उगवत्या वर्षात नुसतं न्यू नॉर्मल नको, ‘न्यू निर्भय’ही हवं!

३० डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार. 

कुठंतरी दूर चीनमधल्या वुहान या चमत्कारिक नावाच्या गावात एक चमत्कारिक वायरस धुमाकूळ घालतोय, अशा बातम्या या वर्षाच्या सुरवातीला आपण वाचल्या. हा वायरस तेव्हा बघता बघता आपल्या घरादारात येईल असं वाटलं नव्हतं. पण तो आला. अनेकांना जखमी करून गेला. अनेकांना सोबत घेऊन कुठं अदृश्यात विलीन करून गेला. अनेकांची पोटं उपाशीपोटी खंगली. अनेकांचा पैसा गेला. सुख समाधान गेलं.

लॉकडाऊन नावाचा कधी न ऐकलेला, कल्पनाही न केलेला प्रकार सगळ्यांनी अनुभवला. नंतर आलेली मोकळीक आपण बघतोय. तरी अजून अनेक गोंधळ आहेत आणि वायरस काही निघून गेलेला नाही. तो आहेच. ‘न्यू नॉर्मल’मधे काहीच नॉर्मल राहिलं नाही. घरात इतका काळ एकमेकांचं तोंड बघायची सवय नसलेले नवरा-बायको करवादू लागले. सुखवस्तू घरातली पोरंबाळं दिवसरात्र पिक्चर बघू लागली, तरी वेळ संपेना.

एक जोक फिरत होता तेव्हा, 'बाळा, काय केलंस आज?' छोट्याश्या मुलीला आई विचारते. ती सोफ्यावर बसल्याबसल्या जांभई देत म्हणते, 'I finished Netflix today' मी आज अख्खच्या अख्ख नेटफ्लिक्स बघून संपवलं. अजून बरेच जोक तेव्हा फिरायला लागले होते आणि ते बघून मला चांगलं वाटायचं कारण विनोदनिर्मिती तत्कालीन परिस्थितीवरचा मानवजातीचा प्रगल्भ असा रिस्पॉन्स होता. 

सगळंच वाईट झालं नाही

हरारीसारखे विचारवंत जी नकारात्मक सुरावट आळवत होते, त्यात तर्कशक्ती होती; पण मानवी मनाच्या लवचिकतेची पुरेशी जाण त्यात नव्हती. माणसं बदलली, त्यांनी त्यांच्या परीने नवे आनंद शोधले, समाजात प्रत्यक्ष भेटता आलं नाही तर नवे झूम मीटिंगचे रस्ते शोधले. माणूस जात अगदी हलकट आहे, असं अनेकदा पर्यावरणप्रेमी म्हणतात. असेलही. पण मानवी प्रज्ञेइतकं सर्जक, लवचिक असं दुसरं क्वचित काही असेल! 

त्या काळातला एक जोक मला फार आवडला होता. तो जोक इंग्रजी होता. पण मी जरा त्याचं मराठीकरण करतो. तंबाखूची चिलीम भरत चेन्ड्या वाट्सअप वीडियोच्या पडद्यावर दिसणार्यार बंड्याला म्हणाला, 'लेका, इनोद ऐक. या वायरसचा हा नवा ज्योक!' बंड्या एक मिनिट थांबला, दोन मिनिटं थांबला, काहीच चेन्ड्या बोलला नाही. शेवटी बंड्याने अस्सल शिवी हाणली तेव्हा चेन्ड्या म्हणाला, 'आरं, तुला ज्योक दोन आठवड्याने कळणार - करोना वायरसचा इनोद हाय नव्ह?'

बाकी या काळात सगळं वाईटच झालं, असं नाही.  घरात अनेक गोष्टी नव्याने उमगल्या. आपले कोण आणि परके कोण, याचाही विचार शांतपणे केला गेला. हॉटेलिंगची चटक सगळ्यांना लागली ती आपोआप बंद झाली. काहींची वजनं वाढली; पण अनेकांनी उलट जाणीवपूर्वक आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरवात केली. घरी व्यायाम केले. हळूहळू चालायला माणसं बाहेर पडली.

हेही वाचा : लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

स्पर्श किती महत्त्वाचा असतो?

लॉकडाऊन संपल्या संपल्या मी एकदा रात्री पुण्यातल्या शांत रस्त्यावर चालायला गेलो होतो. अजिबात लोक नव्हते. एकटा चालत राहिलो. भीती वाटली नाही. उलट शांत, अतिशांत वाटलं. का कुणास ठाऊक, ज्ञानोबा माऊलींच्या ओवी मागे आठवत राहिल्या. 

तियापारी श्रोता अनुभवावी ही कथा
अति हळुवारपण  चित्ता आणुनिया ॥

त्याच दिवशी दुपारी हॉस्पिटलमधून माझी ओपीडी संपवून बाहेर पडताना बाहेर नातेवाईकांचा एकच कल्लोळ ऐकला होता. वीसेक वर्षांचा मुलगा आणि त्याचे भावकीतले लोक असतील. त्या मुलाची आई अचानक कोरोनामुळे गेली होती.

माणूस गेला तरी शेवटीही स्पर्श होतात. मृतदेहाच्या गळ्यात माणसं पडून रडतात. पायाला हात लावून वंदन करतात. इथं काहीच नाही. एक पांढरीशुभ्र पीपीई आणि नखही न दिसणारं त्याच्यातलं शरीर. गेली ती अॅहम्ब्युलन्स पुढे. त्या रात्री चालताना ते दृश्य पुन्हा आठवलं. पण माऊली मागे होते धीर द्यायला. एकदम जाणवलं, की स्पर्श किती महत्त्वाचा असतो. आणि या वर्षात लोकांनी सगळ्यात जास्त काय मिस केलं, अजून काय करत आहेत, तर तो प्रेमाच्या माणसाचा स्पर्श. अजून लोक परदेशी आहेत अडकलेले. ना प्रेमाचं चुंबन, ना मैत्रीत पाठीवर टाकलेली थाप, ना मिठीत घेऊन केलेलं सांत्वन!

प्रगल्भता न दाखवल्यामुळेच संकट

आमचा मित्र चेतन कोळी. चांगला संपादक आहे एका प्रकाशनगृहाचा. त्याने लिहिलेला मेसेज आठवला : आशु, कोरोना माझ्या घरात आला आणि श्वास अडखळले. माझ्या आईला डबल न्यूमोनिया झालेला. पण खूप शिकलोही या काळात. वर्तमानाच्या प्रत्येक क्षणाचं, आयुष्याचं, सृहृदयांच्या निरपेक्ष मैत्रीचं मोल. या कोरोनानं मला अल्पविराम घ्यायला शिकवलं, जगण्याकडे बघण्याचा निरपेक्ष दृष्टिकोन दिला. चेतनला जशी ही प्रगल्भता संकटात गवसली, तशी आपल्यापैकी अनेकांना मिळाली आणि ही या काळात ही एक फार महत्त्वाची गोष्ट झाली.

अर्थात, ही प्रगल्भता सगळ्यांना मिळाली नाही, हे उघडच आहे. गणपतीच्या काळात सगळे लोक एकमेकांच्या घरी फिरत बसले. अर्थात मास्क काढून आणि मग पुन्हा सगळीकडे काऊंट वाढलाच. आताही लस आलेली असली तरी अजूनही लोक बेफिकीर राहिले, तर पुन्हा मोठी लाट येऊच शकते. इंग्लंडमधे तर वायरसने आपलं रूप बदलून नवा इंगा दाखवलाय. मुळात मानवजातीने ही प्रगल्भता न दाखवल्यामुळेच हे संकट आलेलं आहे. 

हेही वाचा : २०२१ : कल, आज और कल

गरज संयम आणि सुजाणपणाची

आयुर्वेदात प्रज्ञापराध नावाची फार सुंदर संकल्पना आहे. प्रज्ञेचा अपराध! कळत असतं की पाच गुलाबजाम खाऊ नयेत, दोनच खावेत, पण खाल्ले जातात. तोच प्रज्ञापराध व्यापक सामाजिक, व्यावसायिक, राजकीय, आर्थिक स्तरांवर झाला. त्याला निसर्गाने दिलेलं हे एक उत्तर असू शकतं. काही म्हणतात की चीनने हे तयार केलेलं बायोवेपन आहे. पण तरी तो प्रज्ञापराधच फक्त वेगळ्या जातकुळीचा. आपल्या भारतीयांची थोडी इम्युनिटी जास्त असावी, काही लोक म्हणतात तसं. पण अति ताणलं तर तुटतं, हा धोका सगळ्यांनी ध्यानात घ्यायला हवा!

या उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. कदाचित लस यायला उशीर होईल. कदाचित वेगळंच काही अरिष्ट येईल. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची एक वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.

शेवटी वायरसचेही आभारच

बराच काळ घरात अडकलो होतो. जरा मोकळं व्हायला लागलो तसा मी आणि माझा सिद्धार्थ हा मित्र आम्ही गाडी काढून एक दिवस शहराबाहेर पडलो. मोकळ्या शेतांवर मास्क न घालता स्वच्छ हवा आत घेत राहिलो. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, समोर वाहत जाणार्याह नदीचा नाद ऐकत शेजारी शेजारी उभं राहत निसर्गाची क्षितिजावरची लोभस केशरी किमया शांतपणे बघत राहिलो. ज्ञानदेवांची ती ओवी पुन्हा आठवली.

आपल्या आणि आपल्या आसपासच्या लोकांची जगण्याची बृहद्कथा आपण नेहमीच्या घाईगडबडीत कुठे ऐकत असतो! ‘अनुभवावी ही कथा अति हळुवारपण चित्ता आणुनिया.’ मधल्या ‘कथे’चे अनेक अर्थ मग जिवलगाच्या सोबतीत तेव्हा दिसत राहिले. त्या वायरसचेही आभारच मानले, हे धडे शिकवल्याबद्दल! आणि शांत मनाने परतलो आम्ही. नव्या वर्षात नव्या आशेने प्रवेश करताना सगळं आयुष्य सुरळीत व्हावं असं मनोमन वाटतच नाही आता! वाटतं, की अनारोग्य जावं, माणसानं प्रज्ञापराध करू नयेत; पण जरा गती संथ राहावी व्यवहाराची. 

निबर झालेल्या माणसाने पुन्हा एकदा लहान मुलासारखं स्वच्छ उन्हात उभं रहावं. मग नव्या वर्षाच्या किरणांनी बाप बनत आणि या पायाखालच्या भक्कम भूमीने आईचा आधार देत माणसाला आशीर्वाद द्यावेत! ते आकाश-धरेचे आशीर्वाद मागे असले, की कसलाच धोका नाही, कसली चिंता नाही, नुसतं न्यू नॉर्मल नसेल, मग ‘न्यू निर्भय’ असेल!

हेही वाचा : 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?