मेस्त्री गुरूजी: नाट्यक्षेत्रातल्या एका स्त्रीपार्टी भूमिकेचा प्रवास

१० डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


भालचंद्र महादेव मेस्त्री यांचं ’मेस्त्री गुरूजी’ हे त्यांच्या नाट्यकला प्रवासावर आधारीत पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मेस्त्री गुरूजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होतेच पण त्याहूनही ते ओळखले जातात ते नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या ’स्त्रीपार्टी’ भूमिकांमुळे. याच त्यांच्या अनोख्या प्रवासाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे.

कोकणात खेळे, नमन, दशावतार, तमाशा, जलसा, आणि नाटक यांची परंपरा आहे. मेस्त्री गुरूजींनी लहान वयापासूनच नाटकांतून अभिनयाला सुरवात केली. त्याकाळी महिलांना नाटकात काम करण्याची मुभा नव्हती. त्यामुळे मेस्त्री गुरूजींच्या वाट्याला आल्या त्या स्त्री भूमिका. तेही आढेवेढे न घेता या भूमिका करू लागले.

अशा भूमिका करताना शारीरिक आणि मानसिक अवस्था महत्वाची असते. काही काळासाठी का होईना मनोवस्थेत लिंगबदल करून वावरावं लागतं. याला क्रॉस ड्रेसिंग म्हणतात. हे क्रॉस ड्रेसिंग करणं हे काम सोपं नसतं.

पुरूषांनी स्त्रीचे बाह्य तपशिल सांभाळत, मानसिक पातळवरही स्त्री भूमिकेशी एकरूप व्हावं लागतं. कोणत्या प्रकारच्या उर्जेचं विनमय केल्यावर नाटकातल्या कोणत्या लिंगाची व्यक्तिरेखा साकारता येते. या पद्धतीची योजना भारतीय नाट्य परंपरेत आणि पर्यायानं भारतीय शास्त्रीय नृत्यांमधे दिसून येते.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

पुरुषांच्या स्त्री-भूमिकेवर बंदी

युरोपात साधारणतः किशोरवयीन मुलंच स्त्री-भूमिका करायचे. पण १५५७ला माद्रिदला कायद्यानं स्त्रियांनी स्त्री-भूमिका करायला परवानगी मिळाली. तत्कालीन स्पॅनिश नाटकांमधे नाच-गाण्यांचं प्रमाण लक्षणीय असल्यानं, नृत्याच्या निमित्तानं स्त्री-नटांचा मंचावर प्रवेश झाला आणि अनेक स्त्री-नट स्पॅनिश रंगभूमीवर प्रस्थापित झालं.

स्त्री-भूमिका करणारे किशोरवयीन पुरुष-नट आणि स्री-भूमिका करणारे स्त्री-नट यांच्यात सारखी चढाओढ चालायची आणि त्यामुळे भांडणं नाहीतर मारामारी व्हायची. हा प्रकार एवढा पराकोटीला गेला की, १६१५ला कायदा करुन पुरुषांनी स्त्री-भूमिका करायला बंदी घालण्यात आली.

मराठी रंगभूमीवरचे स्त्रीपार्टी कलावंत

आपल्या मराठी रंगभूमीचं दीडशे वर्षांचं वैभव आणि परंपरा मिरवता येण्याचं केवळ आणि केवळ एकच कारण म्हणजे १८४३ ते १९२०-२५ पर्यंतच्या ७५ वर्षांत आपल्या रंगभूमीला लाभलेले असंख्य स्त्रीपार्टी कलावंत. किर्लोस्करांच्या नाटकांत स्त्रीपार्टी काम करून नावारूपाला आलेले शंकरराव मुझुमदार, भाऊराव कोल्हटकर, कृष्णराव गोरे, महाराष्ट्राला लाभलेलं वैभव नारायणराव राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’, देवलांची ‘दुर्गा’ साकारणारे विनायकराव कवठेकर, विष्णुपंत वाटवे.

तर जनुभाऊ निमकर, ‘ललितकलादर्श’ला वैभव मिळवून देणारे ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले, पहिली ‘शारदा’ रामा डवरी, मराठी रंगभूमीवरची ‘पहिली विधवा स्त्री’ म्हणून ‘विकेशा’ बनलेले काशिनाथ करमरकर ज्यांना ‘काशा बोडकी’ म्हणून चिडवलं जायचं, भीमसेन जोशींचे गुरू ‘सवाई गंधर्व’ म्हणजे रामभाऊ कुंदगोळकर, मास्टर नरेश, बाळकोबा नाटेकर, अशी असंख्य नावं आहेत. या नंतर जेव्हा स्त्रिया नाटकात काम करू लागल्या तेव्हा बालगंधर्वांनी नाक मुरडलं. ही कला आहे का, असा सवाल बालगंधर्वांनी केला होता.

हेही वाचा: सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

पुरुषी मनोवृत्तीचा अनुभव

मुळात पुरूषाला स्त्रीवेषात बघायला लोकांना आवडत असेल तर ते का? त्याची काय कारणं असतील? महिला आणि पुरूष यांचा याबद्दलचा दृष्टिकोन स्वतंत्र असू शकतो. पुरूष प्रेक्षक स्त्रीपार्टीच्या बाह्यांगाकडे अधिक पहातो, भुलतो. तर महिला प्रेक्षकांसाठी स्त्रीपार्टीची भावनिक गुंतवणूक महत्वाची ठरते.

यातल्या पुरुषी मनोवृत्तीचा एक अनुभव स्वत: मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यावरही बेतला होता. गडकर्‍यांच्या ‘भावबंधन’मधली ‘लतिका’ ते साकारत. हैदराबादमधल्या राजा दीनदयाळ यांच्या स्टुडिओत स्त्रीवेषातल्या दीनानाथांना पाहून काही पुरूषांच्या काळजाचा ठोका चुकला. ती स्त्री नाही, तो पुरुष आहे, असं सांगूनही लोक लगट करू लागले. अखेर दीनानाथांना स्टुडिओच्या मागच्या दरवाजातून पळून जावं लागलं.

१९९८ पर्यंत स्त्री भूमिका

मेस्त्री गुरूजी हे स्त्रीपार्टी करत असले तरी ते तसे मोठ्या नाटक कंपनीत नव्हते. पूर्णवेळ नटही नव्हते. त्यांची नाट्य कारकीर्द ही कोकणातली. त्यामुळे दुर्गम भागात काम करताना ग्लॅमर, प्रसिद्धी तशी दूरच. मात्र मेस्त्री गुरूजींनी ज्या भूमिका केल्या त्या स्वत:च्या आनंदासाठी. कदाचित स्वत:च्या अभिव्यक्तीची गरज म्हणूनही.

अशा भूमिका साकारताना तेच महत्वाचं असतं. त्यांची भूमिका पाहतांना समोरच्या महिला प्रेक्षक भावुक व्हायच्या, डोळ्याला पदर लावत, असं ते या पुस्तकात लिहितात. हे घडलं असेल तर त्यांच्या अभिनयातून सोशिकपणा, कारूण्य अस्सलपणे उतरल्यामुळे.

मालवण मधल्या प्राथमिक शाळेतच मातृभक्ती या नाटकांतून सुरू झालेला प्रवास मेस्त्री गुरूजींनी या पुस्तकात मांडला आहे. शालेय जीवनापासून मुलंबाळं मोठी होईपर्यंत म्हणजे १९९८ पर्यंत ते स्त्री भूमिका साकारत होते. कोणकोणत्या नाटकात कधी कुठल्या भूमिका केल्यात याची माहिती मेस्त्री गुरूजींनी साधारण या पुस्तकात मांडली आहे. खरंतर या भूमिका साकारताना येणारे अनुभव विस्ताराने मांडले असते तर चांगलं झालं असतं.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

'स्त्री' वेषात पुरुष

मेस्त्री गुरूजींनी मुख्यत: विविध स्त्री भूमिका साकारल्या. कलावंताने नाटकाची गरज म्हणून साडी घालणं आणि क्रॉस ड्रेसिंग मनापासून स्विकारणं हे दोन भाग आहेत. मोरूची मावशी, वासूची सासू अशी नाटकं असोत की अशी ही बनवाबनवी सारखा सिनेमा असो, यात भूमिकेची गरज म्हणून सचिन पिळगावकर किंवा दिलीप प्रभावळकरांनी स्त्री वेश केला.

पुरुषाने अंगावर साडी चढवणं हा दीव्य अनुभव असतो. ’जोगवा’ सिनेमात साडी चढवताना किशोर कदम सारखा कसलेला नटही कसा शहारला होता ते त्याने लिहिलंय. याबद्दल मेस्त्री गुरूजींचे अनुभव ऐकायला आवडले असते.

'स्त्री' होणं पत्नीला अस्वस्थ करणारं

मेस्त्री गुरूजींनी एक महत्वाची गोष्ट या पुस्तकात मांडली आहे. ती म्हणजे त्यांनी स्त्रीपार्टी साकारण्याबद्दल पत्नीची नापसंती. अशा कलावंताच्या जीवनातलं खरं नाट्य इथंच सुरू होतं. मेकअप करत हातात बांगड्या भरून साडीत लकबीनं चालणारा नवरा लोकांची वाहवा मिळवत असेलही, पत्नीला मात्र नवर्‍याचा असा शृंगारी अवतार पचवणं अवघड असतं.

मेस्त्री गुरूजींच्या पत्नी उषाबाई अर्थात माई या काही आठामुठ्या स्वभावाच्या नाहीत. दोघांचीही प्रेरणा म्हणजे साने गुरूजी. त्या विचाराने काम करणारं हे दाम्पत्य. पण पत्नी म्हणून नवर्‍याबद्दलची ही भावना त्यांना टोचत होती. हीच स्त्री सुलभता. आणि त्यातूनच आपली नाराजी माई मांडत राहिल्या. नाटकातल्या नटीशी बोलणारा नवरा जसा संशयाची सुई हलवून जातो, तसाच स्त्री झालेला नवरा पत्नीला अस्वस्थ करत असतो.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

नाटक, कुटुंबाला तितकंच महत्व

खरंतर मेस्त्री गुरूजींसाठी स्त्रीपार्टी ही अधिक भावणारी, जवळची होती. त्यांनी इतरही खलनायक, इन्सपेक्टर अशा काही भूमिका करून पाहिल्या. पण ते अधिक रमले स्त्रीपार्टीतच, हे वास्तव आहे. त्यातच ते लक्षवेधीही ठरत. हे का घडतं?

माणसांत अनेक भावभावनांची रसायनं भरलेली असतात. अनेक कलावंतांच्या बाबतीत असं घडतं की उपजत स्त्रैणभावाची जाणीव झाल्यानंतर त्याचा अविष्कार भूमिकांतून त्यांनी केलेला आहे. हे स्वत:ला समजणं कठीण नसतं, पण इतर कुणाला समजावून सांगणं मात्र अवघड असतं. कौटुंबिक कलहाला इथूनच सुरवात होते.

मेस्त्री गुरूजींनी ते सावधपणे टाळलं. आपल्या मनस्वी आनंदाला सोडून दिलं. ही गुंतागुंत हाच खरा नाटकाचा विषय आहे. असो. जितकं जमलं तितकं केलं असं स्वत:ला समजावत मेस्त्री गुरूजींनी कुटुंब महत्वाचं मानत त्याला अग्रक्रम दिला.

गुरुजींच्या नाट्याभिनयाचा सन्मान

स्त्रीपार्टी करणार्‍या मुठभर कलावंतांचा अपवाद सोडला तर प्रतिथयशपण सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. एकतर जीवतोडून काम करणार्‍या अशा कलावंतांची टिंगलटवाळी, अवहेलनाच होत असते. नुकताच एक तामिळ सिनेमा येऊन गेला. परियेरूम पेरूमल या सिनेमातल्या हिरोचे वडील स्त्रीपार्टी करणारे दाखवलेत. मात्र त्यांची जी अवहेलना दाखवलीय ती पाहवत नाही.

पुस्तकात पुसटसाच उल्लेख असला तरी मेस्त्री गुरूजींच्या वाट्याला असला अवहेलनेचा प्रकार आलेला नाही. याचं कारण असं की ते पेशाने शिक्षक होते. दुसरं म्हणजे त्याकाळी प्रेक्षक चांगले असावेत. स्त्रीपार्टी करणार्‍या कलावंतांचं उर्वरीत जीवन ही शोकांतिकाच ठरत असते. अगदी बालगंधर्वही यातून सुटले नाहीत. मेस्त्री गुरूजींची जीवनशैली अशी होती की कुठलंही व्यसन त्यांना नव्हतं. शिकवायचं कामही त्यांनी प्रामाणिकपणे केलं.

आपली आवडनिवड बाजूला ठेवत माईंसोबत कुटुंबाची जबाबदारी त्यांनी नीट पार पाडली. यामुळेच मेस्त्री गुरूजींच्या ८० व्या वर्षी त्यांच्या मुलांनीच हे पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या नाट्याभिनयाला मानसन्मान दिलाय. स्त्रीपार्टी करणार्‍या मेस्त्री गुरूजींनी एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय.या पुस्तकाचं संपादन त्यांची मुलगी उल्का, सजावट मनोज आणि निर्मिती विनायक या मुलांनी केली आहे.

हेही वाचा: 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो