नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय.
कुरुक्षेत्र इथं नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह उपविजेतेपद पटकावलं. महाराष्ट्राच्या या यशात प्रतीक पाटील, सिद्धेश पाटील, प्रणिता सोमण, पूजा दानोळे, स्नेहल माळी, ओम कारंडे, अपूर्वा गोरे या खेळाडूंनी महत्त्वाचा वाटा उचलला.
वेगवेगळ्या अंतराच्या मास स्टार्ट, टाईम ट्रायल, वैयक्तिक कौशल्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांमधे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रेल्वे, सेनादल, कर्नाटक या बलाढ्य टीमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर केलेली मात हेच महाराष्ट्राच्या यशाचं वैशिष्ट्य होतं. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र सोनी, बीरू भोजने आणि पांडुरंग भोजने यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनीही या खेळाडूंच्या यशात सिंहाचा वाटा उचललाय.
महाराष्ट्राचे खेळाडू पूर्वी साध्या सायकलींचा उपयोग करत. वेगवेगळ्या अखिल भारतीय स्तरावर आयोजित केल्या जाणार्या शर्यतींमधे भाग घेत. जिद्दीच्या जोरावर चांगलं यशही मिळवायचे. मुंबई-पुणे सायकल शर्यत, मुंबई-नाशिक शर्यत या शर्यतींमधे घाटातल्या सरावाच्या जोरावर ते विजेतेपद मिळवत. वेगवेगळ्या गिअरच्या सायकलींचा उपयोग सुरू झाल्यानंतर रेल्वे, सेनादल, हवाई दल या टीमच्या खेळाडूंनी या शर्यतींमधली महाराष्ट्राच्या खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणली.
स्पर्धात्मक सायकलींसाठी अत्याधुनिक सायकलींची आवश्यकता आहे, हे महाराष्ट्राच्या खेळाडूंना लक्षात आलं. या खेळात सहभागी होणारे महाराष्ट्राचे बरेचसे खेळाडू आर्थिकदृष्ट्या मध्यम श्रेणी कुटुंबांतले असल्यामुळे स्पर्धात्मक सायकलिंगमधे करिअर करणं हे सोपे नाही. हे महाराष्ट्राच्या सायकलिंग संघटकांच्या लक्षात आलं.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उंचावायची असेल तर या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सायकली, स्पेअर पार्ट, पोषक आहार, फिजिओ आणि अव्वल दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊनच गेल्या पाच-सहा वर्षांमधे सायकलिंग संघटकांनी त्यादृष्टीनेच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि केंद्र शासन यांनी संयुक्तपणे सायकलपटूंच्या विकासासाठी नियोजनबद्ध योजना आखली आणि अमलातही आणली. नवी दिल्ली, पतियाळा, गुवाहाटी या ठिकाणी सायकलिंग अकादमी स्थापन करण्यात आल्या आहेत. या अकादमींसाठी आवश्यक असणारी आर्थिक बाजू केंद्र सरकारने स्वीकारली आहे. तांत्रिक जबाबदारी सायकलिंग संघटनांकडे सोपवली आहे.
साधारणपणे स्पर्धात्मक करिअरसाठी लागणार्या एका सायकलची किंमत अडीच ते तीन लाख रुपये असते. अशा ६०० सायकली खरेदी करण्यात आल्या असून, त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करेल. एवढंच नाही तर नवी दिल्ली इथल्या सायकलिंग वेलोड्रोम खेळाडूंना सरावासाठी मोफत देण्यात आला आहे. अकादमीत प्रशिक्षण घेणार्या खेळाडूंचा सर्व खर्च सायकलिंग संघटनेतर्फे केला जात आहे.
या अकादमीत महाराष्ट्राच्या पन्नास मुला-मुलींना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधून निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. त्यामधे अडीचशेहून अधिक मुलं-मुली सहभागी झाली होती.
खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव हा प्रत्येक खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी करिअर करण्यासाठी उपयुक्त असतो. पूर्वी आर्थिक पाठबळ आणि अव्वल दर्जाच्या सायकलींच्या अभावी भारतीय खेळाडूंना परदेशातल्या स्पर्धांमधे भाग घेण्यात अनेक अडचणी यायच्या. गेल्या पाच-सहा वर्षांत भारताच्या युवा, होतकरू खेळाडूंना दरवर्षी किमान सहा-सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भाग घेण्याची संधी मिळत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागलेत.
प्रणिता सोमण, सुशीकला आगाशे, ऋतुजा सातपुते, मयूर पवार, प्रियंका कारंडे अशा काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे पदकांवर आपलं नाव करायला सुरवात केलीय. दोन-तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने भारताच्या २० मुला-मुलींना परदेशात दोन-तीन महिने प्रशिक्षण घेण्याचीही संधी मिळत आहे. या प्रशिक्षणासाठी खेळाडूंना स्वतःचा एकही पैसा खर्च करावा लागत नाही. संबंधित कंपन्यांतर्फे या खेळाडूंना दैनंदिन भत्ताही दिला जातो.
हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?
भारतीय खेळाडूंना जर परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित आणि दररोज प्रशिक्षण दिलं तरच ते चांगलं यश मिळवू शकतात, असं नेहमी म्हटलं जातं. पण अनेक वेळेला भारतीय खेळाडू आणि परदेशी प्रशिक्षक यांच्यात सुसंवाद आणि समन्वय नसेल तर परदेशी प्रशिक्षकांवर केला जाणारा खर्च निरुपयोगी ठरतो.
प्रत्येक खेळाडूची देहबोली, मानसिक जडणघडण यात परदेशी प्रशिक्षकाच्या मर्यादा असतात. त्यासाठी त्याला स्थानिक प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागते. काही वेळेला परदेशी प्रशिक्षक हात राखूनच तांत्रिक कौशल्य शिकवत असतात. या गोष्टी लक्षात घेऊनच भारतामधल्या प्रशिक्षकांनाच वेळोवेळी अद्यावत प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. जेणेकरून हेच प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना चांगल्या रितीने प्रशिक्षण देऊ शकतील.
आज-काल ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्याचा फंडा वाढला आहे. पण अशा प्रशिक्षण पद्धतीत खेळाडूंचा अपेक्षेइतका विकास होत नाही. खेळाडूच्या चुका योग्य रितीने दुरुस्त होऊ शकत नाहीत. ऑनलाईन पद्धतीने शिकवणार्या प्रशिक्षकाला संबंधित खेळाडूची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी अपेक्षेइतक्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा असं प्रशिक्षण घेणार्या खेळाडूंचं अपयश लगेचच स्पष्ट दिसून येतं.
सायकलिंग संघटकांनी प्रत्यक्ष ट्रॅकवरच्या प्रशिक्षणावरच जास्त भर दिला आहे. मैदानावरच्या प्रशिक्षणाने खेळाडूंच्या चुका लगेच दुरुस्त करणं सहज शक्य होतं. तसंच सायकलीनुसार त्याने कोणतं कौशल्य दाखवलं पाहिजे, हेसुद्धा समजावून सांगणं सोपं होतं.
महाराष्ट्राने कुमार गटापर्यंत खेळाडू तयार करायचं आणि रेल्वे, सेनादल, पेट्रोलियम महामंडळ या सार्वजनिक संस्थांनी त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचं, हे नेहमीच दिसून येतं. सायकलिंग हा क्रीडा प्रकारही त्याला अपवाद नाही.
स्पर्धात्मक सायकलिंग क्षेत्रात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गेल्या पाच-सहा वर्षांत घेतलेली झेप खूपच कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकली, सुविधा आणि अर्थार्जनाची हमी असेल तर महाराष्ट्राचे खेळाडू नजीकच्या काळात आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमधे पदकांवर आपली मोहर लावली तर फारसं आश्चर्य वाटणार नाही. आश्चर्य वाटणार नाही.
हेही वाचा:
सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला
(दैनिक पुढारीतून साभार)