लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या लेखनात सतत अभिव्यक्तीचाच विचार असायचा. बोरकरांचं जगणं हा अस्वस्थ करणारा आलेख आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि जगण्याविषयी शब्द रुची मासिकात अजीम नवाज राही यांचा लेख आलाय. त्या लेखाचा हा संपादित अंश.
बिछडा कुछ इस अदा से के रूत ही बदल गई
एक शख्स सारे शहेर को विरान कर गया
वो तो बता रहा था कई दिन का सफर
जंजीर खिंच के जो मुसाफीर उतर गया
जसं पाणी तयार करता येत नाही, तशी काही माणसं नव्यानं घडत नाहीत. गढुळलेलं पाणी नदीला पूर येण्याची शक्यता दाखवतं. सोसाट्याचा वारा वादळाच्या आगमनाची ग्वाही देतो. अगदी तसंच काही माणसांचं असतं.
पुरुषोत्तम बोरकर अचानक निघून गेले. विजनवासाच्या बेटावर मस्तमौला जगणं जगणार्या अवलिया लेखकावर आता वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येताहेत. या प्रतिभासंपन्न लेखकाच्या आयुष्यात ठाण मांडून बसलेल्या सन्नाट्याची फारशी दखल मात्र कोणी घेतली नाही.
श्वासांची घसघशीत रक्कम मोजल्यावर त्यांच्या जाण्याची ठसठशीत दखल आपण घेत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कोन होते यावर भाष्य करताहोत. विशिष्ट दृष्टिकोन किंवा मान्यतेच्या खिडकीतून त्यांनी आयुष्याचं निरीक्षण केलं नाही. फक्त मांडली सर्वसामान्य माणसाची व्यथा!
माझ्या आणि बोरकरांच्या भेटीगाठी जवळजवळ नाहीतच. प्रदीर्घ भेटीची काळजावर ठसठशीत मुद्राही नाही. एखाद्या साहित्य संमेलनात भेट झाली असेल पण तीही ओझरती! अपवाद तो फोनचा. बोरकरांचं वाचन चौफेर, सकस! कधी-कधी त्यांचा फोन यायचा. वर्हाडी बाजाचा करडा पण आत्मीयतेने ओथंबलेला नितळ, निर्मळ आवाज. भाऊ, अमुक दैनिकात सदर, तमुक नियतकालिकांत तुमची कविता वाचली. बोरकर भरभरून बोलायचे.
त्यांच्या फोनला वेळकाळ नव्हता. कधीकधी तर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा फोन यायचा. सलग तेच बोलायचे. ऐकणार्याला बोलण्याची संधी तशी कमीच. त्यांचं बोलणं म्हणजे भाषाउत्सवच. समर्थ परीक्षणाची रेशीमवीण उसवत जायची. बोरकर आपल्या निर्मितीवरच बोलत आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणायची माझीही हिंमत व्हायची नाही. बोलण्याच्या त्या मर्यादित अवकाशात ते कवितेचा, ललित लेखाचा डोळस धांडोळा घ्य़ायचे.
खामगावला स्थिरावल्यानंतर एक अंतहीन दुंभगलेपण त्यांच्या हिश्श्याला आल्याचं त्यांच्या बोलण्यातून मला जाणवायचं. कर्करोगानं पत्नीच्या निधनानंतरची वैफल्यग्रस्तता आवंढा गिळत हिकमतीने ते लपवायचे. शल्य लपवण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं असावं. संघर्षाचा वैशाख त्यांनी हसत हसत सहन केला. काही नशीबवंत तयार रस्त्यांचे मुशाफीर असतात. काहींना आपले रस्ते स्वत: तयार करावे लागतात. बोरकर दुसर्या पठडीतले.
‘मेड इन इंडिया’ कादंबरीचं आभाळाएवढे यश. त्या यशाची डोळे दिपवणारी प्रभावळ पाठीशी असताना व्यवहाराच्या अबलख घोड्यावर मांड ठोकण्यात मात्र ते अपयशी ठरले. व्यवहारावरची पकड जरी सैल पडली तरी लेखनावरची पकड मात्र त्यांची घट्ट होती. त्यांच्या मनात सतत निर्मितीविषयक सलग घुसळण असायची. ती घुसळण, ती अस्वस्थता आयुष्याच्या कातरवेळेपर्यंत कायम राहिली. सतत अभिव्यक्तीचाच विचार.
कदाचित याच विचारांमुळे व्यावहारिक ताणेबाणे विस्कटत गेले. पण त्याची तमा त्यांनी कधी बाळगली नाही. पानझडीच्या नाकावर टिच्चून सर्वांग डवरणार्या गुलमोहरासारखं त्यांच्यातले शब्दझाड बहरत राहिले. बोरकरांचं जगणं म्हणजे वावटळीत दिवा लावल्यासारखं! जगण्याला भटकंतीची वेगवान चाकं. चाकांच्या वेगाला अर्थप्राप्तीचा नाही सकस साहित्यनिर्मितीचा ध्येयासक्त ध्यास.
हेही वाचा: ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'
भटकंती त्यांना आयुष्यभर खुणावत राहिली. त्यांचाही भटकंतीवर जीव जडला. भटकंतीला त्यांनी आयुष्यभर परकं केलं नाही. अपवाद फक्त खामगाव शहरातल्या अलीकडच्या वास्तव्याचा, ज्याची माती जिथं असते तो तिथंच येऊन आपल्या आयुष्याचे शेवटचे श्वास पूर्ण करतो. ज्या वातावरणातलं झाड त्याच वातावरणातच वाढत असतं. माणूस ज्या हवेत श्वास घेतो तीच हवा त्याच्या निर्मितीतून वाहिली पाहिजे. बोरकरांच्या निर्मितीची नाळ सर्वसामान्य माणसाशी, मातीशी घट्ट जुळलेली. त्यांच्या कवितेची एक ओळ आजही माझ्या काळजात आपली मुळे घट्ट रोवून आहे.
रात्रीने गिळले
सारे दिवसाचे माणिक मोती
वर्हाडी भाषा, वर्हाडी माणूस, वर्हाडी माती कायम त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिली. ‘मेड इन इंडिया’ कादंबरीमुळे वर्हाडीला राज्याच्या वाङमयीन विश्वाचं विस्तीर्ण आकाश कवेत घेता आलं. विनोदाचा भरभक्कम पाया असलेली उपहासात्मक शैली मराठी साहित्यात अधोरेखित करण्याचं काम या कादंबरीने केलं. अत्यंत सुपीक प्रतिभेचे धनी असलेल्या पुरुषोत्तम बोरकर यांनी लेखणी उचलावी आणि त्या लेखणीनं धबधब्यासारखं कागदावर कोसळावं.
हेही वाचा: केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी
‘होबासक्या ऊर्फ बांड्यापंचायती’ त्यांच्या या वाचकप्रिय सदराची आठवण कधी विस्मरणात जाणार नाही, इतका जिवंतपणा या सदरात होता. वर्हाडी स्तंभलेखनाच्या परंपरेचं खरं श्रेय निर्विवादपणे फक्त बोरकरांनाच देता येईल. पु. ल. देशपांडे यांना एका मुलाखतीत निवेदकाने प्रश्न केला. तुमच्या लेखनाव्यतिरिक्त तुम्हाला आवडलेलं पुस्तक नी लेखक कोण?
पुलंनी क्षणाची उसंत न लावता उत्तर दिलं. कादंबरी ‘मेड इन इंडिया’ आणि लेखक पुरुषोत्तम बोरकर. मॅजेस्टिकने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे अनेक मिथक. मिथकांची एक प्रदीर्घ श्रृंखलाच. व्यावहारिक पडझडीत अनेकवेळा बोरकरांनी मरण अनुभवलं. कोसळल्यावर उभं राहण्याचं तंत्रही शिकले. त्यांच्या हिश्श्याला आलेल्या ससेहोलपटीच्या, सततच्या भटकंतीच्या खाणाखुणा मनाच्या तळातून उसळून आलेल्या त्यांच्या कवितांमधे दिसतात. वाचताना आपणही उद्विग्न होतो.
मी काळाचा पाचोळा मजवर मृत्युचा डोळा
मुडदा दावी तिरडीला तो माझा चौथा मळा
जीवन लालसारांजण अस्थी घटातच गोळा
पुसल्या जाईल हा सर्व स्थावरजंगमचा ताळा
झरे फसवती पाण्याला देश हा चोरांचा पोळा
सातपिढ्या? हाव नको सरणापुरते कर गोळा
या त्यांच्या कवितेतलं आयुष्याचं जळजळीत पण वस्तुनिष्ठ तत्त्वज्ञान कोणीच नाकारू शकत नाही. बोरकरांची कविता शिळोप्याच्या गप्पा नव्हत्या. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात संघर्षाच्या खवळलेल्या डांबरानं ही कविता लिहिली होती. लेखाच्या सुरवातीला मी लिहिलं की, काही तयार रस्त्यांचे मुशाफिर असतात. काहींना भाकर, घर, कपडे आणि पुस्तकांना एकत्र आणण्यासाठी आयुष्यभर दमछाक करावी लागते.
हेही वाचा: तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज
बॅक-बॅलन्स, घर-दार
गाळ्या-फाळ्या, बायका
पोरं, वावर-गिवर, शिन्मा-थिएटर
इलाजच नस्ते!
एक दिवस सगळं सोळूनच जा लागते!!
---
कीर्ती, फिर्ती, प्रतिष्ठा-फ्रतिष्ठा
मान-सन्मान, लाजिरवाणे अपमान
स्टेज-गिज, माईक-फाईक,
काही प्रेम करणारे
काही हरामखोर नातेवाईक
इलाजच नस्ते!
एक दिवस सगळं सोळूनच जा लागते!!
---
अकादमी-फकादमी
पद्मश्री-फद्मश्री
हे भूषण ते भूषण
भारतरत्न त्यासाठी प्रयत्न
इलाजच नस्ते!
एक दिवस सगळं सोळूनच जा लागते!!
---
तिच्या
बायोकोच्या
आठवणी
शुक्राणूंचे सदेहपण
त्यांचे संगोपन
एक दिवस तेही संपते
इलाजच नस्ते
एक दिस सगळं सोळूनच जा लागते!!
---
गटबाजी-फटबाजी
कारखाने-फारखाने
लाल दिवा-पिवळा दिवा
हा हवा-तो हवा
वर्षा-गिर्षा, आर्ची परशा
पार्लमेंट-व्हाईट हाऊस
गरिबांचा दुष्काळ, सुकाळ
ऊनवारापाऊस
हे पायज्ये ते पायज्ये
भरपेट उपवास, कट्टर रोजे
इलाजस नस्ते!
एक दिवस सगळं सोळूनच जा लागते!!
---
मंत्र मांगं उरते एक फोटो
चंदनाचा हार घालून
मंत्र वर्षातून एक ताटभर जेवण पितरपरवाले,
दारू-फारू, मटन-फटन
शिरा-पुरी, बासुंदी-त्रिसुंदी
श्रीखंड-फ्रीखंड, वळे-भजे
सगळं मातीतल्या मनूतच मातीमोल होते
आणि मळकभर अस्थींची राख
नदीत विरघळते
इलाजच नस्ते!
एक दिवस सगळं सोळूनच जा लागते!!
आयुष्य आणि मरण यांच्या सीमारेषा पुसून कुठलाही आडपडदा न ठेवता बोरकरांनी किती साध्या-सोप्या भाषेत माणसाच्या गहनगूढ आयुष्याचे सगळे पदर ओघवत्या शैलीत उलगडले. माणूस वाचताना थक्क होतो. बोरकरांच्या जमिनीत खोलवर पाळेमुळे रुजवलेल्या अचाट प्रतिभेची दणकट प्रचिती येते. वाचल्यावर आयुष्यावरची सगळी रया क्षणार्धात उडून जाते. पतंगासारखा आकाशात उडणारा माणूस गपकन जमिनीवर येतो.
पुरुषोत्तम बोरकर जाताना अनेक प्रश्नांच्या मालिका मागे सोडून गेले. काही माणसं लेखनावर जगतात. काही माणसं लेखन जगतात. बोरकर लेखनासाठी जगले. बँकेतली पी.आर.ओ.ची नोकरी सोडल्यावर अनेक वृत्तपत्रांमधे नोकरी केली. या नोकरीत त्यांचं निर्मितीक्षम मन रमलं नाही. रमलं असतं तर ‘आमदार निवास रूम नं. 1756’, ‘15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी’ अशा अफलातून शीर्षकाच्या सकस कादंबर्या लिहिल्या नसत्या.
आपल्या कफल्लक, भणंग जगण्याचा त्रागा त्यांनी चुकूनही मांडला नाही. सृजनमस्तीत प्रपंचाच्या अडीअडचणींचा पाढा वाचला नाही. नवनवीन शब्दांची निर्मिती त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव. निर्मितीसाठी सतत अस्वस्थ असणारा हा अवलिया लेखक म्हणजे अस्वस्थतेचा लाटाळलेला समुद्र अचानक शांत झाला. मागे उरलं विजनवासाचं, उपेक्षेचं, भटकंतीचं रहस्य. सकस लेखनासाठी सर्वकाही उधळून टाकणारा कलंदरीपणा.
ग्रेस म्हणतात,
इथे कोणीतरी रचले होते
झिमझिम पाऊसगाणे
येता-जाता टाकीत होता
तो चिमण्यांना दाणे
हेही वाचा:
आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस
(लेखक हे कवी आहेत. हा लेख ग्रंथाली प्रकाशनाच्या शब्द रुची मासिकाच्या ऑगस्ट २०१९ च्या अंकात आलाय.)