशिवाय गाडी सोडणार नाही असं मावा चघळत चढलेले विशी किंवा त्या आतले दोन तरुण सांगत होते.

एका बसमध्ये किमान ३० प्रवासी होते. त्या तरुणांना हा यात्रेचा टोल यात्रेकरुंकडून वसूल करायचा होता. पण ते सरसकट धमकी देत होते तो कर भरण्यासाठी. काही प्रवाशांनी याला विरोध केला. काही प्रवासी वैतागून त्यांना चटकन पैसे देत होते. ड्रायवरने त्यांच्या भाषेत या मुलांना चिडून काहीतरी सांगितलं आणि ते दोघे बसमधून उतरून गेले. हा कर सरकार गोळा करत होतं की मंदिर समिती हे कळण्याला मार्ग नव्हता. कारण दिलेल्या त्या कर पावतीवरची भाषा वाचता येत नव्हती. तसंच मुलांच्या वागण्यावरुन नक्कीच ते सरकारसाठी पैसा गोळा करत असावेत असं वाटलं नाही.

मोकळ्या माळरानावर डोक्यावर छप्पर करुन राहणारी माणसं कुटुंबाने, गटागटाने राहत होती. चुलीवर जेवण शिजवत होती. आत जिथे तिथे माणसंच माणसं दिसत होती. ग्रुप ग्रुपने राहणारी. मराठी फार माहीत नसलेली. हिंदी तोडकं मोडकं येणारी ही माणसं. एका ताडपत्रीच्या तुकड्याखाली बसून खात होती, गप्पा मारत होती, झोपली होती.

हेही वाचा: यल्लम्माची यात्रा हे जोगतिणींचं, तृतीयपंथीयांचं माहेरघरच

बायकांच्या बाथरूमबाहेर पुरुषांची गर्दी

किमान पाच ते सात लाख पब्लिक तिथं होतं. अगदी आजोबा-आजींपासून सगळेच लोक तिथे आजही पूर्वीसारखेच राहतात. माळरानावर. आसपास हॉटेल नसल्याचा हा फायदा. पण याचा तोटा किंवा त्रास संडासला जाताना जास्त जाणवतो. उघड्या माळरानावर संडास करताना सहज नजरेला पडतं. तंबूच्या आसपास बायका लघवी करतात. रात्रीच्या वेळी काळोखाचा आसरा असतो. तरी त्यातही उघड्या रस्त्यावर संडासासाठी रिकामी जागा नसते आणि बॅटऱ्या मारत फिरणाऱ्या पुरुषांपासून लपून काही सेकंदात काम आटपावं लागतं.

या तीन दिवसांच्या यात्राकाळात एकही फिरता संडास न दिसणं हे त्रासाचं वाटतं. माळरानाच्या आसपास असलेल्या रस्त्यावरही कडेला रांगेत संडासाची रांगोळी पहायला मिळते. सकाळी त्यावर दुर्गंधी रोखण्यासाठी मारलेली ब्लिचिंग पावडर हा सरकारी व्यवस्थापनाचा भाग आहे, याचा धक्का बसतो. सकाळी आंघोळीसाठी केलेली सोय म्हणजे चारही बाजूला कापड बांधून केलेली न्हाणीघरं. त्याच्या बाजूलाच खड्यात आग करुन त्यावर ठेवलेलं लोखंडी पिंप. १० रुपयाला एक गरम पाण्याची बादली दिली जाते.

आंघोळ पहाटेच करावी लागते. जरा उशीर गेलं तर आंघोळ करणाऱ्या बायकांना पाहण्यासाठी पुरूष दारावर उभे आहेत, असं चित्र दिसतं. एके ठिकाणी पाण्याचा कुंड होता. पुरुष आणि लहान मुलं पाण्यात तिथे पाण्यात डुंबत होती. महिला आणि मुली मात्र तिथेच लावलेल्या उघड्या शॉवरखाली अंग भिजवत होती. अशाच ओल्या अंगाने जमिनीवर लोळत घेऊन प्रदक्षिणा घालणाऱ्या बायकही होत्या.

आजारी पडणाऱ्या माणसांचा आकडा कसा मोजायचा?

ही गैरसोय टाळायची असेल तर एकच उपाय. यात्रेच्या आसपासच्या घरात भाड्याने राहणे. घर भरलं की दरवाजातली जागाही तिथले लोक भाड्याने देतात. साधारण ५०० ते ६००० रुपये असं भाडं आकारलं जातं. कुठलीही सुविधा नाही. फक्त डोक्यावर छप्पर आणि बाजूला चार भिंती एवढचं काय ते त्या रुमचं सुख.

आम्ही टॉयलेटसाठी १०, बाथरुमसाठी ५ आणि गरम पाण्याच्या बादलीसाठी २० रुपये भरले. गंमत म्हणजे शॉवरने जिथे अंघोळीची सोय आहे. तशी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शेतातल्या पाईपाचं पाणी लोक भरतात. भांडी धुण्यासाठी तर जेवणाचं पाणी विकत घेतात. १० रुपये हंडा दराने. या यात्रेतून परत गेलेल्या किती जणांवर आजारी पडण्याची वेळ येत असेल हे कळणं अवघडच आहे.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

खरोखरच मृत्यू दाखवणारा ‘मौत का कुआ’

यात्रेत अम्युजमेंट पार्क होतं. पाळणे, ‘मौत का कुआ’ असं काही बाही होतं. सगळीकडे जाता आलं नाही. पण ‘मौत का कुआ’ आवर्जून बघितला. त्या ‘मौत का कुआ’साठी वापरलेला सांगा़डाच इतका खिळखिळा होता की वरच्या लोखंडी बाल्कनीत उभे असलेले सर्वजण उभ्या उभ्या हादरे खात होते.

मोटार सायकल आणि कारवाला तर त्या अनेक ठिकाणी तुटलेल्या सांगाड्यावर गाडी चालवून जीव धोक्यात घालत होता.  ‘मौत का कुआ’ दिल्लीवरुन आला होता. चार पाच वर्षांपूर्वी त्याच्या मालकानं १४ लाखाला मौत का कुआचा सेकेंडहॅण्ड सेट विकत घेतलेला.

मौत का कुआत गाडी चालवणारे लोक तर रिस्क घेतात. पण तो खेळ पहायला जाणाऱ्या लोकांच्या जिवालाही धोका होता. सरकारी यंत्रणा याकडेही कानाडोळा करतेय याचं आश्चर्य वाटलं.

आरोग्यासाठी सरकारी अम्ब्युलन्स, आपत्कालीन परिस्थितीत मदतीला म्हणून फायर ब्रिगेड असं काही काही या यात्रेत किंवा आसपास नव्हतं. देवदासी सोडणे, बळी देणे यावर असलेल्या बंदीचे बोर्ड लागलेले दिसतात. साखळी चोरांपासून सावधान राहण्यासाठी सांगणारे बोर्ड लावलेले असतात. पण त्या व्यतिरिक्त सरकारी हस्तक्षेप म्हणजे अधे मधे उभे असलेले पोलिस आणि रस्त्यावर थांबलेल्या पोलिस वॅन. बस इतकंच!

म्हणून सरकारला लक्ष देण्याची गरज वाटत नाही

इथला सर्व कारभार मंदिर समितीच्या ताब्यात असतो. पण सुविधा देण्यापेक्षा यात्रेत येणाऱ्या  माणसांकडून या तीन दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणं हाच मंदिर समिती आणि पुजाऱ्यांचा हेतू असतो, हे स्पष्ट आहे. पुजारी लोक त्याच बोलीवर घर भाड्याने द्यायला, जागा वापरायला परवानगी देतात. गावातली माणसं या भाड्याच्या खेळावर जो धंदा करतात तो वर्षभरात होत नाही. तीन दिवसांत इथे मोठी आर्थिक उलाढाल असते. अगदी ग्रामीण जत्रेचा अनुभव घेता येतो. मात्र सगळा कारभार यल्लमा भरोसे असतो.

बहुतांश खेडेगावातले लोक या यात्रेला येतात. या सगळ्या खेडेगावात शौचाला जाणं म्हणजे प्लास्टिकचे तांबे घेऊन शेतात जायचं एवढंच माहिती असतं. संडास बिंडास प्रकार नाहीच. तीच गोष्ट इथंही पाळली जाते. संध्याकाळच्या वेळात गाडीतून बाहेर रस्त्यावर फिरताना असे प्लास्टिकचे तांबे घेऊन फिरणारे पुरुष आणि स्त्रिया दिसतात.

इथले पुरुष हे दारू पिणारे आणि शेतात राबून महिला कुटुंब चालवणाऱ्या असतात. यल्लम्माला मानणारा समाज हा बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातला वर्ग आहे. ज्याच्या गरजांकडे लक्ष देण्याची गरज सरकारला वाटत नाही. सरकारने मंदिर समितीच्या हद्दीत जास्त हस्तक्षेप करू नये हेही कर्नाटक सरकारच्या या व्यवस्थपानाच्या उदासीनतेचं कारण असू शकेल. फक्त देवदासी सोडणे, पशू बळी यांवर लक्ष द्यावं आणि तो हेतू साध्य करण्यासाठी सरकारही हे सूत्र पाळत असेल. 

हेही वाचा: 

सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना 

तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारी नज्म हिंदूविरोधी का ठरवली जातेय?