मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.
मोहम्मद अझीज आता आपल्यात नाही. सत्य असलं तरी ते स्वीकारण्याची अद्यापही मनाची तयारी होत नाही. अगदी काल परवा यूट्युबवर त्याला एका शोमधे माय नेम इज लखन गात ठुमके मारताना पाहिलं होतं. जाने दो जाने दो मुझे जाना है म्हणणाऱ्या सहगायिकेच्या समोर कमरेवर हात ठेऊन उभा राहत कौन है वो म्हणत जाब विचारणारा अझीज अजूनही नजरेसमोर तरळतोय.
इम्पॉसिबल आहे यार! मोहम्मद उर्फ मुन्ना अझीज जाणंच शक्य नाही. भले त्याला इंडस्ट्रीने बाहेर काढला असेल. पण आमच्या मनात अजूनही तो आहे. त्याची ती गाणी आहेत. त्याच्याशी आमच्या बालपणाची नाळ जोडलीय. आज कोणाला त्याच्या आवाजात लाख वैगुण्यं दिसत असतील. तरी हाच आवाज ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोय. आता केवळ मुन्ना अझीजच नाही, तर आमच्या आयुष्याचा एक भागच जणू निघून गेलाय.
दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है
लोगों का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया
या मुन्ना अझीजनेच गायलेल्या त्याच्या आवडत्या गाण्यासारखीच त्याची कथा आहे. तो पश्चिम बंगालच्या एका गावखेड्यात जन्मलेला मुलगा. फिल्म इंडस्ट्रीचा बेताज बादशाह असणाऱ्या मोहम्मद रफीचा तो लहानपणापासून जबरदस्त फॅन होता. इतका की त्याने गाण्याची सुरवातच रफीच्या स्टाईलने केली. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेऊनही त्याने आवाजावरचा रफीचा ठसा जपला. आणि हाच ठसा रफीचा वारसदार म्हणून त्याला मुंबईला घेऊन आला.
तशी अझीजने गायक म्हणून बंगालीत सुरवात केली होतीच. इकडे हिंदीतही तो धडपड करत होताच. पण कॉम्पिटिशन टफ होती. किशोरयुग आपल्या उत्कर्षाच्या कळसाला पोचलं होतं. खुद्द रफीच्या हयातीत रफीच्या ऐवजी गाणी मिळवणारा अन्वर होताच. कुली, बेताब सारख्या गाजलेल्या सिनेमांतल्या गाण्यांमुळे इंडस्ट्रीत शब्बीर कुमारने आपला जम बसवलाच होता. रफीचे हे दोन वारसदार असताना तिसऱ्याला तसाही चान्स नव्हताच. स्पेसही नव्हती. पण तकदीर नावाची चीज काही औरच असते. त्याचं प्रत्यंतर अझीजशिवाय जास्त कोणाला आलं नसेल!
हेही वाचाः आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात
१९८५ मधे मर्द रिलीज झाला आणि मोहम्मद अझीजचा भाग्योदय झाला. तसं बघायला गेलं तर मर्दच्याच वर्षी रिलिज झालेल्या गिरफ्तार, आखिर क्यों, जमाना सारख्या सिनेमांतही मुन्नाची गाणी होती. पण मर्दचं टायटल साँग मैं हूं मर्द टांगेवाला भलतंच भाव खाऊन गेलं. वास्तविक हे गाणं शब्बीरकुमार गाणार होता. पण डायरेक्टर मनमोहन देसाईसोबत त्याचा खटका उडला. त्याआधी अन्वरने जास्त पैसे मागितले, म्हणून त्याचाही पत्ताही कट झाला. दोघांच्या जागी मुन्नाची वर्णी लागली आणि त्याची तकदीर बदलली.
मर्दच्या वेळेस अमिताभचं करियर उतरणीला लागलं होतं. तरी तो इंडस्ट्रीचा सुपरस्टार होता. सुपरस्टारला दोन गाण्यांत प्लेबॅक देणं आणि ती गाणी पब्लिकने उचलून धरणं, ही एका नव्या गायकासाठी सामान्य गोष्ट नव्हती. मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा दोस्त हैं उपरवाला म्हणत मुन्नाने आपला ठसा उमटवला. पुढच्याच वर्षी १९८६ मधे अमृत, आखरी रास्ता, नगिना, कर्मा आणि नाम या पाच सिनेमांतल्या गाण्यांनी त्याला त्याचं इंडस्ट्रीमधलं स्थान मिळवून दिलं.
एखाद्या गायकाच्या आवाजाचा प्रभाव मान्य करत गाणाऱ्यांना नकलाकार म्हणून हेटाळणाऱ्यांची एक अभिजनी जमात आपल्या सांस्कृतिक जगतात आहे. तसं पाहिलं तर या जमातीला खुद्द मोहम्मद रफीही पुरला नाही, तर मग त्याचा प्रभाव असणाऱ्यांची काय कथा!
मोहम्मद अझीजच्या आवाजावर रफीची छाप होतीच. ती त्याने कधीही अमान्य केली नाही. पण त्या पलीकडेही त्याच्या आवाजाचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं. त्याचा आवाज जड होता. त्यात एक प्रकारचं गांभीर्य आणि भारदस्तपणा होता. तो त्याच्या गायकीचं महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसा होता. उदाहरणादाखल नाम सिनेमातली दोन गाणी, अमीरों की शाम गरीबों के नाम आणि तू कल चला जायेगा.
यातल्या दुसऱ्या गाण्यात मुन्नासोबत मनहर उधासदेखील आहे. पण संपूर्ण गाणं ऐकल्यावर लक्षात राहतो, फक्त मुन्ना अझीज. आणि त्याच्या आवाजातली ओळ, अरे, तेरा गम रुलाएगा तो मैं क्या करुंगा. कर्माचं टायटल साँग त्याने गायलंय. तरी सिनेमात एका ठिकाणी मनहर उधास आणि सुरेश वाडकरच्या आवाजात मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू अशा ओळी येतात. त्यापाठोपाठ मुन्नाच्या आवाजात ओळी येतात, तेरा सब कुछ मैं, मेरा सबकुछ तू. तेव्हा मोहम्मद अझीजच्या आवाजाचं वजन कळतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल ऐकणाऱ्यांवर इम्पॅक्ट साधण्यासाठी त्यालाच शेवटी का ठेवतात, हेही कळतं.
हेही वाचाः रमेश भाटकरः ते कधीच म्हातारे झाले नाहीत
आखरी रास्तामधल्या तीन गाण्यांपैकी गोरी का साजन साजन की गोरी या गाण्यात एस जानकी सोबत मुन्ना कमाल गायलाय. खरंतर गाणं एकदम साधं सिम्पल आहे. पण त्याने अफाट एनर्जीने ते म्हटलंय. त्यामुळे ते जास्त आठवणीत राहतं.
तीच गोष्ट नगिना मधल्या आजकल याद कुछ और रहता नहीं ची. रफीचं मधुबन में राधिका हे गाणं गाण्यासाठी सोपं वाटतं. तितकंच मुन्नाचं आजकल याद कुछ और वाटतं. यावरून मुन्नाच्या गायकीची आणि त्याला नकलाकार म्हणून हिणवणाऱ्यांच्या कुवतीची कल्पना यावी.
१९९५ला प्रदर्शित झालेला करण अर्जुन हा मुन्नाचा शेवटचा सुपरहिट सिनेमा म्हणावा लागेल. या सिनेमात शाहरुखला त्याने भंगरा पाले या गाण्यात आवाज दिला होता. त्यानंतरही मुन्नाने प्लेबॅक दिलेले सिनेमे रिलिज होत राहिले. पण त्यातील बरेचसे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. मेन हिरोंपेक्षाही साईड हिरोंच्याच प्लेबॅकचं काम त्याच्या वाट्याला येऊ लागलं. तेही हळूहळू कमी कमी होत गेलं.
म्युझिकचा ट्रेंडही झपाट्याने बदलत चालला होता. मोहम्मद अझीजनेच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे तो घरी कधी बसला हे त्यालाही कळलं नाही. वास्तविक या बदलाची नांदी १९९०मधे रिलिज झालेल्या आशिकीनेच झाली होती. या युगाचा आवाज कुमार सानू होता. मुन्ना आणि त्याचे समकालीन अमित कुमार, शब्बीर कुमार, सुदेश भोसले वगैरे मंडळींना काम देणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल युगाचा अस्त झाल्यात जमा होता. आर डी बर्मनदेखील उतरणीला लागलेला. बप्पी लाहिरीची पुण्याई सरत आलेली. अशा स्थितीत या गायक मंडळींना काम देणार कोण?
त्यातूनही अझीजने महानता आणि मृत्युदातामधून पुनरागमनाचे प्रयत्न केले. पैकी महानतामधलं त्याने संजय दत्तसाठी गायलेलं टपका रे टपका गाणं चाललंदेखील. पण त्याचा मुन्नाला फायदा झाला नाही. दुसरीकडे मृत्युदाता हा खुद्द अमिताभसाठीच डिझास्टर ठरला. त्यामुळे मुन्नाची ही इनिंगही व्यर्थ ठरली. यानंतर बी ग्रेड सिनेमे, प्रायवेट अल्बम आणि स्टेज शो मधेच तो रमला.
ओवरऑल पाहिलं तर मुन्नाची म्युझिकल करियर तशी उण्यापुऱ्या पाच सात वर्षांची. पण या त्यातही तो जाम वरायटी गाऊन गेलाय.
क्लासिकल बेसवाली गाणीः पतझड सावन बसंत बहार, आजकल याद और कुछ रहता नहीं
रोमँटिक ड्युएटः मय से मीना से ना साकी से, तेरी मेरी प्यार भरी बातों में, तू मुझे कुबूल मैं तुझे कुबूल, कुछ हो गया हां हो गया, तेरा बीमार मेरा दिल, फूल गुलाब का, उंगली में अंगूठी, प्यार हमारा अमर रहेगा,
सॅड साँगः दुनिया में कितना गम हैं, दिल तेरा किसने तोडा
हेही वाचाः आपण कवी प्रदीपना विसरून चालणार नाही
दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जीतेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सनी देओल, शाहरुख खान, अशा जवळपास तीन पिढ्यांना मुन्नाने प्लेबॅक दिला. गोविंदाची तर सुरवातीची कारकीर्द मुन्नाने प्लेबॅक दिलेल्या गाण्यांनीच सजलीय. त्यात हत्या मधलं मैं प्यार का पुजारी किंवा हम मधल्या कागज कलम दवातचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी एक डान्सिंग अंकल सोशल मीडियावर गोविंदाच्या गाण्यांवर नाचत होता. ते गाणं मय से मीनों से होतं. तेव्हाही मुन्ना कुणाला आठवला नाही.
लता मंगेशकर, आशा भोसलेपासून महेंद्र कपूर, उदित नारायणपर्यंत अनेक गायक गायिकांबरोबर त्याने गाणी गायलीत. त्यात किशोर कुमारही आहे. रफीच्याच स्टाइलने गाणारा अन्वर कुर्बानीच्या टायटल साँगमधे किशोरसमोर साफ उघडा पडलाय. पण जमानासाठी मुन्ना किशोरच्या सोबत किसको कहे हम अपना गातो. तेव्हा त्याचं असं होत नाही. तो किशोरसारख्या दिग्गज गायकासमोर पाय रोवून उभा राहतो.
मोहम्मद अझीज गेल्यानंतर कुठे लिहून आलंय की त्याने दोन हजार गाणी गायलीत. इतकं काम केलंय. शेकडो सुपरहिट गाणी दिली. आजही म्युझिक चॅनल आणि एफएमवर ती वाजत आणि गाजत असतात. रिक्षावाले, ट्रकवाले, बसवाले, टेम्पोवाले तर त्याच्या गाण्यांनाच चिकटून बसलेले असतात. पण गाणं सोपं करणारा हा कलावंत शेवटपर्यंत प्रतिष्ठेच्या आणि मान्यतेच्या शोधात होता. प्रचंड लोकप्रियता मिळूनही मिडिया त्याला विसरून गेला. टीवीवरच्या कोणत्या शोमधे त्याला कधी जज बनवावंस कुणाला वाटलं नाही. कुठे कुठल्या पुरस्कार सोहळ्यात त्याला बोलावलं गेलं नाही. कधी कुठे त्याला मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला नाही.
मुन्नानेच एका इंटरव्यूत म्हटलंय, आपल्याला सगळं काही मिळालं. पण फेस वॅल्यू मात्र मिळाली नाही. ते खरंच होतं. माय नेम इज लखन गाणं लोकांच्या ओठी आजही आहे, पण ते कोणी गायलं हे माहीत नसतं. इमली का भूटा हे दिलीप कुमारचं गाणं असतं. ते मोहम्मद अझीजचं बनत नाही. अनेकदा त्याला स्वतःलाच सांगावं लागायचं, हे माझं गाणं आहे. मी या सिनेमात गायलंय. एका गायकाला हर्ट करणारी दुसरी गोष्ट काय असू शकते? तरीही ती दुःख विसरून तो गाण्यातून शेवटपर्यंत आनंद वाटत राहिला.
मोहम्मद अझीज, शब्बीर कुमार हे केवळ नकलाकार म्हणून संपल्याचं हिणवलं गेलं. पण ते खरं मानावं तर शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकरने काय घोडं मारलं होतं? या सगळ्यांना विसरायला लावणाऱे कुमार सानू आणि उदित नारायण तरी आज कुठे आहेत? बदल तर काळानुसार होणारच. रफीला डोक्यावर घेणाऱ्यांनीच किशोरला उचलून घेतलं. रफीच्या नंतर त्यांनी अन्वर, शब्बीर, मुन्नामधे रफीला शोधलं. रफी त्यांना कितपत भेटला, माहीत नाही. पण एका पिढीच्या सुखदुःखांना जोडणारे अविस्मरणीय क्षण मोहम्मद अझीजने नक्कीच दिले. समीक्षेच्या उठाठेवी करणाऱ्यांना त्याचं मोल कळणार नाही. त्यांच्या फूटपट्ट्यांमुळे आमचा मुन्ना छोटाही होत नाही.
इतरांचं मला माहीत नाही. पण मला आजही कधी प्रेमात पडल्यासारखं वाटलं, माझ्या डोळ्यांसमोर 'ती' तरळत असते, आणि मग कुठून तरी मनात मोहम्मद अझीजचा आवाज रुंजी घालू लागतो
आजकल याद कुछ और रहता नहीं
इक बस आपकी याद आने के बाद
याद आने से पहले चले आईये
और फिर जाईए जान जाने के बाद
हेही वाचाः
ऐश्वर्या, तू आमच्या स्वप्नांना चेहरा दिलास
करण जोहर सेक्शुअॅलिटी उघड करेल?
विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?
(लेखक इतिहासाचे तरुण अभ्यासक असून लोकप्रिय ब्लॉगर आहेत.)