प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर

१४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे.

हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित कोण सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे? या प्रश्नाचं उत्तर काहीजण आपले आवडते, आघाडीचे हिरो, हिरोईन्स यांची नावं घेऊन देतील. फार तर एखाद्या डायरेक्टरचं नाव सांगतिल. पण हे उत्तर चुकीचं ठरेल बरं का. आज अक्षरश: ज्याच्यामागे फोटोग्राफर्स धावत असतात आणि ज्याची छबी काढायला कोण आटापिटा करतात त्या व्यक्तीला खरं तर अद्याप बोलायलासुद्धा येत नाही.

तिचं नाव आहे तैमूर सैफ अली करीना खान. आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे सत्य आहे. सैफ आणि करीनाचा तीन वर्षांचा तैमूर हा सध्या उत्सुकतेचा विषय बनलाय. अलीकडेच तैमूरला सैफ करीनाने बाहेर आणायला सुरवात केली होती आणि तैमूर चक्क त्याचा फोटो काढायला यायचे त्यांना छानपैकी पोझ द्यायला लागला.

तैमूरची दाईही झालीय प्रसिद्ध

तैमूर वर्षाचा होता तेव्हा एका फोटोग्राफरचा अनुभव असा की त्याने एके ठिकाणी तैमूरचा फोटो काढला आणि काही दिवसांनी परत त्याचा फोटो काढायला तो आला. तेव्हा तैमूरने त्याला लागलीच ओळखलं आणि छान हसला. तेव्हापासून तैमूर हे एक वेगळं रसायन आहे आणि भविष्यात हे रसायन काय करेल याच्या चर्चा रंगू लागल्या. 

तैमूर दिसायलाही गोड आहे. त्याचे डोळे पणजोबांसारखे निळे आहेत. त्याचा एकंदर आब नवाबासारखा आहे. त्याचे फोटो कमालीचे लोकप्रिय होताहेत. फेसबूक आणि वॉट्सअपवर त्याचाच गाजावाजा आहे.

आता तर अशी परिस्थिती आलीय की त्याला सांभाळणारी दाई किंवा नोकराणी म्हणा, सावित्री हीसुद्धा त्याच्यामुळे लोकप्रिय झालीय. तिचीही माहिती काहीजण मिळवून आहेत. ती तैमूरला घेऊन जिथे जाते तिथे फोटोग्राफरचा गराडा पडतोच. आता तर तैमूरच्या घराबाहेर फोटोग्राफरची नित्याची गर्दी असते. बस तैमूर घराबाहेर पडण्याचा अवकाश की त्याचे फोटो काढले जाताहेत. एवढी लोकप्रियता सध्या कुठल्याही सुपरस्टारला नसेल.

हेही वाचा : आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?

तैमूर असामान्य निघण्याची शक्यता

अर्थात यामुळे तैमूरचे आजोबा, चुलत आजोबा वैतागलेत. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांनी पत्रकार, छायाचित्रकार यांना मर्यादेत राहायचं आवाहन जरासं चिडूनच केलं होतं. त्यांच्या या अशा उन्मादाने बिचाऱ्या तैमूरला बाहेर पडणंच मुश्कील होईल आणि त्याचं बालपण हरपेल याची धास्ती त्यांनी व्यक्त केली. ते खरंही आहे. एखाद्या लहान मुलाचा एवढा पाठलाग करणं चुकीचं आहे.

एक गोष्ट मात्र यातून सैफने चर्चेला आणलीय. ती ही की त्यालाही आपल्या या मुलाबाबत एक कोडं पडलंय. आपला हा मुलगा नक्कीच असामान्य निघेल असंही त्याला वाटतंय. याचं कारण देताना तो म्हणतो, या मुलामधे राज कपूरचे जीन्स आहेत आणि अगदी रवींद्रनाथ टागोर तसंच पतौडीच्या नवबाचेही आहेत. रवींद्रनाथ टागोर हे सैफची आई शर्मिला हिचे आजोबा होत तर पतौडी सैफचे वडील.

करीनाचा विचार केला तर तिचे पणजोबा पृथ्वीराजजी. आजोबा राजजी आणि वडील रणधीर. त्यामुळे हे पोर खरोखर असामान्य निघण्याची शक्यता आहे. पूर्वीपासूनचा हा अनुभव आहे की एखाद्या घराण्याची गुण वैशिष्ट्ये अनुवंशाने चालत येतात. ती नव्या पिढीत उतरतात. पूर्वी म्हणून गोत्र महत्वाचं मानायचं. त्यावरून मूळ पुरुष समजत असे. त्याचे गुण पुढे चालत येणार हे गृहीत धरलं जायचं. 

मुल कोणासारखं असावं हेही ठरवलं जातं

यावरूनच राजघराणं ही संकल्पना दृढ झाली आणि राजाच्या मुलाच्या मुलालाच युवराज करून पुढे त्याला गादीवर बसवलं जाऊ लागलं आणि आता आताही डॉक्टर, वकील, कलाकार, खेळाडू यांच्या मुलांकडे त्यादृष्टीनंच बघितलं जातं. तेही आपल्या वडीलांच्या व्यवसायात चमकणार असं मानलं जातं. सिनेसृष्टीत तर सर्रास खानदानाचाच प्रभाव राहिलाय.

गंमतीची आणखी एक गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मुल जन्माला येईल ते असंच असावं असा निर्धारच काही गर्भार महिला करताना दिसतात. काही वेळेला एखाद्या कारणासाठी मूल जन्माला घालण्याचीही उदाहरणं आहेत. पुराणात उमाशंकर यांचा मुलगा स्कंद असुराच्या नाशासाठी जन्माला आला होता. या कारणासाठी देवांनीसुद्धा पुढाकार घेऊन उमा-महेशाचा विवाह जुळवला होता. ही पुराणातली गोष्ट आहे आणि ती आजही सांगितली जाते.

राजा द्रुपदाने द्रोणाच्या नाशासाठी पुत्र दृष्टद्युम्न जन्माला घातला. तेही सर्वांना ठाऊक आहे. अलीकडेही गर्भावस्थेत अमुक एकाचं चिंतन करून त्याच्यासारखंच मूल जन्माला यावं असा प्रयत्न करणाऱ्याही महिला आहेत आणि तशीही उदाहरणं आहेत.

हेही वाचा : १९५१ च्या निवडणुकीत कसा होता जवाहरलाल नेहरूंचा प्रचार?

रेखामुळे ऐश्वर्या झाली सुंदर

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ सारखं गीत लिहून अमर झालेल्या गीतकार साहीर याचं आणि पंजाबी साहित्यिका अमृता प्रीतम यांचं प्रेम प्रकरण होतं. त्यांचं लग्न झालं नाही. मात्र अमृताने साहीरवर मनापासून प्रेम होतं. तिला पहिलं मूल होणार होतं तेव्हा ती साहिरचाच विचार करायची आणि खरोखर हे मूल जन्माला आलं तेव्हा ते बरचंसं साहिरसारखं दिसणारं होतं. याला चमत्कार म्हणता येणार नाही. हा ध्यासाचा परिणाम असं म्हणता येईल. 

सौंदर्यवती अभिनेत्री सुद्धा अभिमानाने सांगते की रूपवती ऐश्वर्या राय एवढी सुंदर असण्याचं एक कारण हे आहे की जेव्हा ऐश्वर्याची आई गर्भवती होती तेव्हा ती सारखी रेखाचं एक भव्य चित्र पाहत बसायची आणि खरोखर तिला झालेली कन्या अतिशय सुंदर निघाली. योगायोग कसा बघा ती ऐश्वर्या नेमकी रेखा ज्याचा निरंतर ध्यास घेऊन राहिली त्या अमिताभची सून झाली.

आणखी एक कळस म्हणा किंवा याबाबतचा आचरटपणा म्हणा जेव्हा लेखक सलीम खान यांची बायको गर्भार असताना तिला कळा येऊ लागल्या आणि हॉस्पिटलमधे जाण्याची वेळ आली तेव्हा नेमकी सुपरस्टार राजेश खन्नाची गाडी उपलब्ध झाली. त्या गाडीतून ती हॉस्पिटलमधे गेली आणि तिने मूल जन्माला घातले. तोही पुढे सुपरस्टार झाला. तो म्हणजे सलमान खान. अर्थात यात योगायोगाचा भाग अधिक आहे.

तैमूरला मोकळं ठेवायला हवं

पण खरोखर खानदान किंवा घराण्याचे जीन्स आणि ध्यास यातून जन्माला येणारं मूल नक्कीच आकर्षक आणि चित्रवेधक असतं. तैमूर सध्या या गोष्टी अधोरेखित करून राहिलाय. काहींनी तर पुढे जाऊन शहीद कपूरची कन्याही सुंदर आहे. तिची तैमूरशी आत्ताच जोडी जमवायला घेतलीय. करीना-शहीद यांचं कधी काळी प्रेमप्रकरण होतं. आता बोला.

एकंदरीत पाहता आपल्याकडे वलयांकित व्यक्तींच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे असं म्हणावं लागेल. यामुळे या मुलांना जन्मापासूनच प्रसिद्धीचा झोत मिळतो. पण त्याचबरोबर अपेक्षांचं ओझंही वागवावं लागतं. मूल मोठं झाल्यावर आई किंवा वडलांच्याच क्षेत्रात आलं तर त्याची तुलना सतत त्यांच्याशी होते.

ते सवाई निघालं तर ठीक असतं. अपयशी ठरलं तर येणारी निराशा त्याच्यासाठी मोठी असते. जे चलाख असतात ते वेगळं क्षेत्र निवडतात. तैमूरबाबत आतापासूनचा गाजावाजा अति वाटतोय. त्याला खरंच मोकळा ठेवायला हवा.

हेही वाचा : 

 नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

संचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच