स्त्रीलिंग-पुल्लिंगः मराठीमधला एक धाडसी प्रयोग

१७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


हिंदीतल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. मराठी पोरापोरींच्या वॉलवर सेक्रेड गेम्सच्या कौतुकाचे पाट वाहत होते. मराठीत आलेल्या स्त्रीलिंग-पुल्लिंग या वेबसिरीजलाही तरुणाईचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण या वेबसिरीजची चर्चा होतेय ती बोल्ड सीनमुळे. आजच्या तरुणाईची भाषा बोलणारी ही वेबसिरीज मराठीतला एक धाडसी, दखलपात्र प्रयोग म्हणून नावारूपाला येतेय.

सध्या सगळीकडे वेबसिरीजचं वारं वेगाने वाहतंय. सिनेमा, नाटक या पॉप्युलर माध्यमांपुढेही आता वेबसिरीजचं कडवं आव्हान उभं झालंय. घरबसल्या दर्जेदार एंटरटेंन्मेट म्हणून वेबसिरीजकडे पाहिलं जातंय. हिंदीमधे 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर' यासारख्या वेबसिरीज तुफान लोकप्रिय झाल्या. मराठीमधेही भारतीय डिजीटल पार्टी अर्थात भाडिपाने 'कास्टींग काऊच'सारखे अनेक कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत आणले. याचसोबत चावट या युट्यूब चॅनलची 'स्ट्रगलर साला' सारखी वेबसिरीजही लोकप्रिय झाली.

यूट्युबवर तुफान हिट

याच वेबसिरीजच्या गर्दीत नुकतीच युट्यूबवर आलेली वेबसिरीज म्हणजे 'स्त्रीलिंग पुल्लिंग.' शुद्ध देसी मराठी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आलेल्या या वेबसिरीजने अल्पावधीतच एक अब्ज इतके व्ह्यूज मिळवलेत. वेगळ्या विषयाची काहीशी बोल्ड मांडणी केल्यामुळे 'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसिरीजला मराठी माणसाच्या ऑनलाईन विश्वातला एक धाडसी प्रयोग म्हणावा लागेल.

३१ डिसेंबरच्या पार्टीमधे एका चांगल्या घरातली मुलगी पल्लवी अनोळखी व्यक्तीसोबत रात्र घालवते. परंतु नशेमधे असल्याने आपला कोणीतरी वापर करतंय याची तिला कल्पना नसते. दोन तीन दिवसानंतर तिला आपण गर्भवती असल्याचं कळतं. ती आपल्या अर्चना आणि प्रिया या दोन मैत्रीणींना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांना धक्का बसतो.

पुढे पल्लवी गर्भपात करण्याऐवजी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेते. पण त्यासाठी त्या बाळाचा बाप शोधणं गरजेचं असतं. कारण आपण ती रात्र कोणासोबत घालवली, याबद्दल तिला काहीच आठवत नसतं. त्यामुळे पल्लवी तिच्या मैत्रीणींच्या आणि सच्च्या नामक एका मुलाच्या मदतीने होणाऱ्या बाळाच्या वडलांचा शोध कसा घेते, याची काहीशी गंमतीदार, काहीशी बोल्ड गोष्ट 'स्त्रीलिंग पुल्लिंग'मधून आपल्याला बघायला मिळते.

बोल्ड आणि बिनधास्त पोरंपोरी

या वेबसिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे यात बोल्ड आणि बिनधास्त प्रसंगांचा वापर केलाय. वेबसिरीज बघताना हे प्रसंग अनावश्यक किंवा अतिरंजित न वाटता कथानकात गरजेचे वाटतात. पण समाजातल्या एका वर्गाकडून या वेबसिरीजवर टीकेची झोड उठवली जातेय. यातल्या बोल्ड प्रसंगांना ते वादग्रस्त ठरवून मोकळे झालेत. पाश्चात्य संस्कृतीचा मराठीवर प्रभाव पडल्याची चर्चा पुन्हा एकदा उचल खाल्लीय.

श्लील अश्लीलतेच्या नावाखाली काही प्रेक्षकांनी यातल्या बोल्ड प्रसंगांवरच बोट ठेवलंय. पण हे करताना या वेबसिरीजचं वेगळेपण न बघता यातल्या अशा प्रसंगांवर आक्षेप घेतलाय. संस्कृतीच्या बुरख्याआड दडलेल्या या प्रेक्षकवर्गाला मराठी भाषेतला हा प्रयोग तितकासा रुचलेला दिसत नाही. 

सेक्रेड गेम्स चालतं मग हे का नाही?

एका बाजूला हाच प्रेक्षकवर्ग असतो जो हिंदी भाषेतली 'सेक्रेड गेम्स'सारखी वेबसिरीज उचलून धरतो. त्यामधे अशा कितीही सीन असल्या तरी त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. उलट अशा सीन काटछाट न करता दाखवण्यात आलेत याचं ते कौतुक करतात. पण तुलनेने मराठीत असे सीन त्यांना नकोसे वाटतात. कारण आजही त्यांच्या मनात मराठी मुलींची सोज्वळ, सालस ही प्रतिमा घट्टक आहे. आणि ती काहीकेल्या पुसली जात नाहीय. त्यांच्या मनातल्या या प्रतिमेला तडा गेला तर त्यांना ते सहन होत नाही.

२०१२ मधे आलेल्या 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे' या सिनेमामधे सई ताम्हणकरचा बिकीनीवरचा एक सीन होता. तेव्हासुद्धा असा सीन दिल्यामुळे सई ताम्हणकरवर संस्कृतीप्रेमींना टीका संस्कृती सोडून टीका केली होती. 'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसिरीजमधली प्रयोगशीलता आणि नावीन्य दखल घेण्याजोगं आहे. पण हिंदीसारखा एक वेगळा प्रयोग मराठीत झाला तरी याची कुणी फारशी दखल घेताना दिसत नाही.
 
एका प्रतिष्ठित टीवी चॅनेलने या वेबसिरीजच्या कलाकारांची मुलाखत घेतली होती. तेव्हासुद्धा या कलाकारांना संपूर्ण वेबसिरीजबद्दल प्रश्न न विचारता यातल्या ठराविक सीनबद्दलच प्रश्न विचारले गेले. अर्थात हे प्रश्नसुद्धा आवश्यकच होते. कारण मराठी कलाकार अजुनही बोल्ड सीन द्यायला बिचकतात. पण वेबसिरीजमधल्या कलाकारांनी विशेषतः अभिनेत्रींनी असे सीन दिले. आणि अशा प्रसंगामधे त्यांच्यात कुठेही अवघडलेपणा जाणवत नाही. पण नंतर मात्र या मुलाखतीमधे अशाच धाटणीच्या प्रश्नांचा भडीमार सुरु असल्यासारखा वाटला.

मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या मुली

'स्त्रीलिंग पुल्लिंग'मधल्या मुली हमखास शिव्या देताना दिसतात. त्या आपापसात मोकळेपणाने आयुष्यातल्या सर्व गोष्टी शेअर करताना दिसतात. मुळात तिन्ही मैत्रीणी आपल्या आयुष्यात प्रेमाच्या शोधात आहेत. याच काळात त्यांची सच्याशी गाठ पडते, तेव्हा मुलांबद्दलची गृहितकं बाजूला पडून तिघींनाही जीवाभावाचा मित्र मिळतो. तसंच कितीही अडचणी आल्या, मतभेद झाले तरी चौघांमधलं मैत्रीचं नातं अतुट राहतं.

अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करुन ज्यांना जे पहायचं असतं तेच ते पाहतात आणि मग त्यावर नाहक चर्चा होते. ही वेबसिरीज आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आजच्या घडीला तरुणांमधे यातल्या काही गोष्टी घडणं हे अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. लेखक, दिग्दर्शकांनी सुद्धा ठराविक वयोगटाला डोळ्यासमोर ठेऊन या वेबसिरीजची निर्मित केली असावी.

कोण आहेत कलाकार?

‘स्त्रीलिंग पुल्लिंग’मधे काम करणाऱ्या प्रमुख कलाकारांनी टीवी सिरीयलमधे काम केलंय. यामधे सच्याची भूमिका करणारा निखिल चव्हाण याने 'लागीरं झालं जी’मधे काम केलं होतं. पल्लवीची भूमिका करणारी भाग्यश्री न्हालवे 'कुंकू, टिकली आणि टॅटू' मालिकेत तसंच प्रियाची बोल्ड भूमिका साकारणाऱ्या सायली पाटीलने 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत पार्वतीची भूमिका केली होती. अर्चनाच्या भुमिकेत असणाऱ्या आरती मोरेने 'चि. व चि.सौ.का' सिनेमामधे तसंच 'जय मल्हार' या सिरीयलमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवलीय.

आपल्या आतापर्यंतच्या अॅक्टिंग करिअरमधे या कलाकारांनी ही चौकटीबाहेरची भूमिका निवडलीय. आणि त्या व्यक्तिरेखेला समर्थपणे न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, ही बाब इथे नोंदवायला पाहिजे.

कशामुळे मिळतोय प्रतिसाद?

एकूणच 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या वेबसिरीजची वेगळी वाट काही जणांना खाचखळग्याची वाटत असली तरी मोठ्या प्रमाणात या वेबसिरीजला पसंती मिळत असल्याचं दिसून येतं. संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही ही वेबसिरीज वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे आज असंख्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. यातील बहुतेक व्यक्तिरेखा या आपल्याशा वाटतात.

एकूण सहा भागांची असणारी ही वेबसिरीज एका सुखद क्षणाने संपते आणि आपण या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडून ही वेबसिरीज पुन्हा एकदा पहिल्यापासून बघायला घेतो, यामधेच या वेबसिरीजचं यश दडलंय.