नंदा खरे : साहित्य आणि विज्ञान एकत्र करणारा लेखक

२१ मार्च २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


आपल्या 'उद्या' या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणा-या नंदा खरे यांची पुस्तकं वाचली की  साहित्य आणि विज्ञान वेगवेगळं असतं, या भ्रमातून आपण बाहेर येतो. त्यांचं लेखन वाचताना आपले डोळे खाडखाड उघडायला लागतात ही  त्यांची खरी ताकद. लेखक म्हणून ते भारी आहेतच पण माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी आहेत.

‘खात्री असल्याशिवाय बोलायचं नाही हा गुत्तेदारी हिशोब.’ हेच मला आलेलं खरे सरांचं पहिलं ई-पत्र. यानंतर आमचा प्रत्यक्ष संवाद सुरू झाला. त्यांनी मग मला जॉर्जस पीअरे सेऊरत ज्याचा उच्चार बहुधा 'सूरा' आहे असं सांगून त्या चित्रकाराची ओळख करून दिली. या चित्रकाराची चित्रं असंख्य ठिपक्यांची घडलेली असतात. भारतीय द. रा. बेंद्रे असेच कधीकधी ठिपके देत चित्रं काढायचे हेही सांगितलं.

अमेरिकन लेखक जॉन रॉडेरिगो डॉस पासोस त्याच्या ‘यूएसए’ या ट्रिलॉजीची तोंडओळख करून दिली. मग एकदा ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट सिरीजबद्दल सांगितलं. आणि हेही सांगितलं की त्यांच्या दृष्टीनी अशा या सगळ्या सिरीज म्हणजे बौद्धिक कसरती असतात. पुढं काय काय होणार याचा फक्त अंदाज बांधणाऱ्या. या सगळ्यांचा कसा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे हे सांगितलं. 'बिलियन्स' नावाच्या सिरीजटा आता सहावा भाग येणार आहे हे सांगितलं.

मुघल साम्राज्याच्या पतनाच्या काळात आग्रा शहरात आलेल्या महामंदीबद्दल लिहणाऱ्या कवी नजीर अकबराबादीबद्दल सांगितलं. ‘ब्रॅड डी’ची ‘संस्कृतीसाठी काय पायजे?’ कविता शेअर केली. स्वतः केलेल्या कवितेचा अनुवाद शेअर केला. ‘प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की मी असं झटपट रंगारी उत्तर देणं बरं नाही.’ असं सांगून जबाबदारीची जाणीव काय असते दाखवून दिलं.

हेही वाचा: गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

भाषणं आणि मुलाखतीसुद्धा महत्त्वाच्या

प्रेमचंद यांचा ‘मिल मजदूर’ सिनेमा बॅन झाला होता. त्याच्या पोस्ट वायरल झाल्या. त्या वाचून त्यामधे आलेलं भयरामजी जीजाभाय हे नाव हिंदी भाषकांना पारशी नावांची सवय नसल्यानं बैरामजी जीजीभॉयचं तसं झालं असणार याची शक्यता सांगितली.

जैविक शैलीबद्दल बोलत असताना सस्टेनिबिलिटीचा मुद्दा हा तुमच्या जीवनशैलीशीच निगडीत आहे. जर तुम्ही नुसतंच आदिमानवासारखं शिकार करून, अन्न सावळून जगत असाल तर, मागे कधीतरी हिशोब काढला होता की भारतात फक्त १३ लाख माणसंच जगू शकतात. आज जर आपण इतक्या साधेपणाने जगायचं ठरवलं तर १३४ कोटी ८७ लाख माणसांना मारून टाकावं लागेल.

शेती क्षेत्रात पुष्कळ प्रयत्न झाले. १० गुंठ्याचा प्रयोग म्हणून श्रीपाद दाभोळकरांचा प्रसिद्ध प्रयोग आहे. तो खूप शहाणा प्रयोग होता. त्यांचं म्हणणं होतं की जमीन तयार व्हायला ३-४ वर्ष वेळ दिला तर १० गुंठ्यावरती एक कुटुंब जगू शकतं. सगळं अन्न आणि कापडाकरता लागणारे काही तंतू त्यातून काढता येऊ शकतात. आता ३-४ वर्ष जमीन तयार होत असताना त्यांना कोण जिवंत ठेवणार? हा शेलका प्रश्न सुद्धा उपस्थित केला.

त्याच राहुल बनसोडे यांनी फेसबुकवर घेतलेल्या मुलाखतीत ‘आपण आधीच १३५ कोटी पार केलेत. राजकारणी बोलताना १२५ कोटी सांगतात ते २०११ चं बोलतात. वर्षाला सव्वादोन ते अडीच टक्के लोकसंख्या वाढतेय. आता तुम्हीच अंदाज लावा किती झाले असू ते? आपण १३५ कोटी पार केलेत,’ असं सांगून ऐकणाऱ्यांना तिथल्या तिथं अपडेट केलं. त्यांची पुस्तकंच काय नेटवर उपलब्ध असलेली त्यांची भाषणं, मुलाखातीसुद्धा मौलिक आहेत.

भारतीय कापसाचं सत्य

अमरावतीत झालेलं भाषणसुद्धा मुळातून वाचण्यासारखं आहे त्यातला एक तुकडा राहवत नाही म्हणून इथे पेष्टवतो ‘कथा कापसाच्या धाग्याच्या लांबीची. वर्षानुवर्ष शाळेत शिकवतात की भारतीय कापूस आखुड धाग्याचा असतो, त्यामुळे त्यापासून चांगलं कापड बनत नाही. इजिप्शियन, अमेरिकन वगैरे लांब धाग्याच्या कापसातूनच चांगलं कापड बनू शकतं. हे खोटं आहे. ग्रीक काळापासून, म्हणजे इसवीपूर्व साताठशे वर्षांपूर्वीपासून थेट सतराशे पन्नास इसवीपर्यंत भारतीय कापड जगभर सन्मानानं विकत घेतलं जात असे.

मलमलच्या कापडाच्या आठ थरांमधून पलिकडचं वाचता येतं, हे नागपुरचा अजब-बंगला आजही दाखवतो. भारतीय लाल-हिरवं कापड आफ्रिकेत नवऱ्या मुलीसोबत दिलं जात असे. त्याला इंजिरू म्हणत. तो बहुधा मराठी अंजिरीचा अपभ्रंश आहे. १७५० पर्यंत जगात दोनच देश औद्योगिक मानले जात. वस्त्रोद्योगी भारत आणि रेशीम आणि चिनीमातीची भांडी निर्यात करणारा चीन.

आजच्या दरडोई जीडीपीच्या मापात भारत इतर जगापेक्षा तीस-चाळीस टक्के श्रीमंत होता. सगळा कापड उद्योग विकेंद्रित ग्रामोद्योग नमुन्याचा होता. कापूस पिकवणारे, सूत कातणारे, कापड विणणारे आत्महत्या करत नसत. पण इंग्रजी सूत-कापड यंत्रांना आखूड धाग्याचा कापूस वापरता येत नसे. ग्रामोद्योगी कापडाचा दर्जाही, त्या यंत्रांना गाठता येत नसे.

तेव्हा भारतीय कापड स्पर्धेतून बाद करायला आखूड धाग्याचा कापूस बदनाम केला गेला. पण तोच वाईट कापूस पिकवायला मात्र भरपूर आमिषं देऊन वर्हाडाला सोन्याची कुर्हाड केलं. आपला कापडउद्योग मात्र संपला आणि त्याची जागा इंग्रजी यंत्रोद्योगानं घेतली.

आज तर ही विकृती कीटकनाशकांमुळे होणारे मृत्यू, आत्महत्या, कधीच न मिळणारे हमीभाव वगैरेंपर्यंत पोचलीय. हा खरा इतिहास मांडला, त्याचा प्रसार केला, तर आजचे पॉलिएस्टर प्रिन्स नाराज होतील. त्यांच्याआडून राज्यकर्ते नाराज होतील, इत्यादी, वगैरे. तेव्हा खरा इतिहास शोधत राहाणं ही आपली जबाबदारी आहे. मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या असलं काही करत नाहीत.

सर्व खूपविक्या, बेस्टसेलर कादंबऱ्या दोनशे ते चारशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या राजेलोकांवर केंद्रित आहेत. नाही, राजेलोक चमकदार असायचे. त्यांच्यासाठी देखण्या नटनट्या वापरता येतात. पण प्रजेचं काय? भारतात साठेक हजार वर्षं माणसं वावरताहेत.

वीसपंचवीस हजार वर्षांपूर्वी नेवाशाला, जळगावच्या आसपास माणसं होती. हिमयुग होतं तेव्हा. प्राणीपक्षीही वेगळे असत. आज भारतात न सापडणारे शहामृग असत. त्यांची चित्रं माणसं काढत. त्यांच्या अंड्यांच्या टरफलाचे मणी बनवत. त्यांच्यावर कादंबऱ्या मात्र नाहीत. सोळाशे-अठराशे सनांमधेही फक्त राजेलोक आहेत. प्रजा, तिचे व्यवहार वगैरे नाहीत.’

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

इस्राईलचा नंदा खरे

त्यांचं तर्कदुष्ट लेखन वाचून, ऐकून मिडीवोकर वाचायला सरावलेलं, सोकावलेलं आमचं डोकं झनान झनानतं आणि मग तुमचे सगळे चक्षु खडाखड उघडायला लागतात ही खरी या लेखकाची ताकद. लेखक म्हणून भारी. माणूस म्हणून तर त्यापेक्षा भारी.

एकदा एका योजनेबद्दल सांगितलं. ‘महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन, तालुक्याची गावं निवडून, प्रत्येक जागी एक-दोन दिवस राहायचं. एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने २५ -४५ वयाच्या लोकांना भेटून गप्पा मारायच्या. विषय एकच : तुम्हाला सध्याच्या तुमच्या आयुष्यातले ‘काय दुखतं; काय सुखावतं?’ यातून पुढे तुमची स्वप्नं काय, असाही प्रश्न येईलच.’ आणि मग विचारलं आहे का तयारी सहभागी व्हायची?आणि हो म्हटल्यावर पावसाळ्यात ट्रेन बंद असताना पुणे, लातूर, असा प्रवास करत उद्गीरला आलेसुद्धा! जाताना रस्त्यात उजनी धरण लागलं तेंव्हा दोन मिनिट थांबून ते पाहिलं आणि अगदी सहज सांगितलं की ते त्यांनीच बांधलय. मग पुन्हा प्रवास.

तुमच्याजवळ कागद पेन्सिल असेल तर लिहून घ्या. चार-पाच वाक्यांत सांगतो उत्क्रांती म्हणजे काय ते. 'कुठल्याही जोडप्याला पिल्लं होतात. ती परिस्थितीत जगायला जास्त लायक असतात. काही पिल्लं कमी लायक असतात. जी जास्त लायक ती तब्येतीनी जास्त चांगली होतात. त्यांना पिल्लंही जास्त होतात. असं होत होत परिस्थतीशी जुळत जाणारे गुण त्या एकूण जीवजातींमधे वाढत जातात. फुलस्टॉप! याला उत्क्रांती म्हणतात.’

कोण इतक्या साध्या आणि थेट पद्धतीने उत्क्रांती समजावून सांगेल. तुम्हाला माहिती असेलच कहाणी मानव प्राण्याची सेपियंसच्या आधी आलंय. आमच्या मित्रांत युवाल हरारी यांना इस्त्रायलचा नंदा खरे म्हणतात.

नंदा म्हणजेच अनंत खरे

आमची ओळख होण्याच्या तपभर आधी मी ‘ज्ञाताच्या कुंपणावर’ वाचलं होतं. आणि वाचून माझ्या सर्व मित्रांना फोन करून, भेटून ‘या लेखिका अफाट आहेत’ असं सांगितलं होतं. नंतर खूप वर्षांनी मला नंदा खरे म्हणजे अनंत यशवंत खरे आहेत हे कळलं. आणि तेव्हा मला माझ्या अज्ञान पसरवण्याच्या अक्षम्य कृतीची खूप लाज वाटली.

नंतर हे पण कळलं की नागपूर विद्यापिठात प्रबंध लिहणारीकडूनही अशी घोडचूक झालीय तेंव्हा मात्र मी स्वतःला माफ केलं. तसंही वाचकांसाठी लेखक नंदा खरे स्त्री आहेत, पुरुष आहेत यापेक्षा ते लेखक म्हणून अफाट आणि अचाट आहेत हेच महत्वाचंय. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांची पुस्तकं वाचलीयत त्यांना याबद्दल तीळमात्र शंका नाही.

माझ्या आयुष्यात मी केलेल्या बऱ्याच गोष्टीबद्दल मला लाज वाटते. त्यातली एक म्हणजे खरे सरांचं पहिलं पुस्तक 'ज्ञाताच्या कुंपणावरून' एकोणीसशे नव्वदला येऊनही ते मी वाचलं   २००७च्या सुमारास. म्हणजे साधारण सतरा वर्षानंतर. नव्वदला हे पुस्तक आलं तेव्हा मला वाचता यायचं. पंच्याणवला मी ते वाचलं असतं तर ‘विज्ञान आणि साहित्य या दोन गोष्टी वेगळ्या असतात’ असल्या भपाऱ्या मारत मी माझ्या आयुष्यातली काही मोलाची वर्ष वाया घालवली नसती.

हेही वाचा: कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

मराठी साहित्याचं नुकसान

मी साहित्याचा विद्यार्थी आहे. कॉलेजात असताना प्राध्यापक लोक सांगत ती पुस्तके आम्ही शोधून वाचत असू. पण माझ्या कोणत्याच प्राध्यापकांनी त्या वेळेला आम्हाला ‘नंदा खरे’ यांचं नाव सुचवलेलं नव्हतं. एवढंच काय मी ज्या विद्यापीठात शिकलो तिथं त्यांच्या पुस्तकावर अजूनसुद्धा चर्चासत्र झालंय की नाही याची खात्री देता यायची नाही.

खरंतर खरे सरांच्या प्रत्येक पुस्तकावर भरभरून लिहिलं जाण अत्यावश्यक होतं. साहित्यवर्तुळात त्यांच्याबद्दल बोललं जाणं अत्यावश्यक होतं. कारण अशानेच पुस्तकं वाचकांपर्यंत लवकर पोचतात. दुर्दैवाने वाचण्याच्या आधीच लेखकाची महती पटल्याशिवाय आपल्याकडचा सुजाणवाचक वर्ग पुस्तकात गुंतवत नाही, असा अनुभव आहे.

नंदा खरे सर वाचकांपर्यंत पोहचणं वाचकांसाठी जास्त महत्वाचं आहे. माझ्या माहितीतील दर्दी वाचक, नंदा सरांच्या लिखाणाचे निस्सीम चाहते प्राध्यापक भगवान काळे. त्यांच्या मते ‘नंदा खरे सरांच्या पुस्तकातली बहुविधता, त्यांचा त्या त्या विषयाचा अभ्यास, शास्त्रकाट्याच्या कसोटीवर केलेली मांडणी, खोली, उंची समजून घेण्यास मराठी समीक्षक कमी पडले आणि हे मराठी साहित्यव्यवहारासाठी प्रचंड नुकसानदाई ठरलंय.’ या विधानाला आता बऱ्याच जणांचं अनुमोदनही असेल.

असेल ते असो पण माझ्या प्रत्येक आवडत्या लेखकाचा ‘नंदा खरे’ आवडता लेखक आहे. उदाहरणार्थ जयंत पवार, राजन गवस, अतुल देवूळगावकर, वीणा गवाणकर, आसाराम लोमटे अजूनसुद्धा बरीच मोठी जंत्री देता येईल पण इतक्यावरून अंदाज येईलच.

सध्याच्या बदलांची प्रोजेक्शन्स

खरं तर साहित्य अकादमी पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांच्या सगळ्या पुस्तकांची नावं माहिती झाली असतील. पण तरीही ती मुद्दाम लिहितो. सगळ्यात पहिलं ‘ज्ञाताच्या कुंपणावरून,’ त्यानंतर '२०५०'  ही भविष्यवेधी कादंबरी. या पुस्तकाबद्दल मला अतुल देवूळगावकरांनी नंदा सरांची मुलाखत घेतली होती. त्यात कळलं होतं. मग या पुस्तकाची शोधाशोध केली. पण आता हे आउट ऑफ प्रिंट आहे.

मग त्याच्याबद्दल काही लिहलेलं मिळतंय का ते पाहिलं तर गुगलदेवीने विश्व विज्ञान पेजपर्यंत पोचवलं. जिथं या पुस्तकाचा परिचय सापडतो आणि २०५०च्या संदर्भात नंदा खरे सरांनी लिहलेलं टिपणसुद्धा सापडलं. ज्यात ते लिहितात, ‘२०५० म्हणजे मनुष्यजात, मानवी समाज, भारतीय उपखंड वगैरेंच्या भविष्यात काय घडू शकेल याबद्दलचे माझे अंदाज इथं आहेत. हे अंदाज बरेचसे सध्याच्या बदलांचे प्रक्षेप म्हणजे प्रोजेक्शन आहेत.

आजची स्थिती, आजचे बदल आणि त्यावरून उद्याची स्थिती, असं हे प्रक्षेपांचं गणित असतं. पण यावर कोरडे निबंध लिहिण्याऐवजी अशा प्रक्षेपांची चित्रं एका कृत्रिम गोष्टीत बसवायचा हा प्रयत्न आहे.

मला महत्वाची वाटणारी अंगं, मला जाणवलेली स्थिती आणि बदलांची दिशा, यावरच हे प्रक्षेप अवलंबून आहेत. यामुळे या साऱ्यात पूर्वग्रह खूप आहेत. पण तरीही हे प्रक्षेप ‘हवेतून आलेले’, किंवा बिनबुडाचे नाहीत. त्यांच्या बऱ्याच अंगांना वैज्ञानिक आणि ‘विचारी’ साहित्यातला आधार आहेत. या आधाराचे काही संदर्भ पुस्तकाच्या शेवटी दिलेत. पण पूर्वग्रहांवर एक वेगळा इलाज आहे. हे लिखाण पूर्वपक्ष मानून वाचणाऱ्याने स्वतःची मते उत्तरपक्ष म्हणून ‘ठरवावीत’. या लिखाणाला, चर्चेसाठी मांडलेली एक ‘श्वेतपत्रिका’ समजावे.’

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

विषयांना ताकदीने भिडणारा लेखक

या ‘बीस पचास’ या कादंबरीबद्दल एवढं शोधून लिहण्याचं प्रयोजन एकच. हिची प्रिंट निघावी. या नंतर तिसरं 'अंताजीजी बखर', चौथं  'संप्रती', पाचवं 'जीवोत्पत्ती आणि त्यानंतर', सहावं 'दगडावर दगड विटेवर वीट',  सातवं 'नांगरल्याविण भुई' आठवं 'कहाणी मानवप्राण्याची'. मग 'बखर अंतकाळाची', दहावं 'वाचताना पाहताना जगताना'. अकरावी भविष्यवेधी कादंबरी 'उद्या' साल २०१५  ज्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे.

त्यानंतर बारावं 'ऐवजी', तेरावं 'दगड-धोंडे' या बरोबरच त्यांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकांमध्ये 'वारूळपुराण' एडवर्ड विल्सन यांचं, ज्याला डॉक्टर माधव गाडगीळ यांची प्रस्तावना आहे. त्यानंतर 'कापूसकोंड्याची गोष्ट' ते  डॉक्टर लक्ष्मण सत्या यांचं आहे आणि 'इंडिका' प्रणयलाल यांचं. त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकांमध्ये 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य'  आणि आत्ता आलेलं नेव्हील शूट यांचं 'ऑन द बीच’.

इतक्या विविध विषयावर इतक्या ताकदीने लिहणारा भिडणारा लेखक हाच. आणि यात आणखी एक विशेष उल्लेख करावा लागेल ‘सुधारक’चे संपादक असताना नंदा खरे सरांनी संपादित केलेल्या अनिल पाटील सुर्डीकर यांच्या ‘गावगाडा शतकानंतर..’ या पुस्तकाचं कामही अतिशय मुलभूत आणि महत्वाचं आहे.

ज्ञाताच्या कुंपणाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहलंय ‘तीस वर्ष एकच एक आकलन. एकेक मत टिकणं मला आळशी वाटते. बर्टोल्ड ब्रेख्टची एक चुटकेवजा गोष्ट आहे. दोन माणसं एका कालावधीनंतर भेटतात. एक दुसऱ्याला म्हणतो ‘तुम्ही होता तसेच आहात.’ दुसरा शरमेने काळवंडतो’

सर तीस वर्षांनीसुद्धा तुमचं लेखन मुलभूत आणि मौलिक आहे, हे माझं मत बदलणार नाही आणि ऐकताना समोरचा काळवंडणारही नाही. बाकी तुम्ही सांगितलंय तसं आम्ही आनंद शोधत, भांडत तंडत वाचत राहू.

हेही वाचा: 

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक