आदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या?

१५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आदिम हिंदू महासंघ या संस्थेने गेल्या शनिवारी पुण्यात कुंडली कचऱ्यात टाकण्याचं आंदोलन केलं. स्वतः हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगत हिंदू धर्मातल्या वेडगळ समजुतींवर प्रहार करायचं काम ही संस्था करते. त्यांच्या या ताज्या आंदोलनातल्या एका कार्यकर्त्यांचं हे मनोगत.

कुंडली आणि फलज्योतिष यावर विरोधाच्या आणि समर्थनाच्या बाजूने भरपूर साहित्य उपलब्ध आहे. कुंडली थोतांड आहे असं वैज्ञानिक, विज्ञानवादी विचारांची मंडळी सांगतात. याउलट कुंडली हे शास्त्र आहे, विज्ञान आहे आणि ते मानवी हिताचं आहे असं ज्योतिषी आणि समर्थक ठासून सांगताना दिसतात. त्यामुळे यात कितपत तथ्य आहे, याचा उपयोग काय? फायदा होईल की तोटा? या सगळ्या गोष्टी आज प्रत्येकाला पडताळून बघाव्या लागतायंत.

कुंडलीत विज्ञान आहे का?

एखाद्या गोष्टीचे चांगले किंवा वाईट परिणाम, हे आपल्या बुद्धीचा वापर करून ठरावं लागेल. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मी तो प्रयत्न केला. फलज्योतिष हे संपूर्णतः अवैज्ञानिक आणि नुकसानकारक असल्याचं मला दिसलं.

माझ्या आकलनानुसार, कुंडलीचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांची स्थिती कुंडलीत मांडली जाते. त्या स्थितीवरून तुमच्या आयुष्याशी निगडित असणाऱ्या संभाव्य गोष्टी, खास करून तुमचं भविष्य काय असेल, तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवसाय, घर, शिक्षण, लग्न या संबंधीचं आडाखे बांधले जातात.

ग्रह ताऱ्यांच्या स्थितीमध्ये काही दोष असतील तर ते दूर कसं करायचं यासारख्या गोष्टी यामधे येतात. ग्रहताऱ्यांची स्थिती हा पहिला प्रकार. हा खगोलशास्त्र म्हणून ओळखला जातो. त्याला विज्ञान म्हणून मान्यता आहे. दुसरा प्रकार म्हणजे फलज्योतिष. याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. ग्रहांच्या स्थितीचा, त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा मानवी मनावर किंवा मानवी विचारांवर, मानवाने घ्यावयाच्या निर्णयावर कुठलाच परिणाम होत नाही.

जन्मवेळ कशी ठरवणार?

जन्मवेळेवरचं कुंडलीचं गणित अवलंबून आहे. पण ती जन्मवेळ कुठली पकडावी यावरही अजून एकमत नाही. मुल जन्म घेऊन पूर्ण बाहेर आल्यावरची वेळ घ्यायची? की हात बाहेर आल्यावरची? की पाय बाहेर आल्यावरची? पण बाळाचा जन्म तर आधीच झालेला असतो. आईच्या पोटात ते जिवंतच असत. फक्त ते बाहेर आलेलं नसत. मग पहिल्यांदा बाळाच्या हृदयाचे ठोके सुरु झाले तेव्हाची वेळ घ्यावी लागेल. पण ती कळेल कशी? हा प्रश्न असल्याने ढोबळमानाने जन्माची काहीतरी वेळ निश्चित केली जाते.

म्हणजे ज्या प्रमाण वेळेवर संपूर्ण कुंडली आधारलेली असते ती वेळ नक्की करण्याची प्रक्रिया प्रचंड ढोबळ आणि तकलादू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्योतिष या विषयाला विज्ञान म्हणून मान्यता नाही. जादूगिरीसारखंच जोतिष हा विषयही कला या प्रकारात मोडावा लागेल.

लोक का विश्वास ठेवत असतील?

फलज्योतिषावर विश्वास ठेवणं हे दुर्दैवी आहे. पण तरी लोक विश्वास ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. याला काही कारणं आहेत. त्यातली दोन मुख्य कारणं इथे नमूद करतो. पहिलं म्हणजे ज्योतिषी लॉ ऑफ प्रोबॅबलिटीचा वापर करतो. ही गोष्ट आपल्याला सहज लक्षात येत नाही. आता हीच काही उदाहरणं बघा.

ज्योतिषाने सांगितलं की उत्तरेकडे लग्नाचा योग्य आहे. आता लग्न होणार तेव्हा मुलगी किंवा मुलगा उत्तरेकडील असेल किंवा दक्षिणेकडील दोनच पर्याय. म्हणजे भविष्य ५० टक्के खरं होण्याची शक्यता आधीच असते. १०० स्त्रियांना सांगितलं की तुम्हाला मुलगी होणार, तर ५० स्त्रियांना मुलगी होणारच असते म्हणजे ५०% टक्के शक्यता आहेच. ज्योतिष बऱ्यापैकी या नियमावर चालतात. त्यात आपली फसगत होते. आणि आपण ज्योतिषावर आंधळा विश्वास ठेवायला लागतो.

दुसऱ्या प्रकारात ज्योतिषी आपल्याला काही भविष्य सांगतो ज्याचा थेट असा काहीही अर्थ लागत नाही. तुमच्याकडे पैशाची चणचण आहे. आता ती कुणाकडे नसते? कुटुंबात थोडे वाद आहेत. कुणाच्या नसतात? काही लोकांनी विश्वासघात केला आहे, तो तर प्रत्येकासोबत झालेला असतो. ही सगळी मांडणी प्रचंड उथळ असते, तकलादू असते. म्हणून प्रत्येकाला त्यात आपला भूतकाळ दिसतो. त्यामुळे ज्योतिषावर विश्वास बसतो.

या कुंडलीमुळे होणारं नुकसान

माणसाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींमध्ये कुंडलीचा हस्तक्षेप असतो. शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर, लग्न या सगळ्या महत्वाच्या गोष्टींमधे कुंडली पाहून निर्णय घेतले जातात, हे खूप चिंताजनक आहे. मुलाने शिक्षण कुठल्या शाखेत घ्यायचं हा निर्णय पण अनेकदा कुंडली पाहून घेतला जातो. अवकाशात बसलेल्या शनिला, गुरूला पृथ्वीवर कोण्या एका मुलीचं किंवा मुलाचं शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावं यात अजिबात रस नाही. ते सूर्याभोवती फिरणारे निर्जीव पात्र आहेत.

धंदा कधी करावा, कधी करू नये याबद्दल पण ज्योतिषी बिनधास्त मत व्यक्त करत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होते. मुलींची किंवा मुलांची लग्नं गुरु, शनी, मंगळ असल्याने पुढे ढकलली जातात. हे प्रचंड मोठं नुकसान आहे. घर घेतानाही ते घ्यावं की नको, कधी कुठे घ्यावं इथपर्यंत कुंडली ठरवत असते. कुठल्या कागदाच्या आधारे आपण हे ठरवतो याची चाचपणी, पडताळणी नको का करायला?

कुंडलीच्या धंद्यात आर्थिक फसवणूक आहे का?

होय. तुमच्या आयुष्यातली संकटं किंवा अपेक्षेप्रमाणे न होणाऱ्या गोष्टी या कुंडलीच्या, ग्रहांच्या प्रभावामुळे होत आहेत, हे ज्योतिषी खात्रीशीररित्या पटवून देतो आणि त्यावर उपाय पण सुचवतो. अनेक प्रकारच्या शांती यज्ञाची त्यासाठीच सोय करून ठेवण्यात आलीय. आणि हे शांतीयज्ञ करण्याची एक ठराविक रक्कम असते तोच ज्योतिष्यांचा मुख्य धंदा आहे. कालसर्पयोग, नारायण नागबळी अन् असे अनेक.

मुलाचं शिक्षणात लक्ष लागत नाही तर हे करा. बायकोशी पटत नाही तर हे करा. पैशांची चणचण आहे तर हे करा. नोकरी लागत नाही तर ते करा. तब्येत नीट राहत नाही तर अमुक करा तमुक करा. या विधींचा/यज्ञांचा कुठलाही परिणाम होत नाही म्हणूनच याला धंदा किंवा व्यवसाय न म्हणता शुद्ध फसवणूक म्हणता येईल. ग्रहांची स्थिती या कर्मकांडाने बदलते का? याचा विचार आपल्याला आज ना उद्या करावा लागेल. सर्वसामान्यांना भिती घालून त्यांचे पैसे उकळणं याला लुटालूट नाहीतर काय म्हणायचं?

मग यावर काय करता येईल?

आपण शाळेतच विज्ञानाचे धडे गिरवलेत. पण ते विज्ञान आयुष्यात अवलंबून तर्कशुद्ध भूमिका घेण्याची आपल्याकडे पद्धतच रुजली नाही. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि मानवी आयुष्य याचा संबंध किती किरकोळ आहे हे समजणं तसं अवघड नाही. विज्ञानासोबत चिकित्सकपणा वाढवणं यासाठी उपाय शोधावे लागतील.

जगातल्या नामवंत वैज्ञानिकांनी या ज्योतिष विषयाला केराची टोपली दाखवलीय. त्या वैज्ञानिकांचे विचार शिक्षण व्यवस्थेत, रोजच्या जगण्यात आणावे लागतील. ज्योतिष सांगतो ते भविष्य लिखित स्वरूपात घेतलं पाहिजे.  ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कक्षेत आणून सामान्यांची फसवणूक करणं यासारख्या कायदेशीर बाबी मजबूत कराव्या लागतील.

आमचा संघर्ष हा कुणाला डिवचण्यासाठी नाही. कुणाला हिणवण्यासाठी नाही. थट्टा मस्करीचापण नाही. फलज्योतिष ही सर्वसामान्यांचं शोषण करणारी व्यवस्था आहे. तिला आव्हान देणं गरजेचं आहे.

 

(लेखक हे पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि आदिम हिंदू महासंघाचे कार्याध्यक्ष आहेत.)