सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

१६ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


'बाहेर पडलो तर दुनियादारी कळती. हुशारी येती. चार पैसे गाठीला लागले की वाईट असतंय का? घरचेबी आधी विरोध करतात, पैसे दिले की आपसूकच गोड बोलत्यात मग! संसाराची कामं आता मुलं सुना सांभाळून घेतात,' असं भारतभर फिरणाऱ्या उषाताई सांगतात. कुंभमधे भेटलेल्या या मराठी बायामाणसांशी साधलेलं हे हितगुज.

मी पत्रकार. कामानिमित्त भारतभर फिरते. मात्र बहुतेकदा भेटणाऱ्या माणसांच्या डोळ्यात आणि ओठांवर एकाच प्रश्न वाचायला मिळतो. 'अकेली आई हो?', कामानिमित्त फिरणं हा माझा नाईलाज किंवा हौसही असू शकते हे यातल्या अनेकांच्या पचनीही पडत नाही.

मी नव्या पिढीतली, शिकलेली बाई. विमल कोळी आणि उषा गायकवाड मात्र पन्नाशीतल्या. लौकिकार्थाने कमी शिकलेल्या. वर्षातनं सहा महिने घराबाहेर असतात. 'आता पोटाला खायचं, संसार ओढायचा तर हाताला मिळंल ते काम करावंच लागतंय. घर सोडून बाहेर राहावं लागतंय. आढेवेढे घेऊन कसं चालंल गरीबाला?' उषाताई साधंसोपं उत्तर गेली दहा वर्ष हरेकाला देत आल्यात. कुंभमेळ्यात फिरताना मला दोघी भेटल्या.

भारतभरासह नेपाळची भ्रमंती

विमलताईसोबत मिळून त्या 'मंगलमूर्ती टूर्स अँड ट्रॅवल्स'च्या कर्मचारी म्हणून काम करतात. सुभाष दळवी यांची ही टूर कंपनी गेल्या १५ वर्षांपासून दौंड आणि पुणे परिसरातल्या लोकांसाठी मुख्यतः धार्मिक टूर्सचं आयोजन करते. एकूण सहा लोकांची त्यांची टीम आहे. गेल्या पंधराएक वर्षात पाचेक हजार लोकांना भारतासह नेपाळचीही भ्रमंती घडवल्याचं ते सांगतात. दौंडचे दत्तात्रय भरगुडे, गोपीनाथ गायकवाड आणि ईश्वर बूब हे तिघेही दळवी यांच्यासोबत असतात.

दळवी सांगतात, 'आमचा एक दौरा किमान पंधरा ते पंचवीस दिवसांचा असतो. आम्ही सगळे कर्मचारी एका कुटुंबासारखे झालोत. विमल आणि उषा आमच्या भावकीतल्याच आहेत. एकदम बहिणीसारख्या.'

यावेळचा त्यांचा दौरा चाळीसेक प्रवाशांना घेऊन सुरूय. त्यात जगन्नाथपुरी, पश्चिम बंगालमध्ये गंगासागर, बिहारमध्ये गया, काशी, प्रयागराज असं करून आजचा मुक्काम चित्रकूटला असणार. उद्या मध्यप्रदेशमध्ये इंदूरची अन्नपूर्णामाता, औरंगाबादला घृष्णेश्वर, भद्रा मारोती, वेरूळ, शिर्डी असं करून मग पुणे आणि दौंडला जाणार.’

जीवाला घाबरून किती दिवस घरी राहणार?

आता चपात्यांचं पीठ मळतमळत विमलताई बोलू लागतात, 'माझे मालक मागंच वारले. संसार मागं आहे. मग त्यासाठी काही कराय नको? आमच्या दोघींच्यापण घरी शेती आहे. पण पिकत नाही नीट. त्याच्यावर कसं भागणार?' उषाताई म्हणतात, 'माझे मालक आणि पोरं नाराज होतात. पण मी ऐकत नाही त्यांचं. मालकाच्या रोजमजुरीवर संसार चालायचा नाही, हे वळीखलं आणि विमलसोबत या कामाला लागले. चार पैसे मिळतात ते संसारालाच लागतात. नातवंडांच्या तोंडात चार घास घालता येतात.'

दोघींना दिवसाची प्रत्येकी तीनशे रुपये मजुरी मिळते. सकाळ-संध्याकाळ दोघी मिळून चारशे चपात्या करतात. बाकीची लहानमोठी कामं वेगळीच! इतर स्वयंपाक आचारी करतो.

किमान पंधराएक दिवस बाहेर राहून मधले पाचेक दिवस घरी मुक्कामी. पुन्हा दौरा सुरू असं बिझी शेड्युल असतं दोघींचं. सहाऐक महिने हे असंच सुरू असतं. मी विचारते, 'कधी जीवाची, सुरक्षिततेची भीती वाटत नाही?' या प्रश्नावर विमलताई जरा हसतात.

म्हणतात, 'आता बाईला धोका काय घरात चुकतो ना, बाहेर! आमचा देवावर हवाला. वेळ पडली तर एकमेकींना आडोसा करून कुठंही उघड्यावर अंघोळ करून घेतो. कधी रात्री उशिरा मुक्कामी पोचलो तर उशिरा जागरण करून सैपाक करतो. पुरुषमाणसं झोपतात त्याच खोलीत आम्ही सगळ्याजणी झोपतो. गावातल्या बाया आधी बोलायच्या. म्हणायच्या, 'कशाला जीव दु:खात घालता? गावातच मजुरी करा.' पण गावात काय टिकणारं काम मिळत नाही. जीवाला घाबरून किती दिवस घरी राहणार?'

बाईनं मागं राहायला नको

उषाताईही मान डोलावत शब्द जोडतात, 'बाहेर पडलो तर दुनियादारी कळती, हुशारी येती. चार पैसे गाठीला लागले की वाईट असतंय का? घरचेबी आधी विरोध करतात, पैसे दिले की आपसूकच गोड बोलत्यात मग! संसाराची कामं आता मुलंसुना सांभाळून घेतात.'

जाता-जाता त्या म्हणतात, 'चार लोकांना खाऊ-पिऊ घालणं मोठ्या पुण्याचं काम आहे. तेच आम्ही करतो. नावं ठेवणारे ठेवत राहतील. पन बाईनं मागं राहायला नको. हातात जी कुठली कला असंल ती वापरून बाहेर पडावं, दुनिया बघावी. मग तिला मान मिळतोय!'

मैत्रीचा कुंभ ओसंडून वाहो

टूर्सच्या गाडीवर ड्रायवर म्हणून दौंडचेच शकील शेख कामाला आहेत. ते दळवी यांचे जुने मित्र आहेत. धार्मिक टूर्स करताना हिंदूंच्या सगळ्या तीर्थस्थळांना त्यांनीही भक्तीभावानं भेटी दिल्या. भजन-कीर्तनात रंगलो, असं शेख सांगतात.

'आमचा जसा हज तसा तुमचा कुंभ. सगळीकडं माणसं श्रद्धेनं जातात. मी सगळ्यांच्या श्रद्धेचा आदर करतो. गावातही होळी, दहीहंडी, गणपती सगळ्यात सक्रिय असतो.'

दळवीसुद्धा हे खरं असल्याचं सांगत धर्म त्यांच्या कामासोबतच मैत्रीच्याही कधी आड आला नसल्याचं नोंदवतात. इलाहाबादच्या गंगा आणि यमुनेच्या संगमावरच गंगाजमनी तहजीबची जिवंत प्रतीकं बनून मला सुभाष आणि शकील नावाची दोन मराठी माणसं भेटलीत. त्यांच्या मैत्रीचा कुंभ असाच छलकता राहो!

 

हेही वाचाः

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)