करुणेचे कॉपीराईट्स : माती, नाती, नीती आणि अनुभुतीच्या कविता

१८ मार्च २०२३

वाचन वेळ : ९ मिनिटं


कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.

मला जेमतेम काठावरचा मुक्तछंद आणि तुटकी फुटकी गझल सोडून दुसरं काही लिहिता येत नाही. मी समीक्षक नाही. तो माझा पिंड नाही. त्याचमुळे मी आजपर्यंत कोण्या काव्यसंग्रहावर लिहिण्याची हिंमत केली नाही. हाडाचा वाचक म्हणून प्रतिक्रिया देण्याचा उद्देश बाळगून पेन उचललाय आणि पेन उचलायला भाग पाडणारा काव्यसंग्रह आहे 'करुणेचे कॉपीराईट्स' ज्याचे कवी आहेत वैभव भिवरकर.

आयुष्याच्या शाळेत सह्रदयतेनं जगण्याचा पाठ शिकवणार्‍या प्रत्येक करुणाकारास अर्पिलेल्या या काव्यसंग्रहात, 'कुठल्याही पुर्णत्वाची अपेक्षा न करता केल्या जाणारा आपला माणूस होण्याचा प्रवास म्हणजे कविता' ही व्याख्या सर्वार्थाने लागू पडेल असा हा विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केलेला १२८ पानांचा आणि एकूण ७६ काव्यरचना असलेला काव्यसंग्रह आहे.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

बाप जाणिवेचा, काळजाचा, काळजीचा विषय

माझा आजपर्यंतचा समज असाच राहिलाय की साहित्यातून बाप हा शब्द कायम उपेक्षित राहिलेला आहे. जो आला त्याने फक्त माय मांडली. कवी वैभव यांचा काव्यसंग्रह वाचला आणि शेवटी तो गैरसमज दूर झाला. माय जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे पण बापही जाणिवेचा, काळजाचा आणि काळजीचा विषय आहे, असं कवी मार्मिकपणे नमूद करतात. कवी आपल्या पहिल्याच कवितेत खंत व्यक्त करतात की,

'ज्याने आयुष्यभर जगण्याची मूक कविता लिहिली
त्याच्यावर लिहिलेल्या बोलक्या कवितेने मला रडवले
म्हणून मी आजही बापावर
बोलकी कविता लिहू शकलो नाही...'

या काव्यसंग्रहात कुठेच काल्पनिकतेला थारा दिल्याचं दिसत नाही. जे लिहिलंय ते कवीने स्वत:हून अनुभवलेलं, सोसलेलं, सभोवताली पाहिलेलं वास्तवच आहे. कवी कधी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात हे कळतही नाही. कवी मनकवडे आहेत की प्रत्येकाचा अनुभव एकसारखा आहे? कविता संग्रह वाचताना मला पडलेला भाबडा प्रश्न आहे.

'जिंदगीभर बापानं' या कवितेत कवीनं जो बाप मांडलाय तो बाप जशाच्या तसा माझ्याही वाट्याला आला आहे. शेतकरी दिवसभर राब राब राबून थकतो, तो घरी येतो, जेवतो आणि शांतपणे झोपतो या वाक्यातल्या 'शांतपणे झोपतो' यावर कवी सहमत नाही. कारण शेतकऱ्याच्या वाट्याला कधीच शांती नसते. तो कायम आपल्याच विचारत आकंठ बुडालेला असतो. त्याला भविष्याची चिंता खात असते. खाटेवर फक्त त्याचे डोळे बंद दिसतात पण डोक्यात सतत विचारांची नाव वेल्हावत असते.

पावसाने चाट दिली तरी चिंता. पाऊस जास्त झाला तरी चिंता. यातून बाहेर येऊन पीक घेतलंच तर त्याला सरकारकडून पाहिजे तसा हमी भाव मिळत नाही. स्वत: उपाशी राहून या जगाचं पोट भरण्याच्या आणि कुटुंबाच्या वाट्याला दु:खाव्यतिरिक्त कधीच काही येत नाही. वरून पावसाने टांग दिली तर कायम निराशाच त्याच्या पदरात पडते. कवी वाचकांना निशब्द करुन सोडतात की,

'वेड्याचा झटका यावा
तसा बाप रात्री बेरात्री उठायचा
पिकांना जगविण्यासाठी
पीकं मोठी होत होती
आणि बाप मात्र खंगत चालला होता
तणनाशक मारलेल्या
तणासारखा...'

निरक्षर आईचे संस्कार

कवी एका कवितेच्या दोनच ओळीत आईची महानता विशद करतात की,

'तुला फुटपट्टी लाऊन मोजावं
इतकी लहान नाहीयेस तू...'

जगातल्या कुठल्याच मापाने मायचं प्रेम, वात्सल्य, माया, ममता, आपुलकी मोजता येत नाही. म्हणूनच तिची जागा या जगात साक्षात देवालाही घेता येत नाही अर्थातच तो असेलच तर...! मी एक शेर लिहिला होता की, 'का उगा पूजा करू मी ईश्वराची? काळजी जर घेत आली माय माझी!' आपले शेणाचे हात पेनाला लागले नसते तर आपलं टॅलेंट आजही कुणाच्या घरचं टॉयलेट स्वच्छ करत राहिलं असतं, असे उच्च संस्कार कवीला त्यांच्या निरक्षर आईने दिलेत.

या काव्यसंग्रहातल्या मला आवडलेल्या कवितेपैकी सर्वोत्तम कविता 'लहानपणी अक्षरे गिरवायचो' या कवितेतल्या ओळी. तुमच्या आमच्या भारतातल्या सर्वांच्या जीवनाचा शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आणि चळवळीशी कृतघ्न झालेल्यांना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. माय लेकराला अक्षरं गिरवताना पाहून म्हणते की,

'ब-बाबासाहेबांचा
भ-भुकेचा
हा ब जर निधड्या छातीने
समोर उभा नसता नं
तर भ चा प्रश्न सुटलाच नसता लेकरा..
आमच्या गंजलेल्या आयुष्याच्या लोहपटावर
सुबक, सुस्पष्ट कोरलेले
सुंदर सुवर्णाक्षर
म्हणजे बाबासाहेब...'

'चष्म्याची' या कवितेत चौकात लावलेल्या एका राजकारण्याच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सकडे पाहून माय लेकराला म्हणते की, 'बाबू! अजून किती पेणार हायेत हे गरिबायचं रगत...'

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

माणुसकीचा प्रवास उलट्या दिशेनं

माणुसकी महागली आणि माणसाचं रक्त स्वस्त झालेलं आहे. ही व्यवस्था लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्यासाठी संविधान हटवून मनुस्मृती सारख्या अन्यायकारक धर्मग्रंथाला लागू करुन त्यानुसार देश चालवण्याच्या संबंधित उघड उघड बोलतायत.

व्यवस्था इथल्या बहुजनाला आपल्या पायतली खेटर समजत आलेली आहे. पण त्यांच्या प्रतिगामी विचारांना आग लावून पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. माणसांना माणसासारखे जगण्याचे अधिकार प्राप्त करून दिलेत. पण आज पुन्हा माणुसकीचा प्रवास उलट्या दिशेनं सुरू झाल्याचं दिसतं.

पुन्हा एकदा महामानवाचा वारसा पुढे न्यावा लागेल त्याशिवाय तरणोपाय नाही. याच कवितेच्या वाटत असलेल्या, व्यवस्थेला रोखठोक आव्हान देणाऱ्या 'तुला कारव्या वाटत असतील' या कवितेतल्या ओळीत कवी काय म्हणतोय बघा,

'पण लक्षात ठेव
मी बी आहे, नव्याने उगवेन
पेटून उठेन
फक्त तू हादरू नकोस म्हणजे झालं...'

बुद्ध पेरावाच लागेल

बाबासाहेब लिखित क्रांती प्रतिक्रांती पुस्तकातला सार म्हणता येईल 'कधी कधी वाटतं' या कवितेला जी थेट बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्म ग्रंथाची सुरवात करते.

'आम्हाला परत एकदा
उत्क्रांत व्हावं लागेल
आणि माणुसपण उगवायला
बुद्ध पेरावा लागेल'

वैचारिक माणसाला आज रक्तपात नको आहे. या विश्वाला शांती, समता, न्याय, बंधुता, प्रेम, अहिंसा हे विचार तत्व देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाची गरज आहे. 'जाणिवेच्या घरी' या अभंगात कवी म्हणतात

'जगाला जागाशी/हवे आहे युद्ध
बाबा चला बुद्ध/आणू घरी'

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

तरी माती बेईमान होणार नाही

'बरगड्या मोडत' या कवितेत कवीने 'हारलो पण अंत नाही' हे अधोरेखित केलंय. आमचं या व्यवस्थेशी विचारांचं युद्ध निरंतर चालणार आहे. आज भलेही हारलेलो दिसत असलो तरी उद्या आम्ही निश्चितपणे जिंकू असा आशावाद देताना कवी म्हणतात की,

'कित्येकदा लाथाडल्या गेलो पण हटलो नाही
तुकडे झालेत हजारो कापल्या गेलो
जाळल्या गेलो पण हरलो नाही
कारण मला विश्वास होता
माणसं कितीही बेईमान झालीत
तरी माती बेईमान होणार नाही'

हा काव्यसंग्रहच शेती-माती, नाती-गोती, नीती अनुभुतीवर आधारलेला आहे. कवी बी. फार्म. झालेले असून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी त्यांची शेतीशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. भूमिपुत्र म्हणून त्यांच्या शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आलेले भोग, शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती, सुखाला हुलकावणी देत दुखाचे हेलकावे खाण्याची अनुभूती असलेला हा कवी आपल्या कवितेत म्हणतो की, 'आपला जन्म फक्त पिढीजात हुंदक्यासाठीच झालाय म्हणून...?'

कवीनं 'मी' या कवितेत हे स्पष्ट केलंय की, आजचा माणूस माणसांपेक्षा दगडांवर जास्त विश्वास ठेवायला लागला. संत गाडगेबाबांच्या विचारांना तिलांजली देवून माणसातल्या देवाला सोडून दगडांची पूजा करतोय. यावर फार विचारमंथन करून ते या निष्कर्षावर पोचतात आणि पोटतिडकीतून लिहितात की, एकदाचा दगडाला पाझर फुटेल पण माणसाला जाणीव होणार नाही. माणसातली माणुसकी आता गळून पडलीय. माणूस जनावरासारखा वागू लागलाय. आता माणसांचा गाव गाव राहिला नाही, जंगल झालंय जंगल... 'किती सोप्पं असतं न कविते... माणूस होण्यापेक्षा दगड होणे'

पाचवीला पुजलेलं सत्य

'बॉस माझ्या इज्जतीची लक्तरे' या कवितेतल्या खालील ओळी वाचून मी गर्भगळीत झालो. कवी म्हणतात की, 'तरी सुद्धा मी गप्प बसतो... फक्त प्रश्न पोटाचा असतो म्हणून'

सर्वसामान्य माणसांचं जीवन या 'बॉस' नावाच्या शब्दाच्या दाबावाखाली पर्यायाने टीचभर पोटाच्या सवालासाठी कुणालाही जवाब मागण्याची हिम्मत होत नाही.

सर्वसामान्य माणूस केवळ आणि केवळ दोन सांजेच्या भाकरीसाठी अनेक जुलूम मुकाट्याने सहन करत आलाय. त्याच्या बोलण्यावर बंदी असायची नाही ती आजही आहेच. आजचं वर्तमानही त्याच्यापासून वेगळं नाही. वरतून बुक्की खालून लाथ हे पाचवीला पुजलेलं सत्य आहे.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

तलवारी आपोआप गळून पडल्यात

अभिव्यक्ती स्वतंत्र्याची होत असलेली गळचेपी आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. सत्तेची दहशत कवीने आपल्या कवितेतून उजागर केली आहे. पण कवी या गिधाड धमकीला भिणारे नाहीत. त्यांना मिळालेला घटनादत्त अधिकार ते वापरत राहतीलच किंबहूना ती आजच्या काळाची गरज आहे.

लेखणीवर व्यवस्थेची टांगती तलवार असली तरी लिहिण थांबणार नाही. समाजातल्या भल्याबुऱ्या गोष्टीचं प्रतिबिंब ते व्यवस्थेला दाखवतच राहतील. जीव घ्यायला टपलेल्या व्यवस्थेची जाणीव असूनही कवीच्या निर्भीडतेला सलाम कारावा. कारण कुठल्याही रक्तपाताशिवाय परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य लेखणीत आहे हे बाबासाहेबांनी या जगाला दाखवून दिलंय.

कवी सुद्धा त्या संघर्षाचा वसा पुढे नेण्यात यशस्वी होतील हे त्यांच्या कवितेतून ठळकपणे जाणवते. 'त्यांनी माझ्या' या कवितेत कवी म्हणतात की,

'मी शांतपणे
खिशात असलेली
लेखणी चालवत गेलो
आणि तलवारी आपोआप गळून पडल्यात...'

तथागत बुद्धाच्या करुणेपुढे अंगुलीमालाचं नतमस्तक होणं आणि लेखणीपुढे तलवारी गळून पडणं सारखंच.

लेकीवरची कविता वायरल होतेय

'फार हळव्या असतात पोरी' ही कविता महाराष्ट्रभर प्रचंड वायरल झाली. लेकीचं स्थान बापाच्या आयुष्यात किती मोठं आहे, हे सांगून जाणारी, आपसुकच पापणकाठ ओलावून टाकणारी उत्तुंग आशय असणारी ही कविता आहे.

'लेक घरी आल्याशिवाय
बापाचं सरण सुद्धा जळत नाही'

एका लेकीचा बाप म्हणून माझी आंतरिक इच्छा आहे की, ही कविता महाराष्ट्रासोबतच देशातल्या सर्व विद्यापीठात भाषांतरीत होऊन अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावी. कितीही मोठा आडदांड दगड मनाचा निष्ठूर माणूस ही कविता वाचून रडल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

विशाल संदेश देणारी कविता

वडलाच्या संपत्तीत मुलींना समान वाटा देण्यात यावा, या कायद्याच्या भयाने पुरुषसत्ताक समाजातल्या अनेक मुलींपासून बाप आणि बापापासून मुली दुरावल्यात. सख्खे बहीण भाऊ पक्के वैरी झालेत. या कायद्याचा अस्सल हेतू कुणीच समजायला तयार नाही. हा कायदा आमलात आणण्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.

फक्त भौतिक संपत्तीचा विचार करु नका. मुलगी ही तुमची नैतीक संपत्ती आहे. कन्यादान करता म्हणजे तुमचं सर्वस्व तुम्ही दुसऱ्याच्या अधीन करत असता. ती सासरी गेली म्हणजे तुमचं ओझं हलकं झालं असं नका समजू. माहेरातलं सगळं तिचंच असते. तुम्ही तिला घरातून काढता म्हणजे तुम्ही मनातून काढ्ता असा त्याचा अर्थ होत नाही. नातं पैशाने नाही तर मनाने बांधलेलं असतं, असा विशाल संदेश कवी या कवितेतून देऊन जातात.

गरजेच्या वेळी कुणी परके धावून येत नसतात. मदतीला धावून येणारे आपले असतात. असा समज असायचा आधी. पण हल्ली ती परिस्थिती राहिली नाही. आणि हे सगळं घडतेय केवळ संपत्तीच्या मोहापायी, बाप जाद्याच्या प्रॉपर्टीतून हिस्सा मिळविण्याच्या हव्यासापोटी. कवी एका अभंगात म्हणतात की,

'सुईच्या टोकास / उभं एक नातं
माझं गणगोत / काट्यावानी'

वाचकांना अंतर्मुख करणारा कवी

किती भन्नाट प्रतिक-प्रतिमांचा वापर केलाय ना! मुक्तछंद, अभंग या काव्यप्रकारासोबतच त्यांनी गझल हा काव्यप्रकार सुद्धा चांगला हाताळलाय. काव्यसंग्रहात एक द्वीपदी रचना दिसली. वाचली-आवडली. बघा किती सुंदर लिहिलंय, स्वर काफ़िया सोबत कसे सांगू हा रदीफ़ किती शिताफीने हाताळलाय.

देह नसतो देत ग्वाही - कसे सांगू?
श्वास करतो रोज घाई - कसे सांगू?
फोन कर अन सांग की ठीक आहे तू
वाट बघते रोज आई - कसे सांगू?
आकटे हाती  धरुनी स्वत: गेलो
एवढी केली कमाई - कसे सांगू?

प्रत्येक काव्यप्रकारात वाचकांना अंतर्मुख करुन सोडण्यात कवी यशस्वी झालेत. शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात विशाल आशय देऊन जाणाऱ्या कवितांची नवनिर्मिती करण्याची सृजनशीलता, सर्जनशीलता कवीकडे आहे. कवी आपल्या वाचकाला आपल्या शब्दात घट्ट बांधून ठेवतात.

काव्यसंग्रहाच्या पृष्ठाची मजबूत बांधणी केल्यामुळे नाही तर वैचारीक आशायानुरुप शब्दांची सांधणी केल्यानं चालतो. कवीनं आपल्या भूमिकेशी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत कुठेही तडजोड केलेली नाही. प्रत्येक कविता एक स्वतंत्र कादंबरी होईल इतका मोठा आशय त्यात लपलेला दिसून येतो.

कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून परखडपणे आपलं मत मांडतो. व्यवस्थेशी निर्भीडपणे भिडतो. त्यांची ही प्रखरता, निडरता त्यांना काव्यक्षेत्रात लीडर बनवते. वैचारिक अधिष्ठान असल्यानं कविता अधिकच प्रगल्भ झाल्याचं दिसतं. त्यांच्या लिखाणाची उंची उत्तरोत्तर अशीच वाढत राहो, अधिक प्रगल्भ होत राहो, हीच सदिच्छा व्यक्त करतो.

कवितासंग्रह : करुणेचे कॉपीराईट्स
कवी : वैभव भिवरकर
प्रकाशक : काव्याग्रह प्रकाशन
पानं : १२८ किंमत : २००/-

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह