राष्ट्रीय पुरस्कार जिंकूनही मराठी दिग्दर्शक का रडतोय?

१२ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय.

'लोकांनी स्पष्ट मला सांगावं की तू सिनेमा करू नकोस. तू सिनेमाच्या लायक नाहीस. मी सिनेमा करणं बंद करीन.'

हे उद्गार आहेत भाऊराव कऱ्हाडे नावाच्या एका मराठी दिग्दर्शकाचे. कऱ्हाडेंचा पहिलाच सिनेमा 'ख्वाडा' हा दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यानंतर आलेल्या 'बबन'नेही चांगली कमाई केली होती. पण त्यांच्या 'टीडीएम' या सिनेमाला मात्र म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. पुरेसे शो मिळत नसल्याने आपल्या सिनेमाची अशी दुर्दशा कऱ्हाडेंना बघवली नाही.

इतकी मेहनत करूनही, प्रेक्षकांचा प्रतिसाद असूनही थियेटरमालक आपल्या सिनेमाचे पुरेसे शो लावत नसल्याने कऱ्हाडेंना रडू फुटलं. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या, व्यावसायिक मूल्य असणारा आशयसंपन्न सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शकाला रडताना पाहणं हे एक मराठी सिनेरसिक म्हणून वेदनादायी वाटत असलं, तरी अशावेळी झाल्या प्रकाराच्या दोन्ही बाजू समजून घेणं अतिशय गरजेचं ठरतं.

मराठीतला नवा रांगडा हिरो

गावात विहिरी खोदायचं, ट्रॅक्टरमधून रेती वाहायचं काम करणारा बाबू, त्याची प्रेयसी नीलम आणि गावातलं राजकारण-समाजकारण याभोवती 'टीडीएम'ची कथा फिरते. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावात घडणारं हे कथानक जिवंत करताना कऱ्हाडेंनी ग्रामीण जीवनाचा आरसाच चंदेरी पडद्यावर आणलाय, ज्यात सहकारी संस्थांचचं राजकारण, बेरोजगार तरुणांची दुनियादारी, लग्नात वधूपक्षाची होणारी फरफट आणि बरंच काही लख्ख दिसतं.

समाजव्यवस्थेत पिचलेला नायक आणि त्याचा संघर्ष हा कऱ्हाडेंच्या आजवरच्या 'ख्वाडा', 'बबन' आणि 'टीडीएम' या तिन्ही सिनेमांच्या कथानकाचा मूळ गाभा आहे. कुस्तीचा शौक असणारा बाळू आणि दुधविक्रीच्या व्यवसायातून स्वतंत्र रोजगाराची अपेक्षा करणारा बबन, या भाऊसाहेब शिंदेने साकारलेल्या दोन अस्सल, रांगड्या आणि स्वप्नाळू नायकांच्या पंगतीत कऱ्हाडेंनी आता पृथ्वीराज थोरातने साकारलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर बाबूला नेऊन बसवलंय.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

'टीडीएम' म्हणजे काय?

या सिनेमाचं नाव ही खरी मेख आहे. 'टीडीएम' म्हणजे ट्रॅक्टर ड्रायवर ऑफ महिंद्रा. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या नगरच्या इंदुरीकर महाराजांच्या किर्तनातून हा शब्द नगरी जनतेत वेगाने पसरला. जॉब मागायला जाणारी ड्रायवर पोरं आपल्या रिझ्युममधे ड्रायवर न लिहता 'टीडीएम' लिहून ती एक पदवी असल्यासारखं मिरवू लागली. बाबूही असाच एक 'टीडीएम' आहे.

पण हा शब्द उर्वरित महाराष्ट्रात फारसा प्रचलित नाही. खरं तर, 'सैराट'च्या यशानंतर ग्रामीण भागातले असे शब्द सिनेमाचं टायटल म्हणून घ्यायची एक प्रथाच सुरू झालीय. पण त्या शब्दार्थाला असलेल्या प्रादेशिक मर्यादा मात्र कुणीही लक्षात घेत नाही. 'टीडीएम'चंही असंच झालंय. 'टीडीएम' म्हणजे काय? असं विचारणाऱ्या प्रेक्षकांना सिनेमा बघा म्हणजे कळेल असंच उत्तर 'टीडीएम'च्या प्रेक्षकांना मिळत होतं.

गुगलवर टीडीएमचा फुलफॉर्म शोधला तर कसलीशी वैद्यकीय माहिती मिळते. कारण दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला अर्थ हा नगरी लोकजीवनात दडलाय, महाराष्ट्रभर तो प्रचलित असेलच, असं नाही. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली जाऊन एका शब्दार्थासाठी ते सिनेमा बघतील, हा आपला अंदाज निरर्थक ठरल्याचं 'टीडीएम'च्या टीमने मान्य करायला हवं.

गाणी जमली पण…

'टीडीएम'मधली 'पिंगळा गातो', 'मन झालं मल्हारी', 'बकुळा' आणि 'एक फुल वाहतो सखे' ही सगळीच गाणी उत्तम जमून आली आहेत. पण त्यांच्या माध्यमातून प्रमोशन करण्याची नामी संधी दिग्दर्शकाने वाया घालवली असं सतत वाटत राहतं. हे प्रमोशन किती महत्त्वाचं असतं हे सेकंदभरात वायरल होणाऱ्या रीलच्या जमान्यात वेगळं सांगायला नको. 

'टीडीएम'च्या सोबतच रिलीज झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर'मधल्या 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याचे रील महिनाभर गाजले. अगदी सातासमुद्रापार जाऊन पोचले. पण 'टीडीएम'च्या गाण्यांना मात्र आपला वेगळा ट्रेंड सेट करण्यात अपयश आलं. अवतीभवतीच्या वातावरणाचा अंदाज घेऊन गाणं बनवणं आणि ते ट्रेंडला आणणं किंवा येणं आणि जनमानसात लोकप्रिय होणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'झिंगाट' हे गाणं! 

'सैराट'चं प्रमोशन सुरू असताना टी-२० वर्ल्डकप चालू होता. सिनेमातल्या 'झिंगाट'ला चांगला प्रतिसाद मिळत होता. इकडे मैदानावर कोहली-धोनी चेंडू सीमापार करण्याऐवजी दोन-तीन धावा पळून काढण्याला प्राधान्य देत होते. तेव्हा 'मारतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, सैराट झालंया' अशा प्रकारचे विनोद सोशल मीडियावर विशेषतः, अतिशय वैयक्तिक मानल्या जाणाऱ्या व्हॉट्सऍपवर वायरल होत होते.

साधारणतः उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात लग्नांचा हंगाम सुरू होतो. जसं 'मधुमास' या धामधुमीच्या काळात नव्या नवरीसाठी चपखल बसतं, तशाच प्रकारे पाठवणीसाठी 'बकुळा' आणि देवदर्शनासाठी जेजुरीला निघालेल्या जोडप्यांसाठी 'मन झालं मल्हारी' या दोन गाण्यांचेही असंख्य रील बनू शकले असते. 'एक फुल वाहतो सखे' हे कुठल्याही प्री-वेडिंग शूटमधल्या रीलसाठी चालून गेलं असतं.

हेही वाचा: जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

आडातच नाही, तर… 

'टीडीएम'ला सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणाचा फटका बसला असला तरीही, त्याचं प्रमोशन आणि त्याला थियेटरमधे मिळालेले कमी शो याचा असलेला थेट संबंध दुर्लक्षून चालणार नाही. प्रमोशन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी हाताशी असूनही 'टीडीएम'ची मार्केटिंग टीम त्यांचा पुरेपूर वापर करण्यात अपयशी ठरल्याचं साफ दिसून येतं. सिनेमाचं नाव आणि गाणी ही त्याची दोन प्राथमिक उदाहरणं.

मराठी सिनेमांचं अर्थकारण सध्यातरी पुणे आणि मुंबई या दोन शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रमोशन आणि मार्केटिंग करताना या दोन शहरांमधल्या प्रेक्षकवर्गाला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. पुण्यातलं कोथरूड सिटीप्राईड थियेटर हा मराठी सिनेमांचा हॉटस्पॉट. खरं तर, या थियेटरमधे ट्रॅक्टरवरून वाजतगाजत येऊन सिनेमाचा ट्रेलर लॉंच करत कऱ्हाडेंनी प्रमोशनचा बार दणक्यात उडवला होता.

पण पुढे मात्र या प्रमोशनल फटाक्यातली आग थंडावत गेल्याचं दिसलं. सिनेमात बाबू-नीलमची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने या कलाकारांचा हा पहिलाच सिनेमा होता. स्पर्धापरीक्षा द्यायला पुण्यात आलेली कालिंदी आणि कऱ्हाडेंकडे ऑफिसबॉय म्हणून काम करणारा पृथ्वीराज या नवख्या कलाकारांच्या पार्श्वभूमीचा गवगवा 'सैराट'च्या आर्ची-परशासारखा करणं भाऊरावांना जमलं नाही.

अल्ट्रा मराठी, प्लॅनेट मराठी आणि 'खास रे टीवी'सारख्या प्रथितयश युट्यूब चॅनलवर उशिराने प्रमोशन केल्याने म्हणावे तसे व्ह्यू आणि त्यातून तिकीटबारीवर अपेक्षित असलेलं आऊटपुट मिळालं नाही. 'चला हवा येऊ द्या', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारखे रिऍलिटी शो, लोकप्रिय टीवी मालिकांमधेही 'टीडीएम'ला बोलावलं गेलं नाही. परिणामी, प्रमोशन आणि मार्केटिंग या दोन्ही आघाड्यांवर 'टीडीएम' सपशेल अपयशी ठरला. 

स्पर्धेची जाणीव प्रत्येकाला हवीच

'टीडीएम'सोबतच 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'पोन्नियीन सेल्वन २' या बिगबजेट आणि बिगबॅनर सिनेमांनी थियेटरमधे दमदार एंट्री केली. एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि ऑगस्ट एंटरटेनमेंटसारख्या मोठ्या निर्मिती आणि वितरण संस्था 'महाराष्ट्र शाहीर'च्या पाठीशी आहेत. लायका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजची निर्मिती असलेला 'पोन्नियीन सेल्वन - २' हा त्याच पेन इंडिया लिमिटेडने वितरीत केलाय, ज्यांनी 'आरआरआर'चंही वितरण केलं होतं.

शाहीर साबळेंच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा मराठीतले प्रथितयश दिग्दर्शक केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलाय, तर चोळ साम्राज्याची गाथा सांगणाऱ्या 'पोन्नियीन सेल्वन २'चं दिग्दर्शन 'पद्मश्री' मणिरत्नमने केलंय. एकीकडे अजय-अतुलचं संगीत तर दुसरीकडे ए. आर. रेहमानसारखा सुरांचा जादूगार उभा. या चढाओढीच्या वातावरणात कऱ्हाडेंनी 'टीडीएम'सारखा मोठं बजेट किंवा बॅनर पाठीशी नसलेला सिनेमा रिलीज करायचं धाडस दाखवलं.

अर्थात याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. चांगला आशय असूनही 'टीडीएम'ला प्राईम टाईमचे शो मिळाले नाही. बाकी दोन्ही सिनेमांचे वितरक-निर्माते या व्यवसायात नवीन नाहीत. त्यांनी त्यांचा अनुभव आणि वशिला लावून जोरदार प्रयत्न केले आणि आपला सिनेमा टिकवला. कऱ्हाडेंकडे यूएफओसारखी वितरक संस्था असूनही त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही.

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

भावनिक नाही, व्यावसायिक दृष्टिकोन गरजेचा

एक व्यावसायिक सिनेमा बनवताना नफातोट्याच्या गणितांचा विचार त्या सिनेनिर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येकाने करायलाच हवा. मोठे निर्माते-वितरक कित्येकदा वर्षभर आधीपासूनच आपली रिलीज डेट बुक करून ठेवत असतात, जेणेकरून इतरांना या क्षेत्रातल्या स्पर्धेची जाणीव व्हावी. आपल्या सिनेमाला व्यावसायिक यश मिळवून द्यायचं असेल तर नवख्या आणि प्रयोगशील दिग्दर्शकांनीही शक्यतो असेच निर्माते-वितरक शोधणं गरजेचं असतं.

अर्थात, दरवेळी मोठे निर्माते-वितरकच हिट होतात असं नाही, पण इतरांच्या तुलनेत त्यांच्या यशाची टक्केवारी निश्चितच जास्त भरते. जब्या किंवा आर्ची-परशासारखे नवखे कलाकार आणि नेहमीपेक्षा वेगळं, प्रयोगशील, आशयघन कथानक घेऊन यश मिळवणं निश्चितच सोपं आहे, पण त्यासाठी झी स्टुडियो, एसेलविजनसारख्या संस्था आणि अजय-अतुलसारखं सांगितिक पाठबळ हवं, जे तुम्हाला महाराष्ट्रातल्या घराघरांमधे पोचायला मदत करतात.

कऱ्हाडेंनी सिनेमाच्या बाजारात सध्या कुठला माल तेजीत आहे, याचा अभ्यास केला नसल्याचं यावेळी जाणवलं. 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'सारख्या मराठी सिनेमांना चांगले शो मिळाले, तर रोहित शेट्टीची स्वतंत्र निर्मिती असलेला 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यामुळे थियेटरमधे शो मिळवण्यासाठी एक चांगला वितरक किंवा हा व्यवहार सांभाळणारी लॉबी हाताशी असणं फार गरजेचं असतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

सिनेमा हे आता फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही. त्याचा समाजकारण आणि राजकारणावर प्रभाव असतो. अशावेळी दिग्दर्शकाला, त्याच्या मांडणीला राजकीय चष्म्यातूनही पाहिलं जातं. त्यामुळे राजकीय वरदहस्ताच्या जोरावर 'केरळा स्टोरी' हिट झाल्यावर 'महाराष्ट्र शाहीर'चे शो प्रायोजित केले जातात आणि आठवडाभर आधी शोसाठी झगडणाऱ्या 'टीडीएम'कडे दुर्लक्ष केलं जातं, यातलं राजकारण सिनेनिर्मितीशी संबंधित असलेल्यांनी समजून घ्यायलाच हवं.  

हे निर्मात्यांनो, दिलदार व्हा!

'२०१८' हा मल्याळम सिनेमाही याच आठवड्यात रिलीज झालाय. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम असला तरी त्याला काही भाषिक, भौगोलिक मर्यादा आहेत. यात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या टोविनो थॉमस या मल्याळी अभिनेत्याने एका इवेंटमधे 'आमचाही सिनेमा दाखवा' असं कळकळीचं आवाहन देशातल्या इतर वितरकांना केलंय.

टोविनो पुढे म्हणतो, 'जितकं एखाद्या बिगबजेट सिनेमाचं प्रमोशनसाठीचं बजेट असतं, त्याहून कमी बजेटमधे एक मल्याळम सिनेमा बनवला जातो.' साधारण हीच गत मराठी सिनेसृष्टीचीही आहे. आशयाच्या संदर्भात मल्याळम सिनेसृष्टी मराठीच्या काही पावलं पुढे असली, तरी मराठीतही बऱ्याच चांगल्या सिनेमांची निर्मिती होत असते. नुकताच रिलीज झालेला आणि हळूहळू शो मिळवत असलेला 'तेंडल्या' हा त्यापैकीच एक.

'टीडीएम' असो किंवा 'तेंडल्या', या सिनेमांना प्रमोशनसाठी पुरेसं बजेट शिल्लक राहत नसल्याने त्यांना लोकांपर्यंत पोचता येत नाही. अशावेळी सिनेप्रेमी असल्याचं सांगून निर्मितीसाठी अर्थसहाय्य पुरवणाऱ्या हौशी निर्मात्यांनी त्यांचं हे प्रेम अधिक गांभीर्याने फुलवण्याची गरज आहे. त्यासाठी मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी मुबलक अर्थसहाय्य पुरवण्याबरोबरच वितरक लॉबीसोबतही चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्यायला हवा.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो