दरबार हॉल: पारतंत्र्यापासून लोकशाहीतल्या स्थित्यंतरापर्यंतचा प्रवास

१० फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


मुंबईच्या राजभवनातला जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीला आल्यामुळे त्या जागेवर नवीन दरबार हॉल उभारण्यात आलाय. उद्या ११ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. राजभवनच्या या दरबार हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती देणारा राज्यपालांचे पीआरओ उमेश काशीकर यांचा लेख.

१९११च्या डिसेंबर महिन्यात इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज पत्नी मेरीसोबत भारत भेटीवर आले होते. इंग्लंड आणि त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक देशांचे सार्वभौम राजे म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भारत भेट होती, त्यामुळे या भेटीला भारतात अनन्यसाधारण असं महत्व होतं.

नवी दिल्लीत जॉर्ज यांच्या उपस्थितीत झालेल्या राज दरबारात  ब्रिटिशांनी राजधानी कलकत्ता इथं हलवून दिल्लीत स्थलांतरित करत असल्याची घोषणा केली होती. पंचम जॉर्ज आणि मेरी यांचं आगमन मुंबईत झालं. तिथूनच त्यांनी दिल्लीकडे प्रस्थान केलं होतं. त्यावेळी जॉर्ज सिडनहॅम क्लार्क हे तत्कालीन मुंबई राज्याचे गवर्नर होते.

पंचम जॉर्ज हे इंग्लंडचे भारत भेटीवर आलेले पहिले-वहिले सर्वोच्च राष्ट्रप्रमुख होते आणि त्यामुळे राजशिष्टाराच्या दृष्टीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. पंचम जॉर्ज हे राजपुत्र, प्रिन्स ऑफ वेल्स असतानाही राजकुमारी मेरीसोबत १९०५ला भारतात आले होते. त्यावेळी ते त्यावेळच्या मुंबई ‘गवर्नमेंट हाऊस’ इथं म्हणजेच आजच्या मलबार हिलच्या राजभवनमधे आल्याची नोंद आहे.

हेही वाचा: शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

पंचम जॉर्जसाठी दरबार हॉल

प्रसिद्ध वास्तू रचनाकार जॉर्ज विटेट यांच्याकडे पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी भव्य प्रवेशद्वार निर्माण करण्याची जबाबदारी आली. ही कदाचित सूचना उशिरा आली असावी. त्यामुळे 'गेटवे ऑफ इंडिया' प्रवेशद्वार वेळेवर पूर्ण होऊ शकलं नाही. त्याठिकाणी तात्पुरतं नवं स्वागतद्वार बांधून स्वागत सोहळा संपन्न झाला.

मलबार हिलच्या गवर्नमेंट हाऊस इथं पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी दरबार हॉल बांधण्यात आला. त्याची वास्तुरचनाही जॉर्ज विटेट यांचीच होती. दरबार हॉल इथं अधून मधून ब्रिटिश गवर्नरचं दरबार झालं असावं, पण निश्चित असा संदर्भ उपलब्ध आहे तो १९३७ला झालेल्या दरबाराचा.

गवर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी आपला कार्यकाळ संपत असताना मुंबईतला शेवटचा दरबार याच दरबार हॉलमधे आयोजित केला होता, अशी नोंद सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या ‘राजभवन्स इन महाराष्ट्र’ या पुस्तकामधे नमूद केलीय.

दरबार हॉलची नामकरणं

काँग्रेसने ब्रिटिश राजसत्तेला अनुकूल ठरेल अश्या कुठल्याही शाही समारंभात सहभागी होऊ नये असा ठराव पास केला. मुंबई इथं १९३७ नंतर दरबार झाले नाहीत. सभागृहाला ‘दरबार हॉल’ हे नाव जे चिकटलं ते आजतागायत कायम आहे.

राजभवनात दरबार हॉलने काही नामांतरंही पाहिली आहेत. १९५६ला श्रीप्रकाश यांनी द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी या हॉलचं नाव 'जलनायक' होतं असा संदर्भ आहे. पुढे जलनायकचं जल सभागृह हे नाव झालं. ते काहीही असलं तरीही ‘दरबार हॉल’ म्हणजे शपथविधीचा हॉल असं जे समीकरण झालं ते आजतागायत कायम आहे.

२००२-२००४ दरम्यान राज्यपाल असलेल्या मोहम्मद फजल यांनी वसाहतवादी आठवणी पुसून टाकण्याचा चंगच बांधला होता. त्यावेळी त्यांनी दरबार हॉलचं नामकरण कॉन्फरन्स हॉल असं केलं. पण त्यांचा कार्यकाळ संपल्यावर हॉलने पुन्हा आपलं पूर्वीचं प्रचलित नाव धारण केलं.

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

अनेक सोहळे अनुभवले

राजभवन मुंबईच्या दरबार हॉलमधे मुख्यमंत्री, मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबईचे नगरपाल, मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त यांचे शपथविधी या ठिकाणी होऊ लागले. शासकीय बैठका, शिष्टमंडळांच्या भेटी, सांस्कृतिक सोहळे, पद्म पुरस्कार विजेत्यांचे सत्कार सोहळे, विविध देशांच्या राजदूतांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी दरबार हॉल हे प्रतिष्ठित ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या काळात दरबार हॉलचं नुतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी तिथं हेमा मालिनी यांच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम झाला होता.

१९९४ला राज्यात वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेनंतर राज्यपालांच्या निर्देशांमुळे मराठवाड्याला कधी नव्हे इतका अधिक निधी मिळाला. त्यावेळी मंडळांचे पूर्वीपासून तत्वतः विरोधक असलेल्या माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी गोविंद भाई श्रॉफ, भुजंगराव कुलकर्णी यांच्यासोबत राज्यपाल अलेक्झांडर यांची याच दरबार हॉलमधे भेट घेऊन त्यांचे जाहीर आभार मानले होते.

राजभवनातल्या दरबार हॉलने जशी सत्ता स्थापनेची लगबग पाहिली आहे तशीच आमदारांची शिरगणतीही! भारतीय रेल्वेला १५० वर्ष झाली त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांच्यासोबत याच दरबार हॉल इथून डेक्कन ओडिसीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं होतं.

मुंबईत भारत-पाकिस्तान डेविस कप मॅचेस ठरल्या असताना लिएन्डर पेस, महेश भूपती, पाकिस्तानचे खेळाडू यांच्या उपस्थितीत राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत याच ठिकाणी मॅचेसची सोडत काढली होती. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बाबासाहेब पुरंदरे यांना याच सभागृहात ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान केला होता. दरबार हॉलने अनेकदा शेतकऱ्यांचे सन्मान जसे पाहिले तसे राष्ट्रपती पोलीस पदक दान सोहळेही अनुभवलेत.

असाय नवीन दरबार हॉल

जवळ जवळ १०० वर्ष ऊन पाऊस आणि समुद्रकिनारी उभा असल्याने वादळे व प्रचंड लाटांचे तडाखे सहन केल्यामुळे दरबार हॉलचा वास्तुपुरुष  गलितगात्र झाला नसता तरच नवल. अनेकदा डागडुजी करून देखील त्याची वास्तू खचली, आतील लोखंड गंजले. मध्यंतरी दरबार हॉलला छोटीशी आग देखील लागली. कालांतराने त्याला असुरक्षित म्हणून घोषित केले गेले.

दरबार हॉलची आसन क्षमता २२५ होती. कालांतराने ती कमी वाटू लागली आणि शपथविधी सोहळे राजभवनाच्या हिरवळीवर होऊ लागले. २०१७-१८ नंतर दरबार हॉलचा वापर पूर्णपणे थांबवला गेला आणि पुढे त्याठिकाणी नवा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. २०१८ला नव्या दरबार हॉलचं भूमिपूजन करण्यात आलं. पण प्रत्यक्ष बांधकाम २०२०ला सुरु झालं. पण नुकतंच सुरु झालेलं बांधकाम कोरोना काळात ठप्प झालं आणि मोठ्या काळानंतर ते पुन्हा सुरु झालं आणि पूर्णही झालं.

जुन्या दरबार हॉलच्याच जागेवर आता ७५० आसन क्षमता नवा दरबार हॉल असेल. ज्या हॉलने पारतंत्र्यातल्या ब्रिटिशांचे दरबार पाहिले तो हॉल एका सशक्त लोकशाहीतली स्थित्यंतरं पाहण्यासाठी नव्या दमाने पुनश्च सिद्ध झाला आहे. एका वास्तुपुरुषाचा पुनर्जन्म झाला आहे.

हेही वाचा: 

पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं? 

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?