पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?

२७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे.

देशाचा कारभार कोण करणार हे ठरवणारे लोकसभा निवडणुकीचे टप्पे आता येत्या २५ दिवसांत होतील. आतापर्यंत तीन टप्प्यांचं मतदान झालंय. यात ५४३ पैकी ३०२ जागांवरची मतदान प्रक्रिया पूर्ण झालीय. उरलेल्या अडीचेकशे जागांवर शेवटच्या चार टप्प्यांत मतदान होतंय. पण आता हेच टप्पे खूप महत्त्वाचे होऊन बसलेत.

हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

भाजपसाठी कठीण जागा संपल्या

भाजपसाठी कठीण असलेल्या दक्षिण भारतातल्या सगळ्यांच राज्यातल्या मतदानाची प्रक्रिया आता पार पडलीय. नॉर्थ ईस्टमधलं मतदानही झालंय. गेल्यावेळी भाजपला हात दिलेल्या हिंदी भाषिक पट्ट्यांतलं मतदान खऱ्या अर्थाने सुरू होतंय. पहिल्या तीन टप्प्यांत तीनशे जागांवर मतदान झालं असलं तरी केंद्रात सत्तेत येण्यासाठी अडीचशे जागांच्या या चार टप्प्यांना खूप महत्त्व आहे. या टप्प्यांमधेच गेल्यावेळी भाजपला मिळालेल्या २८२ पैकी १७० जागांवर निवडणूक होतेय.

येत्या काळात उत्तर प्रदेशातल्या ५४, पश्चिम बंगाल ३२, मध्य प्रदेश २९, बिहार २६, राजस्थान २५, महाराष्ट्र १७, झारखंड १४, पंजाब १३, हरयाणा १०, दिल्ली ७, ओडिशा ६, हिमाचल प्रदेश ४, चंदीगड आणि जम्मू काश्मीर प्रत्येकी एक अशा जवळपास २४१ जागांवर मतदान होणार आहे.

तामिळनाडू आणि त्रिपुरातल्या प्रत्येकी एका जागेवरचं पुढं ढकलण्यात आलेलं मतदानही आता होणार आहे. सध्या यापैकी १७४ जागा एनडीएकडे आहेत. दुसरीकडे या टप्प्यांमधे विरोधी गोटातल्या तृणमूल काँग्रेसला ३०, काँग्रेस ९, बिजू जनता दल ६, आम आदमी पार्टी ४ यांच्यासह १६ जागांवर इतर पक्षांना विजय मिळाला होता.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

काँग्रेसकडे गमावण्यासारखं काही नाही

गेल्यावेळी एकट्या भाजपने २८२ जागांवर विजय मिळवत एकहाती बहुमत मिळवलं. यापैकी १२१ मतदारसंघातलं मतदान आतापर्यंत झालंय. आता १६१ जागांवर मतदान राहिलंय. दुसरीकडे काँग्रेसने जिंकलेल्या ४४ जागांपैकी ३५ जागांवरचं मतदान पार पडलंय. फक्त ९ जागांवरचं मतदान शिल्लक आहे.

मतदान होणाऱ्या आणि भाजपकडे असलेल्या महत्त्वाच्या जागांमधे यूपीतल्या ४८, एमपी २७, राजस्थान २५, बिहार १८, झारखंड १२, महाराष्ट्र ८, हरियाणा ७ आणि दिल्लीतल्या ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे खासदार असलेल्या ९ जागांवरही मतदान होतंय.

सत्ताधारी आणि विरोधकांकडे असलेल्या जागांचं विश्लेषण केल्यास काही गोष्टी स्पष्ट होता. २०१४ मधे जिंकलेल्या या जागा कायम राखण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान आहे. कारण तृणमुल काँग्रेस वगळता विरोधकांकडे गमावण्यासारखं विशेष काही नाही. जे काही गमवावं लागणार आहे ते भाजपलाच. पण भाजपला सत्तेतून हटवायचं असेल तर हे टप्पे काँग्रेस आणि विरोधी पक्षांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत.

हेही वाचाः प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?

पण विरोधकांसाठीही हेच टप्पे महत्त्वाचे

गेल्या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधे भाजपच्या हातून सत्ता गेली. याआधी पंजाबमधेही काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. या सत्तांतराने भाजपला धोका निर्माण झालाय. कारण या राज्यांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला होता. छत्तीसगड वगळता यापैकी तीन राज्यांमधलं मतदान शिल्लक आहे.

या सगळ्यांमधे भाजपच्या जीवाला घोर लावणारी एका बातमी आलीय. क्विंट हिंदीवरच्या स्टोरीनुसार, चौथ्या टप्प्यात यूपीतल्या १३ जागांवर मतदान होतंय. यापैकी १२ जागा सध्या भाजपकडे आहेत. पण आता या सगळ्या जागांवर सपा, बसपाच्या महागठबंधनमुळे भाजपसाठी खूप अडचणी तयार झाल्यात. काही ठिकाणी काँग्रेसनेही आव्हान दिलंय.

या जागांवर गेल्यावेळी वेगवेगळं लढलेल्या सपा, बसपाच्या मतांची गोळाबेरीज भाजपची झोप उडवणारी आहे. कारण १३ पैकी सात जागांवर महागठबंधनच्या मतांची बेरीज ही भाजपपेक्षा जास्त होते. महागठबंधनची ही मतं यंदा एकमेकांकडे ट्रान्सफर झाली तर तिथे भाजपचा सहज पराभव होऊ शकतो. आणि ही मतं गेल्यावेळच्या मोदीलाटेतली आहेत. म्हणजेच ते दोन्ही पक्षांचे कमिटेड वोटर आहेत, असं मानायला वाव आहे. त्यामुळे ती एकमेकांकडे सहज ट्रान्सफर होऊ शकतात.

हेही वाचाः वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

निवडणुकीतला आतापर्यंतचा ट्रेंड भाजपविरोधी?

निवडणूक सर्वेक्षण करणारी प्रसिद्ध संस्था सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी दोन लेख लिहिलेत. द एशियन एज या इंग्रजी दैनिकात त्यांनी आतापर्यंतच्या दोन टप्प्यातल्या मतदानाचा अंदाज मांडलाय. एकूण मतदानाचा ट्रेंड कसा आहे, ते सांगितलंय.

पहिल्या टप्प्यात यूपीमधे आठ जागांवर मतदान झालं. या सगळ्या जागा सध्या भाजपकडे आहेत. आता त्यापैकी केवळ दोन जागांवरच भाजपसाठी जिंकण्याच्या शक्यता आहेत. उरलेल्या सहा जागांवर भाजपला खूप अडचणींचा सामना करावा लागला, असं संजय कुमार यांनी आपल्या लेखात म्हटलंय. मतदानाचा ट्रेंड लक्षात घेतल्यास ८० जागा असलेल्या यूपीत भाजपला आता २० ते २५ सीटवरच समाधान मानावं लागेल.

महाराष्ट्रात शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यात शिवसेना, भाजपच्या बालेकिल्ल्यात मतदान होतंय. गेल्या वेळी सगळ्या १७ जागा या दोन्ही पक्षांनी जिंकल्या होत्या. यात मुंबई, ठाणे पट्ट्यातल्या १० जागाही आहेत. त्या पुन्हा मिळवण्याचा मोठं आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झालंय. या जागा युतीच्या हातून गेल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा सत्ताधारी भाजप, शिवसेनाला खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपल्या भात्यातली सगळी अस्त्रं बाहेर काढलीत.

हेही वाचाः 

बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

यंदाच्या मतदानामधे मुस्लिमांची भूमिका कळीची, कारण

५ वर्षांत ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाचा आज वाढदिवस