मीराबाई चानू: रिओतला अर्ध्यावरचा डाव ते टोकियोतला चंदेरी पदकापर्यंतचा प्रवास

२७ जुलै २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.

संधीचं सोनं प्रत्येकालाच करायचं असतं. मीराबाई चानूला पाच वर्षांपूर्वी रिओत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च व्यासपीठावर खेळताना तिच्या नावापुढे did not finish असं लिहून आलं.

वेटलिफ्टिंगच्या आणि ऑलिम्पिक नियमानुसार आवश्यक वजन उचलता न आल्याने तसं लिहून आलं. हरण्यापेक्षाही हे वाईट होतं कारण तुम्हाला खेळताच आलं नाही असं ते वाक्य सूचित करत होतं. २१ वर्षांच्या मीराचा चेहरा अश्रूंनी डबडबलेला होता. लहान वयात मोठी संधी मिळालेली. पण घडलं हे असं. स्पोर्ट्स इज क्रुएल वर्ल्ड असं म्हणतात. त्याचा प्रत्यय मीराबाईला सर्वोच्च अशा जागतिक व्यासपीठावर देशाचं प्रतिनिधित्व करताना आला.

क्रीडाविश्वाचा मानबिंदू असणाऱ्या ऑलिम्पिकमधे पुन्हा खेळायला मिळेल, नाही मिळेल काहीच ठाऊक नव्हतं. चार वर्षात जग बदलतं. यावेळी तर उणीपुरी पाच वर्ष सरली. शनिवारी तो क्षण पुन्हा अवतरला. पाच वर्ष केलेली मेहनत, मिळालेली पदकं, अमेरिकेत जाऊन केलेला सराव, घरच्यांपासून दूर राहण्याची केलेली सवय हे सगळं लक्षात ठेऊन मीराबाईने ऑलिम्पिक पदकावर नाव कोरलं.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

मीराच्या यशाने पॉझिटिवीचा टेडटॉक

गेले दीड वर्ष कोरोनाने आपल्या सगळ्यांचं आयुष्य झाकोळून टाकलंय. कोरोनाचं थैमान असतानाच गेल्या वर्षी राज्यात वादळ आलं होतं. यंदा कोरोनाचं थैमान कमी होत असताना आक्रीत पाऊस आला. कोरोनामुळे ठप्प झालेलं दैनंदिन आयुष्य पूर्वपदावर आणण्याची सामान्य माणसाची धडपड सुरू असताना निसर्ग तडाखा देतो आहे.

माणसं गमावल्याचं दु:ख अनेकांच्या पदरी आहे. अनेकांनी स्वत:च कोरोनाचा त्रासदायक अनुभव घेतलाय. अनेकांची रोजीरोटी कोरोनाच्या नावाखाली हरवलीय. ज्यांची शिल्लक आहे त्यांच्या पुंजीत घट झाली आहे. लॉक आणि अनलॉक, आयसोलेट आणि सोशल डिस्टन्स, लशीसाठीची धडपड, हॉस्पिटल-वेंटिलेटरसाठी वणवण, स्मशानाबाहेरच्या रांगा हे सगळं चित्र विदारक आहे.

कोरोनाचे आकडे कमी होत असले तरी कधीही धडकू शकणाऱ्या लाटेची भीती आहे. जी काही कामं आहेत ती उरकून घ्या, लाट आली तर पुन्हा घरी बसायचंच आहे हा घराबाहेर पडण्यामागचा विचार आहे. पॉझिटिवीचे टेडटॉक अशावेळी कामी येत नाहीत. श्रांत मनाला उभारी देण्यासाठी घासूनपुसून केलेल्या मेहनतीचा आविष्कार लागतो. मीराबाईच्या पदकाने खंडप्राय पसरलेल्या देशवासीयांना उत्साहाने साजरं करण्यासाठी निमित्त मिळालं.

पाच वर्षांच्या मेहनतीचं फळ

मीराबाई मणिपूरची. मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळपासून तिचं गाव २०० किलोमीटर दूर आहे. शहरी चकचकाटापासून खूप दूर. निमशहरं, शहरं होऊ पाहणारी गावं, छोटी गावं यांना बळ देणारं हे पदक. आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी गडबड झाली, संधी गेली. संपलं- असं नसून दिमाखात पुनरागमन करता येतं याचं हे पदक द्योतक आहे.

मुळात स्वत:च्या वजनाच्या तिप्पट जड वजन उचलणं हाच मुळात कठीण विषय आहे. पाच वर्ष सातत्य टिकवणं, वजन उचलण्यासाठी फिट ठेवणं, डाएट फॉलो करणं, चुका कुठे होत आहेत, प्रतिस्पर्धी काय करतात याचा अभ्यास करणं या सगळ्याची फलश्रुती म्हणजे हे पदक आहे.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

यशाला अनेक कंगोरे

मीराबाई ओजीक्यू अर्थात ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संस्थेशी संलग्न आहे. टार्गेट ऑलिम्पिक स्कीम ही सरकारची योजना. मीराबाई त्याची लाभार्थी आहे. ओजीक्यू आणि टॉप्सच्या माध्यमातून मीराबाईला प्रगत सरावासाठी अमेरिकेला धाडण्यात आलं.

कोरोनाच्या काळात परदेशी जाणं म्हणजे दिव्यच. कागदपत्रांची पूर्तता होऊन मीराबाईच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केलं. दुसऱ्या दिवशीपासून अमेरिकेने भारतीय विमानांचं येणं थांबवलं. भारताचे माजी हॉकीपटू वीरेन रस्क्विन्हा त्या अवघड काळाबद्दल आज टीवीवर सांगत होते.

गेले अनेक वर्ष मीराबाईला वर्षातून काही दिवसच घरी जायला मिळतं हेही त्यांनी सांगितलं. स्पर्धा आणि सराव यामुळे घरी जाऊन निवांत आयुष्य अनुभवण्याची संधी अगदीच दुर्मीळ. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे किती कंगोरे आहेत.

घडवणारा एक मराठमोळा हातही

पाच वर्ष मीराबाईचा प्रवास अविरत सुरू होता. या कष्टांना पदकाचं कोंदण लाभणं मीराबाईइतकंच आपल्यासाठीही महत्त्वाचं. नुसतेच काबाडकष्ट उपसण्यात कसला गेम आलाय?

मीराबाईला वजन उचलण्याच्या कामासाठी फिट ठेवण्यात आलाप जावडेकर या मराठमोळ्या व्यक्तीचा सहभाग आहे. मीराबाईच्या प्रशिक्षकांचा म्हणजे विजय शर्मा, संदीप कुमार यांचा मोठा वाटा आहे. अमेरिकेतल्या निष्णात स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच डॉ. आरोन हॉर्चिग यांचं योगदानही विसरून चालणार नाही.

एका पदकामागे किती जणांचे कष्ट असतात. मीराबाईच्या आज शेकडो मुलाखती झाल्या असतील. पण तिला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणारे अनेक हात पडद्यामागेच राहतील. त्या अज्ञात हातांना ऊर्जा देणारं हे पदक आहे. पदकांची पोतडी भरत राहो!

हेही वाचा: 

विराट असा कसा तू वेगळा वेगळा

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?