इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

२४ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं.

जगभर सध्या इस्लाम धर्माची चर्चा होतेय. बरं या चर्चेमागे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दहशतवाद. या दहशतवादाचं मुळ इस्लाममधेच आहे, असं जीभ उचलून टाळ्याला लावणाऱ्या झारीतल्या अनेक शुक्राचार्यांचं मत असतं. आपल्याकडे अर्थात भारतात इस्लामबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. आपल्याला जी माहिती आपल्या शेजारच्या मुस्लिम बांधवांकडून मिळालेली असते, ती किती खरी किती खोटी हे आपण तपासायला जात नाही.

एखादी व्यक्ती मुसलमान आहे म्हणजेच तो त्याच्या धर्मातला सर्वज्ञानी आहे. असं आपण समजून चालतो. पण या समजण्याला फाटा देणारं एक पुस्तक चक्क मराठीतून आलंय. इस्लामच्या धार्मिक रुपाची साध्या सरळ पद्धतीनं माहिती देणारं हे पुस्तक आहे. तेही मराठीत आणि मराठी मातीतल्या लेखकाचं.

साध्या, सरळ भाषेत पुस्तक

‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञात’ हे अब्दुल कादर मुकादम यांचं पुस्तक. अक्षर प्रकाशनने ते काढलंय. इस्लामबद्दलची दुर्मिळ माहिती देणारी जी काही पुस्तकं मराठीत आहेत त्यापैकी हे एक म्हणावं लागेल. कोणताही धर्म, त्याची पुरातन भाषा समजावून घेणं, नाही म्हटलं तरी तसं अवघड. तरीही अशा किचकट गोष्टी प्रत्येक धर्मग्रंथ अभ्यासताना येतातच. मात्रं हे पुस्तक त्याला अपवाद ठरतं.

अरबी, तुर्की आणि इतर इस्लामव्याप्त देशांमधले धर्मगुरू त्यांच्या प्रथा, परंपरा आणि वादग्रस्त मुद्दे लेखकानं सहज आणि सोप्या मराठीत आपल्यापुढे मांडलेत. इतकंच नाही, तर त्यांचं मत किंवा ते या विचारापर्यंत कसं काय पोचले, हे वाचकांना समजावं म्हणून लेखकाने थेट त्यांनीच अभ्यासलेली अनेक पुस्तकं, ग्रंथ आणि इतर सोर्सेसची यादीही दिलीय.

हेही वाचा: रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

इस्लाम खरंच दहशतवादाचं समर्थन करतो?

आपल्या भारतात एक देशभक्तीपर गाणं फेमस आहे. १५ ऑगस्ट आणि २६  जानेवारीला दरवर्षी ते वाजवलं जातंच. ते गाणं म्हणजे ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना.. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’. इस्लाम धर्म हा कोणत्याही दहशतवादाचं समर्थन करत नाही. इतकंच काय इस्लामी राज्यातल्या,  देशातल्या  मुर्तीपुजकांना किंवा इतर धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आणि परंपरा पाळण्याचं स्वातंत्र्य देतो. हे दाखवून देण्यासाठी लेखकानं पैगंबरांचा कुराणातला संदेश काय होता याचा दाखला दिलाय.

अनेक तरुण हे इस्लामचा गैर अर्थ काढत दहशतवादाकडे कसं वळतायत हे लेखकानं कोणतीही भीती न बाळगता सांगितलंय. हे व्हायला नको असेल तर इस्लाम आणि त्याचा अर्थ सर्वस्तरातल्या लोकांना समजणं महत्वाचं आहे. यासाठीचा अट्टाहास म्हणजे हे पुस्तकं असं म्हणता येईल.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

इस्लामी परंपरा, आपले समज आणि गैरसमज

मुसलमान म्हटलं की बुरखा पद्धत, बकरी ईद, पाच वेळची नमाज, एका माणसाला कितीही लग्न करण्याची मुभा, कुटुंब नियोजनाचा अभाव आणि वादग्रस्त तलाक पद्धत इत्यादी इत्यादी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तसंच गेलाबाजार व्याज न घेणं यासारखी काहीशी अव्यवहारी वाटणारी गोष्टं इत्यादी परंपरा आपल्याला माहीत आहेत. मात्र त्या किती बरोबर आहेत? याचा आपण विचार केला नाही. आपण कोणत्या मित्राला यासंदर्भात उत्सुकता म्हणून विचारलं तर त्याचं जुजबी ज्ञान असतं. तो म्हणतो, शरीयतमधे असं लिहिलंय.

शरीयत म्हणजे काय? तर इस्लामी कायदा. हा कायदा कधी अस्तित्त्वात आला, इथपासून शरीयतमधे खरंच महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधन आहेत का? बुरखापद्धतीचा पुरस्कार केला आहे का? महिलांना तलाक देण्याचा अधिकार नाही का? या सर्व गोष्टी हळूहळू या पुस्तकातून स्पष्ट होत जातात. अर्थातच या आणि अशा कोणत्याच गोष्टीचं शरीयत, कुराण आणि हदीस इत्यादी गोष्टींमधे समर्थन आढळत नाही. फक्त महिलांनी अंग व्यवस्थित झाकलं जाईल असा पोषाख करावा असा संदेश आहे. इतकंच नाही इस्लाममधे जाचक अटी येण्याचा काळ, जाचक अटी कोणत्या त्यांचा लोकांनी कसा अज्ञानातून स्विकार केला हेही लेखकानं संदर्भासह लिहिलंय.

हेही वाचा: रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह

पुस्तकात हे असायला हवं होत

इस्लामपुर्व काळात मक्का, मदीना आणि अरबस्थानातील अनेक ठिकाणी देवतांची पुजाअर्चा होत होती. त्या देवीदेवतांची नावं तसंच त्या परंपरा कुठून आल्यात. हेदेखील लेखकानं सांगितलंय. मात्रं या पुस्तकात त्यांनी त्या देवीदेवतांचं वर्णन किंवा फोटो मिळवून दिले असते तर पुस्तक अधिक उठावदार झालं असतं. काळाच्या ओघात ते शक्य नसेलही. पण ऐकीव वर्णन लेखक करू शकला असता. तसंच सुनता किंवा खत्ना पद्धतीबद्दल या पुस्तकात कोणतीही माहिती दिलेली नाही.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर इस्लामी परंपरेतला दरवाजा आणि त्यावर असलेला अर्धचंद्र सोडला तर कोणतंही नक्षीकाम किंवा फोटो नाही. मात्रं, आपल्या सर्वांना अज्ञात असलेल्या इस्लामबद्दल आपले अनेक गैरसमज हे पुस्तक दूर करतं. तसंच इस्लाम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कोणत्याही जुजबी ज्ञान असलेल्या मुसलमानापेक्षा जास्त शिकवतं. आणि इस्लाम आपल्याला अज्ञात नाहीच ही भावना आपल्यामधे अधोरेखित करतं.

पुस्तकाचं नाव: ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञात’

लेखक: अब्दुल कादर मुकादम

प्रकाशक: अक्षर प्रकाशन

किंमतः ३००

पानंः ३००
 

हेही वाचा: 

मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात? 

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका 

बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान