मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.
हा तोच अभिनेता आहे ज्याला आपल्या पहिल्याच ‘मृगया’ सिनेमासाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हाच पुरस्कार त्यानं पुढे आणखी दोन वेळा मिळवला. हा तोच अभिनेता आहे ज्याला ‘मृगया’नंतर दोन वर्षं काहीच काम न मिळाल्यामुळे घरी बसावं लागलं. हा तोच अभिनेता आहे ज्याचं ‘डिस्को डान्सर’नंतर सगळं जग फॅन झालं. हा तोच अभिनेता आहे ज्याचे एका वर्षी सर्वाधिक म्हणजे १९ हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले.
हा तोच अभिनेता आहे ज्यानं १९९५ ते १९९९ या काळात सर्वाधिक आयकर भरला. हा तोच अभिनेता आहे ज्यानं व्यावसायिक हिंदी सिनेमांमधून ‘ब्रेक’ घेतल्यानंतर उटीमधे जाऊन स्वतःची सिनेसृष्टी उभी केली. हा तोच अभिनेता आहे ज्यानं एका हाताचं दान दुसऱ्या हाताला माहिती नको म्हणून आपल्या सामाजिक कामाबद्दल कायम गप्पच राहणं पसंत केलं.
हा तोच अभिनेता आहे ज्यानं सुरवातीला नक्षलवाद, मग डावे पक्ष, मग ममता बॅनर्जी असा प्रवास करत आता भारतीय जनता पक्षाच्या तंबूत प्रवेश केलाय. आणि हा तोच अभिनेता आहे जो आता कोब्रा बनून गरिबांची सेवा करण्याचं सांगत आहे.
मिथुनचा हा एवढा सगळा पट मांडल्यानंतर एकच गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे त्याचं नशीब. मिथुननंच अनेक मुलाखतींमधे अगदी ठामपणे सांगितलंय की, संघर्ष-कष्ट सगळेच करतात. पण, त्याला यशाच्या शिखरावर पोचवण्याचं काम फक्त नशीबच करत असतं. म्हणूनच गेला काही काळ कुठंही चर्चेत नसलेल्या मिथुनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो. काहीच तासांमधे मिथुनवर तब्बल दहा लाख ट्विट्सचा वर्षावही होतो. सगळंच अविश्वसनीय.
पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात तर आत्तापासूनच मिथुनला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. खुद्द मिथुननं या टोकाच्या घडामोडींचा स्पष्ट इन्कार केलाय. मला राजनीती नाही, तर मनुष्यनीती माहितीय असं वक्तव्य त्यानं केलं असलं तरी त्याला स्वतःलाही आपलं नशीब काय करू शकतं, याची पक्की जाणीव आहे. म्हणूनच त्यानं वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर एक मोठा डाव खेळलाय.
कोलकात्त्यामधे बीएस्सी केमिस्ट्री पदवीधर झालेला मिथुन एकेकाळी प्रख्यात गायक, अभिनेता एल्विस प्रेस्लीच्या पदन्यासाचा चाहता होता. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातल्या ‘एफटीआयआय’मधून त्यानं चित्रपट माध्यमाचं प्रशिक्षण घेतलं. दरम्यान नक्षलवादाचंही वळण आलं. त्या वळणाला मागे ठेवून त्यानं ‘मृगया’ सिनेमा साकारला. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुनला नशिबाचं देणं काय असतं याची कल्पना आली.
‘सुरक्षा’ चित्रपटामधला ‘गनमास्टर जी-९’नं मिथुनला स्थैर्य दिलं. तर ‘डिस्को डान्सर’नं त्याला न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता दिली. १९८० ते १९९२ पर्यंत मिथुनचं हिंदी सिनेसृष्टीवर राज्य होतं. या काळात त्याची स्वतःशीच स्पर्धा होती. त्याचे काही सिनेमे आधीचे खूप चालल्यामुळे पडले. अमिताभ बच्चनची कारकीर्द ऐन भरात असताना मिथुननं आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं.
अमिताभ तो अमिताभच होता. पण त्याच्यापर्यंत ज्यांची नजर पोचू शकली नाही, असे अनेक जण या काळात मिथुनवर फिदा झाले आणि ‘गरिबांचा अमिताभ’ ही पदवी अशीच मिथुनच्या नावाला चिकटली. यश, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता आणि त्यातून निर्माण झालेल्या अफवांनाही मिथुन सामोरा गेला.
रोमान्स, ऍक्शन, कौटुंबिक अशा सर्व कथानकांवर आधारलेल्या सिनेमात तो झळकला. १९८० ते १९९० या दशकांमधे तो फक्त काम, काम आणि कामच करत राहिला. त्यामुळेच या दशकात सर्वाधिक सिनेमे त्याच्याच नावावर जमा आहेत. मात्र नशिबाचा तराजू सतत आपल्याच बाजूला कलता राहील, याची मिथुनला स्पष्ट कल्पना असावी. म्हणूनच १९९० दशकाच्या शेवटी नवीन नायकांचं आगमन झाल्यानंतर मिथुननं आपला मोर्चा कर्नाटकातल्या उटीकडे वळवला.
उटीमधे स्वतःचं पंचतारांकित हॉटेल सुरू करून त्यानं आजूबाजूच्या परिसरात झटपट सिनेमा करण्याची नवीन योजना आखली. इथंही नशिबानं त्याला साथ दिली. त्यानं खोऱ्यानं पैसा कमावला. स्वतः तर त्यानं उटीत अनेक सिनेमा केले. इतरांनाही त्यानं इथं भरपूर सेवासुविधा दिल्या. या काळातले इतर काही अभिनेते आपली कमाई लपवण्याचा प्रयत्न करत असताना मिथुननं सलग पाच वर्षं सर्वाधिक आयकर भरला.
दशकभर ‘ए ग्रेड’ दर्जाचे सिनेमे केल्यानंतर हे असले ‘बी, सी ग्रेड’चे सिनेमा करण्याची अवदसा मिथुनवर का आली, अशा प्रश्नांची उत्तरं देत तो बसला नाही. त्या त्या वेळी त्याला जे योग्य वाटलं, ते त्यानं बिनधास्त केलं. अगदी मणीरत्नमसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकालाही त्यानं बी, सी ग्रेडच्या चित्रपटांसाठी नाकारण्याचं धारिष्ट्य दाखवलं. तोच मिथुन कालांतरानं मणीरत्नमच्या ‘गुरु’ सिनेमात दिसला. आपल्या भूमिकांबद्दल किती लवचिक आहे, याची कल्पना आली.
सिनेमे यशस्वी ठरो की अपयशी, त्याचा परिणाम मिथुननं स्वतःवर होऊ दिला नाही. यशानंही तो हुरळला नाही आणि अपयशानंही तो खचला नाही. दरवर्षी सातत्यानं त्याचे हिंदी, बंगाली सिनेमा येत राहिले. इतर कलाकारांचे कोरोनामुळे सिनेमे डब्यात बंद असताना मिथुनचा रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘१२ ओ क्लॉक’ हा सिनेमा या वर्षीच्या जानेवारी महिन्यात प्रदर्शितही झाला. मिथुन सतत पुढे चालत राहिला आणि नशीब जे काही समोर आणून ठेवेल, त्याला तो आनंदानं सामोरा गेला. आताही अगदी तसंच काहीसं घडतंय.
मुंबईत आपली कारकीर्द घडूनही मिथुन पश्चिम बंगालच्या मातीला विसरला नव्हता. तिथं त्याचं नियमित येणं-जाणं होतं. तिथल्या राजकीय घडामोडींची त्याला जाणीव होती. त्या वेळी तो थेट कोणत्याही राजकीय पक्षासोबत नव्हता. मात्र डाव्या पक्षांकडे त्याची विशेष ओढ होती. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यावर त्याचं प्रेम होतं.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यामधला एक महत्त्वाचा धागा बनून त्यानं मुखर्जींना मदत केली होती. तिथूनच ममता बॅनर्जी आणि मिथुन यांच्यातल्या एका नवीन नात्याला सुरवात झाली. फेब्रुवारी २०१४ मधे तो ममतांच्या पक्षातर्फे राज्यसभेचा खासदार बनला. पण फिल्मी कलाकारांना राजकारणात जो शाप आहे, तो याच्याबाबतीतही अपवाद ठरला नाही.
संसदेच्या अधिवेशनात मिथुन फक्त तीन दिवस उपस्थित राहिला. खासदार म्हणूनही त्याच्या नावावर खूप काही चांगलं घडल्याचं कधी कानावर आलं नाही. कालांतरानं कुठंतरी, काहीतरी बिनसलं आणिनि डिसेंबर २०१६ मधे अचानक त्यानं खासदारकीचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना त्यानं आपल्या प्रकृतीचं कारण दिलं होतं.
ते कारण कितपत खरं होतं, याबद्दल शंकाच आहे. कारण त्या काळात मिथुनमधल्या अभिनेत्याचं काम करणं सुरूच होतं. ममतांपासून तो लांब का गेला, हे कारण जेवढं अनुत्तरीत आहे, तेवढंच तो अचानक भाजपाच्या जवळ का आला, हे अनुत्तरीतच आहे.
गेल्या काही वर्षांमधे राजकारण जवळून पाहिल्यामुळे मिथुनला राजकारणातल्या बदलांची जाणीव आहे. म्हणूनच त्यानं भाजपमधे प्रवेश करताना ममता बॅनर्जींना किंवा डाव्या पक्षांना दुखावलेलं नाही. ‘पडद्यावर मी गरिबांच्या बाजूनं उभा राहिलो आणि आताही मी गरिबांच्या बाजूनंच उभा राहतो आहे,’ असं पॉलिटिकली करेक्ट वक्तव्य त्यानं केलं. हे वक्तव्य करताना त्यानं थोडा फार अभ्यास केल्याचंही जाणवतं.
पश्चिम बंगालचा आजवरचा निवडणूक इतिहास पाहता बहुतांशी वेळा केंद्र आणि या राज्यात वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आलं. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर ते जनतेच्या हिताचं ठरेल, ही गोष्ट मिथुनच्या मनात असून तीच मतदारांच्या मनावर पुढील काळात तो बिंबवणार आहे.
निवडणुकीची घोषणा करताना त्यानं स्वतःला कोब्रा म्हणण्याचा आततायीपणा करायला नको होता, असं त्याच्या चाहत्यांनाही वाटेल. कारण खुद्द मिथुननं कधीच कोणाबद्दल अशी कठोर भूमिका घेतल्याचं आजवर समोर आलेलं नव्हतं.
त्याचा कनवाळूपणा सिनेसृष्टीत अनेकदा कानावर आलेला आहे. ‘फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाइड मजदूर युनियन’चा तो काही काळ अध्यक्ष होता. ‘सिने अँड टीवी आर्टिस्ट असोसिएशन’च्या स्थापनेत त्याचा पुढाकार होता. ही संस्था आज मोठी नावारूपाला आली आहे. या संस्थेतर्फे त्यानं अनेक गरजूंना मदत करण्याची भूमिका घेतली.
२०११ मधे एका पडद्यामागच्या तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार या कलाकाराच्या कुटुंबियांना केवळ चार लाख रुपये मिळणार होते. मिथुननं आपलं वजन वापरून या कलाकाराच्या कुटुंबियांना तब्बल १२ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली. पण, अशा चॅरिटीबद्दल तो उघडपणे कधीच बोललेला नाही.
कोरोनाच्या काळातही अनेक सेलिब्रिटींनी केलेली मदत अनेकांना माहितीय. पण, या काळात मिथुन स्वतः बंगळुरूला अडकून पडला होता. तिथल्या गरजूंसाठी त्यानं काम केलं. त्याबद्दल स्वतःहून मात्र काही बोलला नाही. याच काळात त्याच्या वडलांचं निधन झालं. पण नियम तोडून वडलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणं योग्य न वाटल्यानं मिथुन बंगळुरूमधेच थांबला.
नशीबाचं दान मिथुनला आता आणखी एका वळणावर घेऊन आलंय. मिथुननं आता सत्तरीचा टप्पा पार केला आहे. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तो फिट आहे. अभिनेता म्हणून त्याला अजूनही मागणी असली तरी अमिताभसाठी जशा भूमिका लिहिल्या गेल्या, तसा प्रकार मिथुनबद्दल फारसा घडला नाही किंवा या पुढे घडेल असंही वाटत नाही. कदाचित म्हणूनच राजकारणाच्या मोठ्या पटलावर येण्यासाठी मिथुनला हा काळ योग्य वाटला असावा.
मुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं. मिथुन तर नेहमीच स्वप्नांच्या मागे धावत राहिलाय. म्हणूनच तो कधी एका जागी फार काळ स्थिरावू शकलेला नाही. त्यानं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजूही त्याला माहितीय. म्हणूनच भाजप प्रवेशाबद्दल तो ‘उडता हुआ कौआ डाली पे बैठ गया,’ अशी सूचक संवादफेक करू शकला.
थोडक्यात इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. मिथुन उत्तम डान्सर आहे. पुढचा संपूर्ण दीड महिना पश्चिम बंगालमधे त्याची पावलं, त्याच्यातला अभिनेता, त्याची वाणी थिरकणार आहे. मिथुन म्हणतो त्याप्रमाणे या काळात सगळेच पक्ष मेहनत घेतील. पण नशीब ज्याच्यावर फिदा आहे, तोच बंगालचा सिकंदर बनेल.
(मंदार जोशी यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )