मार्गशीर्षातल्या गुरुवारांचं व्रत हा तर फ्रॉड

०३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. राज्यभर घरोघरी बायका लक्ष्मीच्या व्रताची सांगता करत आहेत. पण हे व्रत जुनं नाही. १९६२ला याची पोथी पहिल्यांदा लिहिली गेलीय. नुसता नारळ पुजून लक्ष्मी मिळत नाही, असं आपली संस्कृतीही सांगते. तरीही आपण अशा व्रतांच्या नादी लागून स्वतःचीच फसवणूक करून घेतो.

स्टार प्रवाह नावाचं एक मराठी चॅनल आहे. खूप प्रयत्न करूनही ते काही पुढे सरकत नाही. त्यात एक सिरीयल आहे, छोटी मालकीण. स्टोरी नेहमीचीच आहे. श्रीमंत गरीब, कुलीन कष्टकरी असा क्लासमधला झगडा आणि त्याला लवस्टोरीची फोडणी.

१२ डिसेंबरच्या एपिसोडमधे त्यात हिरोईन रेवतीच्या सासरी आणि माहेरी दोन्ही घरात मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मीची पूजा होताना दाखवलीय. माहेर श्रीमंत आहे. तिथली पूजा शाही आहे. सासर गरीब आहे. तिथे गरिबांची पूजा आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी तिला लक्ष्मी पावतेही. तिच्या शिकलेल्या पण गरीब नवऱ्याला चांगली सरकारी किंवा निमसरकारी नोकरी लागते.

आता सरकारी नोकरी इतकी सोपी असती तर मुलांनी परीक्षेसाठी अभ्यास न करता, मोर्चे आंदोलनं न करता मार्गशीर्ष गुरुवाराची व्रतच केली असती. पण गुरुवारचं मार्गशीर्षाचं व्रत केल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते, ही महाराष्ट्रातल्या लाखो बायकांची भाबडी श्रद्धा आहे. तिला खतपाणी घालून आपला टीआरपी वाढत असेल, तर बघावं, असा प्रयत्न स्टार प्रवाहने केलेला दिसतोय.

लोकसत्तातही मार्गशीर्ष गुरुवारांचं मार्केटिंग

स्टार प्रवाहचं ठीकाय पण लोकसत्तासारखं प्रतिष्ठित वर्तमानपत्रंही त्याला बळी पडलंय. लोकसत्ता मार्गशीर्ष असा सर्च केल्यावर लोकसत्ताच्या वेबसाईटवरची लिंक सगळ्यात वर येते. ती १३ डिसेंबर म्हणजे यंदाच्या पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी प्रकाशित झालेली बातमी आहे. `जाणून घ्या मार्गशीर्षातील गुरुवारचे महत्त्व`. लोकमान्य लोकशक्ती असणाऱ्या आणि प्रबोधनाचा वसा उचललेल्या लोकसत्तानेच हे महत्त्व सांगितल्यामुळे ते सगळ्यांना मान्य करावंच लागेल.

 

 

महाराष्ट्रातील परंपरेचं दर्शन घडवणारी एक प्रथा अशी भलामण करत या बातमीत लोकसत्तावाले लिहितात, `जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.`

दुकानदारांना लक्ष्मी मिळवून देणारं व्रत

मार्गशीर्षातल्या गुरुवार व्रताचं हे मार्केटिंग भन्नाट आहे. किंवा या व्रताच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचेही हे प्रयत्न असू शकता. ती लोकप्रियता जबरदस्तच आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानेच `मासानां मार्गशीर्षोहम`. सगळ्या महिन्यांमधे मी मार्गशीर्ष आहे. म्हणजे हा महिना इतर महिन्यांपेक्षा महत्त्वाचा आहे. तरीही श्रावणाच्या समोर त्याचं महात्म्य वर्षानुवर्षं कुणाच्या खिजगणतीत नव्हतं. पण गेल्या दोनेक दशकांपासून निदान महाराष्ट्रात तरी मार्गशीर्ष हा महिना श्रावणाच्या कॉम्पिटिशनमधे उतरलेला दिसतो. ही क्रांती करून दाखवलीय ती ‘श्रीमहालक्ष्मी महात्म्य’ या दोन पाच रुपयांच्या छोट्या पुस्तकानं.

मार्गशीर्ष आला की दुकानदारांना व्रत न करताही लक्ष्मी पावते. फुलं, फळं, नारळ महाग होऊन जातात. मार्गशीर्षातल्या गुरुवारांच्या पूर्वसंध्येला एरव्ही पाच रुपयाला मिळणारा गजरा पन्नास रुपयांपर्यंत जातो. मार्गशीर्षातल्या पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी तर मार्केटात पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय श्रीलक्ष्मी महात्म्य पूजा विधी या पुस्तकाच्या दहाबारा प्रती घरी असल्या तरी हे पुस्तक घेण्यासाठी दुकानांमधे गर्दी होते.

व्रताची कथा तर निव्वळ बकवास

धार्मिक मंडळी या लहानशा पुस्तिकेला पोथी म्हणतात. दरवर्षी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करताना याची पाच पुस्तकं वाटावी लागतात. पण हे पुस्तक खरं तर पुस्तक म्हणण्याच्याही लायकीचं नाही. त्यातल्या काही पुस्तकांवरचं रंगसम्राट रघुवीर मुळगावकरांचं श्रीलक्ष्मीचं अप्रतिम चित्र वळगता हे तद्दन फाल्तू आहे. यात निव्वळ थोतांड आणि थोतांडच आहे. किंबहुना आजवर ज्यांना आपण थोतांड म्हणतो, अशांनाही दर्जेदार म्हणावं इतकं ते बकवास आहे.

आता देवधर्म वगैरे म्हटल्यावर असं काही म्हणण्याची पद्धत नाही. पण याचा खरंच देवधर्माशी काही संबंध आहे का? बायकांनी धर्म टिकवलाय असं म्हटलं जातं. पण हा टिकवलेला धर्म पाहिला की असा धर्म कशाला टिकवला, असं वाटायला लागतं. लक्ष्मी महात्म्य व्रत कथा किंवा महालक्ष्मी व्रताकडे बघितलं की या विधानाची सत्यता शंभर टक्के पटते. त्यालाच केसरीव्रत, वैभवलक्ष्मी व्रत असंही म्हणतात.

पण मार्गशीर्षातले गुरुवार हेच याचं लोकप्रिय नामानिधान. पैसे मिळवण्यासाठी आणि आलेलं धन जाऊ नये यासाठी हे व्रत केलं जातं. यात एका तांब्यात नारळ, पाच प्रकारची फळं, पाच प्रकारची पानं आणि लक्ष्मीयंत्राचं चित्र याचं पूजन केलं जातं. त्यानंतर ही पुस्तिका वाचली जाते. त्यात गुरुवारची कहाणी आहे. उद्यापनाच्या दिवशी पाचजणींना ही पुस्तिका वाटली जाते.

व्रत करा, श्रीमंत व्हा

ही गुरुवारची कहाणी द्वापारयुगातल्या आणि सौराष्ट्रातल्या राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका यांची आहे. देवी लक्ष्मीला गरिबांच्या घरी जायचं नसतं, कारण ते तिला खाऊन संपवतात. लोकांच्या उपयोगी पडावं म्हणून लक्ष्मी एका म्हातारीच्या वेषात राजाकडे येते. पण सुरतचंद्रिका राणी तिला हाकलून देते. पण राजकन्या शामबाला मात्र म्हातारीचा सन्मान करते. तिने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीचं व्रत करते. त्यामुळे शामबालेचं लग्न होतं. तिच्या सासरी समृद्धी येते. 

सुरतचंद्रिकेकडे मात्र गरिबी येते. दरिद्री झालेला राजा मुलीकडे येतो. मुलगी धनाचा हंडा देते. पण लक्ष्मीच्या अवकृपेने त्या धनाचे कोळसे होतात. मुलीने कोळसे पाठवले म्हणून आई रागावते. मुलगी माहेरपणाला आलेली असताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवते. पण ती माहेरहून एक चिमूट मीठ घेऊन जाते. माहेरहून काय आणलंस, असं विचारल्यावर ती नवऱ्याला सांगते, राज्याचं सार आणलंय. मग अळणी जेवणात मीठ घालून त्याला जिंकते. 

पुढे लेक आईलाही व्रताचं मोठेपण पटवते. ती व्रत करते. पुन्हा राज्य आणि समृद्धी मिळते. अशी ही कहाणी सफळसंपूर्ण होते. यात एक सुरतचंद्रिकेच्या पूर्वजन्माचा फ्लॅशबॅकही आहे. तेव्हा ती गरीब असते. नवरा तिला मारत असतो, छळ करत असतो. ती हे व्रत करते, म्हणून पुढच्या जन्मात राणी बनते.

पुराण तरी खूपच बरी

ही पद्मपुराणातली कहाणी असल्याचं या पुस्तिकेत लिहिलेलं आहे. कमी समज असणाऱ्यांसाठी पुराणांमधल्या कहाण्या सांगण्यात आल्या आहेत. पण गेली शेकडो वर्षं ही पुराणंच धर्माच्या नावाने राज्य करत आहेत. जन्मभर बाराखडीच गिरवावी आणि आपण सुशिक्षित असलेल्याचं सांगावं, तसं हे आहे. पुराणातल्या व्रतांना धार्मिकता किंवा अध्यात्मातली फारतर पहिली पायरी म्हणता येईल. त्या पहिल्या पायरीवरच राहणाऱ्यांना मूर्ख म्हणायला हवं आणि सर्वसामान्यांना या पहिल्या पायरीवरच ठेवणाऱ्यांना स्वार्थी.

संतांनी त्याविरुद्ध कायम बंड केलं. पुढे एकोणिसाव्या शतकातल्या समाजसुधारकांनीही याविरुद्ध आवाज उठवला. ब्राम्हो समाजापासून प्रार्थना समाजापर्यंत आणि विवेकानंदांपासून दयानंदांपर्यंत सगळ्यांनी धर्मसुधारणा वैचारिकतेच्या अग्रक्रमात आणली. गाडगेबाबा, तुकडोजीबाबांसारख्या अध्यात्मिक नेत्यांनीही हीच परंपरा पुढे चालवली. महात्मा फुलेंच्या परंपरेतल्या सत्यशोधकांनी तर या थोतांडांची सालटी काढली. प्रबोधनकार ठाकरेंनी शनिमहात्म्य, सत्यनारायण आणि व्यंकटेशस्तोत्र या पॉप्युलर व्रतवैकल्यांना फोडून काढलंय, ते मुळातून वाचायला हवं. या सगळ्यांनीच पुराणांवर, चमत्कारांवर, निर्बुद्ध कर्मकांडांवर सडकून टीका केलीय. तरीही आपण आजही त्यातून बाहेर पडायला तयार नाही.

हे महालक्ष्मीचं व्रत पुराणाचं नाव घेऊन सांगितलं जातं. पण त्याला पुराणाचाही आधार मिळत नाही. पुराणातल्या बहुतांश कथांमधे निदान काहीतरी बोध असतो. काहीतरी सद्गुणांचा आग्रह धरलेला असतो. काही नसलं तरी निदान दोन घटका चमत्कृतीजन्य मनोरंजन असतं. पण या पोथीत यापैकी काहीच नाही. असलाच तर दुर्गणांचाच परिपोष आहे. हातपाय न हलवता केवळ नारळ पुजून लक्ष्मी मिळण्याची बिलकूल शक्यता नाही. अशाच ढोंगांमधून आलेल्या आळसामुळे आपलं आजवर मोठं नुकसान झालेलं आहे. पण या व्रतात आणि त्याच्या कहाणीत त्यादृष्टीनेही काहीच हाती लागत नाही. त्यामुळे हे व्रत फोलफटासारखं कचराकुंडीत टाकूनच द्यायला हवं. खरा देवधर्म तोच आहे. 

व्रताचा लक्ष्मीकडे बघायचा दृष्टीकोन चुकीचा

खरंतर भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला मोठा मान आहे. भरपूर पुरुषार्थ करा आणि भरपूर कमवा, असंच आपली परंपरा सांगत आलीय. दोनचार अपवाद वगळले तर आपले सगळेच ऋषीमुनी आणि देवदेवता छान कमवून, सोनं नाणं अंगावर लेवून, पोराबाळांसह सुखी संसार करणारे होते. वेदांमधलं श्रीसुक्तम् हे एकच सुक्त दाखला म्हणून पुरेसं आहे. पण निवृत्तीमार्गाच्या प्रभावाने हा विचार अनेक वर्षं झाकला गेलाय. मग पैसे कमवणं हे काहीतरी अनैतिक आणि धर्मविरोधी मानलं गेलं. 

अशावेळेस एक धार्मिक व्रत भरपूर धनाची ग्वाही देतं. त्यात फारसा खर्च नाही. वर ते पंधरा मिनिटात आटोपतं आणि वर्षातून फक्त चार किंवा पाच वेळेस करावं लागतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. हे व्रत केलं आणि पैसे मिळाले तर उत्तमच. नाही मिळाले तरी ठिकाय. असा विचार करून हे व्रत घरोघर पोचलं असावं. शिवाय याची नायिका राणी सूरतचंद्रिका गेल्या जन्मात नवऱ्याचा मार वगैरे खाणारी आहे. त्यामुळे तिच्याविषयी माहेरच्या साडीतल्या अलका कुबलला किंवा आजच्या सास बहू सिरियलमधल्या सोशिक सुनांना मिळते तशी एक सहानुभूतीही आहे.

साठच्या दशकातलं पुस्तक आता प्राचीन बनलंय

या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे व्रत काही जुनंपुराणं मुळीच नाही. याची पहिली आवृत्ती १९७३ सालची आहे. त्यांच्या पोथीचा लेखक मिलिंदमाधव आहे. तोच स्वतः म्हणतो की हा ‘ग्रंथ’ ‘शके अठराशे चौऱ्याण्णौ’ला लिहून पूर्ण झाला. शके वगैरे म्हटल्यावर आपल्याला हे जुनं वाटतं. पण शके १८९४ म्हणजे आपलं १९६२ साल. 

भारत चीन युद्ध झालं आणि शम्मी कपूरच्या जंगली सिनेमातलं याहू गाणं गाजत होतं, ते हे साल. तेव्हा याची मूळ गुजराती कथा लिहिली गेली असावी. आता ही कालपरवाची पोथी आपण प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून पूजा करणार असू तर आपलं कठीणच आहे.

केवळ पुस्तकांची तुफान विक्री व्हावी, निव्वळ याच हेतूने पुस्तक प्रकाशकाने हे व्रत आपल्या माथी मारलं असावं. पुस्तकातल्या पूजाविधीत ही पोथी पाच जणाना दान देण्याचे उल्लेख आहे. काही प्रकाशकांनी तर या वाक्याखाली रेषा मारून ठसवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. तरीही आज लाखो बायका हे व्रत करत आहेत आणि करत राहणार आहेत. त्यातून प्रकाशकांचं फावणार आहे.
आपल्याला व्रतवैकल्यांच्या नादी लावण्यासाठी एक नवं पुस्तकं प्राचीन व्रताची कथा म्हणून आपल्या माथी मारणारा मोठाच फ्रॉड आहे. आपण सगळे त्याला बळी पडलेले आहोत.

 

(२०१०मधे लिहिलेल्या मूळ लेखाची अपडेटेड आवृत्ती)