८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.
आपण ७, ८ वर्षांचे असताना काय करतो? काही आठवतंय तुम्हाला? एव्हाना आपली इवलीशी पावलं शाळेकडे वळलेली असतात. बालवाडीनंतरची ही पहिली दोन, तीन वर्ष. आपण दुसरी, तिसरीत असू. नकळतं वय असतं. काही मुलं शाळेच्या वातावरणात मिसळून जातात. तर काहींना शाळा म्हटलं की, त्यांचा चेहरा रडवेला होतो. शाळेत न जाण्यासाठी म्हणून वेगवेगळी नाटकं केली जातात. किती काय घडत असतं या वयात.
काही मुलांसाठी शाळा हा या नकळत्या वयातही खूप हळवा कोपरा असतो. नव्या मित्र-मैत्रिणी जोडणं, शिक्षकांशी गट्टी. शाळेतल्या खोड्या, मारामाऱ्या, घरी येऊन एकमेकांच्या चुगल्या लावणं, मनसोक्त खेळणं असंही बरंच काही घडत असतं. काहींना शाळेचा प्रत्येक दिवस हवाहवासा वाटतो. काही मुलांना प्रत्येक दिवसाची उत्सुकता असते. कधी एकदा दिवस उजाडतो आणि आपण शाळेत पाऊल ठेवतो असं झालेलं असतं.
या खेळण्या, बागडण्याच्या वयात ब्राझीलमधली निकोल ऑलिविरा ही ८ वर्षांची मुलगी एका वेगळ्याच जगात दंग झालीय. हे वेगळं जग आहे अवकाश संशोधनाचं, ग्रह, ताऱ्यांचं. वयाच्या चौथ्या वर्षी तिला एका वेगळ्या जगाविषयी कुतूहल निर्माण झालं. वयाच्या ८ व्या वर्षी थेट नासा या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेसोबत तिने काम करणं हे तिच्याबद्दलचं कुतूहल वाढवणारं आहे.
हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान
अवकाशातल्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला ओढ लागलेली असते. ते जग नेमकं कसंय, तिथले तारे, ग्रह, धूमकेतू हे केवळ आपण पुस्तकात पाहिलेलं, वाचलेलं असतं. त्या त्या इयत्तेपुरतं ते मर्यादित राहतं. त्यापलीकडे या जगाविषयीची माहिती आपल्याकडे नसते. ना फार जास्त ती शाळेत दिली जाते. नासासारख्या संस्थांची नावं तर आपण पुस्तकांच्या पानांमधेच वाचतो.
काही मुलं मात्र त्यापलीकडे जात हे अनोखं, अद्भुत जग समजून घेतात. त्या जगापर्यंत पोचतात. निकोल ही अशा मोजक्या मुलांमधे मोडते. या काळात आईवडलांची भूमिका बरंच काम करत असते. निकोलचे वडील जीन कार्लो हे संगणक शास्त्रज्ञ तर आई झिल्मा या एका हस्तकला उद्योगात काम करते. लहानपणापासूनच तिला आकाशातल्या ताऱ्यांचं आकर्षण असल्याचं झिल्मा यांनी 'एजंसे फ्रांस प्रेसे' एएफपी या आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीला सांगितलंय.
चार वर्षांची असताना निकोलनं बर्थडेला दुर्बीण गिफ्ट म्हणून मागितली होती. दुर्बीण म्हणजे काय हे आपल्याला त्यावेळी माहितही नसल्याचं तिच्या आईने म्हटलंय. त्यावेळी आपल्याला पुढच्या बर्थडेला काहीच नको यावेळी फक्त दुर्बीण द्या असा तगादा तिने आई-वडलांकडे लावला. दुर्बीण खूप महाग असल्यामुळे घेणं परवडणारं नव्हतं. पुढे ३ वर्षांनी थोडे थोडे पैसे जमा करून तिच्या आई-वडलांनी तिला ते गिफ्ट घेऊन दिलं.
लहानपणी निकोल आकाशाकडे बघून आपल्या आईला एक तारा मला हवाय असं सारखी म्हणायची. या तिच्यातल्या अवकाश संशोधनातल्या शोधक वृत्तीने तिला एका प्रतिष्ठित शाळेची स्कॉलरशिप मिळवून दिली. तिचं मूळ गाव ब्राझीलमधलं मासेयो. पण स्कॉलरशिपमुळे या वर्षाच्या सुरवातीला हे कुटुंब मूळ गावापासून १ हजार किलोमीटरवर असलेल्या ईशान्येकडच्या फोर्टालेझा शहरात स्थायिक झालं. निकोलसाठी तिच्या वडलांनी घरून काम करणं पसंत केलं.
एका खगोलशास्त्र अभ्यासक्रमाला निकोलला प्रवेश घेता यावा म्हणून त्या कोर्सची वयोमर्यादाही कमी करण्यात आल्याचं Phys.org या इंग्लंडमधल्या विज्ञानविषयक साईटने म्हटलंय. तिची रूम पूर्णपणे रॉकेटची छोटी-छोटी मॉडेल, सौरमंडलाचे फोटो, कॅमेरा, अवकाश संशोधनासंदर्भातले फोटो यांनी गच्च भरून गेलीय. ती संशोधनाचं सगळं काम तिच्या कम्प्युटरवरून करते. तोच तिचा दोस्त.
निकोलचं ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न आहे. 'आपल्याला फ्लोरिडा इथल्या नासातल्या केनेडी स्पेस सेंटरमधे जायचंय. एक रॉकेट बनवायचंय.' असं 'एजंसे फ्रांस प्रेसे' या एजन्सीला तिने सांगितलंय. तिचं स्वतःचं युट्यूब चॅनेलही आहे.
हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
कम्प्युटरवरून अवकाशातल्या प्रतिमांचा ती अभ्यास करतेय. 'ऍस्टेरॉइड हंटर' असं तिच्या संशोधनविषयक प्रोजेक्टचं नाव आहे. लहान मुलं आणि तरुणांमधे विज्ञानाची गोडी वाढावी त्यांना विज्ञानाशी जोडून घेता यावं, अवकाश संशोधनाची संधी मिळावी हाच उद्देश या प्रोजेक्टमागे आहे.
'इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिक सर्च कोलॅबरेशन' हा नासाचा एक वैज्ञानिक कार्यक्रम आहे. लघुग्रहांचा शोध हा या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. त्याच अंतर्गत 'ऍस्टेरॉइड हंटर' या प्रोजेक्टची रचना करण्यात आलीय. ब्राझील सरकारचं विज्ञान खातंही या प्रोजेक्टशी जोडलं गेलंय.
इथं जोडल्यावर निकोलनं १८ लघुग्रहांचा शोध लावला. हे रेकॉर्ड आतापर्यंत इटलीच्या १८ वर्षीय लुईगी सॅनिनोच्या नावावर होतं. निकोलने लावलेल्या लघुग्रहांच्या शोधावर अद्याप बरंच काम होणं बाकी आहे. हा शोध सिद्ध होण्यासाठी बरीच वर्ष जातील. पण या ग्रहांना मात्र तिला आपले आईवडील आणि ब्राझीलमधल्या शास्त्रज्ञांची नावं द्यायचीत.
फोर्टालेझा इथल्या शाळेतले खगोलशास्त्राचे शिक्षक हेलिओमार्जिओ रोड्रिग मोरेरा 'एजंसे फ्रांस प्रेसे'ला सांगतात की, 'ती खूप हुशार आहे. सगळं काही ती ओळखते. चित्रांमधले लघुग्रहांचे ठिपके ती क्षणार्धात ओळखू शकते.'
निकोल 'अलागावोस ऍस्ट्रोनॉमिकल स्टडीज सेंटर, सेन्ट्रो डी ऍस्टुडोस ऍस्ट्रोनॉमिको डी अलागावोस' अर्थात सीईएएएल या ब्राझीलमधल्या खगोलशास्त्रज्ञांच्या संस्थेची सगळ्यात तरुण सदस्य आहे. त्यामुळेच तिला जून २०२१ ला ब्राझीलच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोवेशनच्या खगोलशास्त्र आणि वैमानिक विषयावरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमधे बोलण्याची संधी मिळाली. तसंच तिच्या मूळ गावीही तिला व्याख्यानं देण्यासाठी बोलावलं जात असल्याचं ब्राझील न्यूज एजन्सी आर ७ नं म्हटलंय.
इतक्या चिमुकल्या वयात निकोल खगोलशास्त्रातल्या वेगवेगळ्या तज्ञांशी संवाद साधतेय. तिने गेल्यावर्षी ब्राझीलमधले पहिले अंतराळवीर मार्कोस पोटेंस यांची भेट घेतली होती. आपल्या युट्यूब चॅनेलवरून तिने ब्राझीलमधले सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ड्युलिया डी मेलो यांचीही मुलाखत घेतली होती. खगोलशास्त्रातल्या तज्ञांशी संवाद साधणं, आपल्या मित्रांना लघुग्रह, अंतराळाविषयी माहिती देणं हा तिच्या युट्यूब चॅनेलचा महत्वाचा उद्देश आहे.
निकोलची स्वप्न खूप मोठी आहेत. आणि त्यामागचे तिचे प्रयत्नही. ती केवळ स्वतःचा विचार करत नाहीय तर आपल्या इतर मित्र-मैत्रिणींनाही यात गोडी निर्माण व्हावी म्हणून ती प्रयत्नशील आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अवकाशातल्या ताऱ्याबद्दल तिला वाटलेलं कुतूहल आपल्या मुलीला इथपर्यंत पोचवेल याचा अंदाज तिच्या आई-वडलांनाही आला नसेल. इथंच ती थांबणार नाही तर निकोलला लहान मुलांसोबत तरुण, मोठी माणसं यांच्यामधेही विज्ञानाची गोडी निर्माण करायचीय.
हेही वाचा:
ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन
चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता