‘नमस्ते वहाला’: भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणीची प्रेमकथा

२५ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.

राज. व्यवसायानिमित्त परदेशात आलेला भारतीय तरुण. स्थानिक परदेशी मुलीच्या बघताक्षणी प्रेमात पडतो. त्या मुलीचीही अवस्था तीच असते. लव अ‍ॅट फर्स्ट साईट. दोघंही लग्नाचा विचार करतात. पण मुलीकडच्यांना मुलगा बरोबरीचा वाटत नाही. मुलाच्या आईलाही मुलगी खटकते. मुला, मुलीतही त्यामुळे गैरसमजाचं वातावरण. तरीही प्रेम कायम. जोडीला लुटूपुटीचा कौटुंबिक संघर्ष. शेवटी समेट आणि शेवट गोड. अर्थात त्या दोघांचं लग्न.

१९९० च्या दशकात आणि त्याही आधी हिंदी चित्रपटांतून अनेकवेळा आलेला आणि ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे’नं अजरामर करून ठेवलेला हा प्लॉट यंदा ‘वॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं जगभरातल्या तरुणाईसमोर नव्यानं सादर झालाय. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘नमस्ते वहाला’ हा नायजेरियन सिनेमा त्याला निमित्त ठरलाय.

हेही वाचा: फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

नेहमीच्या प्लॉटला ग्लोबल फोडणी

‘वहाला’ म्हणजे ओढवून घेतलेलं संकट! या सिनेमाचं वेगळेपण इतकंच की, या त्याची नायिका आणि तिचं कुटुंबीय कृष्णवर्णीय आहे. नायजेरियात रेस्टॉरंट व्यावसायिक असलेल्या हमिशा दर्यानी अहुजा या तरुणीनं बॉलीवूडचा हा ‘टेस्टेट अँड प्रूव' मसाला घेऊन त्याला थोडी ग्लोबल फोडणी दिलीय. शिवाय कोणतीही रिस्क न घेण्याच्या बेतानं हा सिनेमा तयार केलाय.

वर सांगितलेला प्लॉट हा आपल्या पूर्ण माहितीचाय. पण त्यातला नायजेरियन हिरॉईनचा ट्विस्ट हा फक्त वेगळा भाग. बाकी सारं मसाला न घातलेल्या नूडल्सप्रमाणं सपक. लेखक, दिग्दर्शकानं थोडी रिस्क उचलली असती, तर कदाचित हा एक वेगळा आणि अधिक रंजक माईलस्टोन प्रयोग ठरला असता. मात्र, तसं न होता आता केवळ भारत आणि नायजेरिया यांना जोडणारा पहिला सिनेमाचा प्रयोग इतकंच त्याचं महत्त्व.

बॉलीवूड खालोखाल नॉलीवूड

भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या दोन आघाडीच्या सिनेमा निर्मात्या सृष्टींमधे सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडलंय. इथून पुढे तसे अनेकानेक प्रयोग होत राहतील, राहावेत, म्हणून ‘नमस्ते वहाला’ महत्त्वाचाय.

नॉलीवूड ही जगातली सर्वाधिक सिनेमा निर्माण होणारी बॉलीवूड खालोखाल दुसर्‍या क्रमांकाची इंडस्ट्री. वर्षाकाठी सुमारे २५०० सिनेमा तिथं निर्माण होतात. मात्र, त्यांचं निर्मितीमूल्यं अत्यंत सुमार आणि सरधोपट असतं.

कमीत कमी बजेटमधे पॉप्युलर कथा, मिळेल ती कास्ट घेऊन कुठल्याही कॅमेर्‍यानं शूट करायची. वीएचएसद्वारे तिचं प्रसारण शक्य तितकं सर्वदूर करायचं आणि जास्तीत जास्त नफा मिळवायचा, अशी या सिनेमासृष्टीची स्ट्रेटेजी.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

फुल लेन्थ रोमान्स

सिनेमा निर्मितीत संख्यात्मकदृष्ट्या नॉलीवूड आघाडीवर असलं, तरी गुणात्मक पातळीवर बरीच मजल मारायचीय. ‘नमस्ते वहाला’मधे निर्मितीचा दर्जा सांभाळण्याचा प्रयत्न दिसतो आणि तो प्रयत्न एका भारतीय निर्माता, दिग्दर्शिकेने केलाय, ही जमेची बाजू.

सिनेमाला सरधोपट का असेना पण कथा आहे. एक इंटरेस्टिंग उपकथानक आहे. थोडं नाट्य आहे. चित्रीकरण चकचकीत, ग्लॉसी आहे. बॉलीवुडी, हॉलीवुडी गाणी आहेत. कोका-कोलाची स्पॉन्सरशिप आहे.

ही निर्मितीमूल्यं अगदी हाय क्लास सिनेमाच्या तोडीची नसली, तरी नॉलीवूडच्या तुलनेत नक्कीच वरचढ आहेत. तिथल्या सिनेमासृष्टीत निर्मितीचा एक दर्जा, ट्रेंड सेट करणारा निश्चित आहे, ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे, ‘नमस्ते वहाला’मधून भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणी यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलेला दिसतो.

कृष्णवर्णीयांची वेगळी बाजू

भारतीय सिनेमातून कृष्णवर्णीयांचा वावर हा वीलनचे तगडे साथीदार जे केवळ मारधाडीसाठीच असतात किंवा अमली पदार्थांचा पुरवठा करणारे तस्कर, अशा स्वरूपाचा असतो. कृष्णवर्णीय तरुणींचं चित्रणही बहुतांश वेळा पाषाणहृदयी, अत्याचार, गैरकृत्ये करणार्‍या अशा स्वरूपाचं असतं.

अतिरेक हे आपल्या व्यावसायिक चित्रपटसृष्टीचं गुणवैशिष्ट्य आहे. दोन टोकांमधला संघर्ष दाखवून तो ऍक्शन करण्याला आपलं प्राधान्य असतं. मध्यम मार्ग जणू आपल्याला ठाऊकच नाही. या पार्श्वभूमीवर ‘नमस्ते वहाला’मधला रोमान्स उठून दिसतो.

दोन वेगळ्या संस्कृतींमधलं तसंच जगाच्या पाठीवरच्या समस्त महिलावर्गाच्या विश्वाचं स्वरूप यातली साम्यस्थळं इथं अधोरेखित केलीत. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

आपला भेदभावाचा वारसा

भारतीय समाज हा पाश्चात्त्यांच्या दृष्टीनं कृष्णवर्णीय असला, तरी त्यापासून धडा घेत इतरांशी समानतेनं वागण्याचा गुण न स्वीकारता त्या भेदाभेदांच्या रचनेचा वारसा आपण पुढे चालवतो. देशांतर्गत जाती, धर्म, प्रांत, भाषा या भेदांच्या भिंती उभ्या करतो.

आपण समाजाला समान न राखता एका उतरंडीत राखतो आणि जोखतोही. आफ्रिकन नागरिकांच्या बाबतीतही आपला तोच कित्ता असतो. ते तर आपल्यापेक्षा रंगाने डावे. काळेच. त्यांच्याकडे पूर्वग्रहदूषित, कलुषित नजरेनं आपण पाहतो.

गोऱ्या सुनेची आस

जेव्हा टीवी चांगल्या साहित्यावरून उत्तम सिरीयल तयार करत होता, त्यावेळी म्हणजे सुमारे पंचवीसेक वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही आधी एका कथेवर एपिसोड पाहिल्याचं आठवतंय. गावातला सधन शेतकरी कुटुंबातला मुलगा शिकायला अमेरिकेत असतो. एकेदिवशी त्याचं पत्र येतं. आपण तिथं जेनेट नावाच्या मुलीशी विवाह केला असून, तिला घेऊन गावी येत आहोत, असं कळवलेलं असतं. घरात हलकल्लोळ.

उगीच परदेशात पाठवलं इथपासून ते यासाठीच तिकडं पाठवलं होतं का? इथपर्यंत सगळी उजळणी होते. शेवटी मुलाचे वडील समजूत काढतात की, अमेरिकेतली गोरी सून आली म्हणून गावात उलट आपली मान ताठच होईल. त्यानंतर सगळेच गोरी सून घरात आल्यानंतर काय काय होईल, याची चित्रं रंगवू लागतात.

शेवटी मुलाची मोटार दारात उभी राहते. आई ओवाळणीचं ताट घेऊन मोठ्या कुतूहलानं सूनमुख पाहण्यासाठी पुढं सरसावते. मुलाच्या पाठोपाठ अत्यंत उत्साही, चार्मिंग पण कृष्णवर्णीय जेनेट खाली उतरते. तिला पाहताच आईच्या हातातलं ओवाळणीचं ताट खाली पडतं.

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

या प्रेमकथेकडे कसं पहायचं?

आज आपण एकविसाव्या शतकात जनरेशन झेडच्या गप्पा मारीत असलो तरी आपली मानसिकता मात्र बदललेली नाही. किंबहुना, ती अधिकच आक्रसत चाललीय. कायद्यानं भेदाभेद नष्ट झाले, तरी मनातली भेदभावना नष्ट व्हायला तयार नाही. उलट तिची मुळं अधिक घट्ट होतायत. अमेरिकेपासून जगभरातल्या कृष्णवर्णीयांवरच्या अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.

‘आय काण्ट ब्रीद’चे शेवटचे उसासे आजही कानावर येतात. जागतिक स्तरावर स्थानिक आणि परप्रांतीय संघर्ष तीव्र होत चाललेत. त्याचे ओरखडे जगाच्या पटलावर उमटत आहेत. निर्वासितांच्या तांड्यांचं बेदखल वास्तव आपल्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणी यांच्यातल्या सजाण प्रेमाच्या मांडणीकडे पाहायला हवं.

महिला ही सर्वच समाजांत शोषित असते. जसं आपल्याकडे खालच्या समाजातली स्त्री ही शोषणाच्या अगदी सर्वात वरच्या टप्प्यावर तशीच पाश्चात्त्य देशांत कृष्णवर्णीय महिलेची अवस्था. त्यामुळं तिची आत्मनिर्भर प्रतिमा ऑडियो व्हिज्युअल माध्यमातून निर्माण करणं, ती प्रत्यक्षात येण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणं, हे खरं तर माध्यमांचं काम. त्या दृष्टीनेही या प्रेमकथेकडं पाहायला हवं.

वास्तवाला भिडायलाच हवं

सिनेमात दोन भिन्न संस्कृतींमधला संघर्ष दिसतो. त्यावर सामोपचाराचा तकलादू तोडगाही दिसतो. मात्र, प्रत्यक्षात अशा भिन्न संस्कृतींचं मीलन, त्यांचं सामाजिक अभिसरण या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात, नाहीत. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मोठी गरज असते. नॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्या संगमातून आता नायजेरिया आणि भारत यांच्यामधला सांस्कृतिक बंध दृढ करण्यासाठी प्रयत्नांची सुरवात झालीय.

साधारणत: २१ कोटींच्या नायजेरियामधे अर्धा लाख भारतीय नागरिक विविध क्षेत्रात योगदान देतायंत. लोकसंख्येची मोठी घनता, त्यामुळे आलेलं दारिद्र्य, श्रीमंत, गरिबातली वाढती दरी, असे अनेक कंगोरे तिथल्या राहणीमानाला आहेत. ‘नमस्ते वहाला’मधे तिथल्या उच्चभ्रू वर्गाचं चकचकीत दर्शन घडतं. मात्र, खर्‍या अर्थाने सांस्कृतिक सहसंबंध प्रस्थापित व्हायचे असतील, तर तिथल्या वास्तवाला भिडणं अधिक गरजेचं आहे.

पाश्चिमात्यांनी सांस्कृतिक साम्राज्यवादाचा आधार घेऊन जगातल्या अन्य संस्कृतींवर अतिक्रमण करण्यात आलंय. तशाच प्रकारचा सांस्कृतिक व्यवहार आपल्याकडून अन्य देशांच्या बाबतीत होता कामा नये. याचं सजग भान बाळगणं त्यासाठी खूप आवश्यक आहे.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?

मृत्यूनंतर म्युच्युअल फंडमधल्या पैशांचं काय होतं?

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’

(डॉ. आलोक जत्राटकर यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )